उत्तर प्रदेशातील निवडणूक निकालांबद्दल एक झटपट टिपण
१. मला असं वाटत नाही की हा भयंकर निकाल आहे, कारण समाजवादी पार्टी या मुख्य विरोधी पक्षाने पाच वर्षं अक्षरश: झोपा काढल्या होत्या आणि विरोधी पक्षाची भूमिकाच निभावली नाही. तरीही त्यांची मतांची टक्केवारी जवळपास दहा टक्क्यांहून अधिकने वधारली आहे. मतदारांमध्ये असंतोष होता आणि तो एकवटण्याचे प्रयत्न प्रमुख विरोधी पक्ष करणार नसेल तर मते फुकट मिळत नाहीत. उत्तर प्रदेशात विरोधी पक्षच नव्हता. आता निदान भक्कम विरोधी पक्ष आहे. लोकांनी स्वत:चा विरोधी पक्ष तयार केला आहे.
२. मुझफ्फर नगर, शामली आणि बागपत या तीन जिल्ह्यांनी शेतकरी आंदोलनात थेट सहभाग घेतला होता. त्यांच्या एकूण १२ जागा आहेत. भाजपाला त्यातल्या फक्त ३ मिळाल्या. त्यातली बागपत जिल्ह्यातली बारौतची जागा रालोदने १०००पेक्षा कमी मतांनी गमावली. इथे उमेदवारही चुकीचा होता.
३. हिंदुत्वाचे काही प्रमुख पोस्टर बॉय हरले आहेत, हाही दिलासादायक भाग आहे. संगीत सोम, सुरेश राणा, उमेश मलिक, दिवंगत बाबू हुकूम सिंग (यांची मुलगी मृगांका सिंग कैरानामधून उभी होती) हे सगळे २०१३च्या दंगलीतले आरोपी होते. सगळेच्या सगळे हरले, हे महत्त्वाचे. एकमेव तात्पर्य : लोकांच्या प्रश्नावर आधारलेली खरोखरची जनचळवळ अजूनही ध्रुवीकरणाच्या लाटा उलथवू शकते. त्यातूनच अंतिमत: भाजपचा पराभव होऊ शकतो. निवडणुकीच्या चार महिने आधी मैदानात उतरून काही चतुर सामाजिक राजकीय समीकरणे जुळवून यशस्वी होण्याची कल्पना फोल आहे.