काही व्यंगचित्रं कालातीत असतात… कारण ती ज्या परिस्थितीतून जन्मतात ती परिस्थिती कालातीत असते… आपल्या देशात सरकारे येतात, सरकारे जातात, अमुक विचारसरणीचा पाडाव झाला आणि तमुक विचारसरणी सत्तेत आली, अशा चर्चा सामान्य माणूस करत असतो… निवडून आलेल्या विचारसरणीच्या तो भजनी लागलेला असतो, म्हणूनच तर तिला त्याने कौल दिलेला असतो… आपल्या मतामुळे जीवनमान सुधारेल, विकास होईल, देशाची प्रगती होईल, या विचाराने मतदान केले आणि निवडून आलेल्यांनी नंतर फसवले तर त्याबद्दल निदान अशा पक्षांना दोष तरी देता येतो… पण मतदानच मुळात अमुक समुदायावर बुलडोझर चालवणे, तमुक समुदायाला देशद्रोही ठरवून एकतर्फी कायद्याचा वरवंटा चालवणे, यासाठी केले जात असेल आणि उपाशी राहू पण यांनाच मत देऊ असा सुंदर, उदात्त हेका असेल, तर मग हक से उपाशी राहण्याची पाळी असे सरकार आणल्याशिवाय राहात नाही. मतदानापर्यंत कशीबशी रोखून धरलेली महागाई मतदान होताच त्या मतपेटीतून कशी राक्षसासारखी बाहेर येते याचं जिवंत चित्रण शिवसेनाप्रमुखांच्या बोलक्या कुंचल्याने केलेलं आहे… एकीकडे हा अक्राळविक्राळ राक्षस आणि त्याच्यासमोर पुरता गांगरून गेलेला, भयचकित झालेला सामान्य माणूस, हा विरोधाभासही किती ठसठशीत आहे… या व्यंगचित्राचा आशय स्पष्ट करण्यासाठी नेहमीची चौकोनी रचना न करता तो चौकोन तोडून साखरेचा भाव लिहिल्याने प्रत्यकारकता किती वाढली आहे या चित्राची… तेव्हा निदान सामान्य माणूस गरीबी हटावच्या घोषणेला भुलत तरी होता, आता आपण द्वेषभक्तीपायी हे भागधेय ओढवून घेतले आहे, हे करुणास्पद आहे की हास्यास्पद ते आपणच ठरवायचे.