मित्र-मैत्रिणींनो, कोणत्याही चॅनेल वरून न सांगितली गेलेली अगदी आतली आणि खरी बातमी आज मी तुम्हाला सांगणार आहे. मुकुल रॉय नामक कोणी इसम भाजपात आलाय याची मोदीजींना अजिबात कल्पना नव्हती. परवा बंगालात शेवटच्या प्रचारसभेच्या आधी त्यांच्यापुढे कुणीतरी मुकुलला आणून उभा केला आणि सांगितले की हे साहेब दोन वर्षांपूर्वी तृणमूलमधून भाजपात आलेत. मोदीजींना मुकुलचा चेहेरा बघताच आठवले की आपण याचा फोटो कुठेतरी पाहिलाय. स्मरणशक्तीला थोडीशी चालना देताच त्यांच्या लक्षात आले की या भ्रष्टाचारी माणसाचे नाव एका चिट फंड घोटाळ्यात येऊन पुरते बदनाम झालेले आहे. अशी दुष्कीर्ती असलेला माणूस आपल्या पवित्र पक्षात आलाय म्हटल्यावर मोदीजी प्रचंड खवळले. तथापि कसलेला राजकारणी माणूस हा शांत महासागर किंवा निद्रिस्त ज्वालामुखीप्रमाणे असतो. संपूर्ण जगताला भस्म करू शकणारा लाव्हा हृदयात बंदिस्त करून ठेवण्याचे कसब त्याला साध्य असते. मनात पेटलेला अंगार तो योग्य वेळ आल्याशिवाय कधीच उघड करून दाखवत नाही. त्यातून मोदीजी म्हणजे तर निर्विकारतेचा गौरीशंकर! एक वेळ ब्रह्मांडाच्या उगमाचे रहस्य उलगडेल परंतु मोदीजींच्या ‘पोकर फेस’ मागे दडलेल्या खर्या भावना ओळखणे केवळ अशक्य.
तर त्या सभास्थळी कुणीतरी मुकुलची ओळख तृणमूलमधले माजी महान नेते आणि भाजपाचे बंगालमधील आधारस्तंभ अशी करून दिली. मोदीजींनी त्या क्षणी चेहेर्यावर कोणतेही भाव न दाखवून देता अत्यंत शांतपणे मुकुलची विचारपूस केली. एखाद्या जबाबदार प्रौढ कुटुंबप्रमुखाप्रमाणे त्याच्या मुलाबाळांची हालहवाल देखील विचारली. मनोमन मात्र त्यांनी तेव्हाच निर्णय घेतला होता की भ्रष्टाचार सिद्ध होणे दूरची बात; परंतु भ्रष्टाचाराचा नुसता आरोप झालेला माणूससुद्धा कोणत्याही परिस्थितीत माझ्या पक्षात असता कामा नये. त्यांनी बंगालच्या निवडणुका, तदनंतरचे निकाल पार पडू दिले आणि नंतर एके दिवशी मोदीजींच्या कार्यालयातून मुकुलला बोलावणे आले. तो खूष झाला. त्याला वाटले मोदीजी आपले तोंड भरून कौतुक करणार आणि केंद्रातली काहीतरी मोठी जबाबदारी आपल्यावर सोपवणार. दुसर्या दिवशी तो मोदीजींच्या कार्यालयात पोहोचला. मनात मांडे खात दरवाजा उघडून आत गेला आणि बघतो तो काय, पेटत्या निखार्याप्रमाणे लाल झालेल्या नेत्रांनी मोदीजी त्याची वाट पहात होते. त्याला एक शब्द देखील बोलायची संधी न देता मोदीजींनी त्याला आडवातिडवा फैलावर घेतला आणि शेवटी म्हणाले, ‘चालता हो इथून. भ्रष्टाचाराचे आरोप झालेल्या एकाही माणसाला माझ्या पक्षात स्थान नाही. इतरांसाठी तो फक्त पक्ष असेल पण माझ्यासाठी ते जगातले सर्वात भव्य मंदिर आहे. चल नीघ ताबडतोब आणि पुन्हा माझ्या समोर आपले काळे तोंड घेऊन यायची हिंमत करू नकोस.’
आसुडाप्रमाणे बरसणार्या मोदीजींच्या शब्दांमुळे मुकुलची अवस्था एखाद्या हवा निघालेल्या फुग्यासारखी झाली. मोदीजींना ओळखण्यात तो पूर्णपणे चुकला होता. मान खाली घालून मुकुल तेथून निघाला. मात्र मनोमन त्याने मोदीजींना सलाम ठोकला. त्यांच्या त्या वज्राहुनी कठोर आणि करारी रूपात मुकुलला साक्षात प्रभू श्री रामचंद्रांचा भास झाला. पक्षाचे कितीही नुकसान होवो परंतु डागाळला असल्याची नुसती शंका असलेल्या माणसाला पक्षात स्थान नाही ही भूमिका त्यांनी प्रभावीपणे अधोरेखित केली होती. आता पुन्हा तृणमूलच्या चिखलात जाऊन लोळण्याशिवाय मुकुलला दुसरा इलाज उरला नाही. म्हणतात ना ‘संतो, करम की गती न्यारी’ ….
तर मित्रांनो असे आहेत आपले लाडके मोदीजी! अध्यात्म आणि विज्ञान संपतं तिथे मोदीजी सुरू होतात. त्यांचे मास्टरस्ट्रोक कळायला गुलामांना शंभर जन्म घ्यावे लागतील. नमो नमो!
तळटीप– भाजपा आयटी सेलमधले काही बिनीचे मोहरे सोडून गेल्याचे ऐकले. त्यांची पोकळी भरून काढण्यासाठी या लेखाद्वारे मी अर्ज देत आहे. मासिक मेहेनताना सुरू करावा ही विनंती. क्योंकी …
सखी सैय्या तो खूबही कमावत है
मेहेंगाई डायन खायी जात है…