बाळासाहेबांच्या कुंचल्यातून उतरलेली जत्रा हा तरुण, ताज्या दमाच्या व्यंगचित्रकारांसाठी अभ्यासवर्गच असतो. जेवढं व्यंगचित्र साधं, तितकं ते अवघड. कारण तपशीलांमध्ये खेळायची सोय नाही. दोन माणसं एकमेकांशी बोलत आहेत, अशा चित्रात त्यांचे हावभाव आणि हातवारे यांच्यातूनच गंमत आणायची. या चित्रातल्या संवादात एक आहे तो बाळासाहेबांचा मानसपुत्र काकाजी. त्याच्याबरोबर बोलतोय तो एक भक्त आहे. एकेका नेत्याचे भक्त हा भारतीय लोकशाहीला लागलेला शाप आहे. तो आजचाच नाही. इथला मनुष्य हा तत्कालीन पंतप्रधान मोरारजी देसाई यांचा भक्त आहे. अशा भक्तांकडे कसलंही लॉजिक चालत नाही, सामान्यज्ञान चालत नाही. सगळं काही देवाचरणी गहाण. या इसमाला मोरारजी कसे अहंमन्य आणि मग्रूर आहेत ते माहिती आहे. ते आपल्या मुलासाठी आपलं पदही पणाला लावलंय याचं त्याला आश्चर्य वाटतं. इंदिरा गांधी हुकूमशहा आहेत, असं म्हणण्याचा या अहंमन्य नेत्याला काही अधिकार आहे का (हा काय वेगळं वागतोय), असाही प्रश्न त्याला पडतो. पण आपल्या लाडक्या नेत्याचे इतके अवगुण कळल्यानंतरही त्याला हाय केल्यावाचून जीव राहात नाही… आजच्या काळातले नेते आणि त्यांचे मेंदूगहाण भक्त आठवले ना हे चित्र पाहून! नेत्याचं आणि त्याच्या माध्यमातून देशाचं वाटोळं हेच लोक करत असतात.