१ एप्रिलच्या दिवशी तुम्ही कुणाला एप्रिल फूल केलं किंवा कुणी तुम्हाला एप्रिल फूल केलं असं काही झालं का?
– हादी खान, मिरज
कुठल्या जमान्यात वावरताय मियाँ? तुम्ही म्हणताय तो काळ गेला, या काळात शहाण्याला मूर्खात काढलं जातं आणि आपल्याला कोणी मूर्खात काढलं तर आपल्याला फार कळतं असं दाखवत हसलं जातं. आम्हाला एप्रिल फूल बनवूनच हा काळ आलेला आहे. आता अजून विस्कटून सांगायला हवं?
आमचा सण आहे, आम्ही अमुक खाणार, तर तुम्हीही तमुक खाऊ नका, दुकानं बंद ठेवा, अशी जबरदस्ती करणं ही कसली धार्मिकता आहे? असल्या फतव्यांपुढे प्रशासन, पोलिस वगैरे यंत्रणा का नांगी टाकतात?
– प्रतीक पाटील, सांगली
नांगी टाकली नाही आणि जर का ती ठेचली गेली तर तुम्ही भरून देणार का? आणि असं एकदम टोकाचे बोलू नका… प्रशासन आणि पोलीस यंत्रणा नांगी उगारताना तुम्ही पाहिली नाहीत का? सोशल मीडियावरचे व्हिडिओ बघा मग कळेल बुलडोझरच्या आजूबाजूला, फेरीवाल्यांचे स्टॉल उधळताना, झोपड्या तोडताना प्रशासन आणि पोलिसवाले कशा नांग्या उगारतात ते…
अमेरिकेने सुनीताबेनला पृथ्वीवर सुखरूप आणण्याची जबाबदारी आपल्या नमोजींवर का बरे सोपवली नाही?
– संजय क्षीरसागर, पिंपळे गुरव
तुम्हाला काय वाटतं ते अंतराळात गेले नसते? उगाच खर्च नको म्हणून गेले नसतील ते. वायफळ खर्च होतो म्हणून शास्त्रज्ञांच्या खर्चात कपात करणारा माणूस, शास्त्रज्ञांना आणायला वायफळ खर्च करून अंतराळात गेला म्हणून नंतर तुम्हीच बोंबा मारायला मोकळे झाला असता. आणि त्या यानात जेमतेम दोन माणसं बसतात. आपले नमोजी गेले असते तर त्यांच्याबरोबरचे कॅमेरा घेतलेली माणसं, न्यूज चॅनेलवाले वगैरे कुठे बसले असते? व्हिडिओ आणि फोटो नसतील तर बिचारे नमोजी पुरावा कुठून देणार? एवढी कारणं पुरे? की अजून हवीत?
आपले एक मान्यवर उपमुख्यमंत्री बिग बॉस विजेता, झापुक झुपूक स्टार सूरज चव्हाण याच्या घराचं बांधकाम व्यवस्थित होतंय ना, हे पाहायला खास तिथे गेले होते म्हणे! कलावंतांबद्दल इतकी आस्था असलेले राजकीय नेते याआधी कधी पाहिले होते का तुम्ही?
– विनोद पाथरुडकर, अहमदनगर
मग त्या नेत्यांनी काय एखाद्या खोट्या घरासमोर, खोट्या माणसाला उभा करून, त्याच्याबरोबर फोटो काढून, आम्ही याचा विकास केला म्हणून बोंबा मारायच्या? एवढं कसब सगळ्याच राजकीय नेत्यांकडे नसतं. अहो, वेळ येते तेव्हा भल्या भल्या नेत्यांना जे एरवी नको असतात त्यांचे पाय पण धरावे लागतात, धुवावे लागतात, पुसावे लागतात… आपल्या माननीय नेत्यांनी असं काही करावं असं तुम्हाला वाटतं का? घरफोडी करणार्या नेत्यांच्या जमान्यात एक नेता एखाद्या कलाकाराच्या घराचं बांधकाम बघायला जातो याचं तुम्हाला आश्चर्य वाटतंय का?
महाराष्ट्रात प्रेमाच्या, आपुलकीच्या ‘राम राम’ची जागा आक्रमक, ऊग्र आणि युद्धघोषणेसारख्या उच्चारल्या जाणार्या ‘जय श्रीराम’ने घेतली आहे; आपला अंजनीसुत ‘मारुती’ आता संतप्त चेहर्याचा ‘हनुमान’ बनून बसला आहे… महाराष्ट्र आता पुरता गाळात गेल्याशिवाय थांबणार नाही, अशी भीती वाटत नाही का तुम्हालाही?
– मुकुंद पाष्टे, बदलापूर
कमळ गाळात चिखलातच उगवतं… असं आम्ही उत्तर देऊ असं तुम्हाला वाटत असेल, तरी असं उत्तर आम्ही देणार नाही… कारण आम्हाला फक्त उगवलेलं, फुललेलं, फोफावलेलं कमळ दिसतं… तो गाळ आणि चिखल तुम्हीच बघा. आता राहिला प्रश्न महाराष्ट्र गाळात जाण्याची भीती वाटण्याचा. तर महाराष्ट्र गाळात गेल्यावर आमच्याबरोबर तुम्हीसुद्धा गाळातच जाणार आहात… याचा आम्हाला आनंद होतोय… भीती तुम्ही बाळगा… अहो, ‘नवरा मेला तरी चालेल पण सवत रंडकी झाली पाहिजे’ असा काळ आला आहे.
महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या सिनेमाच्या ट्रेलरच्या विरोधात सनातनी उठाव करतात आणि बसता उठता फुल्यांचा वारसा सांगणारे सगळे नेते चिडिचुप्प आहेत, हे पाहिल्यावर या दाम्पत्याला महाराष्ट्रात जन्म घेतल्याचा पश्चात्ताप होत नसेल का?
– मालिनी सुनंदा मधुकर, पुणे
विरोध बघून पश्चाताप करणार्यांतले फुले दांपत्य असते, तर जेव्हा विरोध झाला, तेव्हाच त्यांना पश्चाताप झाला असता… पण आता त्यांना पश्चाताप या गोष्टीचा होत असेल की आपलं कार्य पुढे न नेता काही लोक फक्त आपलं नाव घेऊन पैसा, पद, प्रतिष्ठा कमावतील हे आपल्याला तेव्हा कसं कळलं नाही… आणि तुमचं काय म्हणणं आहे? फुले दांपत्यांचं नाव घेऊन पैसा, पद, प्रतिष्ठा कमावणार्यांनी, आता त्यांचंच नाव घेऊन हे सगळ गमवायचं? त्या बिचार्यांना किती पश्चाताप करावा लागेल.