शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना एकत्र आल्यामुळे ज्यांची तंतरली आहे, त्या महायुतीतील प्रमुख नेत्यांच्या प्रतिक्रिया घेण्याचं आवाहन मी माझा मानलेला परमप्रिय मित्र टोक्याला केलं आणि माझी आज्ञा शिरसावंद्य मानून पोक्या त्या प्रतिक्रिया घेऊन परतही आला. त्याच या प्रतिक्रिया…
एकनाथ शिंदे : यामुळे आमच्या पक्षाचं काहीही बिघडत नाही की महायुतीला धोका पोहचत नाही. जय गुजरात ही घोषणा मी दिल्यापासून हे दोन्ही पक्ष माझ्या या वक्तव्यावर तुटून पडले आहेत. त्यालाही मी घाबरत नाही. जिथे माननीय अमितजी शहाजी यांच्यासारखे महान नेते माझा अतिशय आपुलकीने सांभाळ करीत आहेत, मला मायेच्या पदराखाली घेत आहेत तोपर्यंत मी त्यांचे गुणगान करीतच राहणार. मग तुम्ही मला चाटूगिरी करणारा गद्दार म्हणा किंवा आणखी काही म्हणा. मला ठाण्यातील जनता पुरेपूर ओळखते. धर्मवीरांच्या नावाखाली स्वत:ची चमकोगिरी करण्यासाठी मी त्या सिनेमाचे दोन भाग काढले. पण तेही कमी पडले म्हणून तिसरा भागही काढणार आहे. पण माझा हा प्रवास इतका लांबत चाललाय की त्या सिनेमाचे बारा भागही कमी पडतील. हे लोकांनी मला दिलेलं प्रेम आहे. माननीय फडणवीसांनी मूळ शिवसेना पक्ष फोडला असं कोणीही म्हणत असलं तरी ते खरं नाही. आदरणीय फडणवीस हे निमित्तमात्र होते. त्याआधी कितीतरी वर्षे मूळ शिवसेना फोडण्याचे विचार माझ्या मनात घोळत होते. माननीय फडणवीसांनी माझ्या स्वप्नांना फक्त आकार दिला आणि ते स्वप्न मी प्रत्यक्षात उतरवलं. आता माझ्यापुढे आव्हान आहे ते उद्धवसेना आणि मनसे यांचं ऐक्य तोडण्याचं. त्याचे डावपेच मी सुरू केले आहेत हे तुमच्या लक्षात आलंच असेल. मिरा-भाईंदर आंदोलनात पोलिसांनी अटक केलेल्या हजारो आंदोलकांची सुटका करण्यासाठी मीच आमच्या प्रताप सरनाईकांना तिथे पाठवलं होतं. मला आंदोलकांबद्दल अजिबात प्रेम नाही, पण सरनाईकांमुळे सर्व आंदोलकांची सुटका झाली तर त्याचं श्रेय परस्पर मला आणि माझ्या पक्षाला मिळावं हा माझा खरा हेतू त्यामागे होता असे आरोप करण्यात आले. सरनाईकांविरुद्ध आम्हाला झोंबणार्या घोषणा देण्यात आल्या. जनतेची सहानुभूती आमच्या पक्षाला मिळावी व पूजनीय फडणवीसांबद्दल द्वेषाची भावना निर्माण व्हावी हा हेतू त्यामागे होता, असंही बोललं गेलं. कुणी काहीही म्हणालं तरी येत्या मुंबई महापालिका निवडणुकीत माझ्या पक्षाला घवघवीत यश मिळेल ही पांढर्या दगडावरली काळी रेघ आहे. ‘त्या’ दोन पक्षांत फूट पाडण्याची आमची कारस्थानं सुरू असल्याच्या बाजारगप्पा रंगल्या आहेत. पण माझ्या डोक्यावर माझे परमदैवत अमितजी शहाजी यांचे शुभाशीर्वाद आणि त्यांच्या पायावर माझं बुद्धिमान डोकं आहे, तोपर्यंत वंदनीय फडणवीससुद्धा माझं काहीही वाकडं करू शकत नाहीत. मग इतरांची काय कथा! जय महाराष्ट्र! जय गुजरात!
देवेंद्र फडणवीस : मनसे आणि उद्धवसेनाच काय, जगातल्या अमेरिकेसकट कितीही महाशक्ती महायुतीच्या विरुद्ध उभ्या ठाकल्या तरी मुंबई महापालिका निवडणुकीत आमच्या युतीचाच विजय होणार आणि मुंबईच्या महापौरपदी गुजराती किंवा उत्तर प्रदेशी असामी बसणार याबद्दल शंका बाळगण्याचं कारण नाही. त्यासाठी आम्ही काय वाट्टेल ते करू, जिवाचं जंगल करू, लाखोचे दशलक्ष-अब्ज करू, आकाशपाताळ एक करू, पण त्या दोन भावांनी एकत्र निवडणूक लढवली तर आम्ही त्यांचा न भूतो न भविष्यति असा पराभव करू. त्याची झलक तुम्ही विधानसभेच्या निवडणुकीत महाआघाडीविरुद्ध पाहिलीच असेल. महाआघाडीला आम्ही कुठल्या कुठे कसं फेकून दिलं हे जगाने पाहिलं. त्यासाठी आम्ही काय केलं नाही हे जगाने सांगावं. त्रिभाषा सूत्र आणि हिंदी सक्तीच्या वादाला विरोध या गोष्टी येत्या महापालिका निवडणुकीत वावटळीसारख्या उडून जातील आणि निवडणुकीत महायुतीची आणि त्यातही भाजपाची आश्चर्यकारक सरशी होईल याबद्दल माझ्या मनात मुळीच संदेह नाही. आम्ही लोकभावना पायी तुडवल्या, विरोधकांना कस्पटासमान मानलं, धमक्या दिल्या, जेलमध्ये डांबलं असं म्हणून विरोधक जनतेला भडकवत असले तरी मुंबईची जनता आदरणीय पंतप्रधान आणि माननीय गृहमंत्री अमित शहांच्या मागे आहे हे मुंबईकर सिद्ध करतील, याची मला शंभर टक्के खात्री आहे. त्यासाठी आम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा आणि होत्याचं नव्हतं करून मुंबईवर मराठीच्या नावाने चालणारी दादागिरी कायमची संपवून टाकू. हे मी मराठीच्या द्वेषाने बोलत नाही. पण गुजराती आणि हिंदी भाषेचा अपमान मी अजिबात खपवून घेणार नाही. तसं करणार्यांना कठोरात कठोर शिक्षा दिली जाईल. आमच्या पक्षाचे झारखंडचे खासदार आणि जिगरबाज भाजपा नेते निशिकांत दुबेजी काय म्हणाले माहीत आहे ना? एकेक मराठी आदमी को पटक पटककर मारेंगे. म्हणजे आपटून आपटून मारू असा त्याचा अर्थ आहे. त्यांच्याहून भयंकर आणि आक्रस्ताळी नेते भाजपात आहेत. उद्या हिंदी भाषेच्या सक्तीसाठी तेही धावून येतील आमच्या बाजूने. तुम्ही देशहित लक्षात घ्या. त्रिभाषा सूत्र लक्षात घ्या. म्हणूनच मी त्यासाठी डॉ. नरेंद्र जाधव समिती नेमली आहे. या प्रश्नावर मी माघार घेणार नाही. मग पाताळात भूकंप होवो वा आकाश फाटो. मराठीपेक्षा देशहित आणि बिहारच्या निवडणुका मोठ्या आहेत. त्या िजंकल्या की भाजपाचा मार्ग मोकळा! मग खावू खमण ढोकळा!!
अजित पवार : या आमच्या लोकांचं डोकंबिकं तर फिरलं नाही ना, अशी शंका मला येतेय. अरे, काय त्या त्रिभाषा सूत्राचं तंगडं घेऊन नाचताय. आणि हिंदीचा पुळका कशासाठी येतोय तुम्हाला? हिंदी सक्तीच्या विरोधात ते दोन भाऊ आले एकत्र तर येऊं देत ना! मराठी भाषेचाच जागर करताहेत ना ते! मग तुमच्या नाकाला मिरच्या का झोंबतायत फडणवीस साहेब? खूप महागात पडणार आहे तुम्हाला ते, आणि महायुतीलाही!