दाग गुलामी का धोया है जान लुटा के
दीप जलाए हैं ये कितने दीप बुझा के
ली है आजादी तो फिर इस आजादी को
रखना होगा हर दुश्मन से आज बचा के’
या ओळीतून स्वातंत्र्याचे दुष्मन येत रहातील आणि त्यांच्यापासून देश वाचवा, असे आवाहन केले आहे. स्वातंत्र्याचे दुष्मन काही फक्त परराष्ट्रातून येत नसतात, तर देशातील हुकूमशहा देखील स्वातंत्र्याचे दुष्मन असू शकतात. लोकशाहीचे शत्रू देशांतर्गत देखील असू शकतात. जनतेने हुकूमशहाला ठणकावून सांगायला हवे की कालच्या बाता आता आम्हाला नको आहेत. उद्याचे भविष्य आम्ही स्वतः घडवू… छोडो कल की बातें, हे एक फिल्मी गाणे नाही, तर ते देशाचे जीवनगाणे आहे, असायला हवे.
– – –
दरवर्षी स्वातंत्र्यदिनाला म्हणजे १५ ऑगस्टला सर्वत्र देशभक्तीपर गाणी वाजत असतात आणि देशभर एक रोमांचकारी माहोल बनतो… यंदा देखील ‘सारे जहाँ से अच्छा,’ ‘मेरे देश की धरती’, ‘अब तुम्हारे हवाले है वतन साथियों’, ‘है प्रीत जहाँ की रीत सदा’, ‘ऐ वतन ऐ वतन’ यांच्यापासून ‘वंदे मातरम’ आणि ‘सुनो गौर से दुनियावालों’ यांसारखी गीते स्वातंत्र्यदिनी कानावर पडत होतीच. असेच एक गीत आहे ‘छोडो कल की बाते, कल की बात पुरानी…’ एरवी आपण सर्वांनी बर्याचदा ऐकलेलं हम हिंदुस्थानी या सिनेमातलं हे गाणं आज परत एकदा फक्त नीट ऐकण्याची गरज आहे. ६३ वर्षांपूर्वी या गाण्याने जो संदेश दिला होता, तो आजही लागू व्हावा, साक्षात देशाच्या भक्तघोषित विश्वगुरू वगैरे असलेल्या पंतप्रधानांनाही तो शिकवायला लागावा, हे दुर्भाग्यच या देशाचे. भूतकाळाचा जुना कोळसा उगाळत न बसता भविष्याचा वेध घ्या असा संदेश या गाण्याने देशवासीयांना तेव्हा दिला होता. सतत जुने आणि असंबद्ध असे काहीतरी उगाळत बसणारी आणि कायम राजकीय कावीळ झाल्याप्रमाणे सतत विरोधकांना (त्यातही काँग्रेसला) दूषणे देणारी रटाळ भाषणे करणार्या पंतप्रधान महोदयांनी ‘छोडो कल की बातें, कल की बात पुरानी, नये दौर मे लिखेंगे मिलकर नयी कहानी’ हा संदेश आता मनावर घ्यायला हवा. यापुढे रेडिओवर मन की बात लागल्यावर पाठोपाठ लगेच ‘छोडो कल की बाते…’ पण लावायला हवे. लोकांच्या हृदयाला हात घालणारं भाषण करण्याची कला साध्य झाल्यानंतर सतत भाषणात जुने संदर्भ, इतिहासातल्या कहाण्या, विरोधी पक्ष सगळे हरामी, अकार्यक्षम, आजवरची सरकारे फक्त खादाडपंथी आणि हे सत्यवादी राजा हरिश्चंद्रांचेच अवतार असा जो आक्रस्ताळा भडीमार गेली नऊ वर्षे पंतप्रधान करत असतात आणि त्यात भरीस भर म्हणून स्वतःच्या नामाचा जो जयघोष संसदेतल्या भक्तगणांकडून भाषणाच्या अध्येमध्ये करवून घेतात, या त्यांच्या आत्ममग्न प्रचारकी प्रयोगाला जनताच काय, भाजपाचे काही संसद सदस्य देखील कंटाळून गेले आहेत. मोदींच्या भाषणात कोणाचे लक्ष नसताना लपून जांभई उरकून घेण्याचा कार्यक्रम त्यांचेच पक्ष सदस्य करताना दिसतात.
१९६० साली ‘बासू पोरिबार’ या बंगाली चित्रपटाचा हिंदी रिमेक ‘हम हिंदुस्थानी’ या नावाने प्रदर्शित झाला. सुनील दत्त, आशा पारेख, जॉय मुखर्जी, प्रेम चोपडा, हेलन यांच्या भूमिका असलेला हा चित्रपट त्या काळात चांगलाच गाजला. या चित्रपटातूनच संजीव कुमारचे चित्रपट जगतात आगमन झाले. स्वातंत्र्यानंतर १३ वर्षांनी आलेल्या या चित्रपटातील नायक व त्याचे कुटुंब खडतर परिस्थितीत देखील सत्याच्या मार्गापासून ढळत नाही, अशा स्वरूपाचे कथानक चित्रपटात होते. तो काळ मूल्याधिष्ठित, सत्यमार्गाने जगण्यालाच सर्वोच्च मानण्याचा काळ होता. या चित्रपटाचे मुकेशने गायलेले शीर्षकगीत उषा खन्ना यांनी संगीतबद्ध केले होते. अनेक देशभक्तीपर गाणी लिहिणारे प्रेम धवन यांच्या सिद्धहस्त लेखणीतून ते उतरले होते.
छोड़ो कल की बातें, कल की बात पुरानी
नए दौर में लिखेंगे, मिल कर नई कहानी
हम हिंदुस्तानी, हम हिंदुस्तानी..
हा गाण्याचा मुखडाच भविष्यात कोणीएक नेहरूगंडग्रस्त मोदी सत्तेवर येतील आणि रोज जुनी मढी काढून रडत बसतील, हे ओळखणारी दूरदृष्टी बाळगून लिहिल्याबद्दल प्रेम धवन यांचे कौतुक करावे तितके कमी आहे. समाजासाठीची मार्गदर्शक तत्वे काही दरवेळी धर्मग्रंथांतून, धर्मगुरूंच्या, विद्वानांच्या, सुधारकांच्या अथवा नेत्यांच्या तोंडूनच यायला हवीत असा नियम नाही, तर ती एखाद्या चित्रपटाच्या गाण्यातील बोलात देखील दडलेली असतात. सतत काहीतरी जुने उकरून काढायचे आणि वितंडवाद घालायचे या आजच्या राजकारणाला जनता पार वैतागली आहे. कोणी दळभद्री, नादार इसमाने गांधींवर, नेहरूंवर, सावरकरांवर, औरंगजेबावर, पेशव्यांवर, आंबेडकरांवर, महात्मा फुल्यांवर किंवा छत्रपती शिवरायांवर काहीतरी बिनबुडाची भडकाऊ टिप्पणी करायची, त्यातून वाद निर्माण करायचे, भावना भडकवायच्या; जमले तर दंगल घडवायची, हा एक फंडा तयार झालेला आहे. मोगलांनी काय केले, मराठ्यांनी काय केले, निजामांनी काय केले, ब्रिटीशांनी काय केले, नेहरूंनी काय केले, इंदिराजी, राजीव, अटलजी, डॉ.मनमोहन सिंग या सर्व पंतप्रधानांनी काय केले अथवा काय नाही केले त्याचा आज ऊहापोह व्हायलाच हवा, पण तो तौलनिक अभ्यासाची बुद्धी आणि खोली असलेल्या इतिहासकारांनी आणि अभ्यासकांनी करायला हवा. आपल्या पक्षाचे २४ बाय ७ स्टार प्रचारक असण्यापलीकडे इतर काही फार मोठे साध्य करू न शकलेल्या पंतप्रधानांनी दर भाषणाच्या सुरुवातीला नेहरू, काँग्रेसची रूदाली गाणे हे काही बरे चिन्ह नाही. मोदींनी नेहरूंच्या नावे रोज बोंब ठोकावी इतके काही पंडितजी गये गुजरे नव्हते आणि भविष्यात मोदी काही नेहरूंच्या बरोबरीच्या पंतप्रधानांत मोजलेही जाणार नाहीत, शिवाय मोदी स्वत: काही नवे निर्माण न करता जे जुने मोडून खातायत, ते काँग्रेसनेच निर्माण केलेले आहे, हे वास्तव लक्षात घेता त्यांनी नेहरूंच्या आणि काँग्रेसच्या नावाने कंठशोष करणे थांबवले पाहिजे. साधा रिक्षावाला देखील रिक्षाच्या मागे आई वडिलांची पुण्याई असं लिहितो, पण स्वातंत्र्यलढ्यापासून देशाच्या कोणत्याही लढ्यात सहभागी नसलेल्या परिवाराचे हे आयत्या पिठावर रेघोट्या मारणारे भाजपचे विश्वगुरू देशातल्या लोकशाहीचा पाया मजबूत बनवणार्या नेहरूंना दूषणे देताना दिसत आहेत. ज्या ब्रिटिशांनी दीडशे वर्षे हा देश लुटला, देशाची वाट लावली, खुद्द पं, नेहरूंना १२ वर्षे तुरुंगात डांबले त्या ब्रिटिशांवर नेहरू कधी दिवसरात्र आगपाखड करत बसले नाहीत. ते स्वतःचा तुरूंगवास विसरून, जुने हेवेदावे विसरून नव्याने देशनिर्माणाच्या कामाला लागले. त्यांनी पोलाद उद्योग, वीजनिर्मिती, धरणे, रेल्वेमार्ग, इस्पितळे, आयआयटी, आयआयएम, अणुसंशोधन केंद्र अशी एक ना हजार चाके जोडून देशाचा खरोखरचा विकासरथ साकार केला. मी बघा कसे ब्रिटिशांना हाकलले आणि मी एकट्यानेच देशाचे स्वातंत्र्य आणले असल्या फुकाच्या गमजा त्यांना कधी माराव्या लागल्या नाहीत. सतत इव्हेंटबाजी करून चाराण्याच्या कामाचा शंभर रुपयांच्या आकाराचा बेंडबाजा वाजवायला लागला नाही त्यांना. त्या काळातल्या नेहरूंच्या लोकप्रियतेच्या पासंगालाही देशाच्या नंतरच्या कोणत्याही पुढार्याची लोकप्रियता पुरणार नाही; तरी ते लोकसभेत आले की काँग्रेसच्या खासदारांनी कधी ‘नेहरू, नेहरू’ असा ओंगळवाणा आणि थिल्लर गजर केला नाही.
पंडित नेहरूंच्या धडाकेबाज कामांकडे पाहूनच प्रेम धवननी गाण्यातील पुढचे कडवे लिहिले आहे, ते मोदींनी वाचले पाहिजे…
‘आज पुरानी जंजीरों को तोड चुके हैं
क्या देखें उस मंजिल को जो छोड चुके हैं
चांद के दर पर जा पहुंचा है आज जमाना
नए जगत से हम भी नाता जोड चुके हैं
नया खून है नई उमंगें, अब है नई जवानी
हम हिंदुस्थानी..’
आज देशात नुसतीच मन की बात होते, ठोस कृती होत नाही. चांद्रयानचे श्रेय स्वतः घ्यायचे तर घ्या, पण निदान शास्त्रज्ञांचे भारतीय नोबेल समजले जाणारे शांतीस्वरूप भटनागर पुरस्कार तीन वर्षे न देता दाबून ठेवू नका. मणिपूरबाबत अविश्वास ठराव आल्यावर देखील भाषणाच्या सुरवातीला मणिपूरवर न बोलता इतर विषयांवर हास्यविनोद करत दीड तास वेळ काढायचा, हे देशाचे पंतप्रधान देशातल्याच एका राज्यात पेटलेल्या हिंसाचाराबद्दल संवेदनशील असण्याचे लक्षण आहे काय? मणिपूरबाबत देश चिंतेत असताना हास्यविनोद कसे काय सुचतात? अर्थात, असे वागण्याचा दोष एकट्या पंतप्रधानांना का द्यायचा? त्यांच्या पक्षातले बाकीचे नेते तरी काय करत आहेत? आज कोठेही राजकीय चर्चा असो अथवा सोशल मीडियावर व्यक्त होणे असो; भाजपेयी मंडळी फक्त इतिहासातला कोळसा उगाळायचे काम इमाने इतबारे करत असतात. इतिहास आणि पुराणात जितके खणू तितके कमीच आहे. इतिहास बदलता येत नसतो, त्यातून शिकवण घेऊन फक्त भविष्य घडवता येते, हे सामान्यज्ञान सत्ताधीशांना नव्याने सांगायची गरज आहे का? इतिहासाचे खोदकाम, खाणकाम करताना त्यातून हिरे मिळाले तर तितकेच निवडून घ्यावे आणि बाकीचे दगड वा माती फेकून द्यावी, ते न करता इतिहासातील चिखलात मनसोक्त लोळत राहणे, हा गुणधर्म मानवप्राण्याला शोभा देत नाही. आपल्या पूर्वजांनी अजंठ्याची अप्रतिम लेणी कोरली, वेरूळचे कैलास लेणे घडवले, ताजमहाल घडवला ते पाहावे आणि आपण नव्या युगातले अजंठा आणि ताजमहल घडवावे.
‘हम को कितने ताजमहल हैं और बनाने
कितने हैं अजंता हम को और सजाने
अभी पलटना है रुख कितने दरियाओं का
कितने पवर्त राहों से हैं आज हटाने..’
गाण्यातील वरच्या ओळींत देशाने काय करावे हे सांगितले आहे. आज महागाई, बेरोजगारीचे पर्वतसमान अडथळे तातडीने हटवण्याची गरज आहे. आजचे सरकार ज्यांना मूर्ख ठरवते त्यातील एखादा जरी मूर्ख म्हातारा आज जिवंत असता तर हे पर्वत कधीचेच हटले असते. सरकार ज्यांना मूर्ख म्हातारे म्हणते ते ध्येयवेडे होते. परदेशात चांगली चालणारी वकिली सोडून या देशात येऊन देश स्वतंत्र करायचा ध्यास घेणारे गांधीजी असतील, स्वतःच्या प्रचंड बुद्धिमत्तेवर परदेशात नाव कमावले असूनही तिथे कायमचे स्थायिक न होता मायदेशात येऊन स्वतःच्या दलित समाजाच्या उद्धारासाठी झटणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर असतील, प्रचंड ऐश्वर्य आणि संपत्ती सोडून १२ वर्षं तुरूंगात जाणारे पंडित नेहरू असतील… हे सगळेच ध्येयवेडे होते.
चीनमधे एका ध्येयवेड्या म्हातार्याची पुराणकथा सांगितली जाते. यू प्रांतातील तैहांग आणि वांगवू जोडपर्वतांच्या पायथ्याशी राहणार्या एका ९० वर्षांच्या म्हातार्याने उतारवयात पर्वतातून रस्ता करण्याचा निश्चय केला. म्हातारपणी त्याने कुदळ, फावडे, टोपले घेऊन एकट्याने ते पर्वत खोदण्यास सुरुवात केली. त्याच्या एकट्याच्याने उरल्या आयुष्यात हे कार्य इंचभर देखील पुढे सरकणे अशक्य आहे हे प्रत्येक जण त्याला समजावून सांगायचा, पण तो म्हातारा ऐकत नव्हता. त्याला बहुतेकांनी मूर्ख म्हाताराच ठरवले होते. कधी हालणार तुझे डोंगर, असा हेटाळणीखोर प्रश्न विचारला गेल्यावर म्हातारा बाणेदार उत्तर द्यायचा की त्याच्याकडून हे कार्य स्वतःच्या आयुष्यात पूर्ण झाले नाही तरी त्याच्या मुलांनी आणि नातवांनी आणि अशाच अनेक पिढ्यांनी धीर धरून हे काम सातत्याने केले, तर एखाद्या दिवशी दोन्ही पर्वत नक्कीच हटवले जातील आणि त्यानंतरच्या भावी पिढीचे तरी भले होईल. देशनिर्माण हे असे ध्येयवेडे होऊनच करायचे असते. चीनच्या त्या वृद्धाच्या कठोर परिश्रमाने आणि चिकाटीने स्वर्गातील देवतांना प्रभावित केले आणि देवतांनी प्रसन्न होत पर्वत तात्काळ दूर केले असा कथेचा शेवट आहे. या कथेचा संदर्भ देत चेअरमन माओने १९४५ साली केलेल्या भाषणात चिनी लोकांवरचे साम्राज्यवाद आणि सरंजामशाही हे दोन पर्वतसमान अडथळे असेच हटवू हे सांगितले होते. माओने त्या ध्येयवेड्या म्हातार्याला आदर्श मानले पण आपले पंतप्रधान मोदी मात्र सतत या देशातील ध्येयवेडे म्हातारे कसे चुकीचे होते, याचंच रडगाणं गातात. जनतेने आता जागे होऊन यापुढे स्वतःच देशनिर्माणात लक्ष द्यायला हवे. ते शक्य आहे.
आओ मेहनत को अपना ईमान बनाएं
अपने हाथों से अपना भगवान बनाएं
राम की इस धरती को गौतम की भूमी को
सपनों से भी प्यारा हिंदुस्तान बनाएं
असे प्रेम धवन यांनी सांगितले आहेच. पण हा तेव्हाच्या ध्येयवेड्यांच्या स्वप्नांतला आधुनिक संवेदनांचा, भारतीयत्व सर्वोपरी मानणारा प्रिय हिंदुस्थान काही आजही बनलेला नाही. किंबहुना तो तसा बनू नये, यासाठी आजचे सत्ताधीश राबताना दिसत आहेत. एकीकडे आपण (निव्वळ अर्थव्यवस्थेच्या आकाराच्या आधारावर) तिसरी आर्थिक महासत्ता बनणार आहोत (जगातल्या सर्वाधिक लोकसंख्येच्या देशासाठी यात कौतुकास्पद काय आहे?) आणि त्याचवेळी जगातील सर्वात गरीब लोकसंख्येत आपण आघाडीवर असणार आहोत. देशातील दहा टक्के लोकांच्या घरात ऐश्वर्य आणि ९० टक्के जनतेकडे अंधार अशी संपत्तीची असमान वाटणी आहे.
दाग गुलामी का धोया है जान लुटा के
दीप जलाए हैं ये कितने दीप बुझा के
ली है आजादी तो फिर इस आजादी को
रखना होगा हर दुश्मन से आज बचा के’
या ओळीतून स्वातंत्र्याचे दुष्मन येत रहातील आणि त्यांच्यापासून देश वाचवा, असे आवाहन केले आहे. स्वातंत्र्याचे दुष्मन काही फक्त परराष्ट्रातून येत नसतात, तर देशातील हुकूमशहा देखील स्वातंत्र्याचे दुष्मन असू शकतात. लोकशाहीचे शत्रू देशांतर्गत देखील असू शकतात. हुकूमशहा सगळे प्रश्न स्वतः एकटे सोडवू शकतो अशी बतावणी करत सत्तेत येतात आणि जनताही राजकीय अंधश्रद्धेची बळी ठरते. जनतेने अंधश्रद्धेतून बाहेर पडून भविष्याचा विचार केला तरच हुकूमशहा संपतो आणि खरोखरचे अच्छे दिन येऊ शकतात. हुकूमशहा जुन्या गोष्टी सांगून सतत भीती घालत राहतो, तेव्हा जनतेने मात्र त्याला ठणकावून सांगायला हवे की कालच्या बाता आता आम्हाला नको आहेत. उद्याचे भविष्य आम्ही स्वतः घडवू… छोडो कल की बातें, हे एक फिल्मी गाणे नाही, तर ते देशाचे जीवनगाणे आहे, असायला हवे.