आईच्या पोटातून जन्मलेलं मूल, मग ते कुठंही जन्मावं, कोणत्याही स्थितीत जन्मावं, ते तिच्यासाठी तितकंच प्रिय असतं. पण जेव्हा या लाडक्या बाळाला दिसतच नाही, ऐकू येत नाही, विचारांची संगती लागत नाही, तेव्हा एका आईच्या मनात अस्वस्थतेचा, भयाचा आणि अपरिहार्यतेचा अंधार भरून राहतो. प्रत्येक क्षण प्रश्नांचा, अश्रूंचा आणि भविष्याच्या काळज्यांचा. मोठ्या शहरांमधील पालकांनाही अशा मुलांसाठी योग्य शिक्षण, समुपदेशन, उपचार मिळणं हे आव्हान वाटतं, मग डोंगराळ, दुर्गम भागांतील गरीब कुटुंबांतील पालकांची अवस्था काय असावी? त्यांचं मूल अंध असेल, मतिमंद असेल, अपंग असेल, तर त्याचं भवितव्य काय? या भीतीनं अनेकांच्या आयुष्यात काळोखच दाटून येतो.
पण याच अंधार्या वास्तवात एका आशेचा दीप गेली दोन दशके सातत्याने तेवत आहे, तो म्हणजे ‘श्री गुरुदेव बहुउद्देशीय सामाजिक संस्था’ आणि तिचं मनाला भिडणारं कार्य म्हणजे ‘दिव्य विद्यालय – गुलमोहर’. जव्हारसारख्या अतिदुर्गम आदिवासी भागात ही संस्था कार्यरत आहे. २००३मध्ये श्रीमती प्रमिला औदुंबर कोकड यांनी कुटुंबीय व स्नेही यांच्या मदतीने या संस्थेची स्थापना केली. त्यावेळी जव्हारमध्ये वीज, रस्ते, मूलभूत सुविधा फारशा नव्हत्या. त्या काळात दिव्यांग मुलांसाठी शिक्षण सुरू करणं म्हणजे अशक्यप्राय धाडसच होतं. पण या सेवाव्रतींनी स्वप्न पाहिलं की अंध, मतिमंद, अपंग आणि आदिवासी मुलांनाही शिक्षण आणि सन्मानाने जगण्याचा अधिकार मिळाला पाहिजे. त्यांनी ते फक्त स्वप्नात न पाहता, प्रत्यक्षात उतरवलं.
२००७ साली ‘दिव्य विद्यालय – गुलमोहर’ ही निवासी शाळा सुरू झाली. तीही पूर्णपणे विनाअनुदानित पद्धतीने. सुरुवातीला केवळ चार मुलं, एक शिक्षक, आणि चार चटया एवढ्याच साधनसामग्रीने ही वाटचाल सुरू झाली. आज जवळपास ८५ अंध आणि मतिमंद मुले येथे शिक्षण घेत आहेत. त्यांचा निवास, भोजन, शिक्षण, औषधोपचार, कपडे, स्टेशनरी, या सगळ्या गरजा संस्था आणि समाजातील दानशूर व्यक्ती यांच्या मदतीने भागवल्या जातात. शासकीय मदतीशिवाय या सेवाभावी प्रकल्पाचा गाडा गेली १८ वर्षं अखंड चालतो आहे, तेही कुठलाही गाजावाजा न करता.
या शाळेत येणारी अनेक मुलं अनाथ आहेत. काहींना त्यांच्या जन्मदात्यांनी सोडलंय. काहींचे पालक इतके गरीब आहेत की दोन वेळचं जेवण देणंही त्यांना कठीण आहे. पण ‘दिव्य विद्यालया’मध्ये ही मुलं कोणत्याही भेदभावाशिवाय प्रेमानं वाढवली जातात. त्यांना कोणतीही अपंगत्वाची जाणीव होऊ न देता इतरांप्रमाणेच आनंदानं, हक्कानं, सन्मानानं वागवलं जातं. शिक्षक त्यांच्या समस्या ऐकतात, समजून घेतात, त्यांना नावानं हाक मारतात आणि हेच त्यांचं खरं वैभव आहे.
शाळेतील अंध विद्यार्थ्यांसाठी ब्रेल लिपी, अॅबॅकस, संगणक शिक्षण यासारखी आधुनिक साधनं आहेत. मतिमंद मुलांसाठी विशेष प्रशिक्षित शिक्षक, व्यवहाराधारित अभ्यासक्रम आणि कौशल्यावर आधारित शिक्षणपद्धती वापरली जाते. शाळेच्या स्थापनेपासून आजवर १०वीच्या चार बॅचेस आणि १२वीच्या दोन बॅचेस उत्तीर्ण झाल्या आहेत. या विद्यार्थ्यांपैकी अनेकांनी महिंद्रा अँड महिंद्रा, आयडीबीआय बँक, अंध शिक्षक प्रशिक्षण संस्था, आयटीआय अशा विविध ठिकाणी नोकर्या मिळवल्या आहेत. शिक्षणामुळे या मुलांचा आत्मविश्वास वाढतो, ती स्वतःच्या पायावर उभी राहतात आणि आपल्यासारखंच सामान्य आयुष्य जगण्याचा प्रयत्न करतात.
या शाळेत केवळ पुस्तकांचं शिक्षण नाही, तर मुलांचं सर्वांगीण व्यक्तिमत्त्व घडवणारी प्रक्रिया सुरू आहे. चित्रकला, नृत्य, संगीत, वादन या कलाक्षेत्रांनाही तितकंच महत्त्व दिलं जातं. शाळेत तबला, हार्मोनिअम, कीबोर्ड, सुगम संगीत, लोकनृत्य यांचं प्रशिक्षण दिलं जातं. अंध असूनही मुलं सुरांशी, तालाशी नातं जोडतात. राज्य स्तरावर या मुलांनी अनेक स्पर्धांमध्ये पारितोषिकं मिळवली आहेत. दिलीप दखणे या अंध विद्यार्थ्याचे उदाहरण हृदयस्पर्शी आहे. जन्मतः अंध असलेल्या दिलीपने एका शस्त्रक्रियेनंतर जेव्हा पहिल्यांदा सूर्य पाहिला, तेव्हा त्याच्या डोळ्यातलं आश्चर्य आणि आनंद पाहून उपस्थित सर्वांच्या डोळ्यांत अश्रू तरळलं. अशा कितीतरी गोष्टी या शाळेच्या आठवणीत कोरल्या गेल्या आहेत.
शाळेत स्वावलंबनासाठी विविध कौशल्यांचं प्रशिक्षण दिलं जातं. शिवणकाम, चित्रकला, मातीची भांडी रंगवणं, मोत्यांची माळा तयार करणं, रोपवाटिका, गांडूळखत निर्मिती, बागकाम, स्वयंपाक या सर्व गोष्टी मुलं स्वतः शिकतात. त्यांनी तयार केलेल्या वस्तू विविध प्रदर्शनांत विकल्या जातात. उत्पन्नाचा एक भाग मुलांच्या उपयोगासाठी पुन्हा संस्थेला दिला जातो. या संपूर्ण प्रक्रियेमुळे मुलांमध्ये ‘मी काही करू शकतो’ हा आत्मविश्वास निर्माण होतो. पूर्वी जी मुलं फक्त ‘दये’च्या नजरेनं पाहिली जात होती, तीच मुलं आता स्वत:चे निर्णय घेणारी, स्वत: उत्पन्न कमावणारी आणि समाजाला उपयोगी पडणारी व्यक्ती बनत आहेत.
‘दिव्य विद्यालय’ फक्त शाळा नाही, ती निसर्गाशी जोडलेली जीवनशाळा आहे. येथे सेंद्रिय शेती, खतनिर्मिती, झाडांची लागवड या गोष्टी शिकवल्या जातात. पर्यावरण शिक्षण हा अभ्यासक्रमाचाच एक भाग आहे. ‘प्लास्टिक टाकू नका’, ‘पाणी वाचवा’, ‘झाडं लावा’ या संकल्पना केवळ पाठ्यपुस्तकात मर्यादित राहू नयेत हे मुलांना कृतीतून शिकवलं जातं. ही मुलं गावोगाव जाऊन पर्यावरण जागरूकता अभियानंही राबवतात. वयाने लहान, पण विचाराने मोठी झालेली ही मुलं आज संपूर्ण परिसरात बदल घडवत आहेत.
या संस्थेचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे पालकांशी सातत्याने संवाद ठेवणं. प्रत्येक विद्यार्थ्याबाबत पालकांसोबत समुपदेशन, मार्गदर्शन केलं जातं. संस्थेचे कार्यकर्ते गावागावात जाऊन अंध, मतिमंद, अपंग मुलांचा शोध घेतात. पालकांना आपल्या मुलांमध्ये फक्त समस्याच नाहीत, तर प्रचंड शक्यताही दडलेल्या आहेत, हे सांगणं आणि पटवणं, हेच या संस्थेचं मोठं कार्य आहे. एक आई एकदा रडत रडत म्हणाली होती, ‘माझं मूल आयुष्यभर दुसर्यावर अवलंबून राहील’ आणि त्यावेळी शिक्षकांनी उत्तर दिलं होतं, ‘तुमचं मूलही स्वयंपूर्ण होऊ शकतं, त्याच्यातही काहीतरी विशेष आहे.’ हा संवाद हेच मुळात परिवर्तनाचं बीज आहे.
‘श्री गुरुदेव बहुउद्देशीय सामाजिक संस्थे’चा दृष्टिकोन स्पष्ट आहे. ‘हा काय करू शकत नाही?’ असं विचारायचं नाही, तर ‘तो काय करू शकतो?’ याचा शोध घ्यायचा. प्रत्येक मुलामध्ये काहीतरी विशेष आहे, त्याला फुलवणं हेच या संस्थेचं ब्रीद आहे. ही संस्था केवळ शिक्षण देत नाही, ती माणूस घडवते, त्याच्या आत्म्याला आकार देते, त्याच्यातील प्रकाश शोधते आणि तो समाजात पसरवते.
आजच्या यांत्रिक आणि स्पर्धात्मक शिक्षणपद्धतीच्या युगात ‘दिव्य विद्यालय’ हे एक जिवंत आदर्श ठरतं. ही शाळा म्हणजे सामाजिक संवेदनशीलतेचा एक नमुना आहे. याचे उदाहरण म्हणजे कोविडच्या काळात निसर्गरम्य वातावरणात सर्व सोयींनी युक्त असे ५० बेडचे कोविड सेंटर शाळेत सुरू करण्यात आले. आलेले सर्व रुग्ण बरे होऊन आनंदाने घरी गेले. याच काळात प्रत्येक विद्यार्थ्याच्या घरी व गावात ३५०० कुटुंबांपर्यंत धान्यकिट व औषधे पोहचवली. देशातील विविध भागांत जर अशी शाळा उभारली गेली, तर हजारो दिव्यांग मुलांचं आयुष्य उजळू शकेल. शासन, सीएसआर कंपन्या, स्वयंसेवी संस्था, युवक मंडळं आणि सामान्य नागरिकांनी जर या कार्याची दखल घेतली, तर अशा शाळा प्रत्येक जिल्ह्यात उभ्या राहतील.
कारण शिक्षण म्हणजे केवळ डिग्री नव्हे, ते आहे माणूस घडवण्याची, आत्मा जागवण्याची आणि अंधारातल्या घरातही दिवा लावण्याची प्रक्रिया. आणि ही प्रक्रिया गेली १८ वर्षं जव्हारच्या डोंगराळ भागात एका शांत कोपर्यात, अंधारातील मुलांमध्ये प्रकाश पेरत सुरू आहे. निर्व्याज, नि:स्वार्थ आणि निःशब्द झगड्यातून!
==========
सहृदयी समाजाची साथ
समाज हा सहृदयी आहे, याचा पदोपदी अनुभव आला. मूळात आईवडिलांकडून सामाजिक बांधिलकीचे बाळकडू मिळाले. श्रीमती प्रमिलाताई कोकड शाळा सुरू करावयाचे निश्चित केल्यावर मदतीचा हात दिला तो श्री. संजयजी खन्ना, श्री. ठाकूर गुरुजी, श्री. व सौ. अंजली व सतीश पै यांच्या माध्यमातून पू. दादा महाराजांचा आशीर्वाद मिळाला. शाळेचे आधारस्तंभ ठरले. श्री. बिमलजी केडिया. अनेक ज्ञात अज्ञात हितचिंतक, देणगीदार यांच्या बहुमोल सहकार्याने दिव्य विद्यालय, गुलमोहर कार्यरत आहे. दिव्यांगाच्या क्षेत्रात कार्यरत असल्यामुळे अपंग व्यक्ती सक्षमीकरण या राष्ट्रीय पुरस्काराने प्रमिलाताई कोकड यांना सन्मानित करण्यात आले, अनेक पुरस्कार प्राप्त झाले. माझी शाळा, सुंदर शाळा या उपक्रमांतर्गत तालुका स्तरावर शाळेला प्रथम क्रमांकाचा पुरस्कार प्राप्त झाला आहे.
– श्रीमती यशदा शशिधर जोशी