एखाद्या संघटनेचं किंवा राजकीय पक्षाचं मुखपत्र असणं, ही एक नेहमीची गोष्ट. पण एका साप्ताहिकातून एक संघटना आणि नंतर राजकीय पक्ष उभा राहणं, ही अपूर्व गोष्ट शिवसेनेच्या बाबतीत घडलेली दिसते. १९६० साली मार्मिकची स्थापना झाली. त्यातून मराठी बाण्याचा विचार रुजला आणि १९६६ साली शिवसेनेची स्थापना झाली. मुंबईतल्या, महाराष्ट्रातल्या स्थानिक मराठी माणसाच्या न्याय्य हक्कांसाठी लढण्याची सुरूवात झाली. पण हे सहज घडलं नव्हतं. त्याचा पाया बरोबर ४० वर्षं आधी प्रबोधनकार ठाकरे यांनी रचला होता. प्रबोधनकारांनी पाक्षिक प्रबोधनमधून मराठी माणसांवर होणार्या अन्यायाला पहिल्यांदा वाचा फोडली होती. स्थानिक लोकाधिकाराच्या विचारधारेचा तो ओनामा होता.
– – –
प्रबोधनकार तेव्हा दादरमधल्या मिरांडा चाळीत राहत होते. त्या इमारतीत त्यांचे दोन ब्लॉक होते आणि बाकीचे आठ ब्लॉक दक्षिण भारतीयांचे होते. या मद्रासी शेजार्यांची दादागिरी त्यांनी जशास तसं उत्तर देऊन मोडून काढली होतीच. पण हा फक्त व्यक्तिगत प्रश्न नव्हता. तो मराठी माणसावर होणार्या अन्यायाचा प्रश्न होता. कारण मराठी चाकरमान्यांच्या नोकर्यांवर होणारं मद्राशांचं आक्रमण ते बघत होतेच. त्यांनी त्याच्याविरुद्ध पहिला आवाज उठवला. १६ जून १९२३च्या अंकात त्यांनी तीन सणसणीत स्फुटलेख लिहिले. `मद्राशांचा सुळसुळाट`, `स्थानिक रहिवाशांचा कोंडमारा`, `मद्रासी आणि महाराष्ट्रीय`, `मद्राशांचा बोजा मुंबईवर कां?` ही त्यांची शीर्षकं वाचली, तरी त्याचं स्वरूप लक्षात येतं. भविष्यकाळात महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासाला या लेखांनी महत्त्वाचं वळण लावलं आहे. त्यामुळे हे लेख नव्याने वाचकांसमोर येणं गरजेचं आहे. म्हणून यातले पहिले तीन लेख प्रबोधनकारांच्या शब्दांत जवळपास जशाच तसे मांडले आहेत.
मद्राशांचा सुळसुळाट
मारुती, म्हसोबा, मदिरा आणि मारवाडी असे चार मकार कितीक वर्षे महाराष्ट्राच्या बोकांडी बसलेले आहेत. दहा बारा झोंपड्यांचें एखादें खेडें का असेना, तेथें हे चार मकार असायचेच. पैकीं मारुती आणि म्हसोबा कधिमधीं एखादा नारळ व आणाफद्याचा शेंदूर फांसला कीं गप्प बसतात; पण मदिरा व मारवाडी या दोन मकारांचा फांस माणसाच्या मानेला मृत्यूचा फांस पडल्याशिवाय सुटत नाहीं. मारवाडी मदिरेला शिवत नाहीं, पण माणसानें मदिरेची मनधरणी केली की त्याच्या सर्वस्वानें मारवाड्याची घरभरणी आपोआप होते. मदिरेचा एकच पेला पोटांत गेला कीं तो माणसाला जसा अखेर बिनशर्त जिवंतपणींच ठार मारतो, तद्वत् मारवाडी कर्जाचा एकच रुपया बिनशर्त वाटेल त्या शहाण्याच्या घरादाराची राखरांगोळी केल्याशिवाय रहात नाहीं.
या मकारांत अलीकडे मद्राशी मकाराची पांचवी भर पडली आहे. हल्ली महाराष्ट्रांतल्या पुणे-मुंबईसारख्या शहरांत या मद्राशी नाज्जुंडारावांचा एवढा भयंकर सुळसुळाट उडालेला आहे की सांगता पुरवत नाहीं. दादर माटुंगा व माहीम तर मद्राशांनीं इतकें भरून गेलें आहे कीं नासकें नारींग सहजगत्या घरांतून सडकेवर भिरकावलें तर तें अचूक एखाद्या मद्राशाच्याच आंगावर पडलें पाहिजे. सन १९०९पर्यंत दादरला मद्राशी वस्ती तुरळक होती. गेल्या १५ वर्षांत ती शेकडा दोनशेंपट वाढली आहे. दररोज २५/२५ मद्राशाची टोळी नियमांत इकडे येतांना पाहिली की असे वाटतें, मद्रास इलाख्यांत काय एखादा भयंकर आजार उद्भवला आहे, दुर्गादेवी दुष्काळ बोकाळला आहे की प्रजोत्पादनाचा निसर्गाचा नियम भरंसाट बेताल झाला आहे, झाले तरी काय? सगळा इलाखाचा इलाखा इकडे कां जीव घेऊन पळत येत आहे?
प्रथम प्रथम हे लोक अशा गप्पा मारीत कीं ते मोठ्या श्रीमंत सावकारांचे बेटे असून बापाशीं किंवा भावांशीं किंवा दुसर्या कोणा माणसांशीं पटत नाहीं, म्हणून इकडे आले. पुढें जेव्हां यांच्या टोळ्या भराभर हजारोंनी ट्रेनी भरभरून दादरला उतरूं लागल्या, तेव्हां या बेगडी सावकारपुत्रांच्या गप्पांवर कोणी विश्वास धरी ना! अखेर आतां तर ते स्पष्टच बोलतात की मद्रास इलाख्यांत त्यांच्या पोटापाण्याची धड सोयी लागत नसल्यामुळे ते इकडे येतात. एका मद्राशाने आम्हांला उत्तर दिलें की तिकडे ब्राह्मणेतर चळवळ फार जोरांत चालू असल्यांमुळे सर्व ब्राह्मण इकडे पोट भरण्यासाठीं येत आहेत. कोणी कांहीं कोणी कांही वाटेल तें सांगून वेळ मारून नेतात. सारांश, मागे १८९६ सालच्या दुष्काळांत जसें काठेवाड्यांचे पेंब महाराष्ट्रांत फुटलें होते, तसे हे आतां मद्राशीं पेंढार मुंबईच्या व मुंबई इलाख्याच्या बोकांडी बसलें आहे.
स्थानिक रहिवाशांचा कोंडमारा
बरें, इकडे येणारा मद्राशी तरूण म्हणजे कांही विशेष बुद्धिमत्तेचा बृहस्पति असतो असे मुळींच नाहीं. अगदी रेम्याडोक्या असतो. विशेष कांहीं असेल तर प्रत्येकजण मात्र शॉर्टहॅन्डचा थोडा रटफ अभ्यास करून येतो. मद्राशी आणि मारवाडी हे दोघे एकाच गोत्राचे व एकाच सूत्राचे दिसतात. मारवाड्याप्रमाणेच मद्राशीहि येतो तेव्हां वस्त्रहीन कळाहीन व द्रव्यहीन येतो. त्याची ती लांबलचक शेंडी, ढुंगाचें तें एकच पटकूर, हजामत वाढलेली, हातांत एक लोट्या व एक बारीकसें एखादें गाठोडे, अशी ही स्वारी कोणाचा तरी पत्ता काढीत येते. आम्ही राहतो ती मिरांडाची चाळ म्हणजे पत्ता मिळण्याचें सदर स्टेशन. नंतर एखाद्या खोलींत ही स्वारी घुसते व तास दीड तासाच्या अवधींतच शॉर्टहॅन्डचे नोटबुक घेऊन किंवा अर्जांची भेंडोंळीं खरडीत बसलेली दिसते. मग हजामत वगैरे करून, कोणाचा काेट कोणाची टोपी मिळवून कोणाच्या तरी बरोबर फोर्टात भटक्या मारायला जाते. एक दोन दिवसांतच स्वारी कोठेंतरी चिकटते. मग आस्ते आस्ते एक दिवस शेंडी गुप्त होते. ढुंगणाचें फडकें जाऊन एक फॅशनेबल पँट येते. कोट स्टॉकिंग्ज बूट नेकष्टाय वगैरे साहित्य पहिल्याच महिन्याच्या पगाराला तयार होऊन स्वारी नखशिखांत बाँम्बेटैप जंटलमन बनते. मग त्याची ऐट, त्याच्या हापिसांतल्या गप्पा, त्याच्या जिभेवर अखंड नाचणारी मुंबईतील कंपन्यांच्या नामावळीची जंत्री, वगैरे थाट कांहीं विचारू नये! कीटकाचा पतंग व्हायला तरी वेळ लागतो; पण मद्राशी लोट्या बहाद्दराला अपटूडेट जंटलमन बनायला अवघा महिना बस्स होतो.
मद्राशी लोक मुंबईला येण्यापूर्वी येथे नोकरी करणार्यांचीं काहीं बूज असे. विशिष्ट कलेच्या माणसालाही पगार चांगला मिळे. साधारण शॉर्टहॅन्ड शिकलेला माणूस शंभर रुपयांच्या खालीं पगार घेत नसे. पण ही मद्राशी टोळवाड येथें कोसळल्यामुळे सगळाच चिवडा झाला आहे. ‘उत्तम शॉर्टहॅन्ड टैपिष्ट ५० रुपयाला पाहिजे’ म्हणून आतां जाहिराती लागतात. सारंभातंवर राहणार्या मद्राशांनी सगळीकडे एकच गर्दी करून नोकरीची किमान किंमत तिरस्करणीय केली आहे. शंभर रुपये पगाराच्या जागेवर ४० रुपयांत संतुष्ट राहणारा मद्राशीं जर न बोलवतां ‘याऽऽस साऽऽर’ करून दरवाजाशींच भेटतो, तर कंपन्यांना काय? देवच पावला. कमी मजुरीवर पुष्कळ राबणारा बैल कोणाला नको?
अशा रीतीनें मुंबईची नोकरदारी मद्राशी पाहुण्यांनीं आज पार बिघडून टाकली आहे. याचा परिणाम येथील स्थाईक व कुटुंबवत्सल नोकरदारींच्या लोकांवर अत्यंत अनिष्ट झाला आहे व नित्य होत आहे. मुंबईला साधारण स्थितींतल्या स्थायिक दक्षिणी हिंदूचा संसार जेमतेम शंभर रुपयांत कसातरी भागतो. मद्राशी सडेसोटाची तीस रुपयांत दिवाळी होते. सगळ्या नोकर्यांच्या जागा हेच अडऊन बसल्यामुळे दक्षिणी संसार्यांची तारांबळ अत्यंत करुणास्पद झाली आहे. या गोष्टी कोणी स्पष्ट बोलत नाहींत, पण वस्तुस्थिती काय आहे याची चौकशी करण्याचा प्रसंग आता आला आहे.
जी गोष्ट नोकर्यांची, तीच राहत्या जागांची. मुंबईस जागांची भाडीं इतकी बेसुमार भडकलीं आहेत की ढेंगभर जागेला द्यावे लागणारे रुपये पूर्वी मामलतदाराच्या पगाराला पुरत असत. भाडें कितीहि जबरदस्त असो, नवीन चाळ झाली रे झाली की मद्राशी त्यांत घुसलेच. सारेच सडेसोट असल्यामुळे १० बाय १२च्या दोन खोल्यांच्या गाळ्याला ५० ते ६० रुपये भाडें पडलें, तरी त्यांत १०-१२ टोळभैरव खुशाल घुसतात आणि प्रत्येकाला ५-६ रुपये भाडें पडल्यामुळे कोणाला फारसा चट्टाहि लागत नाहीं. पण चाळींतल्या गाळ्यांचें भाडें दरमहा ४० ते ६० रुपये ठरल्यामुळे आणि तें घरवाल्याला मिळू लागल्यामुळे इतर हिंदू संसार्याला एक गाळा भाड्यानें घेणे म्हणजे प्राणान्तीचा प्रश्न वाटतो. घरवाल्यांना काय? भाडेकरी मद्राशी असो, नाहींतर कुणी असो, त्याचे ५०-६० रुपये उकळले म्हणजे झालें! आज मुंबईला जी भाड्यांची भरंसाट चणचण उडाली आहे, तिला कारण ही मद्राशी टोळधाडच होय.
एकेका खोलींत दहा दहा पंधरा पंधरा टोळभैरव पडलेले असतात. दादर माटुंगा व माहीमच्या जागांना पांच वर्षांपूर्वी जें भाडें होतें, तेंच आज या मद्राशी सुळसुळाटामुळें पांचपट वाढलें आहे. याचा परिणाम येथील स्थानिक संसार्यांवर किती भयंकर झालेला आहे, याची कोणी चौकशी करील, किंवा आमचे महाराष्ट्रीय बंधूच आपले तोंड उघडून स्पष्ट बोलू लागतील, तर आमच्या विधानांची सत्यता प्रगट होईल. मुंबईतला पोटापाण्याचा प्रश्न आतां अगदीं कमालीचा ताणला गेला आहे आणि याला कारण मद्राशांचा सुळसुळाट होय.
मद्राशी आणि महाराष्ट्रीय
आचारविचार किंवा संस्कृति या किंवा कोणत्याहि बाबतींत या दोन समाजांत कसलेंहि साम्य नाहीं. दोघांच्याहि भाषा दक्षिणोत्तर भेदाच्या. मद्राशी लोकांची जेवण्याची विचित्र तर्हा, त्यांची चमत्कारीक रहाणी, इत्यादि प्रकार महाराष्ट्रीय आचारविचारांशीं इतके विसदृश व सामन्यतः किळसवाणे असतात कीं यामुळे पुष्कळ वेळां या दोन समाजांतील शेजार्या शेजार्यांत भांडणे लागतात. या लोकांना स्थानिक प्रश्नांबद्दल किंवा इतर कांहीं गोष्टीबद्दल मुळींच कळवळा वाटत नाहीं. ते नेहमी अशा एकलकोंड्या वर्तनानें रहात असतात की सर्वसामान्य अडीअडचणीच्या प्रसंगी सुद्धा त्यांचा पुरस्कार स्थानिक महाराष्ट्रीयांना लाभत नाही. ‘मनि इज देअर गॉड’ पैसा त्यांचा देव तो मिळाला की त्यांना इतर कोणचीहि पर्वा नसते.
सारांश, सर्वच बाबतीत हे लोक महाराष्ट्रीय रहिवाश्यांपासून निसर्गत:च भिन्न असल्यामुळे, त्यांच्या वर्तनांत दिसून येणारा तुसडा एकलकोंडेंपणा आज स्थानिक हिंदूंच्या सामाजिक जीवनांत बेपर्वाईचं बीज पेरण्यास कारण झालेला आहे. सारांश, मद्राशी आणि महाराष्ट्रीय परिस्थितीच्या दणक्यामुळे एकमेकांच्या कितीहि सन्निध आले, तरी त्यांच्या सुखदुःखांत किंवा परस्पर प्रेमभावनांत, एकतानता राहूंच द्या, पण एकसूत्रताहि येऊं शकत नाहीं. सर्व गोष्टींचा बारकाईनें विचार केला तर आतां मद्राशी वस्तीची बेसुमार वाढ म्हणजे मुंबईला एक डोईजड परचक्रच होऊन बसलें आहे, याचा महाराष्ट्रीयांनीं शुद्धीवर येऊन विचार करावा.