(वाडीच्या शिवेवर कुणा निरपराध्यांचं मांस खात बसलेला हुकूमशहा लोकशाहीला बघून शीळ घालत वाट अडवू जातो.)
हुकूमशहा :- बाई, तुम्ही कोण हो?
लोकशाही :- बाई, बाईमाणसाला पाहायची ही रीत असते का?
हुकूमशहा :- अहो, मी जन्मतःच खालमुंडी आहे, कंपनी फॉल्ट. मेड इन चायना, इंस्पायर्ड बाय पीपल्स रेड आर्मी.
लोकशाही :- पण तुम्ही माझ्याच वाटेत का आलात?
हुकूमशहा :- बाई, तुम्ही खुशाल गैरसमज करून घ्या, पण, आम्ही वाटेवरच पडलेले लोक! बेवारस म्हणा ना?
लोकशाही :- पण मला का अडवलंत?
हुकूमशहा :- घ्या आता! तुम्ही डोळा हाणला म्हणून मी लगट करायला आलो ना? नाहीतर आपल्या बेचाळीस पिढ्या बाई नावाच्या जातीशी बोलल्या नाहीत.
लोकशाही :- मी बापडी माझ्या वाटेनं चाललेय, मी का डोळा मारू?
हुकूमशहा :- अहो, तुम्ही एक खोटं बोलाल हो! मी हजार बोलू शकतो! ते पण एकदम सोफीस्टिकिटेड. पहिल्या धारेचं प्युअर! तुम्हाला नाही जमायचं ते! मी बघितलं म्हणून हातात चार मुंडके असताना ते कापायचे सोडून धावलो हो इकडे!
लोकशाही :- फार तर डोळ्यात चाचनं गेली असतील म्हणून लवला असेल डोळा…
हुकूमशहा :- डोळा म्हंटला तर लवायचाच नि… ते पाहून आमचा तोल जायचाच. पण नुस्ता डोळा लवला असता तर एकवेळ ठीक होतं हो! पण चक्क तुम्ही गालात मुरकलात हो?
लोकशाही :- काहीतरीच काय? तुम्हाला भास झाला असेल.
हुकूमशहा :- असू शकतो! तशीबी आई मला भासमार्याच म्हणायची. पण का हो, तुमचं लग्नं झालंय का?
लोकशाही :- हे बाई काय विचारणं झालं का? सत्तर वर्षांत मला कुणी असं विचारायचं धाडस केलं नाही! तुम्हाला काही लाज?
हुकूमशहा :- लाज? मला? बाई मी जन्मतः निर्लज्ज आहे! एकदम सर्टीफाईड! लाज हा शब्द मला घाबरून असतो!
लोकशाही :- माझी वाट सोडा बघू!
हुकूमशहा :- बाई मी धरायच्या येळी सोडत नसतो हो!
लोकशाही :- काय?
हुकूमशहा :- चानस!! मी तुम्हाला प्रपोज करायला आलो अन् तुम्ही घायवतड अश्या निघाल्या कुठं? मला जोराचं लग्नं आलंय हो!
लोकशाही :- आमच्या देशात आताशा किमान भिकारभंगार संडास गल्लोगल्ली दिसतात. मग ते पडीक का असेनात. तिथं बसून तुम्ही ‘कळा’ देऊ शकतात! आणि जोवर नळ पाणी देत नाही तोवर उठू नका.
हुकूमशहा :- कळा द्यायचं मला सांगू नका हो! कळ सोसतच इथंवर आलोय मी! मी तुम्हाला कायतरी सिरीयस सवाल केलेला हो! त्यावर बोलायचं सोडून तुम्ही मला चारदा बसवून तीनदा हिसळून आणलंत!
लोकशाही :- एवढ्यात माझा काही लग्नं करायचा विचार नाहीय.
हुकूमशहा :- पुढल्या वर्षी करा की, मुहूर्त चांगलाय २४चा!
लोकशाही :- त्यात आपले नातेसंबंध कुठंय?
हुकूमशहा :- आला ना जातीवर? अहो रस्सीयाचा म्हणजे तुमच्या मोठ्या बहिणीचा पती पुतीन माझा भाऊचं. झालंच तर ज्या सोव्हिएतच्या वाटपात ठिकर्या झाल्या, त्याच्या काही ठिकर्यांवर माझे बंधू तुमच्या भगिनींसोबत संसार थाटून आहेत. आणखी किती नाते सांगू? डेमोक्रसीच्या माथी आमच्याच खानोट्याचं कुंकू लागलंय!
लोकशाही :- पण बाई…
हुकूमशहा :- त्यात तुमच्या कपाळावर बिंदी, नाकापर्यंत पदर असला तर काय शोभून दिसंल हो?
लोकशाही :- मला अश्या कुठल्याही बंधनात अडकायला आवडायचं नाही.
हुकूमशहा :- लग्नाआधी तुमच्या बहुतेक भगिनी देखील अश्याच बाता झोडायच्या. आता मात्र गरीब गायीसारखी सैपाकघराची झाडलोट बघतात त्या!
लोकशाही :- तरीही मी अशीच स्वतंत्र बरी! कुणी भेटलं तर चारेक वर्षे लिव्ह-इन मध्ये राहते, जीव उबगला की नात्यास मूव्ह ऑन म्हणावं!
हुकूमशहा :- बाई, तुम्ही कशात बी र्हा! पण पटत असंल तर मला ‘ठेवा’ की!
लोकशाही :- काय असभ्यपणा आहे हा? तुम्ही तुमची मर्यादा ओलांडताय!
हुकूमशहा :- तुमचं लक्ष असणार कसं म्हणा? मी केव्हाच तुमच्या साडीला हात लावलाय, हा बघा हाती पदर! कपाळाला अल्लाद कुंकू लावलंय, माझ्या नावाचं! तुमची पोरं मांसाचे तुकडे देऊन फितवलीत! ती आता टाळ्या पिटीत हाडं फोडताय. बाई आता २४च्या जत्रेत गावाम्होरं तुमच्या गळ्यात डोरलं घातलं का तुम्ही कितीबी नाही म्हणा, नाही तुम्हाला पाय दाबायला ठ्युवलं तर नाव लावायचो नाही!!