चड्डी बनियन गँग नावाची एक दरोडेखोरांची टोळी फार कुप्रसिद्ध आहे. आता एक चड्डी बनियन पक्ष तयार झालेला आहे म्हणे! आता यापुढे आपल्याला काय पाहावं लागणार आहे?
– अल्पना शेंडे, भोकरदन
चड्डी बनियान नंतर पुढे काय पाहावं लागणार? अहो ताई, याची कल्पनाही करू शकत नाही. अहो, दाखवणार्यांना नाही, पण बघणार्यांना, बोलणार्यांना काहीतरी वाटेल ना! चड्डी बनियनवाल्यांना हायवेवर उतरायचं असेल तर चड्डी बनियानची सुद्धा गरज नाही असं म्हणतात. जाऊदे ताई.. मोठ्या लोकांच्या मोठ्या गोष्टी असतात, त्यांनी कमरेचं सोडलं तरी आपण तोंड बंद ठेवायचं असतं.
जेवण चांगलं नव्हतं म्हणून आमदाराने कँटीनच्या कर्मचार्यांना ठोसे मारले. रस्ते चांगले नाहीत, शिक्षण चांगलं नाही, जीवनमान चांगलं नाही, प्रदूषणाने जीव चाललाय, समाजात सत्ताधारीच आगी लावतायत, म्हणून सर्वसामान्य माणसांनी या तथाकथित लोकप्रतिनिधींशी असंच वागायचं का?
– आर. के. पंडित, पनवेल
म्हणजे आधीच रस्त्यावर आलेल्या जनतेला टॉवेलवर आणायचा विचार आहे की काय तुमचा? (समोरच्याने गाय मारली म्हणून तुम्ही वासरू मारणार का? ही फक्त एक म्हण आहे. पण ही म्हण बाहेर बोलू नका. गाय मारली… या एकाच शब्दावरून रामायण रचून, त्यावर महाभारत केले जाईल.) अहो, आधी जमाना बदलायचा, आता जमाना बदलवला गेलाय, मग त्याप्रमाणे विचार करा. जेवण कितीही चांगल्या दर्जाचं असलं, तरी ते रात्री उशिरा खराब होतंच, असा फालतू विचार करू नका आणि मारणार्याला त्याच्यासमोर नसेल पण कॅमेर्यासमोर समजावला आहे, त्यात समाधान माना. त्यानंतर हे असं समजावणंसुद्धा नाही समजावलं तर काय कराल?
सरकारचा भाग असलेल्या फक्त एकाच पक्षातल्या नेत्यांच्या भानगडींचे व्हिडिओ अचानक लागोपाठ बाहेर पडायला लागले आहेत, यामागे कोण असेल असं वाटतं तुम्हाला संतोषराव?
– प्रवीण सोनकांबळे, नागपूर
तुम्ही नागपूरचे असून हा प्रश्न आम्हाला विचारताय? म्हणजे… यामागे कोणी नागपूरवाला असेल असा अर्थ काढू नका. नागपूरला हिवाळी अधिवेशन होत असतं, तेव्हा हा प्रश्न त्या अधिवेशनात नागपूरलाच का विचारत नाही असं वाटतंय आम्हाला? बाकी तुम्हाला जे वाटतंय, तेच आम्हाला वाटतंय, आणि आम्हाला वाटतंय, तेच तुम्हाला वाटतंय, असं वाटतंय आम्हाला… असं वाटतंय का तुम्हाला?
आणीबाणीपेक्षा कितीतरी पटींनी घातक असलेला, सर्वसामान्य माणसाचा आणि विरोधी पक्षाचा सरकारच्या निषेधाचा अधिकारच हिरावून घेणारं जनसुरक्षा विधेयक विधानसभेत मंजूर झालं, त्याला विरोधी पक्षांनीही पाठिंबा कसा दिला? आता लोकांनी काय करायचं?
– सायमन डिसिल्व्हा, नालासोपारा
आधी या जनसुरक्षा विधेयकाबद्दल तरी बोलण्याचा अधिकार आहे का? हे जरा समजून घ्यावं लागेल. कसं आहे… आम्ही सर्वसामान्य, कायदा मानणारी मंडळी, कायदा आमच्या विरोधात असला तरी आम्ही कायदा मानतो आणि हे कायदा बनवणार्यांना बरोबर माहित आहे. आणि विरोधकांचं म्हणाल, तर उद्या ते सत्तेत आल्यावर, जो साप फणा काढण्याची भीती असते, तो साप आताच्या सत्ताधार्यांच्या काठीने विरोधक मारून घेतायत… एवढं तर समजून घ्या. (पण त्याआधी, जनसुरक्षा विधेयकामध्ये ते आपण स्वत: समजून घेणं हा गुन्हा नाही ना, हे समजून घ्या).
एकवेळ परप्रांतीय अस्खलित मराठी बोलू लागतील, पण मुंबईच्या मराठी माणसांना एकमेकांमध्ये आणि इतरांशी मराठी बोलायला लावण्यासाठी काय उपाय करायचा?
– यशवंत कानेटकर, पवई
मराठी सुरक्षा कायदा करायचा. किंवा आता हिंदीची सक्ती केल्यावर लोकांचं मराठीपण जागृत झालं, ते ओसरू लागलं की उर्दूची सक्ती करायची, की मराठी माणसांमधलं मराठीवरचं प्रेम परत जागृत होणार, ते ओसरू लागलं, की मग गुजरातीची सक्ती करायची. असं चालूच ठेवायचं, थोडक्यात काय तर मराठी माणसाचं मराठीवरचं प्रेम ओसरू द्यायचं नाही, हा एक उपाय आहे. करता उपाययोजना?