– किरण माने
काहीही झालं… रस्त्यावर, रेल्वेत, विमानात निष्पाप नागरिक हकनाक मेले, देशावर संकट कोसळलं, युद्धाचा प्रसंग आला तरी सोबत फोटोग्राफर घेऊन जाऊन… फ्लेक्सबाजी करून स्वत:ची जाहिरात करायची सवय त्याच नेत्यांना असते, जे ‘नाकर्ते’ असतात! ‘आपण लोकप्रतिनिधी आहोत. आपल्या देशवासीयांचं रक्षण करू शकत नसू, तर ते आपलं अपयश आहे. त्या हलगर्जीपणासाठी जनतेला आपण आन्सरेबल आहोत.’ याचं भान न ठेवता मूळ गोष्टींना बगल देऊन कर्कश्श आवाजात भाषणबाजी करून भाबड्या जनतेला गंडा घालणारे कधी ना कधी उघडे पडतातच. कसोटीच्या काळात आणि काळाच्या कसोटीत त्याच्याच नांवाच्या आणि कार्याचा प्रसार होतो, जो ‘सच्चा’ आहे.
खरे, बुद्धिमान, सुसंस्कृत नेते खालच्या पट्टीत मोजकं बोलून, शक्यतो मौन पाळून अफाट आणि अफलातून काम करून जातात… त्या कामाची प्रसिद्धी करण्याच्या फालतू उद्योगात ते स्वत:चा वेळ आणि देशाचा पैसा घालवत नाहीत. त्यांनी केलेलं महान कार्य लपवायचा, त्यांची बदनामी करायचा कुणी आटोकाट प्रयत्न करूदे… ते कधी ना कधी लख्खपणे जगासमोर येतं आणि अख्खं जग त्यांच्यासमोर नतमस्तक होतं! आपल्या संत तुकोबारायांनी चारशे वर्षांपूर्वी लिहून ठेवलंय,
‘न लगे चंदना पुसावा परिमळ । वनस्पतिमेळ हाकारुनी ।।
अंतरीचें धांवे स्वभावें बाहेरी । धरितां ही परी आवरे ना ।।
सूर्य नाहीं जागें करीत या जना । प्रकाश किरणा कर म्हून ।।
तुका म्हणे मेघ नाचवी मयूरें । लपवितां खरें येत नाहीं ।।’
…चंदनाला आपल्या सुवासाची जाहिरात करावी लागत नाही. भवतालच्या वनस्पतींपुढे आरडाओरडा करून, हाका मारून आपल्या परिमळाची प्रसिद्धी करावी लागत नाही. चंदनाचा गंध आपसूक दरवळतो. भवताल भारून टाकतो.
…’अंतरी’, आत जे असतं ते स्वभावत:च बाहेर पडतं. कुणी धरायचा, अडवायचा, थोपवायचा प्रयत्न केला तरी ते आवरत नाही.
…सूर्याला स्वत:हूनच ओरडून, लोकांना जागं करून, ‘मीच प्रकाशमान’ अशी मिनिटामिनिटाला टीव्ही रेडिओवर अॅड करून, भाषणबाजी करून आपल्या प्रकाशकिरणांची महती सांगत बसावं लागत नाही. ती डोळ्यांनी दिसते… ढळढळीत!
…शेवटी तुका म्हणे, आकाशात मेघ दाटून आले की मोराचा पिसारा आपोआपच फुलतो आणि तो नाचू लागतो. नकळत होतं ते. ‘मी मोर आहे’ हे त्याला जिथं-तिथं फोटो चिकटवून सांगावं लागत नाही.. तसंच जे ‘खरं’ असतं ते लपवता येत नाही मित्रहो… ते व्यक्त होतंच!
किती समर्पक अभंग आहे हा! फार काही सांगायची गरजच नाही. एवढंच सांगतो, ‘स्वत:चा नालायकपणा झाकण्यासाठी कुणी कितीही चमकोगिरी करून लोकांना भापवण्याचा प्रयत्न करूदेत. सत्य समोर येतेच. बेडकाचा बैल नाही होत. तसेच एखाद्या महान व्यक्तीचे विचार किंवा कार्य झाकायचा, बदनामी किंवा दुर्लक्ष करून मारण्याचा कुणी कितीही प्रयत्न करूदे… ते चांगलं असेल, समाजहिताचं असेल आणि ‘सत्य’ असेल तर लोकांसमोर येतंच.
याउलट महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर अशा महामानवांचं आणि डॉ. मनमोहन सिंग यांच्यासारख्या सुसंस्कृत, बुद्धिमान नेत्यांचं कार्य जगभर गौरवलं जातं. त्यासाठी त्यांना जाहिरातबाजी करावी लागली नाही. अंगी चांगले गुण असल्यावर त्याचा गवगवा करावा लागत नाही… तो आपोआप पसरतो… सुगंधासारखा. हे सांगताना आणखी एका अभंगात तुकोबाराया म्हणतात,
नाही सुगंधाची लागत लावणी ।
लावावी ते मनीं शुद्ध होता ।।
वार्या हातीं माप चाले सज्जनाचे ।
कीर्ति मुख त्याचे नारायण ।।
प्रभा आणि रवि काय असे आन ?।
उदयी तंव जन सकळ साक्षी ।।
तुका म्हणे बरा सत्याचा सायास ।
नवनीता नाश नाही पुन्हा ।।
…आपण झाडांची, फळांची, फुलांची रोपं लावतो, तशी सुगंधाची रोपं लावावी लागत नाहीत. मन शुद्ध असलं, की त्याच्यामधे सदगुण आपोआपच रुजतो.
…सुगंध जसा वार्यासोबत आसमंत दरवळून टाकतो, तसाच सज्जनाच्या सदगुणांचा सुगंध लोकांपर्यंत पोचतो, त्याचं स्वरूप आणि प्रमाण लोकांना काळाच्या ओघात आपोआप समजू लागतं. त्याच्या कीर्तीचं वर्णन करण्यासाठी जणू ईश्वरच मुख बनतो.
…सूर्य आणि त्याची प्रभा हे दोघे भिन्न नसतात. उगवत्या सूर्याच्या तेजाचे सगळे लोकच प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असतात.
…शेवटी तुकाराम महाराज म्हणतात, आपण नेहमी सत्याचा ध्यास धरावा. एकदा का लोणी तयार झालं, की त्याचा नाश होत नाही, म्हणजेच लोण्याचं पुन्हा दही वा ताक बनत नाही. अर्थात एकदा सत्याचा अंगीकार केला, की त्याचा नाश होत नाही.
कुणी स्वत: कितीही उदोउदो करून घेऊद्यात, आपल्या वागण्यानं आणि बोलण्यानं त्यांचं नाव खराब व्हायचं ते होतंच. त्यांनी शत्रूच्या बदनामीची कितीही कारस्थानं रचूद्यात, तो जर चांगला असेल तर त्यांचं नाव उजळायचं थांबत नाही. मी उदाहरणे जरी मोठ्या नेत्यांची वगैरे दिली असली, तरी ती तुकोबांच्या विचारांमधला भावार्थ पटकन समजावा म्हणून आहेत. हाच न्याय आपण सर्वसामान्य लोकांनी स्वत:लाही लावून घ्यावा. ज्या वागण्यानं आपलं नाव खराब होईल, चारचौघांत हसं होईल असं वागणं टाळावं. हे सांगताना तुकाराम महाराज म्हणतात,
जेणें वाढे अपकीर्ति । सर्वार्थी ते वर्जावे ।।
सत्य रुचे भलेपण । वचन ते जगासी ।।
हाेइजेते शुद्ध त्यागें । वाउगे ते सारावे ।।
तुका म्हणे खोटे वर्म । निंद्यकर्म काळिमा ।।
…ज्या गोष्टीमुळं आपली अपकीर्ती होते, ती गोष्ट पूर्णपणे टाळावी.
…जे बोलणं सत्य असतं, ज्या वागण्यात भलेपणा असतो, ते जगाला आवडतं.
…होईल तेवढा वाईटाचा त्याग करून शुद्ध व्हावं. जे वावगं असेल, ते दूर सारावं.
…शेवटी तुका म्हणे, खोटं कृत्य हे निंद्यकर्म असतं आणि ते आपल्याला काळिमा लावतं. म्हणून त्याच्यापासून दूर राहावं.
आपण लोकप्रिय व्हावं, सगळ्यांचा आवडता व्हावं असं सगळ्यांनाच वाटतं. पण त्यासाठी अविचारानं काहीही करामती करणं घातक ठरतं. भारंभार पैसा ओतूनही प्रसिद्धी मिळत नाही. कारण त्यासाठी सगळ्यात मोठी अट असते ती मनाच्या नितळपणाची! मन शुद्ध ठेवून अंगी सद्गुण बाळगले तर जग कसं आपल्यावर प्रेम करू लागतं हे सांगताना तुकाराम महाराज म्हणतात,
नसावे ओशाळ । मग मानिती सकळ ।।
जाय तेथे पावे मान । चाले बोलिले वचन ।।
राहो नेदी बाकी । दान ज्याचे त्यासी टाकी ।।
होवा वाटे जना । तुका म्हणे साटी गुणां ।।
…आपण कधीही ओशाळं असू नये, अर्थात लाचार असू नये. तरच लोक आपल्याला मान देतात.
…अशा प्रकारे जो स्वाभिमानी जगतो, त्याला जिथं जाईल तिथं मानसन्मान मिळतो. त्याचा शब्द अन् शब्द लोक विश्वासानं झेलतात.
…कुणाचं काही बाकी न ठेवता तो माणूस ज्याचे दान त्याला देतो.
…तुकाराम महाराज म्हणतात, असा मनुष्य त्याच्या गुणांसाठी लोकांना हवाहवासा वाटतो.
एवढे सगळे अंगीकारूनही इप्सित ध्येयापर्यंत पोहोचायला प्रचंड चिकाटी आणि अफाट जिद्दीनं संघर्ष करावा लागतो. मोठमोठ्या स्वप्नांचा मोहर अनेकांच्या मनात फुललेला असतो. प्रत्येकाला कायतरी भव्यदिव्य करून दाखवायचं असतं. काहीजण त्यासाठी प्रयत्नही सुरू करतात. पण प्रवास सोपा नसतो. कारण नंतर सुरू होते अडथळ्यांची शर्यत! अनेक संकटांवर मात करत, परीक्षा बघणारे प्रसंग पार करत पुढे जात राहण्याचा निर्धार… आणि चिकाटी न सोडता, हार न मानता, ती स्वप्नं साकार करण्याचा जिगरा लै कमीजणांकडे असतो. बहुतेक जण सुरुवातीला पहिला तडाखा बसताच नांगी टाकतात. काही अर्ध्यातनं माघार घेतात. तरीही टिकलेले कुणी, कसोटीच्या क्षणी होणार्या जीवघेण्या अपमान, अवहेलनेपुढे हतबल होतात, तर कुणी आत्मविश्वास गमावून दिशा बदलतात. सगळी स्वप्नं गुंडाळून ठेऊन आयुष्यभर गपगुमान चाकोरीतलं जगणं जगतात.
विपरीत परिस्थितीशी झगडून चिकाटीनं यश खेचून आणणार्या जिगरबाजांची संघर्षगाथा तुकोबाराया एका अतिशय सुंदर अभंगातनं प्रभावीपणे मांडतात.. त्याबरोबरच काहीही अंगाला न लावून घेता, घरबसल्या फक्त ‘बड्या बड्या बाता’ मारणार्यांना चपराकही देतात.
महुरा ऐसी फळे नाही । आली काही गळती ।।
पक्वदशे येती थोडी । नाश आढी वेचे तों ।।
विरळा पावे विरळा पावे । अवघड गोवे सेवटाचे ।।
उंच निंच परिवार देवी । धन्या ठावी चाकरी ।।
झळके तेथे पावे आणी । ऐसे क्षणीं बहु थोडे ।।
पावेल तो पैलथडी । म्हणो गडी आपुला ।।
तुका म्हणे उभार्याने । कोण खरे मानितसे ।।
…मोहर भरगच्च येतो झाडाला. पण त्या तुलनेत फळं खूप कमी येतात. वादळवारे, गारांमुळे बराच मोहोर गळतो, त्यातून टिकलेली काही छोटी फळं अशाच काही संकटांत गळून पडतात. त्यातूनही टिकून पाडाला आलेली काही पडून खराब होतात, काही आढीत नासतात. एवढं सगळं घडून गेल्यावरही जी पिकतात, टिकतात त्या फळांचा आस्वाद घेण्यासाठी लोक भरपूर मोल देतात.
…असंच खडतर मार्ग पार करून शेवटचे ‘गोवे’ म्हणजेच ‘मंजिल’, ध्येय गाठणारा बहाद्दर विरळाच.. खूप विरळा!
…अनेक लहानमोठे लोक देवाची भक्ती करत असतात. आपल्या मालकाकडे अनेक नोकर चाकरी करत असतात. पण कसोटींच्या काळात चिकाटीनं, हुशारीनं, निष्ठेनं आणि प्रामाणिकपणामुळे जे झळकतात, तेच मालकाच्या पसंतीस पावतात. उत्कर्षाचे धनी होतात.
…अडचणींवर मात करून पैलथडीला पोचतो, तोच खरा शूरवीर मर्दगडी!
…शेवटी तुका म्हणे, अंगात कर्तृत्व नसताना, छाती फुगवून नुसती ‘बाह्य उभारी’ दाखवणार्या, फुशारकी मारणार्यांचं कोण खरं मानणार?
एकदा आपलं ध्येय मनाशी पक्कं केलं की मग हार मानायची नाही. आर नाहीतर पार. जो भी होगा देखा जायेगा. चिकाटी नाही सोडायची. तुफानी वादळं अंगावर घेत लढत राहायचं. अहो, म्हणून तर अस्पृश्य म्हणन हिणवल्या गेलेल्या भिमरावचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होऊन त्यानं या देशाचं संविधान लिहिलं. केवळ पंचा नेसून आणि हातात काठी घेऊन फिरणार्या गांधीजींनी ब्रिटीश राजवटीला आव्हान देऊन स्वातंत्र्य मिळवून दिलं. मूठभर मावळे हाताशी घेत, मुघल साम्राज्याला हादरे देऊन जिजाऊ व शहाजींचा लेक शिवबा स्वराज्याचा छत्रपती झाला.
वर्षं येतात-जातात. काळ बदलत रहातो. पण काळाच्या ओघात तेच टिकतात ज्यांनी सद्गुणांचा दरवळ पसरवून समाजमन प्रफुल्लित केलं. शुद्ध, नितळ मनानं आणि सच्च्या भावनेनं दीनदुबळ्या, शोषितपीडितांच्या उद्धारासाठी प्रयत्न केले… जिवाचं रान केलं… रक्ताचं पाणी केलं… संकटांपुढं हार मानली नाही! इतिहास कलुषित करून त्यांचीही बदनामी करण्याचा प्रयत्न अनेक नतद्रष्ट करतात. ज्यांची पात्रता नाही अशांना ओढूनताणून महान बनवण्यासाठी पाण्यासारखा पैसा ओतून जाहिरातबाजी करतात… पण काळाच्या ओघात त्याचे खरे रुप समोर येतेच आणि जगभर नाचक्की झाल्याशिवाय रहात नाही.
तुकोबाराया बहुजनांसाठी अनमोल विचारधन ठेवून गेलाय. आजच्या नासलेल्या भवतालात तेच आपल्याला तारणार आहे. हे आपण समजून घेतलं पाहिजे. आपलं आयुष्य उजळवण्यासाठी दुसरा मार्ग नाही. हे सत्य जर आपण समजून घेतलं नाही, अंतरंगाच्या शुद्धतेपेक्षा बाहेरच्या बेगडी झगमगाटाला आपण भुललो, संघर्षापेक्षा ‘शॉर्टकट’चा मार्ग पत्करला तर आपल्यासारखे कमनशिबी आपणच ठरू.