सुखधाम सोसायटीमधील एका फ्लॅटमध्ये चोरी झाली होती. हवालदार जोंधळे त्याचा तपास करत होते. सोसायटीतले राजेश जामकर यांच्या घरातून सोन्याचे दागिने, दोन लाखांची रोकड, असा माल चोरीला गेला होता. जामकरांची परिस्थिती बेताचीच होती. सोसायटी अलीकडेच स्थापन झालेली होती आणि तिथे सर्वसाधारण उत्पन्न गटातली मध्यमवर्गीय माणसं राहत होती. अशा एखाद्या माणसाच्या घरी एवढे पैसे आणि दागिने कसे काय, हाच पोलिसांचा पहिला प्रश्न होता. जामकरांकडून त्याचं उत्तर त्यांना मिळालं, ते म्हणजे जामकरांचा मोठा मुलगा अनिकेत याचं लग्न. पुढच्या महिन्यात त्याचं लग्न होतं, त्यासाठी खर्चाची तजवीज म्हणून जामकरांनी दागिने आणि पैसे जमवले होते.
सोसायटी छोटी असली, तरी तिथे सीसीटीव्ही लावलेले होते. रात्री एकच्या दरम्यान बाईकवरून दोघेजण आले, त्यांनी गेटच्या बाहेर बाईक लावली. वॉचमन तेव्हा जागेवर नव्हता. त्या दोघांनी तोंडाला फडकं बांधलेलं होतं. गेटमधून ते वॉचमनचा डोळा चुकवून आत शिरले, थोड्या वेळाने बाहेर गेले, हे सीसीटीव्हीमध्ये दिसत होतं. तोंडावरच्या फडक्यामुळे चेहरा ओळखू येत नव्हता.
चोरी झाली, तेव्हा जामकर आणि त्यांची पत्नी बाहेरगावी गेलेले होते, त्यांची मुलगी मनीषा ही एकटीच घरी होती. चोरट्यांनी तिला चाकूचा धाक दाखवून गप्प केलं होतं.
“आमची पोरगी लहान आहे हो साहेब, खूप घाबरली होती ती!’’ जामकरांनी पोलिसांना सांगितलं.
मनीषा कॉलेजच्या पहिल्या वर्षाला होती. परीक्षा जवळ आली म्हणून ती अभ्यास करत होती, त्याचवेळी झालेल्या या घटनेमुळे तिला धक्का बसल्याचं जाणवत होतं. तिच्या आईलाही तिची काळजी वाटत होती.
“दागिने, पैसे गेले तर जाऊ द्यात, पोरगी वाचली, हेच नशीब!’’ असंच ती पोलिसांनाही सांगत होती.
“साहेब, आमच्या मोठ्या मुलाचं लग्न आहे हो पुढच्या महिन्यात. कायतरी करा आणि चोरीला गेलेला माल परत मिळवून द्या!’’ असं सांगून जामकर पोलिसांच्या हातापाया पडले.
“ठीकाय, बघू.’’ असं सांगून जोंधळेंनी पुढचा तपास सुरू केला. वॉचमन नेमक्या मोक्याच्या वेळी जागेवर का नव्हता, हे पोलिसांना पडलेलं कोडं होतं. त्यांनी वॉचमनला दरडावून विचारलं.
“पेशाब करने के लिये गया था साहब!’’ म्हणून त्यानं सांगितलं. त्याला दोन रट्टेही देऊन झाले, पण त्याच्यावर संशय घेण्यासारखं काही नाही, हे त्यांच्या लक्षात आलं. चोरट्यांनी चेहरे झाकून घेतल्यामुळे त्यांची ओळख पटवणं अवघड जाणार होतं. पोलिसांनी काही सराईत गुन्हेगारांचे फोटो पडताळून बघितले, पण त्यातून काहीच हाती लागलं नाही.
चोरीला आता आठ दिवस होऊ गेले होते. एके दिवशी सकाळी जामकर आणि त्यांची बायको पोलिस स्टेशनला आले.
“काही तपास लागलेला नाही अजून. समजलं तर कळवतो.’’ असं सांगून हवालदार जोंधळेंनी त्यांना टोलवून लावायच्या प्रयत्नात होते, एवढ्यात जामकर रडत रडत म्हणाले, “चोरीचं विचारायला आलो नाहीये साहेब, आमची पोरगी गायब आहे कालपास्नं!’’
“काय?’’ जोंधळेंना धक्काच बसला.
“होय साहेब. काल संध्याकाळी क्लासला गेली होती. रात्री आठपर्यंत परत यायला हवी होती, पण आलीच नाही. सगळीकडे शोधलं, कुठेच पत्ता लागत नाहीये!’’ त्यांनी सांगितलं.
जोंधळे लगेच त्यांना इन्स्पेक्टर अभिनकरांकडे घेऊन गेले.
अभिनकरांनी मनीषाबद्दलची सगळी माहिती घेतली. जामकर नवरा-बायकोला धीर दिला.
“तुमची मुलगी सापडेल, धीर धरा!’’ असं सांगून दिलासा दिला. जामकरांची काळजी काही संपली नव्हती. चोरी आणि नंतर एक तरुण मुलगी गायब होणं, अशी दोन संकटं एकाच घरावर कोसळली होती, तीसुद्धा आठवड्याच्या आत. पोलिसांपुढे दोन्हीही गुन्हे उकलण्याचं आव्हान होतं.
मनीषाचा फोन बंद होता. तो ट्रॅक करायच्या सूचना अभिनकरांनी जोंधळेंना दिल्या. मनीषाबद्दल अधिक माहिती काढायला सुरुवात केली.
“पोरगी साधीसुधी होती साहेब. कुणाच्या अध्यातमध्यात नसायची. कॉलेजला जायची, क्लासला जायची. वेडंवाकडं काय करताना दिसली नाही कधी.’’ एका शेजारणीनं सांगितलं.
“मनीषा आणि मी नेहमी बरोबर असायचो. ती फार बोलायची नाही. पण कायम आनंदी असायची. तिला काही त्रास आहे किंवा मनात काही आहे, असं कधी वाटलं नाही.’’ एका मैत्रिणीनं माहिती पुरवली.
“साहेब, आमची मुलगी नाकासमोर चालणारी होती. आमचा मोठा मुलगा कामाला औरंगाबादला असतो. मनीषाचा त्याच्यावर लई जीव. सोसायटीत सगळ्यांचं ऐकणार, घरात आमचं ऐकणार. कुणाला काय त्रास नव्हता तिचा साहेब,’’ मनीषाच्या आईचं रडणं थांबत नव्हतं.
एकूणच मनीषाबद्दल सगळ्यांचं चांगलं मत होतं. आदल्या दिवशी ती नॉर्मलच वाटत होती. संध्याकाळी सातचा क्लास असायचा, त्यासाठी ती साडेसहा वाजता घरातून निघाली होती. क्लासमध्ये मात्र गेली नव्हती. याचा अर्थ, घरातून निघाल्यानंतरच तिच्या आयुष्यात काहीतरी घडलं होतं आणि ती गायब झाली होती.
“फोनचे रेकॉर्ड्स आले का, जोंधळे?’’ अभिनकरांनी विचारलं.
“होय साहेब.“ जोंधळेंनी तातडीने कॉल रेकॉर्ड्स अभिनकरांकडे सादर केले. त्यातल्या काही नंबर्सवर त्यांनी खुणा केल्या होत्या.
“साहेब, काल दिवसभरात तिला पाच कॉल्स आले होते. त्यातला एक औरंगाबादला असलेल्या तिच्या भावाचा होता, एक वडिलांचा, एक मार्वेâटिंग कॉल होता, एक मैत्रिणीचा.’’
“आणि हा नंबर कुणाचा आहे?“
“हा एका दुकानाचा आहे साहेब, फोन करून बघितलाय. इथून कॉल का आला होता, हे माहीत नाही,’’ जोंधळेंनी सांगितलं. जोंधळेंनी फक्त फोन करून कन्फर्म केलं होतं. मनीषाबद्दल काही विचारलं नव्हतं.
अभिनकरांनी लगेच तिच्या आईवडिलांना बोलावून घेतलं.
“हा नंबर ओळखीचा आहे काय?’’ त्यांनी तो नंबर दाखवून जामकरांना विचारलं.
“नाही साहेब, आमच्या ओळखीतला कुणाचा नाहीये.’’
अभिनकरांनी जोंधळेंना लगेच त्या नंबरवर उलट कॉल करायची सूचना केली. जोंधळेंनी कॉल केला. कॉल त्या दुकानात वाजला.
“हॅलो… संतोष जनरल स्टोअर!!’’ पलीकडून आवाज आला.
“ससाणेवाडी पोलिस स्टेशनमधून हवालदार जोंधळे बोलतोय. कुठं आलं तुमचं दुकान?’’
“हनुमाननगर भागात साहेब. प्रगती क्लासेसच्या बाजूला,’’ पलीकडच्या माणसानं पटकन उत्तर दिलं. जोंधळेंनी त्याच्याकडून आणखी जुजबी माहिती घेऊन फोन ठेवला.
“आत्ता आठवलं साहेब. मनीषा प्रगती क्लासमध्येच संध्याकाळी जायची. तिथल्या जवळच्या दुकानातून ती फोनचा रिचार्ज मारायची. या नंबरवरून तिला फोन यायचा. त्यांनी रिचार्जसाठीच फोन केला असणार,’’ मनीषाच्या आईनं सांगितलं.
एक धागा मिळण्याची शक्यता होती, तीसुद्धा मावळली. पोलिसांनी दोघांना घरी पाठवून दिलं. दिवस संपला, तरी मनीषाचा काही पत्ता लागत नव्हता.
दुसरा दिवस उजाडला आणि सकाळीच पोलिसांना वर्दी मिळाली. शहराबाहेरच्या एका रस्त्याच्या कडेला एका तरूण मुलीचा मृतदेह सापडला होता. फोटोवरून ती मनीषाच असल्याची खात्री झाली. जामकरांना ओळखीसाठी बोलावलं गेलं आणि मुलीचा निष्प्राण देह बघून मनीषाच्या आईनं टाहो फोडला. अचानक घरातून गायब झालेली आपली मुलगी कायमची सोडून जाणं, हा दोघांसाठीही प्रचंड धक्का होता.
पोस्टमार्टेमचा रिपोर्ट आला आणि त्यात मनीषाचा गळा घोटून खून करण्यात आल्याचं स्पष्ट झालं. दुसरी धक्कादायक गोष्ट उघड झाली होती, ती म्हणजे तिच्यावर बलात्कार झाला होता. आधी घरात चोरी, मग मुलीचं गायब होणं, तिचा खून झाल्याचं उघड होणं आणि तिच्यावर झालेला बलात्कार. जामकर कुटुंबावर आभाळ कोसळल्यासारखं झालं होतं.
“जामकर, तुमच्या मुलीबद्दल तुम्ही सगळं सांगितलं आहे. तरीही काही संशय येण्यासारखं, नजरेतून सुटलं असेल असं काही होतं का? तिला कुणी त्रास देत होतं का, कुणाशी जास्त मैत्री वगैरे होती का?’’ अभिनकरांनी पुन्हा नव्याने चौकशीला सुरुवात केली.
“नाही हो साहेब… आमची मुलगी अशी नाही!’’ हे एकच पालुपद जामकर नवराबायकोनं लावून धरलं होतं. मनीषाचा फोन त्या संध्याकाळपासून बंदच होता. ती घरातून गायब झाल्यानंतर काही वेळातच फोन बंद झाला होता. सिमकार्ड बंद होतं, तरी लोकेशन ट्रॅक करायला पोलिसांनी सांगितलं होतं. तिच्या घराजवळच्याच एका नदीपाशी ते लोकेशन मिळालं. मनीषाचा फोन तिथेच कुणीतरी टाकून दिला असावा, असा अंदाज होता. फोन मिळणं अशक्यच होतं. निदान मनीषा तिथपर्यंत आली होती, याचा तपास लागत होता.
अभिनकरांनी आता सगळ्याच प्रकरणाकडे पहिल्यापासून बघायचं ठरवलं. मनीषाचं अचानक घरातून निघून जाणं, तिचा बलात्कार आणि खून, यात काहीतरी संशयास्पद होतं नक्कीच. तिच्या फोनचे रेकॉर्ड पुन्हा पुन्हा तपासून बघितले गेले. तिला ओळखणार्या सगळ्या माणसांची पुन्हा एकदा जबानी झाली.
दोन दिवस काहीच धागेदोरे मिळत नव्हते. क्लासमधल्या एका मुलीनं चौकशीत एक माहिती पुरवली आणि पोलिसांच्या तपासाची चक्रंच फिरली.
“मनीषाला अधूनमधून कुणाचेतरी फोन यायचे साहेब. क्लासमध्ये फोन आला, की ती काहीतरी कारण सांगून लवकर निघून जायची.’’
तिच्या या माहितीमुळे अभिनकरांचं लक्ष वेधलं गेलं. त्यांनी पुन्हा मनीषाच्या आईवडिलांकडे चौकशी केली, पण ते स्वत: कधीच असा क्लासमध्ये फोन करायचे नाहीत, हे उघड झालं. संध्याकाळी सात ते आठ या वेळेत तिला कुणाचे कॉल आले होते, हे शोधून काढायला हवं होतं. रेकॉर्ड हाताशी होतंच. एका नंबरवर पोलिसांची नजर खिळून राहिली. आता हाच नंबर पोलिसांना गुन्हेगारापर्यंत पोचवणार होता.
फोनचे रेकॉर्ड पुन्हा बघताना लक्षात आलं, की ज्या दिवशी घरात चोरी झाली, त्या रात्रीही मनीषाच्या फोनवर त्याच नंबरवरून कॉल्स आले होते. रात्री बारा वाजता, साडेबारा वाजता. एवढ्या रात्री तिला कुणी फोन केला असेल? चोरट्यांनी तिला काही इजा केली नव्हती. तिला फक्त चाकूचा धाक दाखवला, असं तिचं म्हणणं होतं. हा त्या चोरट्याचाच नंबर नसेल ना? पण मग तिचं गायब होणं आणि नंतर बलात्कार, खून?
एक शक्यता अभिनकरांच्या डोक्यात घर करू लागली होती आणि आता तिची शहािनशा करायची वेळ आली होती. मनीषाच्या फोनवर जिथून कॉल आला होता, तो नंबर त्यांनी ट्रॅक करायला सांगितला. त्याची प्रत्येक दिवसाची सगळी लोकेशन्स त्यांना हवी होती.
रेकॉर्ड हातात आले आणि अभिनकरांचा चेहरा उजळला. त्यांनी सरळ प्रगती क्लासेसच्या बाजूला असलेल्या संतोष जनरल स्टोअर्सकडे मोर्चा वळवला आणि दुकानाच्या मालकाचा पोरगा सूरज पायगुडे याला उचलला. कोठडीत आणून पोलिसांनी त्याला चांगला हाणला.
“सूरज पायगुडे, मनीषाला का मारलंस?’’ अभिनकरांनी विचारल्यावर सूरज गळपाटला. तरीही आपण काहीच केलं नाही, असं सांगत राहिला. पट्ट्याचे आणखी दोन तडाखे बसल्यावर मात्र त्याचा धीर सुटला.
“सगळं सांगतो साहेब… सगळं सांगतो,’’ तो हातापाया पडायला लागला.
क्लासमध्ये जाणारी मनीषा शेजारच्या संतोष स्टोअर्समध्ये फोनचं रिचार्ज करायची. तिथेच तिची सूरजशी मैत्री झाली, ती प्रेमात पडली. त्यानं तिला लग्नाचं आमिष दाखवलं. पळून जाऊया, असंही सांगितलं. घरात भावाच्या लग्नाची तयारी सुरू होती, पैसे आणि दागिनेही ठेवलेले होते, हे तिनं सूरजला सांगितलं. मग सूरजने त्याच्या एका मित्राबरोबर चोरीचा प्लॅन केला. मनीषा एकटीच घरात होती, तिनं कुठल्या वेळी या, कसे या, सगळं सूरजला सांगितलं होतं. वॉचमनची नजर चुकवून दोघं आत आले, मनीषानं आयताच सगळा मुद्देमाल त्यांच्या ताब्यात दिला. पैसे आणि दागिने मिळाल्यावर मात्र सूरजचा तिच्यातला इंटरेस्ट संपला. तिच्याशी लग्न करायचा विषय तो टाळू लागला. आठ दिवस वाट बघून तिनं त्याला जाब विचारायचं ठरवलं. सरळ त्याच्याकडे गेली. ही अशी ऐकणार नाही आणि आपल्यालाही अडचणीत आणेल, हे लक्षात आल्यावर सूरजने वेगळाच डाव खेळला. लग्न करायची कबुली दिली. त्यासाठी तिचा फोन बंद करायला लावला, तो फेकूनही दिला. हळूहळू तिला त्याचा डाव लक्षात येऊ लागला. तिनं त्याच्याशी वाद घातला, भांडली. सूरजचं डोकं फिरलं.
“आता तिला सोडलं, तर आपलं काही खरं नाही, हे लक्षात आलं होतं साहेब,’’ सूरज म्हणाला. त्यानं तिला गाडीत घालून कुठेतरी नेलं, तिच्यावर जबरदस्ती करायचा प्रयत्न केला. मनीषानं जिवाच्या आकांतानं विरोध केला, पण तो थिटा पडला. तिच्यावर बलात्कार करून तिचं आयुष्य सूरजने कायमचं संपवून टाकलं. एका कोवळ्या प्रेमाचा असा भीषण अंत झाला.
मनीषाच्या शरीरावरच्या नखांच्या, रक्ताच्या नमुन्यावरूनही गुन्हेगार सूरजच होता, हे उघड झालं. चोरी आणि खुनाच्या दिवशीही त्याच्या फोनचं लोकेशन त्या त्या ठिकाणी मॅच झालं. एका कोवळ्या कळीचं आयुष्य संपवणार्या सूरजचं निम्मं आयुष्यही आता गजाआडच जाणार होतं.
– अभिजित पेंढारकर
(लेखक मालिका व चित्रपट क्षेत्रात नामवंत संवादलेखक आहेत)