जो फक्त आपल्या मनाचंच बडबडत बसतो, इतरांचं काही ऐकूनच घेत नाही, त्याला काय म्हणतात?
– रोशन तांबोळी, मिरज
जे इतरांचं ऐकून घेत नाहीत ते माझं उत्तर वाचतील? उगाच कोणाचं नाव घ्यायचं आणि त्या आडनावाच्या समाजाच्या भावना दुखावल्या म्हणून त्या आडनावाचा कोणी तरी केस करायचा?… म्हणजे प्रश्न विचारण्यामागची तुमची आणि उत्तर देण्यामागची माझी, अशा आपल्या भावना.. मिरजेच्या फाट्यावर!
मला रात्री झोपेत कधी गाय, तर कधी म्हैस, तर कधी कुत्रा असे प्राण्यांचे आवाज काढण्याची सवय लागली आहे… मी काय करू?
– पवन होळकर, सातारा
काहीही करू नका. फक्त तुमच्या बाजूला झोपलेल्यांचं भान ठेवा.
आपलं दुसर्याच कोणा मुलीशी लग्न लागलेलं आहे, असं गोड स्वप्न तुम्हाला कधी पडलंय का?
– कविता कोलारकर, परभणी
होय हो… रोज पडतं अस स्वप्न आणि मी घाबरून जागा होतो. कारण अस गोड स्वप्न एकदा मला पहाटे पडलं होतं… ते खरं झालं. तेव्हापासून अशा स्वप्नाची भीतीच वाटते.
कधीतरी राजकारणात जावं, अशी इच्छा तुमच्या मनात कधी येत नाही का?
– संपत पोवार, जयसिंगपूर
खूप मनात येतं हो.. पण आपल्यावर आरोप करणार्याला, आपलं घर आणि पक्ष फोडणार्या आपल्या विरोधकाला पुरस्कार देण्याएवढं आपलं मन मोठं नाहीय, असंही त्याच मनात येतं आणि मग आपली लायकी ओळखून माझं मनच गप्प बसतं.
मूर्ख आणि अडाणी यांच्यात काय फरक आहे?
– जेम्स डिसूझा, वसई
मूर्ख माणसाला कोणाशी मैत्री करावी हे कळत नाही, त्यामुळे तो गरीब राहतो.. अडाणी माणसाला कोणाशी मैत्री करावी हे बरोबर कळतं, त्यामुळे तो श्रीमंत होतो मूर्ख अडाणी असतो, पण अडाणी मूर्ख नसतो़.
जगातल्या सगळ्या मुलींनी माझ्या प्रेमात पडावं, अशी माझी छोटीशी इच्छा आहे. त्यासाठी मी काय करायला हवं?
– ऋषी दिघोळे, पाचोरा
जगातला सगळा शिलाजित घ्यायला हवा.
माझा एक मित्र एक फुटकळ प्रश्न विचारला की अडीच तास बोलतो आणि एवढी बडबड करून विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देत नाहीच. याच्यावर काय उपाय करावा?
– कानिफनाथ खराटे, शिगवण
खराटे साहेब, का उफराटे प्रश्न विचारताय?… अशा प्रश्नाचे उत्तर द्यायला लावून मला घरातून बाहेर काढायचंय? की मला पदयात्रेला पाठवायचंय?
चंद्राकडे सतत बघत राहिले तर माणूस वेडा होतो असं म्हणतात. तुमचा यावर विश्वास आहे का?
– रजनी शिंगोटे, बेलापूर
चंद्राकडे कितीही वेळ बघत बसा, पण त्याला फ्लाईंग किस देऊ नका… कोणी बघितलं तर ते वेडे होतील आणि त्या किसचाच किस काढत बसतील!
प्रेमपत्र आणि प्रश्नपत्रिका यांच्यात काय फरक आहे?
– स्नेहल पातोळे, लोणीकंद
दोन्ही सोडवून मला पाठवा. मी चेक करून सांगतो काय फरक आहे ते.
मला एक मुलगी फार आवडते. आमच्या गल्लीतच राहते. पण, तिच्या घरी जातो, तेव्हा तिचा कुत्रा फार भुंकतो हो! मी काय करू?
– रोहन पानसरे, इचलकरंजी
गल्ली बदला. जिच्याकडे कुत्री असेल अशी मुलगी शोधा. दुधाची तहान ताकावर भागते का बघा (कुत्री किंवा मुलगी यापैकी कोणीतरी तुम्हाला विचारते किंवा भुंकते का बघा… उमेद हरू नका… उम्मीद पे दुनिया कायम आहे हे लक्षात ठेवा).
संतोषराव, मला सांगा, एका हाताने टाळी कशी वाजवायची?
– मोहन गद्रे, दहिसर
एका हाताने टाळी का वाजवायची आहे? दुसरा हात वापरला तर त्या हाताला जीएसटी लागणार आहे का? (एक हात कुठे बिझी असतो का? सगळ्याच गोष्टी एका हाताने होत नाहीत. ज्या गोष्टींना दोन हात लागतात, त्या गोष्टींना दोन्ही हात वापरा.)
माणूस मेल्यावर यमराजाचे दूत आपल्याला म्हणे यमलोकात नेतात. एवढ्या मोठ्या प्रवासाचा काही खर्च नसतो? आपल्याला जाताना तिकीट काढावं लागतं का?
– शमसुद्दीन कादरी, पुणे
शमसुद्दीन साहेब आपल्याला जन्नतमध्ये जायचंय की स्वर्गात?? की जहन्नुममध्ये जायचंय की नरकात? ज्या गावाला जायचंच नाही त्याची चौकशी कशाला करताय? (आयला, एखाद्या प्रश्नाच उत्तर देता येत नसेल, तर आपण पण कुठल्याही प्रश्नाला धार्मिक रंग देऊ शकतो, याचा ‘स्वक्षात्कार’ या प्रश्नाच्या निमित्ताने झाला. मग तो प्रश्न कादरींचा असो कि पाद्रींचा!)