□ पदावर बसलेल्या लोकांना पद आणि अधिकार यांचे तारतम्य राहात नाही! शरद पवार यांचा राज्यपालांना टोला
■ तारतम्य हा विषय त्यांनी शाळेत ऑप्शनला टाकला असणार.
□ ‘सन्माननीय व्यक्ती’ची वक्तव्ये महाराष्ट्राला पटणारी नाहीत – अजित पवार
■ म्हणूनच तर ती केली जात आहेत, महाराष्ट्राला डिवचण्यासाठी
□ हार्बरचे मराठी कच्चे; नव्या मुंबईतील दारावेचे केले धारवे
■ खडकीचे किरकी करणार्या ब्रिटिशांचा वारसा अजून विसरलेले नाहीत रेल्वेतले काही लोक.
□ मी पुन्हा येणार म्हणता; पण आम्ही येऊ द्यायला पाहिजे! – शरद पवार यांचा फडणवीसांना टोला
■ ते विरोधी पक्षनेता म्हणून पुन्हा येणार, असं सांगतायत पवार साहेब, तेवढं तरी राहू द्या त्यांच्याकडे.
□ ‘ऑपरेशन गंगा’ राबवून भारताने करून दाखवले – नरेंद्र मोदी यांचा दावा
■ त्यांचं बरोबर आहे… इतकी वर्षं सरकारांनी जे कर्तव्य बकबक न करता बजावलं, त्याची यांनी इव्हेंटबाजी करून दाखवलीच… तीही बैल गेल्यावर झोपा करून.
□ झुकला नाही तर संपूर्ण युक्रेनच बेचिराख करू – पुतीन यांची धमकी. मोडू पण वाकणार नाही – झेलेन्स्की
■ या संघर्षामुळे भारतासारख्या अनेक अविकसित देशांच्या अर्थव्यवस्था मोडून पडणार आहेत आणि गोरगरीबांची स्वप्नं बेचिराख होणार आहेत, याची या दोन्ही महनीयांना कल्पनाही नसेल कदाचित.
□ लॉकडाऊनमुळे वाढली लठ्ठ मुलांची संख्या
■ त्यापेक्षा देशातली मठ्ठ माणसांची संख्या वाढत चालली आहे, त्याकडे पाहिले पाहिजे.
□ ईडीपेक्षा खिशातील बिडीची किंमत जास्त – धनंजय मुंडे यांचा भाजपला टोला
■ ती यांच्यासाठी विरोधकांमध्ये टाकायची काडीच बनून बसली आहे… दोन रुपड्यांच्या माचिसमधली.
□ संरक्षणासाठी चीनचा खर्च भारताच्या तिप्पट. २३० अब्ज डॉलर्सची तरतूद
■ चिनी भाषेत आक्रमण आणि अतिक्रमणाला संरक्षण म्हणतात बहुतेक.
□ टिकटॉकमुळे अमेरिकन मुलांचे मानसिक आरोग्य प्रभावित
■ जणू आधी स्वस्थच होती ही मुलं मानसिकदृष्ट्या
□ टीव्ही रेन या रशियन वृत्तवाहिनीच्या कर्मचार्यांनी युद्धाच्या विरोधात ‘नो टू वॉर’ म्हणत आपल्या पदाचा राजीनामा दिला
■ आमच्याकडचे कर्नल, ब्रिगेडियर, जनरलचे पोषाख घालून खेळण्यातल्या बंदुका आणि रणगाडे घेऊन आले असते स्टुडिओमध्ये.
□ मुलांनो, शाळेत चला! १५ मार्चपर्यंत शिक्षकच शोधणार शाळाबाह्य मुले
■ असतील शाळेत मुले, तरच शिक्षकांकडे फुलतील पगाराची फुले!
□ तुम्हाला आवडेल त्या साहित्याचे वाचन करा. तरच तुम्हाला जीवनकौशल्यांविषयीचे अनुभव व शिक्षण मिळेल – जावेद अख्तर यांचा एमआयटीच्या विद्यार्थ्यांना सल्ला
■ हल्ली व्हॉट्सअॅप आणि फेसबुकवरची कचरापट्टी म्हणजे साहित्य बनून बसलंय जावेदसाब, ते विनाखातरजमा वाचू नये, एवढं मुलांनी पाळलं तरी पुष्कळ आहे.
□ मध्यमवर्गीयांच्या खिशात इंधन दरवाढीचा ‘बॉम्ब’. कोणत्याही क्षणी फुटणार!
■ विधानसभा निवडणुकीत सत्ताधार्यांच्या विजयाचे फटाके फुटले आहेत, तेव्हा आता जळके खिसे घेऊन नाचा.
□ स्कूल बस फी गगनाला भिडणार. पेट्रोल, डिझेलच्या वाढत्या किमती पालकांची डोकेदुखी
■ ये तो सिर्फ झाँकी है, अभी बहुत कुछ बाकी है.
□ भारताच्या हद्दीत पुन्हा पाकिस्तानी ड्रोनची घुसखोरी
■ आता त्यांच्या हवाई दलात ड्रोनच राहिलेत की काय?
□ भारतीयांच्या सुखरुप सुटकेबाबत पुतीन यांची मोदींना ग्वाही
■ युद्धाच्या धामधुमीत या आश्वासनावर अंमलबजावणी किती होते, ते महत्त्वाचं. तेही बोलबच्चनच असतील तर उपयोग काय?
□ मोदी सरकार केवळ प्रसिद्धीतंत्राचा वापर करण्यात मश्गुल आहे. देशातील प्रश्नांवर मोदी सरकारकडे योजनाच नाही.
■ निवडणुका जिंकतायत ना, लोकांचं पाठबळ आहे ना, मग हव्यात कशाला योजना?
□ मेघालयाचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्यावर पंतप्रधान मोदी कमालीचे नाराज
■ ते खरं बोलतात, ते टोचतं. मग करा की गच्छंती.
□ आयपीएलऐवजी देशातील खेळण्याला प्राधान्य द्या – दक्षिण आप्रिâकेचा कर्णधार डीन एल्गरचे सहकार्यांना आवाहन
■ देशप्रेम की पैसा यात व्यावसायिक खेळाडू कशाची निवड करणार? देशासाठी खेळणंही फायदेशीर करा की.
□ स्त्री-पुरुष भेद राहिलाय कुठे? अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे यांचे मत
■ शहाण्या माणसांच्या मनात आणि व्यवहारात तो नाही, पण त्यांची संख्या किती आहे मॅडम?
□ विमानप्रवास ४० ते ५० टक्क्यांनी महागला
■ जमिनीवरचा तरी कुठे स्वस्त आहे?
□ क्रिकेटपटू माझ्याकडे टक लावून पाहायचे! १९ वर्षांनंतर समालोचक मंदिरा बेदीने मन केले मोकळे
■ टीव्हीचे प्रेक्षक तरी दुसरं काय करायचे? तुझी बडबड ऐकायचे की काय? तुझी नेमणूकच त्यासाठी होती ताई… हे तुला माहितीच नव्हतं की काय?
□ रशिया आमचा महत्त्वाचा भागीदार. चीनकडून समर्थन. संबंध कायम राहणार
■ अमेरिकेचा विरोध हेच सगळ्यात महत्त्वाचे कारण आहे एकत्र येण्याचे.
□ स्त्रिया जन्मत:च पुरुषांपेक्षा सक्षम. डॉ. भालचंद्र मुणगेकर यांचे प्रतिपादन
■ नंतर आपला समाज त्यांना मनाने ‘अबला’ बनवतो आणि सोयीने दुर्गा म्हणून गौरवतो.