महाराष्ट्रात चार महिन्यांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपासह अजित पवारांच्या नकली राष्ट्रवादी काँग्रेसने, एकनाथ शिंदेंच्या नकली शिवसेनेने मतदारयंत्रांत गडबडीने कुणाचाच विश्वास बसणार नाही, असा महाप्रचंड विजय मिळवून सत्ता काबीज केली. प्रत्येक मतदान केंद्रावरील मतदानयंत्रात मतमोजणीच्या वेळी कशी अवाच्या सवा वाढ झाली हे मोठं कोडंच होतं. महायुतीचा प्रत्येक उमेदवार किमान पन्नास हजारांहून अधिक मताधिक्याने निवडून येईल अशी चोख व्यवस्था केल्याचं सरळ सरळ दिसत होतं.
प्रत्येक मतदारसंघात कोट्यवधीचं वाटपही करण्यात आलं होतं. त्याशिवाय लाडक्या बहिणींना पैशाची लालूच दाखवून त्यांची मतं मिळवून मतांचा फुगवटाही वाढला होता. महायुतीच्या आणि त्यातही भाजपाच्या या मतांच्या फुगवट्यावर मात करून असली शिवसेनेसह महाआघाडीचे अनेक कर्तृत्ववान उमेदवार निवडून आलेच. निवडणूक आयोगासह संबंधित सर्वांना हाताशी धरून खर्याचं खोटं करण्याचा चंग बांधून लबाडांनी सत्ता मिळवली खरी, पण ही लबाडी हळूहळू जनतेच्या लक्षात येतेय ही चांगली गोष्ट आहे.
सातारा जिल्ह्यातील सह्याद्री साखर कारखान्याच्या निवडणुकीत भाजप पॅनलचा झालेला दारुण पराभव हा त्याचंच द्योतक आहे, असं माझा मानलेला परमप्रिय मित्र पोक्याने सकाळी सकाळी घरी येऊन आनंदाने नाचत नाचत सांगितलं, तेव्हा माझीही ट्युबलाईट पेटली. पोक्या म्हणाला, ही निवडणूक गडबडगुंडा असलेल्या ईव्हीएमद्वारे न होता बॅलेट पेपरवर झाली. सह्याद्री साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात सातारा जिल्ह्यात कराड, कोरेगाव, सातारा, खटाव, कडेगाव या पंचक्रोशीचा समावेश होतो. इथे विधानसभा निवडणुकीत भाजपचे मनोज घोरपडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाळासाहेब पाटील यांचा ४४ हजार मताधिक्याने पराभव केला होता. त्यांचे सर्वच्या सर्व २१ उमेदवार साखर कारखान्याच्या निवडणुकीत पराभूत झाले.
भारत हा एकच देश आणि भाजप हा एकच पक्ष सार्या जगात बदनाम झालेल्या ईव्हीएमद्वारे निवडणुका घेतो आणि जिंकतो. बॅलेट पेपरवर निवडणुका घेतल्या तर राज्यातील महायुतीसह केंद्रातील सरकारही नेस्तनाबूत होईल, अशी खात्री पोक्याने व्यक्त केली, तेव्हा महायुतीच्या प्रमुख नेत्यांच्या प्रतिक्रिया घेऊन ये, असा पोक्त सल्ला मी त्याला दिला. पोक्याही लगेच त्या प्रतिक्रिया घेऊन आला. त्याच या प्रतिक्रिया…
फडणवीस – बॅलेट पेपरवर निवडणुका घेणं भाजपला कधीही मान्य होणार नाही. आमच्या महायुती सरकारचा कारभार इतका फास्ट आहे की बॅलेट पेपरवर निवडणुका घेऊन वेळेचा निष्कारण अपव्यय करणं आम्हाला शक्य नाही. तेवढ्या वेळेत आम्ही अनेक रस्त्यांवर खड्डे खोदून भ्रष्टाचारमुक्त रस्तेकामाचा शुभारंभ करू शकतो. मुळात माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचं कार्यच इतकं महान आहे की भारतच काय, पण अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प त्यांचे कट्टर चाहते आहेत. भाजपला प्रचंड संख्येने मिळणारी मतं हा ईव्हीएम घोटाळा नसून तो माननीय मोदींवरील प्रेमाचा वर्षाव आहे. सातार्यातील सह्याद्री सहकारी साखर कारखान्यातील भाजपप्रणित २१ उमेदवारांचा धुव्वा हे आमच्याच महायुतीतील दोन पक्षांनी मला बदनाम करण्यासाठी केलेलं कारस्थान आहे. या महाशयांचा काटा कसा काढायचा ते मला माहीत आहे. थोड्याच दिवसांत तुम्हाला ते दिसेल. जो माझ्यावर कुरघोडी करू पाहतो त्याची काय अवस्था होते हे तुम्ही पाहाल.
अजितदादा – सातारा तालुक्यात जे काय झालं त्यासाठी मला कोणी जबाबदार धरत असेल तर तो चिखलाच्या नंदनवनात वावरत आहे. शेवटी जनता ठरवते कोण चांगला आणि कोण बदमाश ते. तुम्ही आमच्या नांग्या ठेचायला जाल ना, तर विंचवासारखे डसू आम्ही. माझ्याइतकी लोकप्रिय व्यक्ती बारामती तालुक्यात नाही हे सर्वेक्षणातून सिद्ध झालं आहे. जनतेला कोण हवा आणि कोण नको, कोण बदमाश आणि कोण साव हे जनता ठरवते. तिच्याशी प्रतारणा होतेय हे तिच्या लक्षात आलं तर ती कुणालाच माफ करणार नाही. तुम्ही माझ्यासारखे कामाने मोठे व्हा ना. दुसर्यावर कुरघोडी करून तुमचा मोठेपणा सिद्ध होत नाही. आज राज्यात काय अनाचार माजलाय ते मतदारांना समजतं. मी गृहमंत्री असतो तर एकेकाला सरळ केलं असतं. पण सध्या तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करतोय. त्यात त्या लाडक्या बहिणींनी जेरीस आणलंय. एकेकदा असं वाटतं की सर्वसंग परित्याग की काय म्हणतात तो करून थेट काम्पुचियाला निघून जावं, म्हणजे पुन्हा घोटाळ्याचं भूत मानेवर बसायला नको. हे भाजपवाले कसा सूड घेतील हे सांगता येणार नाही.
एकनाथ शिंदे – सातारा जिल्हा म्हणजे माझा पंचप्राण नव्हे तर अडीच प्राण आहे. कारण उरलेला अडीच प्राण ठाणे जिल्हा आहे. ज्याच्या अंगाखांद्यावर मी बागडलो, ट्रॅक्टरने शेती केली, त्या सातारा जिल्ह्यातील माझं गाव म्हणजे माझा अर्धा जीव आहे. आनि म्हनून मी निराश झालो की माझ्या गावी येतो, बोलतो. दु:ख हलकं करतो. त्या सातारा तालुक्यातील पंचक्रोशीची मर्यादा असलेल्या सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत भाजप पॅनेलचा नाचक्की करणारा जबर पराभव झाला याला ईव्हीएम मशीनची अनुपस्थिती किंवा बॅलेट पेपरवर झालेलं मतदान या दोन्ही गोष्टी जबाबदार नाहीत. जबरदस्त पराभव ही भाजपच्या कर्माची फळं आहेत. ज्यांनी माझ्या लाडक्या बहिणींना त्रास दिला, माझ्या योजनेला सुरुंग लावण्याचा प्रयत्न केला, त्याला माझ्या लाडक्या बहिणींनी दिलेलं हे चोख उत्तर आहे. मी उपमुख्यमंत्री असून माझी चारी बाजूंनी नाकाबंदी करण्याचा, माझ्यावर घोटाळ्याचे आरोप करून मला बदनाम करण्याचा प्रयत्न केला त्याला त्या साखर कारखान्याच्या कक्षेत येणार्या पंचक्रोशीतील जनतेने दिलेली सणसणीत चपराक आहे. मला पाण्यात पाहणार्या फडणवीसांना आणि अजितदादांना जनतेने नाकारलंय असा स्पष्ट संदेश भाजपच्या या पराभवाने दिला आहे. त्याचं मी स्वागत करतो.