‘आयपीएल’च्या १८व्या पर्वाच्या आतापर्यंतच्या सामन्यात काही मोठ्या तार्यांनी कमालीची निराशा केली आहे, तर काही तारे दर्जाला साजेशी चमकदार कामगिरी करीत आहेत. काही नवे तारेसुद्धा उदयास आले आहेत. मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंगसारखे लोकप्रिय संघ धडपडत आहेत. ‘आयपीएल’च्या सद्यस्थितीवर टाकलेला हा प्रकाशझोत.
– – –
जे घडते आहे, त्यात नवे असे काहीच नाही. याआधीची १७ वर्षे तेच घडले, तोच पायंडा यंदाच्या १८व्या वर्षीसुद्धा कायम राखला गेला आहे. काही मोठी नावे फक्त हजेरीदाखल मैदानावर उतरताना दिसत आहेत. त्यांच्याकडून दर्जाला साजेशी कामगिरी होताना दिसत नाही. पण, काही तारे आपल्या कामगिरीने लक्ष वेधून घेत आहेत आणि स्वत:ला सिद्ध करीत आहेत. किंबहुना हीच ‘आयपीएल’ची खासियत झाली आहे.
‘आयपीएल’ अद्याप मध्यावरही पोहोचलेले नाही. पण मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग या दोन लोकप्रिय संघांची बरीच चर्चा रंगते आहे. मुंबईच्या खात्यावर पहिल्या पाच सामन्यांपैकी चार पराभव आणि एकमेव विजय जमा आहे. मुंबईच्या पराभवाला कारणीभूत ठरते आहे, सलामीवीर रोहित शर्माची खराब कामगिरी. चार सामन्यांत ३८ धावा ही आकडेवारी रोहितच्या दर्जाला मुळीच न्याय देत नाही. ‘इम्पॅक्ट प्लेयर’ (प्रभावी खेळाडू) हा नवा शिक्का तो आता अभिमानाने मिरवतो आहे. मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पंड्याची वैयक्तिक कामगिरी चोख होते आहे. गोलंदाजी कधी नव्हे इतकी बहरली आहे. एका सामन्यात तर त्याने पाच बळी घेण्याचीही किमया साधली होती. पण एकंदर संघ दुभंगला आहे. त्यामुळे मुंबईची सांघिक कामगिरी डागाळली आहे. पण, यातही नवे काही नाही. ‘हार के जीतनेवाले को बाझीगर कहेते है’ हे ब्रीद जपत अखेरच्या टप्प्यातील सर्व सामने जिंकत बाद फेरी गाठणे, हे मुंबईचे वैशिष्ट्य. इतकेच नव्हे, प्रारंभीच्या झगडणार्या प्रवासानंतर मुंबईने जेतेपदही पटकावल्याचे ‘आयपीएल’ इतिहास सांगतो.
वानखेडे स्टेडियमवर कोलकाता नाइट रायडर्सविरुद्धच्या विजयात पदार्पणवीर अश्वनी कुमारच्या डावखुर्या वेगवान मार्याने छाप पाडली. चार बळी मिळवत त्याने सामनावीर किताबही जिंकला. दोन सामन्यांत पाच बळी घेणार्या या गोलंदाजाला संघात स्थान मिळवणे आता कठीण जाते आहे. परंतु वेगवान गोलंदाज दीपक चहर कामगिरी नसतानाही आपली जागा टिकवून आहे, याचे अधिक आश्चर्य वाटते.
समस्यांच्या बाबतीत मुंबईपेक्षा चेन्नई सुपर किंग अधिक ‘सरस’ ठरेल. महाराष्ट्राच्या ऋतुराज गायकवाडकडे नावाला कर्णधारपद सोपवून स्वत: संघ चालवणार्या ४३ वर्षीय महेंद्रसिंह धोनीचा हा संघ. ‘थाला’ला पाहण्यासाठी गर्दी करणार्या चाहत्यांना यंदा मात्र निराशा पदरी पडत आहे. कोपराला झालेल्या दुखापतीचे कारण देत ऋतुराज संपूर्ण हंगामाला मुकणार हे स्पष्ट झाले आहे. समाजमाध्यमांवर ऋतुराजच्या दुखापतीबाबतही साशंका उपस्थित केली जात आहे. ऋतुराज नसल्याने चेन्नईचा सलामीचा प्रश्न बिकट झाला आहे. पण ऋतुराज सलामीला खेळेल याची खात्री काय? गेल्या वर्षभरात त्याने आपण कोणत्याही स्थानावर खेळू शकतो, हेच सिद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे. ऋतुराजनंतर चेन्नईने पुन्हा नेतृत्व धोनीकडेच बहाल केले. रचिन रवींद्र आणि डेव्हॉन कॉन्वे हे सलामीवीर अपयशी ठरत आहेत. त्यामुळे चेन्नईचा डाव कोसळत आहे. कोलकाताविरुद्ध चेन्नईकडून ९ बाद १०३ ही हंगामातील नीचांकी धावसंख्या नोंदली गेली. या सामन्यात चेन्नईच्या फलंदाजांनी तब्बल ६१ निर्धाव चेंडू (डॉट बॉल) खेळल्याची चर्चा रंगली. चेन्नईने डावातले अर्धे चेंडू निर्धाव घालवले आणि तितक्याच चेंडूंत कोलकाताने लक्ष्य गाठले. चेन्नईचा भरवशाचा वेगवान गोलंदाज मथीशा पथिराणा सुरुवातीच्या दोन सामन्यांमधील आवेश नंतर राखू शकला नाही. सध्या त्याला दुखापत झाल्याचेही म्हटले जात आहे. धोनी आणि रवींद्र जडेजा हे वयस्क क्रिकेटपटू नावाला साजेशी कामगिरी करीत नाहीत. धोनी आता नवव्या क्रमांकावर फलंदाजीला उतरतो. दीपक हुडा आणि विजय शंकर यांच्या कामगिरीत सातत्याचा अभाव जाणवतो.
‘आयपीएल’च्या लिलावात सर्वाधिक २७ कोटी रुपयांची बोली जिंकत इतिहास घडवणारा ऋषभ पंत लखनौ सुपर जायंट्ससाठी चांगली कामगिरी साकारू शकलेला नाही. सहा सामन्यांत फक्त ४० धावा ही त्याची निराशाजनक आकडेवारी. पण संघ चार सामने जिंकल्यामुळे किमान तो नेतृत्वाला न्याय देऊ शकलेला आहे. निकोलस पूरन आणि मिचेल मार्श सातत्याने धावा करीत आहेत, हेच त्यांच्या यशाचे महत्त्वाचे शिलेदार. पूरन ‘ऑरेंज कॅप’च्या शर्यतीत अग्रेसर आहे, तर चार अर्धशतके झळकावणारा मार्शही थोड्या अंतरावर आहे. एडिन मार्करम हा त्यांचा आणखी एक हुकमी पर्याय. पण डेव्हिड मिलरला सूर गवसलेला नाही. लिलावात कुणीच वाली नसलेल्या वेगवान मारा करू शकणार्या अष्टपैलू शार्दूल ठाकूरला प्रशिक्षक झहीर खानने दुखापतग्रस्त खेळाडूच्या जागी पाचारण केले. त्यानंतर त्याने स्वत:ला सिद्ध करणारी कामगिरी केली. फिरकी गोलंदाज दिग्वेश राठीसुद्धा चमकदार कामगिरी बजावत आहे.
दिल्ली कॅपिटल्स चारपैकी चार सामने जिंकत गुणतालिकेत आघाडीच्या स्थानावर आहे. या यशात महत्त्वाचे योगदान कर्णधार केएल राहुलचे आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुविरुद्ध प्रारंभीच्या पडझडीनंतरही राहुलने संघाला अफलातून विजय मिळवून दिला. गुणतालिकेत दुसर्या स्थानावर विराजमान असलेल्या गुजरात टायटन्सकडून सर्वात लक्षवेधी कामगिरी करतोय, तो साई सुदर्शन. याशिवाय कर्णधार शुभमन गिल, जोस बटलर यांची फलंदाजी संघासाठी फलदायी ठरत आहे. प्रसिध कृष्णा, साई किशोर आणि मोहम्मद सिराज ही गुजरातच्या गोलंदाजीची बलस्थाने. यापैकी सिराजने आपल्या कामगिरीच्या बळावर भारतीय संघाचे दार ठोठावले आहे. पंजाब किंगच्या यशाचा शिल्पकार कर्णधार श्रेयस अय्यर आहे. भारताच्या एकदिवसीय क्रिकेटमध्ये हक्काचे स्थान निर्माण करणारा श्रेयस हा ट्वेन्टी-२० प्रकारामध्ये देशाच्या नेतृत्वासाठीसुद्धा उत्तम पर्याय ठरू शकेल. वेगवान शतक झळकावणारा प्रियांश आर्य हा तारा नव्याने उदयास आला आहे. अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेल निवृत्तीनजीक आल्याचे स्पष्ट होत आहे, तर युजर्वेंद्र चहलच्या झोळीत फारसे बळी मिळालेले नाहीत. सनरायजर्स हैदराबादने सहापैकी चार सामने गमावले आहेत. ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा यांच्यावर त्याच्या फलंदाजीची भिस्त. भारतीय संघाबाहेर फेकल्या गेलेल्या इशान किशनने एकाच सामन्यात शतकी खेळी उभारली; परंतु बाकीच्या सामन्यांत तो चांगली कामगिरी करू शकलेला नाही.
कोलकाताने सहा सामन्यांत तीन सामने जिंकले आहेत. यात कर्णधार अजिंक्य रहाणेचे नेतृत्त्व आणि कामगिरी उपयुक्त ठरली आहे. रहाणेला क्विंटन डीकॉक आणि अष्टपैलू सुनील नारायणकडून तोलामोलाची साथ मिळत आहे. मुंबईचा नवोदित फलंदाज अंक्रिश रघुवंशीने आपले नाणे खणखणीत असल्याचे सिद्ध केले आहे. दोन वर्षांपूर्वी अखेरच्या षटकात सलग पाच षटकार खेचत कोलकाताला अविश्वसनीय विजय मिळवून देणारा रिंकू सिंह मोठी धावसंख्या उभारू शकलेला नाही. २३.७५ कोटी रुपये मानधन घेणारा वेंकटेश अय्यरसुद्धा सातत्याने अपयशी ठरत आहे. एकमेव अर्धशतक ही त्याची जमापुंजी. वयस्क आंद्रे रसेल आणि मोईन अली या अष्टपैलूंचे गोलंदाजीतले योगदान सरासरी स्तराचे आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुचा तारांकित फलंदाज विराट कोहली आजही तितक्याच उमेदीने धावा करीत आहे. पण तरीही संघाला जेतेपद मिळेल का, याची खात्री देऊ शकलेला नाही. कर्णधार रजत पाटीदार आणि फिल सॉल्ट यांच्यावर फलंदाजीची तर जोश हेजलवूड आणि कृणाल पंड्यावर गोलंदाजीची मदार आहे. मागील हंगामात बाद फेरी गाठणार्या राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसन यंदाही तितक्याचे आशेने धावांचे इमले बांधतो आहे. शिम्रॉन हेटमायर, रयान पराग, ध्रुव जुरेल हे राजस्थानचे फलंदाजीचे आधारस्तंभ. एकमेव अर्धशतक झळकावणार्या सलामीवीर यशस्वी जैस्वालला सूर गवसलेला नाही. जोफ्रा आर्चर आणि तुषार देशपांडे यांनी एकेक सामना गाजवला. पण संघाच्या यशासाठी सातत्य असावे लागते.
‘आयपीएल’च्या हंगाम आता कुठे बहरायला लागला आहे. नाव मोठे असलेले काही खेळाडू अपयशी ठरत आहेत, तर काही दर्जाला साजेशी कामगिरी करीत आहेत. याशिवाय काही नवे चेहरे लक्ष वेधत आहेत. पण अजून बरेच सामने बाकी आहेत. त्यामुळे आणखी उत्कंठावर्धक चमत्कार मैदानावर पाहायला मिळू शकतात. रोहित, धोनी संघाला अनपेक्षित यश मिळवून देऊ शकतात. तूर्तास, ‘आयपीएल’च्या सामन्यांचा यथेच्छ आस्वाद लुटूया!