चार महिने तालीम झाल्यानंतर ३० एप्रिल २००० रोजी ‘जाऊबाई जोरात’ या नाटकाचा पहिला प्रयोग झाला आणि पुढच्या साडेतीन वर्षांत १००० प्रयोग झालेसुद्धा. पण हे यश सहजासहजी मिळाले नाही. निर्माता म्हणून दिलीपने प्रचंड कष्ट काढले. मानसिक ताण सहन केला. सुरुवातीचे १०० प्रयोग प्रचंड तणावात काढले. पण त्यानंतर तो ‘बाप’ निर्माता झाला.
—-
गिरगावातल्या चर्नी रोड स्टेशनचा पूल क्रॉस केला की केळेवाडी लागते, आता तिथे साहित्य संघ मंदिर आहे; पूर्वी तिथे एक स्मशान होते, ते अजूनही आहे… समोरच्या पटांगणात पत्र्याचा मंडप टाकून एक ओपन एयर नाट्यगृह होते, केळेवाडी नाट्यगृह. तिथे नाटक सादर होणं हा एक सांस्कृतिक सोहळाच असायचा. जवळच असलेल्या पिंपळाच्या झाडावर चढून वाडीतली उनाड, हुल्लडबाज पोरं ती नाटकं चोरून बघायची… अर्थात त्यांना ‘तिथून बघू नका’ असं सांगण्याचं कोणाच्यात धाडस नव्हतं. कारण ती मुलं दिवसभर शाळेत मस्ती करून, त्यांतर घरी दप्तर फेकून भर उन्हातान्हात त्या स्मशानात आणि समोरच्या मैदानात क्रिकेट, लगोर्या, हुतुतू यांसारखे खेळ खेळण्यात आणि उरलेला वेळ भांडण-तंटे करण्यात मग्न असत. त्यातून जमल्यास किंवा आईवडिलांचा ओरडा पडल्यास थोडाफार अभ्यास करीत…
त्या मुलांमध्ये पाप्प्या, बावा, बाबू, भाऊ ही जाधवांच्या घरातली मुलं आणि आजूबाजूची देसाई, परब, ठाकूर, वैद्य, लेले, बापट, सोमण अशी बरीच मराठी मुलं होती. दिवसभर खेळून झालं की नाटक असेल त्या रात्री पिंपळाचं झाड हे त्या सर्वांची हक्काची बाल्कनी असे. त्यावरच्या सर्वांच्या फांद्या फिक्स असायच्या. त्यातल्या त्यात ज्याची टगेगिरी जास्त त्याला जिथून नाटक स्पष्ट आणि चांगलं दिसायचं ती उत्कृष्ट फांदी मिळायची. या अशा मुलांमध्ये सातवीनंतर पुढचं शिक्षण घेण्यासाठी बावा कोकणातून आला होता. त्याचे वडील मुंबईत एका कारखान्यात नोकरी करायचे. बावा आणि त्याची भावंडं, पापा, विलास, आणि बाबू हे चौघेही एकामागोमाग एक शिकायला मुंबईत आले. केळेवाडीच्या नाक्यावर जाधवमामांनी, म्हणजे या मुलांच्या वडिलांनी एक खोली पागडीवर घेतली होती. त्यात जाधवांबरोबर आणखी दोनचार चाकरमानी पण राहत होते. सगळे मिळून एका मित्राच्या मावशीबाईंकडे खानावळी म्हणून जेवायला होते. बावाला शिक्षणात काडीचा रस नव्हता, पण पिंपळावर बसून नाटक बघणे यात त्याला प्रचंड रस होता. तिकीटं काढणं परवडायचं नाही, म्हणून पिंपळाचा पर्याय शोधून काढला होता. त्या मुलांमध्ये नुसतं नाटक बघणारे सगळेच होते, पण अतिशय तन्मयतेने नाटक बघणारा एकच होता- बावा म्हणजे दिलीप… ज्या पिंपळाच्या फांदीवर बसून दिलीप नाटक बघायचा त्या पिंपळालाच जणू खात्री होती की आपल्यावर बसून नाटक बघणारा हा मुलगा पुढे एक प्रतिथयश नाट्य निर्माता होईल म्हणून.
राममोहन हायस्कूलमधून एसेस्सी झालेला दिलीप ऐपत असून देखील कॉलेजला जाऊ शकला नाही. कारण अजून वाडीच्या बाहेरच्या जगात आपण काही करू शकू, याचा त्याला पत्ता नव्हता. कमावणारे एकटे वडील आणि तीन भावंडं, आई असा परिवार. वडिलांनीही अखेर सांगून टाकलं, एवढी माणसं घरात आणि मी एकटाच कमावतोय, चला तुम्हीपण कामाला लागा. दिलीपने सहज उपलब्ध होतं ते काम सुरू केलं. रोज सकाळी तो पेपरची लाईन टाकीत असे. गिरगाव, ठाकुरद्वारपासून ते अगदी ऑपेरा हाऊसपर्यंतच्या चाळीत, बिल्डिंगांमध्ये पेपर टाकण्याचे काम दिलीप करीत होता.
ते दिवस म्हणजे मुंबईतल्या मराठी माणसांवर, विशेषत: तरूण मराठी मुलांवर तेव्हा ‘मार्मिक’कार असलेल्या बाळासाहेब ठाकरे यांच्या भाषणांनी गारूड केले होते. रक्त सळसळवून टाकणारी बाळासाहेबांची भाषणे ऐकून मुळातच गरम रक्ताचा, आणि तापलेल्या डोक्याचा दिलीप बाळासाहेबांचा क्रियाशील सैनिक झाला. ‘अरे ला कारे’ म्हणून अंगावर धावणे या मुलांच्या अंगात भिनले होते. स्वभावाला पोषक अशी भारावलेली अवस्था त्या काळात तरुणांची झाली होती. सकाळच्या पेपर टाकण्याने तशी तुटपुंजी कमाई होत होती. म्हणून मग दिलीपने जवळच कांदेवाडीमध्ये ‘वडापावची गाडी’ टाकली. भगवा झेंडा आणि साहेबांचा फोटो एवढ्या भांडवलावर जागेचा प्रश्न सुटला आणि धंदाही तेजीत झाला. तशात १९६६चे ‘हटाव लुंगी, बजाव पुंगी’ आंदोलन छेडले गेले आणि दिलीप त्यात सक्रीय उतरला. याच काळात शिवसेनाही स्थापन झाली आणि दिलीप सक्रिय शिवसैनिक म्हणून ओळखला जाऊ लागला… एवढं सगळं करूनसुद्धा दिलीपचं लक्ष एकीकडे नाटकधंद्यावरही होतंच… या सर्व काळात साहित्य संघाची इमारत उभी राहिली आणि एक अद्ययावत असे नाट्यगृहही उभे राहिले.
दिलीपचे सगळे उद्योग आणि टापटीप हिशोब ठेवण्याची वृत्ती- जी त्याला त्याच्या ‘कोकणातल्या आजी’कडून आली होती, ती काही लोकांच्या लक्षात आली होती. साहित्य संघातल्या श्रीधर जाधव यानी दिलीपला डोअरकीपर म्हणून काम दिले. प्रत्येक नाटकाचे दोन रुपये डोअरकीपर म्हणून दिलीपला मिळायचे. विजय देसाई हे अभिजातसारख्या तीन चार मोठ्या संस्थेचे व्यवस्थापक तिथे जवळच राहत होते. त्यांनी दिलीपला हेरले. आणि त्यांच्याकडे असलेल्या नाटकांच्या बुकिंग्जवर बुकिंग क्लार्क म्हणून जबाबदारी दिली. त्याचे चार दिवसांचे २५ रुपये मिळत, पण त्यातले दहा रुपये विजय देसाईला द्यावे लागत. पैशापेक्षा नाटकाशी संबंध राहतो म्हणून दिलीप तेही करीत गेला.
त्या काळात साहित्य संघात अनेक एकांकिका स्पर्धा होत होत्या. उन्मेष आंतरमहाविद्यालयीन, आयएनटी, तसेच आंतरबँक एकांकिका स्पर्धा, अगदी प्रचंड गर्दीत सादर होत. त्यात बँकेच्या स्पर्धेमध्ये युनियन बँकेच्या एका ग्रुपला दिलीपने खूप मदत केली. त्यावेळी त्याचा तो आवेश बघून युनियन बँकेचे अनिल घोडदळकर यांनी दिलीपला नोकरीसाठी बँकेत अर्ज करायला सांगितला. त्याच्यातल्या हिशेबी आणि व्यवहारात चोख माणसाने बँकेतच काम केले पाहिजे असा त्यांचा आग्रह होता. पण दिलीपचं शिक्षण एसेसीपर्यंतच झाले होते, ही अडचण होती. ग्रॅज्युएट असता तर क्लार्क म्हणून नोकरी मिळाली असती. तरीही घोडदळकरांनी अर्ज करायला सांगितले आणि तीन मान्यवर व्यक्तींचे पत्र मिळव म्हणून कामाला लावले. दिलीपच्या अर्जाला त्यावेळी डॉ. काशिनाथ घाणेकर, लेखक सुरेश खरे, आणि भालचंद्र पेंढारकर यांनी खास पत्र दिले की हा मुलगा अत्यंत हुशार आणि बँकेत नोकरीकरिता योग्य आहे वगैरे. घोडदळकरांचा वशिला आणि ही तीन पत्रे यांच्या जोरावर दिलीपला बँकेत प्यून म्हणून नोकरी लागली. घोडदळकरांनी सांगितले की तूर्तास तू ही नोकरी स्वीकार आणि परीक्षा देत देत पुढे प्रमोशन घेत जा. दिलीपने त्यांचे ऐकले आणि तो इमानेइतबारे बँकेत कामाला लागला.
नाट्यक्षेत्रातली बरीच मंडळी तेव्हा बँकांमध्ये नोकरी करीत होती. अमोल पालेकर, अशोक सराफ, रीमा लागू, विवेक लागू, दिलीप कोल्हटकर, दिलीप कुलकर्णी वगैरे वेगवेगळ्या बँकांमध्ये होते, स्पर्धांच्या निमित्ताने सर्वांचा दिलीपशी संपर्क असे. अशा प्रकारे इथून तिथून दिलीपचा नाट्यक्षेत्राशी संबंध मात्र कायम राहिला.
त्या काळात मच्छिंद्र कांबळींचं ‘वस्त्रहरण’ नाटक जोरात सुरू होतं… त्यानंतर मच्छिन्द्रनी एका पेक्षा एक सरस नाटकांची निर्मिती केली. सगळी नाटकं हाऊसफुल सुरू होती. बाळ कोचरेकर त्यांचा व्यवस्थापक होता. मच्छिंद्र कांबळींना म्हणजे बाबुजींना आणखी व्यवस्थापक हवा होता. त्यांनी दिलीपला बोलावले. दिलीप नोकरी सांभाळून ते करत होता. दिलीपला बाबूजी पैसे देत नव्हते पण हाउसफुल नाटकांचे व्यवस्थापन, तारखा मॅनेज करणे, कलाकार सांभाळणे, बुकिंग मॅनेज करणे या सर्व गोष्टींचे ट्रेनिंग दिलीपला मिळाले. मात्र ‘वस्त्रहरण’च्या लंडन दौर्यात बाबूजी दिलीपला घेऊन गेले. त्याचा खर्च त्यांनी स्वत: केला, दिलीपला करू दिला नाही.
दिलीपची बुकिंग, व्यवस्थापन, नाटकविषयक जाण वाढत होती. राजा गावडेलिखित दिलीप कोल्हटकर दिग्दर्शित ‘संगीत उचलबांगडी’ या नाटकाची व्यवस्था बघण्याचे स्वतंत्र काम दिलीपला मिळाले. नोकरी सांभाळून ते तो करीत होता. त्यात राजा गावडे आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या प्रमुख भूमिका होत्या. नाटक धमाल विनोदी असूनही चालले नाही. (पुढे ‘टूरटूर’, ‘शांतेचं कार्ट चालू आहे’ या नाटकांच्या प्रचंड यशानंतर तेच नाटक नाव बदलून ‘बिघडले स्वर्गाचे दार’ या नावाने विलास जाधव, दादा गोडकर वगैरेनी लक्षाला घेऊन काढले, यावेळी मात्र ते सुपरहिट झाले.) मधल्या काळात दिलीपने विजय देसाई यांच्याबरोबर पुण्याच्या थिएटर अकादमी निर्मित ‘घाशीराम कोतवाल’, ‘महानिर्वाण’ वगैरे नाटकांचे मुंबईतले व्यवस्थापन केले. अनेक नाटकांचे व्यवस्थापन केले. नोकरी शाबूत होती, तरी दिलीपचा एक पाय रंगभूमीच्या व्यवस्थापनात होताच.
१९८३ साली मी माझ्या ‘चौरंग’ या नाट्यसंस्थेतर्फे ‘टूरटूर’ हे माझं पहिलं व्यावसायिक नाटक लिहून दिग्दर्शित केले आणि निर्माताही मीच होतो. लक्ष्मीकांतने मला सल्ला दिला, व्यवस्थापन आपण दिलीप जाधवकडे देऊ या. त्याचवेळी लक्षाने माझी दिलीपशी ओळख करून दिली आणि टूरटूरची अगदी रिहर्सलपासूनची सगळी व्यवस्था दिलीपने केली. प्रयोग सुरू झाले, नाटक हळूहळू सुपरहिट झाले. ते बारा वर्षे चालले.
निर्माता म्हणून ‘पहिला (निसटता) ब्रेक’
१९८७ साली एके दिवशी दिग्दर्शक कुमार सोहोनीने एक स्क्रिप्ट दिलीपकडे आणले, लेखक प्रदीप दळवी. नाटकाचं नाव ‘सासू मेलीच पाहिजे’ असं होतं. त्यात दिलीप प्रभावळकर प्रमुख भूमिका करणार होते. कुमारने सगळी जमवाजमव केली होती. दिलीपने त्या नाटकाची निर्मिती करावी, म्हणून कुमारने ते स्क्रिप्ट दिलीपकडे दिले. दिलीपने ‘ओम नाट्यगन्धा’ या संस्थेच्या मदतीने या नाटकाची निर्मिती करायचे ठरवले. पार्श्वसंगीत देण्यासाठी ते स्क्रिप्ट दिलीपने माझ्याकडे दिले. नाटकाचे नाव वाचून मी दिलीपला म्हटले, हे नाव नकारात्मक आहे. ‘सासू मेलीच पाहिजे’ या नावाने महिलावर्ग कदाचित नाराज होईल. कशीही असली तरी सासू ही आईच्या जागी असते. त्यापेक्षा या नाटकाचे नाव ‘वासूची सासू’ ठेव. त्यातल्या ‘रवी’ या पात्राचे नाव बदलून ‘वासू’ असे ठेवायला सांगितले. दिलीप, कुमार, प्रदीप सर्वांना हे नाव आवडले. दिलीप प्रभावळकर, अविनाश खर्शीकर, अरूण नलावडे, अतुल परचुरे आणि अश्विनी भावे अशी दमदार कलावंत मंडळी त्या नाटकात होती. कुमारने धमाल दिग्दर्शन केलेले असूनही आणि तुफान कॉमेडी असूनसुद्धा नाटक १६० प्रयोगापर्यंत टुकूटुकू चालले होते. त्या काळात दूरदर्शनवर ‘नाट्यावलोकन’ या कार्यक्रमात नाटकांचे त्यातील प्रसंगांसहित परीक्षण व्हायचे. त्यात नाटकाचे कौतुक तर व्हायचेच शिवाय संपूर्ण महाराष्ट्रात ते मोठ्या प्रमाणात पाहिले जायचे. हे नाट्यावलोकन झाले आणि १६१व्या प्रयोगापासून ‘वासूच्या सासूचे’ जणू ‘मोरूची मावशी’ झाले. धो धो हाऊसफुल प्रयोग होऊ लागले. आणि दिलीपला निर्माता म्हणून अनेक नाटकांनंतर यश मिळाले. पैसा आला. सगळ्यांची देणी देऊन दिलीपने इतर दोन भागीदारांबरोबर पुण्यात बाणेरला १० गुंठे प्लॉट पण घेतला.
नवीन नवीन पैसा आला की तो घरात टिकत नाही, तसा या यशानंतरचा पैसाही टिकला नाही. त्यानंतर केलेली नाटके सपशेल पडली. आर्थिक नुकसान झालं आणि मोठ्या हौसेने घेतलेली जागा विकून लोकांचे पैसे देऊन टाकावे लागले. त्यानंतर पुन्हा दिलीपने ‘रानभूल’ या नाटकाची निर्मिती केली. लेखक होते प्र. ल. मयेकर, दिग्दर्शक विनय आपटे. जिद्दीने ७०, ८० प्रयोग केल्यानंतर ते नाटक दिलीपला झेपेना. अनेक पुरस्कार मिळूनसुद्धा ही दर्जेदार निर्मिती तग धरू शकली नाही. मग दिलीपने ते नाटक विनय आपटेला दिले, त्याने त्याच्या ‘गणरंग’ संस्थेतर्फे ते पुढे चालवले.
दुसरा, पण ‘रिस्की’ ब्रेक…
दिलीपची नाट्यधडपड सुरूच होती. त्याला कोणी ना कोणी उद्योजक भेटायचे, नाट्यनिर्मितीसाठी पैसे द्यायचे, निर्माता म्हणून दिलीप त्याच्या ‘अष्टविनायक’ या नाट्यसंस्थेतर्फे नाटक निर्माण करायचा. पण ते नाटक चालले की कोणीतरी त्या उद्योजकाला पिन मारायचे आणि ते नाटक दिलीपच्या हातून जायचे. १९९५ साली मी महाराष्ट्र शासनाची ‘शिवशाही आपल्या दारी’ ही मंत्र्यांच्या मुलाखतींवर आधारित मालिका करीत होतो. त्याची व्यवस्था बघायला मी दिलीपला सांगितले. त्यात केदार शिंदे माझ्या युनिटमध्ये दिग्दर्शक म्हणून होता. त्याने दिलीपला त्याचे ‘आमच्या सारखे आम्हीच’ हे नाटक निर्माण करायची विनंती केली. पण तोपर्यंत दिलीपची स्वत: नाटक निर्माण करण्याची ऐपत शिल्लक उरली नव्हती. त्यामुळे ते नाटक घेऊन दिलीप एका प्रथितयश निर्मातीकडे गेला आणि त्यांना नाटकाची निर्मिती करायची विनंती केली. त्या बदल्यात त्याने फक्त प्रत्येक प्रयोगासाठी २०० रुपये रॉयल्टीची मागणी केली. त्यांनी ती कबूल करून नाटक निर्माण केले. केदारचे पहिलेच व्यावसायिक नाटक हिट झाले. पण दिलीपला त्याची रॉयल्टी पन्नासएक प्रयोगांनंतर काही मिळाली नाही.. दिलीप मागायला गेला तर त्या निर्मातीने एका मोठ्या वर्तमानपत्रात लेख लिहून ‘दिलीप जाधव माझ्याकडे खंडणी मागतो’ अशी ‘अंडरवर्ल्डी’ तक्रार केली. या बदनामीला उत्तर न देता दिलीप गप्प राहिला. स्वत:वर झालेला अन्याय दिलीप नेहमीच सहन करतो, मात्र नाट्यक्षेत्रातील अडचणींसाठी वर्तमानपत्रातून अथवा सरकार दरबारी मात्र दिलीप अनेक पत्र लिहित असतो. त्या पत्रलेखनाचा वापर दिलीपने त्याकाळी केला असता तर एक वेगळेच पत्रयुद्ध वाचकांना वाचायला मिळाले असते.
१९९५च्या दरम्यान ‘शिवशाही…’ मालिकेसाठी दिलीप व्यवस्थापन करीत असताना मी त्याची ही नाट्य धडपड पहात होतो. दिलीपने ‘अष्टविनायक’तर्फे नाटक निर्माण केले आणि ते हिट होऊन चालू लागले की काहीतरी निमित्त होऊन ते नाटक त्याच्या हातून निघून जायचे. हे सतत चालूच होते. मीही अनेक वर्षे सरकारी कामे, माहितीपट, इव्हेंट्स वगैरे करीत होतो. त्यामुळे त्या दरम्यान मला एक नाटक सुचलं. त्यात मंत्र्यांच्या बायका महाराष्ट्रभर सहलीला निघतात आणि त्यांना जे अनुभव येतात, त्यावर ते नाटक दृक्श्राव्य माध्यमात, अतिशय भव्य दिव्य स्वरूपात मला सादर करायचे होते. एकूण नाट्यनिर्मितीला नेहमीपेक्षा चौपट खर्च येणार होता आणि त्यात सोळा सतरा स्त्री भूमिकाही होत्या. मी दिलीपला म्हटले, हे नाटक तू निर्माण कर, पण हक्क तुझ्याकडेच ठेव. भागीदार घेऊ नकोस. हा वेगळा प्रयोग आहे व्यावसायिकदृष्ट्या, हे नुसते नाटक नाही, हे एक प्रपोजल आहे. तीन तास मनोरंजनाचा खजिना आहे. यात नाटक, सिनेमा, संगीत, नृत्य, नेपथ्यातल्या गमती, कॉमेडी, प्रवासवर्णन, भावभावनांचे मिश्रण, असे हे एक व्यंगचित्रात्मक कार्टून नाट्य आहे. हे तू कर, मलाही तुझ्याबरोबर असे भव्य नाटक उभे करायला सोप्पे जाईल. दिलीपने कबूल केले, पण त्यानंतर मला ते नाटक लिहून रंगमंचावर आणायला पाच वर्षे लागली. ते नाटक म्हणजे ‘जाऊबाई जोरात…’
निर्मिती सावंत, मकरंद अनासपुरे, मंगेश देसाई, उज्वला जोग, शीतल शुक्ल, अतिशा नाईक असे अत्यंत संवेदनशील कलावंत, १६ स्त्री कलावंत, पाच पुरुष कलावंत, आणि १२ तंत्रज्ञ तसेच पडद्यावर अनेक पाहुणे कलाकार असा एक प्रचंड मोठा घाट म्हणजे ‘जाऊबाई जोरात’ हे नाटक. चार महिने तालीम झाल्यानंतर ३० एप्रिल २००० रोजी या नाटकाचा पहिला प्रयोग झाला आणि पुढच्या साडेतीन वर्षांत १००० प्रयोग झालेसुद्धा. पण हे यश सहजासहजी मिळाले नाही. निर्माता म्हणून दिलीपने प्रचंड कष्ट काढले. मानसिक ताण सहन केला. सुरुवातीचे १०० प्रयोग प्रचंड तणावात काढले. नाटक जसजसं सुपरहिट होत होतं, तसतसं ते नेहमीप्रमाणे दिलीपच्या हातून सटकण्याचे चान्सेस वाढले. अगदी दिलीपच्या जिवावर उठण्यापर्यंत मजल गेली. प्रचंड बजेट असल्या कारणाने दिलीपने काही लोकांकडून पैसे घेतले… ते त्यांना परत दिलेही. पण त्यातला एक मात्र चांगलाच नडला. तो नाटकावर हक्क सांगू लागला. एका ‘भाई’च्या मदतीने जिवे मारण्याच्या धमक्या आल्या. दिलीपने मित्रांच्या मदतीने ते प्रकरण अतिशय शिताफीने सोडवले. आणखी काही पैसे देऊन त्या माणसाला कायमचे गप्प केले. आणि त्याच्याकडून त्याच भाईच्या मदतीने लेखी हमीसुद्धा घेतली की ‘उद्या मी केळीच्या सालीवरून जरी घसरलो, तरी त्याला जबाबदार तुम्हीच..’. पैसे मिळतायत म्हटल्यावर त्याने लिहूनही दिले. आणि त्यानंतर मात्र आजतागायत काही अडचण आली नाही.
ब्रेक के बाद
‘जाऊबाई जोरात’ या नाटकाने दिलीपला चांगलेच स्थिरस्थावर केले. त्यानंतर आलेली ‘श्यामची मम्मी’, ‘गंगुबाई नॉन मॅट्रिक’ ही नाटकेही जोरात चालली आणि दिलीप जाधव एक महत्वाचा नाट्यनिर्माता झाला. ‘बाप’ निर्माता झाला. नाटकातल्या कलावंतांचा आधारस्तंभ झाला. जाऊबाईमधल्या मुलींचा ‘बाबा’ झाला.. त्यांचे भरपूर लाड केले. १९९० सालीच बॅकस्टेज कलावंताचा विमा उतरवणारा दिलीप हा बहुधा पहिला निर्माता असावा. इतकंच नव्हे, तर माझ्या बाबतीतही त्याने एक अघटित घटना घडवली. जाऊबाईच्या हजाराव्या प्रयोगाला त्याने मला चक्क या नाटकाचा लेखक, दिग्दर्शक, संगीतकार, नेपथ्यकार, प्रकाशयोजनाकार म्हणून प्रचंड यशाच्या मोबदल्यात एक नवी कोरी ‘फोर्ड आयकॉन कार’ प्रेझेंट दिली.
दिलीप जाधवच्या नावावर एक निर्माता म्हणून अनेक महत्वाची नाटके आहेत. अलीकडे सादर झालेले शेक्सपियरचे ‘हॅम्लेट’ हे प्रचंड भव्यदिव्य आणि तितकेच परिणामकारक नाटक दिलीपने ‘जिगीषा’ या संस्थेसमवेत निर्माण केले. प्रशांत दळवी, चंद्रकांत कुलकर्णी या लेखक-दिग्दर्शकद्वयीचे, श्रीपाद पद्माकर यांचा निर्मिती सहभाग असलेले हे नाटक, अनेक नवीन संकल्पनांसकट मराठी रंगाभूमीवर अवतरले. त्यानंतर दिलीपला या टीमच्या संगतीत वेगळे दर्जेदार प्रयोग करण्याचा चस्काच लागला. महेश एलकुंचवार लिखित ‘वाडा चिरेबंदी’ ‘मग्न तळ्याकाठी’सारखी अनवट नाटकं त्यापाठोपाठ आली. प्रशांत दामलेबरोबर ‘साखर खाल्लेला माणूस’ची सहनिर्मिती केली आणि आता निर्मिती सावंत आणि अशोक सराफ ही तुफान विनोदी जोडगोळी ‘व्हॅक्युम क्लीनर’सारख्या त्याच्या नाटकात झळकते आहे.
कोरोनामुळे अचानक उद्भवलेल्या टाळेबंदीमुळे सर्व रंगकर्मी मोठ्या संकटातून संक्रमित होत आहेत. दिलीपसह सर्वजण यातून मोठ्या जिद्दीने पुन्हा बाहेर पडणार आहेत हे निश्चित. अनेक नवीन प्रयोग दिलीपच्या मनात आहेत. या महामारीच्या ब्रेकनंतर पुन्हा जोरात उभं राहण्यासाठी दिलीप सज्ज आहे.
दिलीपची धाकटी मुलगी खुशबू ही चक्क जागतिक कीर्तीचा शैलीदार डान्सर आणि डान्सगुरू श्यामक दावर याची प्रमुख सहायक नृत्यदिग्दर्शिका आहे, हे कळल्यावर मला सगळ्यात मोठा धक्का बसला. ती सतत परदेश दौर्यावर असते. मोठी मुलगी मालिका संकलक आहे आणि मुलगा अजून शिकतोय. दिलीपचे वडील, आई, पत्नी, आणि भाऊ विलास जाधव यांचे अकाली निधन हा दिलीपच्या इतर अनेक तोट्यांप्रमाणे मोठा लॉस आहे. पण जसे दिलीपने अनेक अपयश, आर्थिक तोटे, बदनाम्या, जिवावरच्या सुपार्या, मनस्ताप सोसले, तसे हेही दु:खद प्रसंग सोसले.
एकेकाळी व्यायामाने कमवलेलं शरीर, आणि अंगातली रग केळेवाडीतल्या शिवसेनेसाठी अंगावर धावून जाण्यासाठी वापरणारा दिलीप, आज अतिशय शांत, सहनशील, आणि सावध जीवन जगतोय. पण त्याच्या निकटवर्तीयांना त्याचा शांत, गंभीरपणा बघणं कधी कधी जिवावर येतं. ज्यावेळी वस्सकन अंगावर येऊन दिलीप चार शब्द सुनावतो, तेव्हाच तो सर्वांना आपला ‘बाप’ निर्माता असल्याचा आनंद होतो. प्रचंड चढउतार, तरीही डोअरकीपर ते एक यशस्वी निर्माता, हा दिलीपचा प्रवास… हिमालय चढून जाणार्या शेरपा तेनझिंगसारखाच धाडसी आहे एवढं नक्की.
– पुरुषोत्तम बेर्डे
(लेखक नाट्य व चित्रपटसृष्टीतील सिद्धहस्त अष्टपैलू कलावंत आहेत)