परीक्षेआधी जे जे भाग्यहीन युवक त्यांच्याशी संपर्क साधण्यात यशस्वी होत त्या सर्वांचे ललाट नव्याने लिहून त्यांना भाग्यवंत बनवण्याचे सशुल्क कर्म हे भाग्यविधाते वर्षानुवर्षे करत असत. त्यांच्याशी संपर्क न साधू शकलेले सारे परीक्षार्थी अभ्यास करत. उत्तीर्णही होत. फक्त गुणानुक्रमात खाली राहिल्याने प्रतीक्षा यादीत स्वतःची प्राणप्रतिष्ठा करून हयातभर प्रतीक्षा करत राहात. असो. प्रशिक्षणार्थी असलेले नवजात भाग्यवंत सर्वोत्कृष्ट खाद्य भक्षण करण्यास आतुर आहेत हे आमच्या सरावलेल्या दृष्टीने तेव्हाच जाणले होते.
– – –
जेव्हा जेव्हा आमचे साहेब अगदी आनंदात असत तेव्हा ते आम्हाला सोबत बसवत आणि आमचे प्रशिक्षण घेण्याचा प्रयत्न करत. त्यांना एक कुतूहल असे की आम्ही त्यांची परंपरा पुढे नेऊ शकू किंवा नाही? त्यासाठी आमची वृत्ती वारंवार तपासायला त्यांना आवडे. एक दिवशी आम्ही त्यांना त्यांचा नैवेद्य अर्पण करून असेच त्यांच्या दालनात बसलो होतो, त्यावेळी त्यांनी आम्हाला एक प्रश्न विचारला, ते म्हणाले, संपूर्ण जगात एकच पदार्थ असा आहे, जो केव्हाही, कधीही, कितीही खाल्ला तर तो पुन्हा पुन्हा खावासा वाटतो. अगदी पोट तट्ट फुगलेले असेल, त्यावेळी जरी तो खाल्ला तरी सहज पचतो आणि हा पदार्थ पचवणारी जी कोणी व्यक्ती असते ती सर्वार्थाने भाग्यवंत असते. हे भाग्य सहसा नोकरी करणार्यांना लाभते. सांगा बरं काय आहे तो पदार्थ? या प्रश्नाचे उत्तर आम्हाला काही सुचले नाही. आम्ही मग मौन झालो. मौनावर ओशाळवाणे हावभाव आणले. लघुकोनात असलेली मान अजूनच काटकोनात झुकवली. हलकेच श्वास घेत आजूबाजूची शांतता वाढवली आणि साहेबांना त्यांचा विजय झाल्याचा संकेत देऊन मोकळे झालो.
आदर्श आज्ञाधारक कर्मचारी म्हणून आमची ख्याती असल्याने साहेबांनी विचारलेल्या त्या कूट प्रश्नाचे उत्तर देण्याची जबाबदारी त्यांच्यावर ढकलून दिली आणि स्वस्थ झालो.
कर्तव्यकठोर अशी समाजात ख्याती कमावलेले आमचे साहेब नेहमीप्रमाणे स्वतःचा विजय झाला म्हणून खुलले, म्हणाले, ‘अहो, तो पदार्थ म्हणजे पैसा! पैसा कितीही खाल्ला तरी तो सतत खावा वाटतो. खाल्लेला पैसा ऊब देतो. ही ऊब म्हणजे आयुष्यभराचा पौष्टिक आहार! हाच पैसा आपल्याला अहंकाररूपी अ जीवनसत्व देतो. बिनधास्तपणाच्या रूपात ब जीवनसत्व देतो. करामतीच्या रूपात क जीवनसत्व देतो. डबोल्याच्या रूपात ड जीवनसत्व देतो. इरसालपणाचा रूपात ई जीवनसत्व देतो. म्हणूनच सर्वसमावेशक आहार म्हणून पैशाला बघावे लागते. आपल्या आजूबाजूला बुभुक्षित प्राक्तनाचे उपाशी लोक असले तर हा पैसा कधीकधी अंगाशी येतो. अशावेळी या पैशाला त्यांचे पोट भरण्यासाठी त्यांच्या अंगांवर ढकलून द्यावे लागते. पण ही घटना तशी दुर्मिळ घडत असते. फक्त सहज म्हणून तुम्हाला सांगितले!
साहेबांनी बोलणे थांबवले. आम्ही मनोमन प्रसन्न झालो. साहेबांना म्हणालो, ‘साहेब, तुमच्या मार्गदर्शनाखालीच आमचीही प्रकृती सुदृढ होणे चालू आहे. आमच्या वाटेला आलेल्या खाद्यातले काही खाद्य आम्ही आधी तुम्हाला नैवेद्य म्हणून देत असतोच. त्यामुळे आपण आमची आराध्यदेवता ठरता. आपल्यासोबतच इतर देवतांचे जे कोणते सण-उत्सव येतात, तेही आम्ही मनोभावे पाळत असतो, हे तर तुम्ही जाणता!’
हास्याचा गडगडाट करून साहेबांनी आमचे म्हणणे आवडल्याची प्रचिती दिली. आपली मान गतीने उजवीकडे उंचावत ‘आता निघा’ असे सुचवले आणि त्या दिवशीचे आमचे अल्पकालीन प्रशिक्षण संपले.
आम्ही त्यांच्या दालनातून बाहेर येतो न येतो तोच आम्हाला एका नवजात भाग्यवंताने गाठले. हे नवजात भाग्यवंत नुकतेच आमच्या कार्यालयात प्रशिक्षणार्थी म्हणून रुजू झाले होते. ते ज्या पदावर रुजू झाले होते, त्या पदाची स्पर्धा परीक्षा त्यांचा भाग्योदय होण्यास कारण ठरली होती. ही परीक्षा खाजगी संस्थेद्वारे घेतली गेली होती आणि या खाजगी संस्थेला निविदेद्वारे निवडले गेले होते. तिचे संस्थाचालक भाग्यविधाता म्हणून ओळखले जात. परीक्षेआधी जे जे भाग्यहीन युवक त्यांच्याशी संपर्क साधण्यात यशस्वी होत त्या सर्वांचे ललाट नव्याने लिहून त्यांना भाग्यवंत बनवण्याचे सशुल्क कर्म हे भाग्यविधाते वर्षानुवर्षे करत असत. त्यांच्याशी संपर्क न साधू शकलेले सारे परीक्षार्थी अभ्यास करत. उत्तीर्णही होत. फक्त गुणानुक्रमात खाली राहिल्याने प्रतीक्षा यादीत स्वतःची प्राणप्रतिष्ठा करून हयातभर प्रतीक्षा करत राहात. असो.
प्रशिक्षणार्थी असलेले नवजात भाग्यवंत सर्वोत्कृष्ट खाद्य भक्षण करण्यास आतुर आहेत हे आमच्या सरावलेल्या दृष्टीने तेव्हाच जाणले होते. प्रशिक्षणार्थीला सविस्तर प्रशिक्षण देऊन त्याला पूर्ण भाग्यवंत बनवणे हे आमचेही कर्तव्य असल्याने आम्ही त्यांना आमच्या छोट्या दालनात घेऊन गेलो, म्हणालो, ‘आत्मा अमर आहे- देह नश्वर आहे’ या सिद्धांतावर सर्वात जास्त विश्वास ठेवत जगा. शुद्ध आत्मा ठेवून तुच्छ अशा आपल्या देहाचे चोचले पुरवून त्याला उपकृत करायला काहीही हरकत नसते. कारण शरीराचे कितीही चोचले पुरवले तरी ते त्याला कमीच असतात. आपल्या उदात्त नशीबाशी शरीराने असहकार पुकारू नये म्हणून त्याचे लाड पुरवायचे असतात. मौज, मजा, मस्तीच्या साधनांना ते चटावलेले असते हे सदैव लक्षात ठेवायचे असते. आत्म्यापुढे शरीराला कमीपणा वाटू नये म्हणून, तो कमीपणा घालवण्यासाठी त्याचे जास्तीत जास्त चोचले पुरवण्याची काळजी आपण घ्यायची असते. हे काळजी घेणे ज्या सुज्ञांना जाणवते ते सुज्ञ आपल्यासारख्या नोकरांवर भाग्यवर्धक बनून मदतीला तत्पर असतात. त्याबदल्यात त्यांचाही देह पोसला जावा म्हणून त्यांची कामे करून टाकायची असतात. ही एक स्थिर रचना आहे. नोकरी करणारे जसे भाग्यवंत मानावे लागतात, तसेच या सुज्ञांना भाग्यवर्धक म्हणावे लागते. अश्या भाग्यवर्धक मंडळींना मध्यस्थ म्हणून कधीही हेटाळायचे नसते हे लक्षात ठेवा.
भाग्यवर्धकांकडे हे सर्वोत्कृष्ट खाद्य कुठून येते हा प्रश्न पडला असेल तर त्याचे उत्तर म्हणजे हे खाद्य त्यांच्याकडे भाग्यवितरकांकडून येते. ‘उत्तम ते आपल्याला- उरलेसुरले जगाला’ ही भाग्यवितरकांची वृत्ती ‘आहे रे’ आणि ‘नाही रे’ यांचा समतोल ठेवत असते. असे वितरक पिढ्यानपिढ्या आपल्या भाग्याला वृद्धिंगत करत राहतात. कोण भाग्यवंत करायचा हे ठरवणेही त्यांच्या हाती असते. सारे भाग्यवितरक म्हणायला म्हणून भाग्यनियंत्रकाच्या अधीन असतात. भाग्यनियंत्रक मात्र सर्वसामान्यांच्या एकत्रित जयघोषातून निर्माण होतात. यांचे अवतारकार्य अल्पकालीन किंवा दीर्घकालीन असू शकते. यांच्या अवतारकार्यासमयी भाग्यवितरक मात्र पूर्णपणे यांच्या मनाप्रमाणे भाग्यवितरण करतात. आयुष्यभर या सार्यांना प्रमाणाबाहेर खायला मिळतो तो पैसा. तो यांच्या चित्ती समाधान म्हणून राहतो. सार्याच प्रकारच्या भाग्यवंतांचे शरीर स्वस्थ ठेवण्यासाठी सारे भाग्यहीन सदा आसुसलेले असतात. सर्व युगात भाग्यहीनांची संख्या प्रमाणापेक्षा जास्त असल्याने व एखादं दोन टक्केच भाग्यवंत निर्माण होत असल्याने ‘धनाढ्य आवर्जून पुज्यते’ असे म्हणावेच लागते.
आमचे रुक्ष, रटाळ विवेचन ऐकून आमचा नवजात प्रशिक्षणार्थी कंटाळलाय हे आमच्या लक्षात आले. नीती-अनीतीच्या गृहितकानुसार त्याचे विचारचक्र चालू असावे हे गृहित धरून आम्ही त्याला म्हणालो, ‘आज आपल्या भूभागात शे-दीडशे कोटी प्रजानन राहतात, तेव्हा या सर्वांच्या सत्कर्माची किंवा कुकर्माची दैनंदिन नोंद ईश्वरदरबारी होणे अशक्य आहे. दुसरे म्हणजे कर्म करून फळ काय मिळेल याची काळजी कधीच करायची नसते. भाग्यवंतांच्या समूहात प्रवेश, हीच या जन्माची ईश्वरप्रचिती समजून काटेकोरपणे सर्वोत्कृष्ट आहार असलेला पैसा कसा खावा हे शिकून घ्या. त्यासाठी काही सिद्धांत पाळा. चला, आज मी तुम्हाला एखाद्या प्रकरणात निर्णय देण्यात विलंब केल्यावर काय काय फायदे होतात तो सिद्धांत शिकवतो!’
सर्वोत्कृष्ट खाद्य मिळण्याचे प्राक्तन घेऊन आलेला आमचा नवजात भाग्यवंत आता मात्र पूर्ण खुललेला तेव्हा बघायला मिळाला.