ना. धों. महानोर यांचे या जगातून जाणे म्हणजे अस्सल मातीतून जन्मलेल्या साहित्यावर काळाने घातलेला वर्मी घावच. हा रानकवी रानात उगवला, वाढला आणि अखेरपर्यंत रानातच रमला. साहित्य आणि शेती या दोन्हीतही सहजपणे संचार करणारा हा कवी. त्यांच्या एका चाहत्याने त्यांना वाहिलेली ही रानफुलांची भावांजली.
– – –
ना. धों. महानोर यांची आणि माझी पहिली कविताभेट झाली ती बालभारतीच्या मराठी पाठ्यपुस्तकातून. ‘लक्ष्मणराव आपटे प्रशाले’त मी शिक्षक म्हणून कार्यरत होतो. मराठी आणि गणित हे माझे शिकवण्याचे विषय. पाठ्यपुस्तकात ‘या नभाने या भुईला दान द्यावे’ ही महानोरांची कविता शिकवण्याकरता होती. या कवितेने मला झपाटून टाकले. कवितेवर मनस्वी प्रेम असणारा मी, या छोट्याशा कवितेने अगदी भारावून गेलो. ‘कोणती पुण्ये अशी येती फळाला, जोंधळ्याला चांदणे लखडून जावे’ किंवा ‘गुंतलेले प्राण हे रानात माझ्या, शब्दगंधे तू मला बाहूत घ्यावे’ किती अर्थपूर्ण आणि भावपूर्ण या ओळी! त्यानंतर महानोर यांचे सर्व लिखाण, मग त्या कविता असो, गद्यलेखन असो मी वाचतच गेलो. त्यांच्या साहित्याने माझ्यावर गारुडच टाकलं.
या गारुडाला खरी ओळख मिळाली ती ‘जैत रे जैत’ या चित्रपटामुळे. जब्बार पटेल यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट. जब्बार यांनी मलाही यात काम करण्याची संधी दिली. चंद्रकांत काळे, कामिनी भाटिया, आणि मी- श्रीराम रानडे- आम्ही या चित्रपटात ‘नॅरेटर’ म्हणून काम केले आहे. यातील सर्व गीते महानोर यांनी लिहिलेली. हृदयनाथ मंगेशकर यांचे संगीत. लता मंगेशकर, आशा भोसले, उषा मंगेशकर, रवींद्र साठे, चंद्रकांत काळे आणि कोरस असा गायकांचा समूह. प्रत्यक्ष शूटिंगच्या वेळी वारंवार ऐकून ‘जैत रे जैत’ची सर्व गाणी आम्हाला तोंडपाठ झाली. चित्रपट कसा असेल याबद्दल आम्ही निश्चितपणे सांगू शकत नव्हतो, पण सगळी गाणी गणपती उत्सवात भाव खाऊन जाणार, अगदी हिट होणार, वारंवार वाजवली जाणार यावर आम्हा सर्व छोट्या-मोठ्या कलाकारांचे एकमत होते. काही गाणी तर आम्हा तिघांवर चित्रित केली गेली.
‘डोंगरकाठाडी ठाकरवाडी’, ‘मी रात टाकली’, ‘लिंगोबाचा डोंगूर आभाळी गेला’, ‘जांभूळ पिकल्या झाडाखाली’, ‘असं एखादं पाखरू वेल्हाळ’, ‘आम्ही ठाकर ठाकर’, ‘पीक करपलं’, ‘नभ उतरू आलं’ एक ना दोन. प्रत्येक गाणं लाजवाब! आजही हा चित्रपट आणि यातील एक से एक सुंदर गाणी ऐकवली जातात,गायली जातात आणि नवीन पिढीसुद्धा त्याचा मनमुराद आनंद घेते.
‘घाशीराम कोतवाल’ या नाटकाच्या प्रयोगादरम्यान आमच्या ‘थिएटर अकॅडमी’ या प्रायोगिक संस्थेतील कलाकारांना पळसखेड या महानोरांच्या गावी जाण्याची संधी गवसली. आम्ही जवळजवळ ३५ ते ४० जण एक दिवस महानोरांच्या गावी गेलो. तिथे शेती, फळबागा बघितल्या. शेतीवर चालणारे विविध प्रयोग पाहिले. नवीन कृषीसंशोधन कसं चालतं याचाही आम्हाला जवळून अनुभव घेता आला. फुललेली, फळलेली शेती बघून दिठी तृप्त झाली. शेतातल्या भल्यामोठ्या विहिरीवर आमच्यापैकी काहीजण डोळे लाल होईपर्यंत मस्त डुंबले. पोटात कावळे ओरडायला लागले तेव्हाच विहिरीतून वर आले आणि थेट महानोर यांच्या घरच्या माजघरातच सगळे जेवायला जाऊन बसले. मस्त झणझणीत बेत होता. मडक्यावर भाजलेले गरमगरम हे भले मोठे मांडे. दुधा-तुपाची रेलचेल. दाबून जेवलो. डोळे जडावले, गडद झोप केव्हा लागली कळलंच नाही. उठलो तेव्हा संध्याकाळ झाली होती. चहापाणी घेऊन पळसखेडे बघायला महानोर यांच्या बरोबर बाहेर पडलो. गावात फेरफटका घातला. रानातल्या कविता इथं उगवल्या ते गाव आणि ती शेतीवाडी बघून मन तृप्त झालं.
इतकी वर्षं झाली पण कालच घडल्यासारख्या या सार्या गोष्टी आठवतात. महानोरांच्या घरच्या लोकांनी केलेलं अगत्य, त्यांचं गाव आणि विशेष म्हणजे त्या दुधा-तुपाबरोबर खाल्लेल्या गरमागरम मांड्यांची चव अजूनही जिभेवर रेंगाळते आहे. शरद पवार, यशवंतराव चव्हाण, पु. ल. देशपांडे अशा अनेक क्षेत्रातल्या दिग्गजांनी आवर्जून महानोर यांचं पळसखेड बघितलं आहे. आम्हीही बघितलं याचा मला मनस्वी आनंद आहे.
‘एक होता विदूषक’ या सिनेमामुळे पुन्हा एकदा महानोरांची आणि आमची जवळीक साधली गेली. पु. ल. देशपांडे अनेक वर्षानंतर पुन्हा एकवार चित्रपटसृष्टीत आले. दिग्दर्शक जब्बार पटेल, संगीत दिग्दर्शक आमचा आनंद मोडक आणि गीतकार ना. धों. महानोर. एके रात्री जब्बार मला मोडकच्या घरी घेऊन गेला. मोडक त्यावेळेस पर्वती परिसरातील एका बिल्डिंगमध्ये छोट्याशा फ्लॅटमध्ये रहात होता. जब्बारच्या हातात फाईल होती. मोडक पेटी वाजवत आम्हाला काही गीते गाऊन दाखवत होता. ही चाल कशी वाटते, ती चाल कशी वाटते, हे शब्द बदलले पाहिजेत का, यात या ओळी घालूया का अशी चर्चा रंगात आली होती. जब्बारची आणि आनंदची अशी जुगलबंदी मी बघत होतो. मधूनमधून चहाची तलफ आली की मी बेधडक स्वयंपाकघरात घुसायचो आणि मला जसा जमेल तसा चहा करून आणायचो. महानोरांचे गीतांचे शब्द, त्यावर आनंदने चढवलेला स्वरसाज आणि त्याला जब्बारने दिलेली दाद मी ऐकत होतो. प्रत्यक्ष बघत होतो. रात्रीचे अडीच-तीन वाजले आणि त्या दिवशीची आमची बैठक संपली. त्यादिवशी भारावलेल्या स्थितीतच मी घरी परतलो.
गीतांच्या प्रत्यक्ष ध्वनीमुद्रणप्रसंगी मी अगदी थोडा वेळच का होईना मुंबईच्या स्टुडिओमध्ये होतो. आशाताईंच्या गाण्याची तयारी सुरू होती. स्टुडिओ रूममध्ये बसून महानोर एकाग्र होऊन लिहीत होते. त्यांची समाधी लागली होती. मला त्या दिवशी तिथेच थांबावं याची अनावर ओढ होती पण नाट्यदर्पणचा कार्यक्रम सायंकाळी रंगभवनला असल्यामुळे मी ध्वनीमुद्रण न अनुभवताच रंगभवनकडे गेलो.
जब्बारने मला ‘एक होता विदूषक’मध्ये तमाशा फडातल्या एका सहकार्याची भूमिका दिली होती. सर्व शूटिंग होईपर्यंत मी कोल्हापूरलाच होतो. मधु कांबीकर आणि लक्ष्मीबाई कोल्हापूरकर या नृत्यदिग्दर्शिका होत्या. शॉट ‘ओके’ होईपर्यंत गाण्याचा प्रत्येक तुकडा वारंवार वाजवला जायचा. त्यामुळे सगळी गाणी आम्हा सगळ्यांना तोंडपाठ झाली. ‘कुठे तुम्ही गेला होता सांगा कारभारी’, ‘लाल पैठणी रंग माझ्या चोळीला, तुम्ही यावं सजण रंग होळीला’, ‘शब्दांचा हा खेळ मांडीला तुझ्या कृपेवर ईश्वरा’, ‘यमुनेच्या काठावर दोरवा, जाळीमंदी झोंबतो गारवा’, ‘श्रावणाचं ऊन मला झेपेना’ अशी सगळी गाणी मला आपोआपच तोंडपाठ झाली. त्यातील दृश्यासकट आणि शूटिंग करताना घडलेल्या गमतीसकट, हालचालीसकट ही गाणी वारंवार ऐकल्यामुळे महानोर यांच्या कल्पनाविश्वाबद्दल, त्यांनी वापरलेल्या अस्सल ग्रामीण शब्दांबद्दल आणि रूपकांबद्दल मला अधिकच कुतूहल वाटू लागलं.
‘ जैत रे जैत’ घ्या किंवा ‘एक होता विदूषक’ घ्या. त्या गाण्यातील शब्दकल्पना, मांडणी इतकी विलक्षण वेगळी आहे की मराठी चित्रपट संगीतातील गीतरचनेपेक्षा महानोर यांची ही गीते सर्वस्वी वेगळी आहेत. ‘पिवळ्या रंगाचा पक्षी’, ‘अंग झिम्माड झालं’, ‘सावळचावळ चालती’, ‘यमुनेच्या काठावर दोरवा, ‘नभ उतरू आलं’, ‘वेल्हाळ पाखरू’, ‘जांभूळ पिकल्या झाडाखाली’ किती वेगळ्या प्रकारची आणि अस्सल गावरान शब्दरचना! महानोर, यामुळेच तुमचं गारुड आमच्यावर कायमचं आहे.
महानोर, तुमचं जाणं असं जिवाला चटका लावून गेलं. पण तुम्ही गेलात असं मी मानतच नाही. जोवर मराठी भाषा आहे, भाषेतील बोलीभाषा आहेत, चित्रपट संगीत आहे, साहित्य आहे, काव्य आहे तोपर्यंत आपण मराठी मातीच्या हिरव्यागार रानात सदैव जिते जागतेच आहात, चिरंजीव आहात!