सेंदरी हेंदरी दैवते।
कोण पूजी भुतेखेते।
आपुल्या पोटा जी रडते।
मागती शिते अवदान।।१।।
आपुले इच्छी आणिका पिडी।
काय ते देईल बराडी।
कळो ही आली तयाची जोडी।
अल्प रोकडी बुद्धी अधिरा।।२।।
दासीचा पाहुणेरउखिते।
धनी देईल आपुल्या हाते।
हे तो रिते सतत शक्तीहिन ।।३।।
काय ते थिल्लरीचे पाणी।
न भिजे ओठ न पुरे धणी।
क्षोभे पुरश्चरणी दिले फळ।।४।।
विलेपने बुजविती तोंड।
भार खोळ वाहती उदंड।
करविती आपणया दंड।
ऐसियास भांड म्हणे देव तो।।५।।
तैसा नव्हे नारायण।
जगव्यापक जनार्दन।
तुका म्हणे त्याचे करा चिंतन।
वंदू चरण येती सकळे।।६।।
आपण गेल्या वेळी निरुपणाला तुकोबांचा हा अभंग घेतला होता… या अभंगात लाभासाठी देवबदलूपणा करणार्या भक्तांचा भरपूर समाचार घेतला आहे. त्यात पहिलं उदाहरण दासीच्या पाहुणचाराचं. दासीच्या पाहुणचाराला काही मर्यादा आहेत, त्याचप्रमाणे या दैवतांच्या लाभाला काही मर्यादा आहेत असं तुकोबाराय म्हणतात. पुढे जाऊन तर तुकोबाराय म्हणतात की ज्याप्रमाणे डबक्यातलं पाणी तहान भागवण्यासाठी असून नसल्यासारखं आहे, त्याप्रमाणे या दैवतांपासून होणारा लाभ हा असून नसल्यासारखा आहे. त्यापुढे जात तुकोबाराय या दैवतांच्या उपासनेतल्या लाभाची तुलना थेट पुरश्चरणाच्या लाभाशी करतात. पुरश्चरणात लाभ तर होत नाहीच उलट क्षोभ होतो. भक्तांवर कृपा करण्याऐवजी हे देव त्यांच्यावर अवकृपाच करतात. त्यांच्या उपासनेतल्या चुका दाखवून त्यांनाच त्रास देतात. विशेष म्हणजे हे देव भक्तांनाच त्रास देतात, जे लोक त्यांना मानत नाहीत त्यांना कधीच त्रास देत नाहीत. आमच्याकडे एक म्हण आहे, ‘भिईल त्याला म्हसोबा.’ जो घाबरून ज्या देवाची उपासना करतो तोच देव त्याच्या पाठी लागतो. थोडक्यात कोणताच देव त्रास देत नाही तर त्या देवाची कल्पना त्रास देते. एरवी एखाद्या व्यक्तीला वेगळ्या कारणाने होत असलेला त्रास हा त्या देवाच्या अवकृपेचा भाग म्हणून होत आहे अशी चुकीची समजूत तयार होते. त्या त्रासातून मुक्तता होण्यासाठी परत देवाची उपासना करावी लागते. त्याची मर्जी सांभाळून त्याला खूश करण्यासाठी बळी द्यावे लागतात. त्यामुळेच अशा देवांची उपासनाच करु नये असं तुकोबाराय म्हणतात.
याउलट विठ्ठलाचं आहे. विठ्ठल कोणालाच काही लागत नाही आणि तो काही मागतही नाही. तो भक्तांच्या उपासनेतल्या चुका न बघता त्याचं प्रेम पाहून त्याला प्रेमच देतो. त्याचा कधीच कोणत्या भक्तांवर कोप होत नाही. उपासनेत कितीही चुका घडल्या तर फक्त त्याच्या मनातला भाव पाहून तो त्याच्यावर प्रेम करतो. त्यामुळेच तुकोबाराय विठ्ठलाचा महिमा सांगतात.
तुकोबाराय या अभंगाच्या पाचव्या चरणात म्हणतात की हे देव सिंदूराच्या लेपाने आपले तोंड लपवतात. जणू त्या सिंदूराच्या खोळीचा भारच ते वाहतात. अशा देवांना देव म्हणणारे हे लोक भांड आहेत असा आक्रमक पवित्रा तुकोबाराय घेतात. भांड म्हणजे विचित्र. ‘करवती आपणया दंड’ म्हणजे तुकोबाराय म्हणतात की हे देव आपल्याच भक्तांना दंड करतात. जो आपल्या भक्तांनाच त्रास देतो तो देव कसा? असा तुकोबारायांचा रास्त सवाल आहे. त्यामुळेच तुकोबाराय अशा तथाकथित देवांना ‘देव’ मानायला तयार नाहीत.
देवाच्या चुकीच्या कल्पना सांगून झाल्यावर ते देवाचं खरं स्वरूप सांगतात. खरा देव हा या सेंदर्या दैवतासारखा नाही. तो जगव्यापक आहे, म्हणजे जगाला व्यापून उरलेला. विश्वाच्या रूपाने प्रकट झालेला. विश्व हेच खर्या अर्थाने देव आहे. ‘ऐसा ज्याचा अनुभव विश्व देव सत्यत्वे’ असं तुकोबाराय म्हणतात. या विश्वदेवाचं प्रतीक म्हणजे विठ्ठल. तो जगव्यापक आहे. तो कोणाला लागत नाही. मागत नाही. भक्तांवर अवकृपा करत नाही. तुकोबाराय म्हणतात की मी अशा जगव्यापक नारायणाची सेवा करतो. ‘करिती कामिकांची सेवा। लागोन मागोन खात्या देवा।।’ असं तुकोबाराय म्हणतात. काही लोक कामिक देवांची म्हणजे भक्तांना लागून आणि मागून खाणार्या देवांची सेवा करतात. याउलट तुकोबाराय मात्र जगव्यापक जनार्दनाची सेवा करतात.
वारकरी संतांची आणि म्हणूनच तुकोबारायांची भूमिका एकविधभावाची आहे. एकाच देवाची उपासना करण्याचा हा विचार वारकरी परंपरेत रुजला होता. संतवचनांचं भान असल्यानं पूर्वी पारंपारिक वारकरी लोक इतर देवांची उपासना करत नसत. संतांनी सांगितलेला पांडुरंग हा केवळ वारकरी संप्रदायाचा देव नाही. तो सर्वांचा आहे. तत्त्वज्ञ कवी बहिणाबाई चौधरी यांनीही ‘खरा देव’ म्हणजे पांडुरंग असल्याचं सांगितलं आहे. बहिणाबाई म्हणजे केवळ रानामाळातल्या कविता लिहिणार्या कवयित्री असा आपला समज असतो. पण त्या थोर दर्जाच्या तत्त्वज्ञ कवयित्री आहेत. साध्या साध्या शब्दातून उच्च दर्जाचं तत्त्वज्ञान त्यांनी मांडलं आहे. जीव, देव, जग आणि मन अशा अनेक संकल्पनांचा अर्थ एखाद्या नामांकित तत्त्वज्ञाप्रमाणे बहिणाबाईंनी त्यांच्या कवितांमधून मांडला आहे. त्यामुळे बहिणाबाईंचा देव म्हणजे एका तत्त्वज्ञाचा तात्विक देव ठरतो. बहिणाबाई महाराष्ट्रात असल्यानं त्यांचा तात्त्विक देव म्हणजे पांडुरंगच आहे. कानोड नावाच्या एका अशाच देवतेच्या तुलनेत पांडुरंगाचं मोठेपण बहिणाबाईंनी मांडलं आहे.
अरे कानोड कानोड, सदा रुसते फुगते।
अंगावरी लेयले सर्व डागीने मागीते।।
माय कानोड कानोड, काय देवाचं रे सोंग।
खरा देवामधी देव पंढरीचा पांडुरंग ।।
देवातला खरा देव पांडुरंग असल्याचं सांगून बहिणाबाई विठ्ठलाचं तात्त्विक स्वरूप स्पष्ट करतात. विठ्ठल रुसणारा-फुगणारा नाही आणि अंगावर घालायला दागदागिने मागणाराही नाही. याच कवितेत बहिणाबाई पुढे म्हणतात,
अरे इठोबासारखं,
देव देवत एकज।
चला घ्यारे दरसन
निघा पंढरीले आज।।
विठ्ठल हा एकमेव देव आहे आणि त्याच्यासारखा तोच आहे असं बहिणाबाई सांगतात, तेव्हा त्या वारकरी संप्रदायातीलच एक आहेत असं वाटायला लागतं. किंबहुना त्या वारकरी तत्त्वज्ञानाच्या थोर भाष्यकारही आहेत. रुढार्थाने त्या वारकरी संप्रदायिक असल्याचा किंवा नसल्याचा काही उलगडा होत नाही. तरीही संतांनी विठ्ठलाचं जे वेगळेपण सांगितलं आहे तेच वेगळेपण त्यांच्या खास शैलीत त्या सांगतात. विठ्ठल हाच एकमेव देव आहे असं बहिणाबाई म्हणतात तेव्हा संतांनी एकविधभावाचा आग्रह धरल्याची कारणं स्पष्ट होतात. देवासंबंधीचा निश्चित दृष्टिकोन आणि त्याच्या स्वरूपाविषयीची तात्त्विक स्पष्टता असल्यानं वारकरी संप्रदाय एकविधभाव मानतो.
वारकरी संप्रदाय ज्याला एकविधभाव म्हणतो, तोच शब्द पुढे ‘एकेश्वरवाद’ आणि ‘एकदेवतावाद’ अशा नावाने आला. साधारण एकोणिसाव्या शतकात ज्या प्रबोधन चळवळी सुरू झाल्या त्यांचाही भर एकेश्वरवादावरच होता. प्रार्थना समाज आणि सत्यशोधक समाज हे एकेश्वरवादीच तत्त्वज्ञानावर उभे होते. अपवाद फक्त आर्य समाजाचा. आर्य समाज हा वेदप्रामाण्यवादी होता. वेदात अनेक देवता आहेत. त्यामुळे आर्य समाजाचं तत्त्वज्ञान ‘अनेकदेवतावादी’ होतं. वारकरी तत्त्वज्ञान आणि वेदातल्या तत्त्वज्ञानातला मूलभूत फरक हाच आहे. तो फरक नामदेवराय सांगतात. केशवाशिवाय अनेक देवता आहेत असं वेदांत सांगितलं असलं तरी आम्ही ते मानत नाही, असं नामदेवराय म्हणतात. वारकरी संप्रदायाने जशी सेंदर्या दैवतांची उपासना नाकारली त्याचप्रमाणे वेदांतल्या दैवतांचीही उपासना नाकारली. नामदेवराय म्हणतात,
केशवापरते देव आणिक आहेती।
ऐसे श्रुतीस्मृती बोलती।।
तरी ते शब्द झणी कानी हो पडती।
पाखंडी म्हणती सहावे ते।।
वेदांतल्या वैदिक देवता नाकारल्यामुळे कोणी पाखंडी म्हटलं तरी ते सहन करावं असं नामदेवराय म्हणतात. वेदातल्या देवता म्हणजे अग्नी, इंद्र, चंद्र आणि सूर्य वगैरे. या देवताही यज्ञातून आहुती मागणार्याच आहेत. त्यामुळेच ज्ञानोबाराय या देवता आणि त्याची यज्ञात्मक उपासना नाकारतात. ते म्हणतात, ‘आता आणिकही संप्रदाये। परि माते नेणती समवाये। जे अग्नी इंद्र सूर्य सोमाये। म्हणौनी यजिती।।’ असं म्हणत त्या दैवतांच्या उपासनेचे संप्रदाय नाकारतात.
वारकरी आणि वैदिक तत्त्वज्ञानातल्या या फरकाची जाणीव पुढच्या काळात वारकर्यांना होती. त्याची नोंद १८६४ साली लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख करतात. ते लिहितात, ‘वैदिक व स्मार्त कर्म यांचा आणि वारकरी यांचा द्वेष आहे. कारण वैदिक व स्मृती मार्गात अनेक देव येतात. वारकरी यांचे मत एक पांडुरगाखेरीज अन्य दैवत मानावयाचे नाही, असे आहे. तेव्हा दुसरे देव भजल्याने व्याभिचार होतो. हरताळिका, गणेशपूजा वगैरे ते सर्व सोडून देतात. कित्येकांनी खंडोबा, भवानी यांचे भजनही सोडून दिले आहे.’ लोकहितवादींनी तत्कालीन वारकरी संप्रदायाचे निरीक्षण करुन ही जी नोंद केलेली आहे ती महत्त्वाची आहे. त्यानुसार त्या काळातल्या वारकर्यांची भूमिका लक्षात येते. वारकरी एकविधभाव जोपासत असत असं दिसतं.
जेव्हा वारकरी लोक घरातल्या, कुळातल्या आणि जातीतल्या देवांची उपासना सोडून देत त्यावेळी त्यांना भरपूर त्रास सहन करावा लागत असे. जातीतले लोक अनेकदा वाळीत टाकत असत. वारकरी मात्र त्याची पर्वा न करता एकविधभावाने विठ्ठलाची भक्ती करत. याबाबतीत अनेक उदाहरणे सांगता येतील. फक्त प्रातिनिधिक स्वरूपात दादा महाराज सातारकर यांचे उदाहरण देतो. वारकरी संप्रदायात अलीकडच्या काळात दादा महाराज सातारकर हे प्रख्यात वारकरी भाष्यकार होऊन गेले. त्यांचं बोधचरित्र वारकरी संतसाहित्याचे निष्णात अभ्यासक गोपाळ शंकर राहिरकर यांनी लिहिलं आहे. त्यांनी दादा महाराजांच्या जीवनातील एक प्रसंग सांगितला आहे. ‘महाराजांच्या घरात पूर्वीचे टाक, देवाच्या मूर्ती, इत्यादि देव होते. त्या सर्वांना पंढरीला आणून त्यांनी चंद्रभागेत विश्रांती दिली. कल्पनेनी नटवलेल्या देवांना, स्वयंभू प्रेमाचा देव भेटल्यानंतर जागाच राहते कुठे? ज्यांच्या ठिकाणी या प्रत्येक जीवात, जीवाअगोदर हजर असलेल्या देवावर नजर नसते त्यांना इतर देव मांडावे लागतात. ‘आघवेन गावद्वारी। अहेव जैशी।’ अशी अनेक देवतांची पूजा हा व्याभिचार आहे. महाराजांच्या अनुयायांच्या घरीपण श्री विठ्ठलाखेरीज इतर देवांची उचलबांगडी झालेली आढळून येईल. अनेकांची पूजा करताना कोणाचीच पूजा होत नाही आणि देव कोणता हे ओळखता जी पूजा होते ती देवाची पूजा नसून आपल्याला देवापासून जे धनऐश्वर्य मिळण्याची इच्छा असते, त्या इच्छेची पूजा आहे. मातुश्री कृष्णाबाईंना चंद्रभागेत देव सोडले हे बरोबर वाटले नाही. पण आपला मुलगा साधू आहे हे ठाऊक असल्याने तो करतो त्याचे कारण त्यालाच माहीत, म्हणून त्यांनी विशेष विरोध केला नाही. जातवाले व इतर अजाण लोक त्याविरुद्ध तक्रार करीतच.’ गो. शं. राहिरकर यांनी केलेल्या या मांडणीवर वेगळे भाष्य करण्याची गरजच उरत नाही.