‘प्रोजेक्ट टुडे’च्या अहवालानुसार, ऑक्टोबर ते डिसेंबर २०२० दरम्यान नवीन गुंतवणूक आकर्षित करून घेण्यात महाराष्ट्र हा देशात पहिल्या स्थानावर होता. आता महाराष्ट्राच्या आर्थिक पाहणी अहवालानुसार, देशातील परदेशी गुंतवणुकीत महाराष्ट्राचा २८ टक्के वाटा आहे. तसेच यंदा भारताचा विकास दर ८.९ टक्के असला, तरी महाराष्ट्राचा विकासदर १२ टक्क्यांवर जाऊन पोहोचला आहे. राज्याचे नेतृत्व राष्ट्राचे दैवत असलेले मोदी करत नाहीत आणि सध्या देवेंद्रदेखील मुख्यमंत्री नाहीत. त्यांच्या अनुपस्थितीत, महाविकास आघाडी सरकारच्या काळात या गोष्टी घडून आलेल्या आहेत! कमाल आहे ना! असे कसे घडले बुवा? ‘हे सरकार २४ तास फक्त आणि फक्त महावसुलीच करते’, अशी टीका गेली सव्वा दोन वर्षे घाटकोपरचा संतपुरुष करत आला आहे.
हेच खरे मानायचे, तर महाराष्ट्राचा हा विकास परग्रहावरच्या कोणी माणसाने येऊन करून दाखवला आहे का? एखाद्या सरकारला सतत बदनाम करताना, त्या सरकारतर्फे काही चांगल्या गोष्टी घडून येतात, हे मान्यच करायचे नाही का? आमच्या शिवाय दुसरे कोणी विकासच करू शकत नाहीत, असा दावा करणार्यांना ‘आप’ने चांगले उत्तर दिले आहे. ‘आप’पासून बोध घेऊन महाविकास आघाडी सरकारनेदेखील आणखी चांगली कामे करून दाखवली, तर लोक त्यास दुवाच देतील!
– हेमंत देसाई
पेटीएमचे शेअर गडगडले कसे?
नोटबंदीच्या अगदी अगोदर ‘पे-टीएम’ चे क्युआर कोड दुकानांच्या बाहेर दिसू लागले होते… निवडणूकांच्या बरोबर अगोदर ‘पे-टीएम’चा आयपीओ वायदा बाजारात आला… २३०० रुपये प्रति किंमतीच्या दरात घेतलेला तो शेअर, ‘एनएसई’वर १९५३ रुपये प्रती या सवलतीच्या किमतीत दाखल झाला… आज तो शेअर ७७३ रुपये प्रति या दराने वायदा बाजारात आहे… याला वायदा बाजाराच्या भाषेत ‘पम्प अॅण्ड डम्प’ नीती म्हणतात, प्रस्थापित लोक किंवा वायदा बाजाराच्या भाषेत ‘ऑपरेटर्स’ एखाद्या स्टॉकची किंमत तो खरेदी करून करून वाढवतात आणि लोकांना तो घेण्याचे सल्ले देतात, जेव्हा लोक तो शेअर विकत घेतात तेव्हा त्या स्टॉकची किंमत अजून वाढते, आणि मग हे ऑपरेटर्स स्वतःचा नफा काढून हे स्टॉक विकून टाकतात…म्हणजे शक्यता ही आहे, की कोणीतरी तो आयपीओ येण्याआधीच म्हणजे तो स्टॉक पब्लिक लिमिटेड होण्याआधीच समभाग १००-५०० रुपये प्रतिला घेतला असेल, इतका घेतला असेल की ‘सेबी’ जी एनएसई व बीएसईची संचालक संस्था आहे, तिला या स्टॉकची किंमत २३०० रुपये प्रति अशी ठरविण्यास भाग पाडले असेल (लिस्टींग ची किंमत कंपनीच्या एकूण व्हॅल्युएशनवरून ठरवतात, आणि कंपनीचे व्हॅल्युएशन कंपनीचा नफा व बाहेरील गुंतवणूक यांच्या वरून काढली जाते) आणि मग तो स्वतःचा नफा काढून २३०० रुपये प्रतीला विकून टाकला असेल…आता या प्रकरणात अजून एक दिशा आहे, की ‘पे-टीएम’ हा स्टॉक वायदा बाजारच्या इतर २ प्रकारात म्हणजेच ‘ऑप्शन ट्रेडिंग’ व ‘इन्ट्रा डे शॉर्ट सेल’ प्रकारात समाविष्ट नाहीये, नाहीतर प्रस्तापितांच्या नफ्याची रक्कम लिहिता देखील आली नसती… ‘हर्षद मेहता’ वेबसीरिजमुळे सर्वांना माहिती आहे, पण त्याचाच पट्टशिष्य ‘केतन पारेख’ ज्याने ४०,००० हजार कोटींचा घोटाळा केला होता, याच ‘पम्प अॅण्ड डम्प’ नीतीचा वापर करून… हा कोणाला माहिती नाहीये…
आता तुझा प्रश्न कोण कोणाला ‘प्रमोट’ करतंय??? दादा, कोणीच कोणाला ‘प्रमोट’ करत नाहीये, ‘पे-टीएम’चा हे लोक प्याद्यासारखा वापर करतायेत आणि ‘पे-टीएम’ला नफ्याच्या आशेपोटी अजूनही माहिती नाहीये, हा ‘अत्याधुनिक’ केतन पारेख आज दाढी-मिश्या वाढवून त्यांना व लोकांना लुटतोय…!!! पुरावा नाहीये दादा, पण ही सत्य-परिस्थिती असू शकते.
– स्वप्नील सोनवणे
संविधान नेस्तनाबूत होतंय…
आपलं संविधान लिहतांना डॉ. बाबासाहेबांच्या समोर जगातील सर्व संविधानं होती. त्यातील सर्व त्रुटी लक्षांत घेऊन, त्या आपल्या संविधानांतून हद्दपार करीत, जागतिक विद्वान बाबासाहेबांनी आपलं एक जगावेगळं संविधान तयार केलं. ज्यात त्यांनी आम्हां सर्व भारतीयांना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष अन्न, वस्र, निवारा, शिक्षण व आरोग्याची हमी दिलेली आहे. आम्ही त्यांचे करंटे वंशज त्या संविधानाची अंमलबजावणीच फक्त करण्यात १०० टक्के अयशस्वी ठरलो नाही तर ते संविधान १०० टक्के नेस्तनाबूत होईपर्यंत थांबलो. आता फक्त संविधानाच्या १०० टक्के अंमलबजावणीसाठी संविधानाच्या चौकटीत अहिंसेच्या मार्गाने करणारी राजवट आणणे किंवा आत्महत्या करणे हाच उपाय.
– बी. जी. कोळसे-पाटील
हे फडणवीसांचं अपयशच
गोव्यात भाजपला अखेर बहुमतासाठी अपक्षांचा आधार घ्यावा लागला. पण महाराष्ट्रात मात्र भाजपला तसे करता आले नाही. फडणवीस हे गोव्यातील निवडणुकीत प्रभारी असल्यामुळे भाजपवाले अंगावरील कपडे काढून फडणवीसांचा जयजयकार करत आहेत. गोव्यात फडणवीसांची जादू चालली असती तर किमान ३० जागा मिळायल्या हव्या होत्या, पण काठावरचं बहुमत प्राप्त करणे हेच फडणवीसांचं अपयश आहे हे अंधभक्तांना कोण सांगणार?
– अरुण पां. खटावकर, लालबाग