इतरांच्या शारीरीक व्यंगावर हसणे या सारखे दळभद्री काम जगात कोणतेच नसेल. स्वत:ची खिल्ली उडवणे किंवा आपल्यावरच विनोद करणे ही अत्यंत अवघड गोष्ट. चार्ली चॅप्लीनने स्वत:चीच इतक्या टोकादारपणे खिल्ली उडवली की तो आमच्याच वर्मावर घाव घालत होता हे आम्हाला कळलेच नाही. लॉरेल हार्डी या जाड्यारड्याच्या शारीरिक विजोड जोडीने आम्हाला खदखदून हसवले. भारतीय चित्रपटसृष्टीतही असे अनेक कलावंत होते व आजही आहेत. दामूअण्णा मालवणकरांचे डोळे तिरळे होते, पण त्यांनी याच डोळ्यांचा वापर करून प्रेक्षकांना भरपूर हसवले. डेव्हिड व शरद तळवळकरांनी आपल्या टकलावर स्वत:च विनोद केले. प्रीती गांगुली, गुड्डी मारुती, असित सेन, गोप, मनोरमा यांनी स्वत:च्या जाडेपणावर व्यंग करून हसविले. मुकरी, सुंदर, भगवानदादा यांची शारीरीक उंची जरी कमी होती, तरी विनोदाची उंची मोठी होती. असे स्वत:वर हसत हसत प्रेक्षकांना हसवत ठेवण्याची कला जगातल्या ज्या ज्या अभिनेत्यांनी साधली, त्यांचे वैयक्तिक आयुष्य मात्र तितकेच वेदनामय होते.
उत्तर प्रदेशातील एका पंजाबी ग्रामीण मेहतर कुटुंबात आजच्या आपल्या कथानायिकेचा जन्म झाला तेव्हा तिचे नाव उमादेवी असे ठेवण्यात आले. उमादेवी खत्री. आईवडील लहानपणीच वारले. उमाला हरी नावाचा एक मोठा भाऊ होता, जो तिच्यापेक्षा नऊ वर्षांनी मोठा होता. तो बहिणीची काळजी घेत असे. काही काळानंतर हा भाऊही हे जग सोडून गेला. उमाच्या दु:खाच्या खात्यातील संचित हळूहळू वाढायला सुरुवात झाली. अनाथ उमाला मग काकाने आधार दिला. स्वत:च्या पोटपाण्यासाठी ती नातेवाईकांच्या घरात धुणीभांडी करू लागली. मोठी झाल्यानंतर तिला हे सत्य समजलं की तिच्या कुटुंबांची जी काही थोडीफार जमीन होती, ती हडपण्यासाठी आईवडील व भावाचा काटा काढण्यात आला होता.
हे अनाथपण जीवनातले सर्व विषाचे घोट पचवायला अनेकदा खूप मदत करतं. सुरक्षित वातावरणात वाढताना आपल्याला जो भवताल प्राप्त होतो, तो या अनाथांच्या नशिबी कधीच येत नाही. लहानपण संघर्षात घालवणार्या मुलांना मग निसर्गच झुंजण्याची एक असीम शक्ती देत राहतो. उमाला निसर्गत: एक देणगी होती ती म्हणजे तिचा गोड गळा. अनाथपणाच्या संघर्षात याच आवाजाची तिला सोबत होती. गाणी ऐकणे व कॉपी करत तसेच म्हणणे, हा तिचा छंदच होता. मग एक दिवस तिने अचानक निर्णय घेतला की घर सोडून जायचे. पण कुठे? तरुण वयात हे कसे शक्य होईल? पण उमाने घर सोडले आणि तिने मुंबईचा रस्ता धरला. तरुण मुलीने असे घर सोडून मुंबईला पळून येणे आणि तेही एका त्या काळात!! किती अवघड गोष्ट असेल ना? बरे, मुंबईत नातेवाईक तर दूरच, पण ओळखीचेही कुणी नाही.
दिग्दर्शक नितीन बोस यांचे एक सहाय्यक जव्वाद हुसेन यांचा पत्ता तिला कुठून तरी मिळाला होता. मुंबईत उमाला सहारा दिला तो या जव्वाद साहेबांनीच. अन्यथा तिला फक्त एकच नाव माहीत होते संगीतकार नौशाद यांचे. कारण तेही उत्तर प्रदेशाचेच आणि त्यांच्या संगीताची भुरळ सर्वत्र पडलेली. मग उमा पत्ता शोधत थेट त्यांच्याकडे पोहचली आणि बेधडकपणे त्यांना म्हणाली, ‘मला छान गाता येते. मला काहीतरी काम द्या, नाहीतर मी समुद्रात जीव देईन.’’ नौशाद अली यांना समजेना की ही काय म्हणतेय. मग नौशादजींनी तिला गायला लावले. उमाच्या नैसर्गिक आवाज खरंच चांगला होता. नौशादनी तिला चक्क एक सोलो गाणे दिले. १९४६मधील हा प्रसंग आहे. ए. के. कारदार हे त्या काळातील प्रसिद्ध निर्माते-दिग्दर्शक. त्यांनी उमादेवीला करारबद्ध केले ते ही चक्क ५०० रुपये महिना या वेतनावर.
१९४७ मध्ये कारदार यांनी मुनव्वर सुलताना या अभिनेत्रीला घेऊन ‘दर्द’ हा चित्रपट तयार केला. यात सुरैय्या सहकलाकार होती. नौशाद संगीतकार होते. ‘अफसाना लिख रही हूं..’ हे उमादेवीचे गाणे प्रचंड हिट झाले. या गाण्याचे गीतकार शकील बदायुनी हेही आपले नशीब अजमावण्यासाठी त्याच काळात मुंबईत आले होते. ‘दर्द’ची सर्व गाणी त्यांनी लिहिली होती. त्या वर्षातला हा सर्वात हिट संगीतमय चित्रपट होता. ‘अफसाना लिख रही हूं..’ हे गाणे ऐकून पाकिस्तानचे एक महोदय अख्तर अब्बास काजी इतके प्रभावित झाले की ते दिल्लीला आले. नंतर उमादेवीचा पत्ता शोधत मुंबईत आले आणि उमादेवी यांच्यासोबत काही काळ राहून त्यांनी तिच्याशी लग्नही केले. दोन मुले आणि दोन मुली या दांपत्याला झाल्या. मुलं झाल्यानंतर उमादेवीचे शरीर खूप जाड झाले. उमादेवी आपल्या पतीला मोहन या नावाने हाक मारीत.
उमादेवीला लगेच पुढच्या वर्षी मेहबूब खानच्या ‘अनोखी अदा’ चित्रपटात गायची संधी मिळाली. यातली दोन गाणी पुन्हा हिट झाली आणि उमादेवी उत्तम मानधन मिळविणार्यांच्या यादीत समाविष्ट झाली. १९४८मध्ये दक्षिणेतील प्रसिद्ध जेमिनी बॅनरचा भव्यपट ‘चंद्रलेखा’तील उमादेवीची सात गाणी खूप गाजली. तिच्या संगीत कारकीर्दीतील हा सर्वात महत्वाचा टप्पा होता. मात्र तिच्या आवाजाची एक विशिष्ट रेंज होती. चित्रपटसृष्टीतले संगीत हळूहळू बदलत होतं. त्यात लता-आशा यांचा उदय झालेला. त्यामुळे उमादेवीला काम मिळणं पुढे कठीण जात होतं. तिचे पती नोकरी करत असत, पण संसारगाडा पैशाच्या कमतरतेमुळे खडखडत होता. आता उमादेवीचा प्रवास संपून टुणटुण नावाच्या विनोदी अभिनेत्रीचा प्रवास सुरू होणार होता.
उमादेवी बर्यापैकी जाड झाली होती. तिचे बबली व्यक्तिमत्व बघून नौशादनी तिला अभिनय करण्याचा सल्ला दिला. दिलीपकुमार हे उमादेवीचे चांगले मित्र होते. एक दिवस तिने दिलीपकुमारला गळ घातली की तुझ्या चित्रपटात मला काहीतरी काम दे. ते वर्ष होते १९५०. दिलीपकुमारच्या ‘बाबुल’ या चित्रपटात उमादेवीने सर्वप्रथम अभिनय केला. टुणटुण हे नाव याच चित्रपटाने तिला दिले. यानंतर मात्र तिने आपल्या उत्साहाने फसफसणार्या बबली व्यक्तिमत्वाचा पुरेपूर वापर करून घेतला.
५० ते ९० या चार दशकात हास्य अभिनेत्री म्हणून टुणटुणचा दबदबा चांगलाच राहिला. अनेक चित्रपटांत तिच्यासाठी पटकथेत खास जागा निर्माण केली जाऊ लागली. कौटुंबिक, धार्मिक, सामाजिक, थ्रिलर सस्पेन्स, सांगितिक अशा सर्वच चित्रपटांत टुणटुण असायची. बाबुल, दीदार, गुनाह, बाज, आरपार, उडन खटोला, मि. अन्ड मिसेस ५५, मिलाप, श्री ४२०, राजहट, पॉकेटमार, जागते रहो, सीआयडी, राम लक्ष्मण, मिर्झा साहिब, प्यासा, सोलवा साल, फिर सुबह होगी, लाजवंती, कोहिनूर, जाली नोट, एक फूल चार काँटे, दिल अपना और प्रीत परायी, बंबई का बाबू, गंगा जमुना, चौदहवी का चाँद, गोदान, गहरा दाग, ब्लफमास्टर, दिल दिया दर्द लिया, उपकार, अनिता, सुहागरात, परिवार, साधू और शैतान, किस्मत, तलाश, अनमोल मोती, दो रास्ते, हिम्मत, गीत, पहचान, द ट्रेन, गरम मसाला, कच्चे धागे, शैतान, हेराफेरी, लोक परलोक, नमक हलाल, हादसा अशा जवळपास २०० चित्रपटांतून टुणटुणने विविधरंगी विनोदी भूमिका केल्या. १९९० मधील ‘धंदे की कसम’ हा तिचा शेवटचा चित्रपट. याच काळात तिच्या पतीचे निधन झाले आणि ती चित्रपटापासून दूर गेली.
आपल्या समाजव्यवस्थेत स्त्रियांचे जाड असणे हा टवाळीचाच विषय होता. मात्र, टुणटुणने त्याच जाड असण्याचा वापर करून हिंदी न कळणार्या प्रेक्षकांनाही भरपूर हसविले. तिची पडद्यावरची एंट्रीच हसू आणायला पुरेशी होई. टुणटुण ही कोणत्याही पुरूषाच्या स्वप्नात येणारी स्त्री असू शकत नव्हती, कारण पुरूषांना आखीव-रेखीव, वळणदार बांधा असलेली, नाजूक, मुलायम रेशमी केस असलेली, शिक्षित, बुद्धिमान, आकर्षक कपडे घालणारी, लज्जायुक्त संभाषण करणारी वगैरे-वगैरे स्त्री हवी असते. मग तो स्वत: कसाही असो. टुणटुण नेमकी याचे दुसरे टोक. जाडजुड, अजागळ वस्त्रं नेसणारी, ओबडधोबड आवाजात बोलणारी, ग्रामीण, कधी कधी तर भीती वाटेल अशी. एखादी जाड व्यक्ती रस्त्यात पाय घसरून पडली की लोक आजही हसतात. प्रेक्षकांची ही मानसिकता टुणटुणने ओळखली असावी. त्यामुळे पटकथेत जे सांगतील तसे ती करत असे. अनेकांना तिचा अभिनय बालिशपणाचा वाटू शकतो. पण शेवटी जगणे तर आहेच की. टुणटुणकडे तिच्या जाडजुड देहाशिवाय आणि निरागस चेहर्याशिवाय काही नसल्यामुळे तिने हा मार्ग स्वीकारला.
गुरुदत्तच्या बहुतेक चित्रपटांत टुणटुण आहे. प्यासासारख्या सिनेमात ती विनोदी अभिनेत्रीच असली तरी तिच्या व्यक्तिरेखेला संवेदनशील छटा आहे. त्यात तिचा सहज अभिनयही समजतो. भगवान दादा, आगा, सुंदर, मुकरी, धुमाळ, जॉनी वॉकर या त्या काळच्या सर्वच विनोदवीरांसोबत तिने काम केले. तिच्या चेहर्यावरील निरागस आणि मिष्कील भाव खळखळून हसवत. टुणटुण हा जाडजूडपणाचा पर्यायवाचक शब्द बनला ही तिची कमाईच नव्हे काय? गायनाची कोणतीच शिकवणी न लावता नैसर्गिक गळ्याने तिला जसे गायिका बनवले, तसेच तिच्या जाडजूड देहाने तिला हास्य अभिनेत्री बनवले.
व्यक्तिगत पातळीवर ती जेथे जात असे, तेथे तीच डॉमिनेटींग असे. तिच्यासमोर भल्याभल्यांची बोलताना धांदल उडत असे. खूप हजरजबाबी होती टुणटुण. दिलीप कुमार, चंद्रशेखर, धर्मेन्द्र, अमरीश पुरी आणि दारासिंह यांच्यासारखे अभिनेते व्यासपीठावर टुणटुणशी अत्यंत सन्मानाने बोलत. तिच्यासमोर बोलताना अनेक घमेंडखोर पुरुषही वचकून असत. तिचे शिक्षण भलेही फारसे झाले नव्हते, पण दारिद्र्य, संघर्ष, मेहनत, वेदना, कष्ट यासारख्या आंतरराष्ट्रीय विद्यापीठांत तिने बालपणीच प्रवेश मिळवला होता. नशिबाने अमुक तमुक मिळाले असे तिच्या बाबतीत नव्हतेच मुळी… तिच्यापासूनच ‘विनोदवीरांगनां’ची परंपरा सुरू झाली असे म्हणावयास काहीच हरकत नाही. टुणटुणची शेवटची मुलाखत २७ ऑक्टोबर २००३ रोजी चित्रपट लेखक आणि इतिहासकार शिशिर कृष्ण शर्मा यांनी घेतली होती. तिच्या मृत्यूच्या दोन दिवस अगोदर ही मुलाखत दैनिकांत प्रसिद्धही झाली. त्यावेळी त्यांनी टुणटुणला फोन केला व म्हटले की, ‘मी मुलाखतीच्या प्रती कुरीअरने पाठवतोय.’ यावर आपल्या खास चिरपरिचित शैलीत ती उत्तरली, ‘मग मुलाखत पण फोनवरच घ्यायचीस ना!!’ शिशिर कृष्ण शर्माना स्वत: ते दैनिक घरी घेऊन यावे लागेल या अटीवरच टुणटुणने फोन खाली ठेवला. मात्र ते पोहचण्याआधीच मृत्यूदूत पोहचला आणि तिचा शेवटचा आनंदही हिसकावून घेऊन तिला सोबत घेऊन गेला.
चित्रपटसृष्टीत जोपर्यंत पडद्यावर अभिनेते दिसत असतात, तोपर्यंत ते लक्षात रहातात. पडद्यावर दिसेनासे झाले की ते विस्मृतीत जातात. टुणटुण आजच्या पिढीला माहिती नाहीच. पण सिनेमाच्या इतिहासातून तिचं पान पुसता येणार नाही. हा अफसाना अजरामर राहणार आहे.