नरेंद्र मोदी
मित्र असावा ट्रम्पसारखा
दुनिया सारी हादरवणारा
अमेरिकेसह बलाढ्य चीनला
करंगळीवर नाचवणारा
अगदी माझ्यासारखा स्वभाव
नाही कुणाची कसली पर्वा
बसूंदे बोंबलत सगळी जनता
एकेकाची मस्ती जिरवा
ज्याच्या त्याच्या तोंडी पाहतो
लाडक्या माझ्या मित्राचे नाव
माझीही कॉलर ताठ जाहली
जरी देशावर पडले घाव
———-
डोनाल्ड ट्रम्प
कोण म्हणतो मजला चक्रम
कोण करतो माझा धिक्कार
“ब्लॅक मंडे” हा फक्त ट्रेलर
करीन सर्व “डे”ना अंधार
नाही छाती छप्पन इंची
नाही करत मी मनकी बात
साऱ्या जगाला फूटबॉल समजून
बस्स, एकच मारतो लाथ
माझ्याकडून शिका म्हणावं
कसा असावा देशाभिमान
दुसऱ्या देशांना बुडवताना
मीच बुडूनही झालो महान
———-
चीनी राज्यकर्ते
आमची किंमत केली त्याने
शिकवू त्याला कायम धडा
द्वेषबुद्धीने पछाडलेल्या
पापांचा तर भरलाय घडा
कितीही केली कोंडी तरीही
जशास तसे देऊ उत्तर
लवकर कळून चुकेल त्याला
बूमरँग होईल कसे अंगावर
इतरांसारखे नाही नेभळट
आमच्या देशाचे ते धोरण
अद्दल घडवू कायम त्याला
भीतीनेच मग उडेल गाळण
———-
अमेरिकन्स
हा पहिल्यापासून असाच
खुन्नस चेहऱ्यावरती दिसतो
मस्का मारणाऱ्या मित्राकडे
अक्कल गहाण ठेवून फिरतो
देश भिकेला लावला याने
सत्तेची तर आहे मस्ती
नाही लाजलज्जा त्याला
म्हणून उतरलो रस्त्यावरती
अमेरिकेच्या स्वातंत्र्याची
याने पुरती केली थट्टा
लोकशाही अन स्वाभिमानाला
लावला याने कायम बट्टा
———-
भारतीय जनता
तिकडे ट्रम्प तर इकडे मोदी
महाग झाले गॅस सिलिंडर
ट्रॅम्पेटाची अब्रू झाकण्या
पेट्रोल-डिझेलचे भडकावले दर
जगी तेलाचे भाव उतरले
यांच्या लेखी नाही किंमत
दगडासारखे काळीज यांचे
उतरवण्याची नाही हिंमत
लोकक्षोभाची नाही पर्वा
हुकूमशाहीचा सगळा तोरा
रस्त्यावरती उतरेल जनता
तेव्हाच उतरेल नक्षा सारा