अनेक वर्षांच्या कालप्रवाहात होत्याचं नव्हतं झालं. पंचवटीची शान असलेला भाजीबाजार बारा वर्षांनी येणार्या सिंहस्थाच्या नावाखाली उद्ध्वस्त केला. गरीब दुबळ्या विक्रेत्यांना भिकेला लावले. पावन रामकुंड स्वच्छतेसाठी आलेले रुपये ज्याच्या त्याच्या घरी गेले. ती दुर्गंधी नदीकाठी अजूनही रेंगाळत आहे. आता नाशिक मेट्रोसिटी होणार आहे म्हणे. गगनचुंबी इमारती, ताजसारखी तारांकित हॉटेलं, पंचगल्ली बोळात मोठमोठे मॉल्स, प्रशस्त महामार्ग, फ्लायओव्हर्स, इंटरनॅशनल स्कूल्स, इलेक्ट्रॉनिक मीडियाचे नेटवर्क लेवून नाशिक भरजरी होत आहे. कॉलेज कट्ट्यावर बसून, लाजून गुंजन करणारे तरूण-तरुणी नव्या कोर्या लांबलचक चारचाक्यात बसून हवं तेथे हवं त्यावेळी बिनधास्त बिअर, सिगार्स वडीलधार्यांना न जुमानता भकाभक ओढत आहेत.
– – –
नाशिकचे सिंहावलोकन करताना ओठी ओळी आल्या…
‘या भवनातील गीत पुराणे मवाळ हळवे सूर जाऊ द्या येथूनी दूर..’
खरेच आहे जग झपाट्याने बदललेय. आठवणीत रमायचे किती? सात दशकांत नाशिक किती बदलले जे आमचे वाटायचे गल्ल्या, बोळ, मंदिरं, मेनरोड, पांडवलेणी, तपोवन, गोदावरीकाठचे नारोशंकर, काळाराम, लक्ष्मीनारायण, गोदावरी मंदिर, गांधी ज्योत. दरवर्षी नैसर्गिक महापूर येई. मंदिरं यथेच्छ न्हाऊन घेत. गंगेवर विस्तीर्ण पटांगणात फुललेला भाजीबाजार, त्यात ताजा भाजीपाला मांडलेला. मे महिन्यात भरणारी अत्यंत श्रवणीय अशी वसंत व्याख्यानमाला, महापुराला वर्षांनुवर्ष आव्हान देणारा व्हिक्टोरिया पूल, त्याच्या कठड्यावरून पुरात उड्या घेणारी हिंमतबाज पोरं, सरकारवाड्याच्या पायर्यांना नमस्कार करून जाता जाता सराफ बाजार, कापड व भांडे बाजार यांची घाबरगुंडी उडवणारे पुराचे पाणी दहिपुलाला गळ्यापर्यंत बुडविल्याशिवाय परतत नसे.
अनेक वर्षांच्या कालप्रवाहात होत्याचं नव्हतं झालं. पंचवटीची शान असलेला भाजीबाजार बारा वर्षांनी येणार्या सिंहस्थाच्या नावाखाली उद्ध्वस्त केला. गरीब दुबळ्या विक्रेत्यांना भिकेला लावले. पावन रामकुंड स्वच्छतेसाठी आलेले रुपये ज्याच्या त्याच्या घरी गेले. ती दुर्गंधी नदीकाठी अजूनही रेंगाळत आहे.
नाशिकचा मेनरोड हे वैभव होते. चार पाच थिएटर्स ज्यात वैभवशाली हिंदी-मराठी सिनेमे आम्ही पाहिले. पांडे मिठाई, बुधा व सरवटेंची जिलेबी, भगवंतरावांची रंगबिरंगी मिसळ, मकाजी कोंडाजी पैलवानांचा खुमासदार चटकदार चिवडा. गंगेवर बसून यांचा चिवडा व भेळभत्त्याचे बकाणे भरून खाण्याची लज्जतच न्यारी, असे पु. ल. देशपांडे म्हणाले होते. पाणीपुरी-आइस्क्रीमची चौपाटी अजूनही आहे. पण चव नाही. मेनरोडच्या गर्दीत तरुणींना चुटपुटते स्पर्श करण्याची पोरांची अहमहमिका लागे. चुकून फसला तर यथेच्छ मार खावा लागे. रात्रभर मख्ख चेहर्याच्या पारश्याची मेहेर, कॅफे हिंदसारखी हॉटेल्स उघडी असायची. तिथे चहा व खारी मिळे. स्वस्त असूनही खिशात पैसे नसत.
सोमेश्वर, त्र्यंबकेश्वर, पांडवलेणी येथे पायी वा एक आणा तासाच्या सायकलवर जायचो. घरची पिठलं-पोळी घेऊन श्रावणी सोमवारी लोक पांडवलेणे, म्हसरूळ, सोमेश्वरला जात. गर्द झाडीत वनभोजनाचा आनंद मिळे. पिठलं, बटाट्याची भाजी, वड्या पाडलेले पिठले, पोळी-भाकरी, लोणची, काड्याकुड्या पेटवून तीन दगडांच्या चुलीवर गरमगरम खिचडी शिजवून वाढली जाई. यात एकही पदार्थ हॉटेलातला नसे. त्र्यंबकेश्वरी कोंबून माणसे भरलेली टॅक्सी मंदिरापर्यंत जाई. देवांचे सहज दर्शन मिळे. प्रशस्त पटांगणात बसून लोक घरच्या दशम्या खात आणि आता देव श्रीमंत झाल्याने दुरावलेत. मैलभर लांब चारचाक्या पार्क करून भर उन्हात पाय ओढत जायचं. तिथे तासन्तास रांगेत उभं रहायचं; लहान मुलांपासून वयोवृद्धांनीही. आजूबाजूला पोलिसांचा फौजफाटा, अंगाची झाडाझडती.
झाडाझुडपात डोंगराच्या मधोमध वसलेले नाशिक आज उंच इमारतींतील वन रूम किचनमध्ये हरवलेय. जुन्या नाशकातले शिसवी लाकडातले कलाकुसरीने नटलेले चौपदरी वाडे दिसेनासे झालेत. चित्रकारांच्या दोन-तीन पिढ्या गंगेवरच्या मंदिरांची लँडस्केप्स करत आहेत, तरी त्याचं अद्यापही मन भरत नाही.
सराफ बाजारातील पेशवे वाड्यातील सार्वजनिक वाचनालयात हजारो माणसे वाचनाने घडली. त्या वाचनालयाचे ऐश्वर्यच वेगळे होते. तेथे अनेक विद्वत्जनांना पाहायला मिळाले. आमच्यात आलेला बहुश्रुतपणा ही वाचनालयाची मोठी देणगी आहे. ज्ञानपीठ विजेते, सर्वश्रुत नटसम्राटचे सृजनशील नाटककार तात्यासाहेब शिरवाडकर तथा कविश्रेष्ठ कुसुमाग्रज आणि महाराष्ट्रातल्या वीस-पंचवीस थिएटर्समध्ये ज्यांची नाटकं एकाचवेळी चालू असायची ते देखणे, रुबाबदार वसंतराव कानेटकर. तात्यासाहेबांचा प्रसन्न चेहरा, निरागस हसू, अभ्यागतांना सदैव उघडे दार, परिणामी, त्यांच्या विश्रांतीची, जेवणाची, लिखाणाची, वेळेची तमा न बाळगता लोक येत राहत. मात्र कानेटकरांकडे तितका सहजी प्रवेश नसे. ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक आणि राजकारणात राहूनही कोणतेही सत्तापद न स्वीकारणारे दादासाहेब पोतनीस, कवी गोविंद, ना. वा. टिळक, देवदत्त टिळक, विनोदी लेखक म्हणून गाजलेले ‘राणीचा बाग’ नाटकाचे कर्ते डॉ. अ. वा. वर्टी आणि कितीक. नाशिकपुरतं आभाळ असतं तर हे केवढं मोठं तारांगण पाहता आलं असतं.
साठ-सत्तरच्या दशकात भरपूर नाटके नाशिकला येत. प्रयोग रुंगठा हायस्कूलच्या प्रांगणात होत. त्यावेळी सायखेडकर नाट्यगृह अस्तित्वात नव्हते. कधी भीमसेन जोशींचे गायन तर कधी अटल बिहारी वाजपेयींचे खुमासदार भाषण ऐकायला मिळाले. अत्रेंची अनेक नाटके तेथे यायची. दोन प्रसंग असे- भीमसेन जोशींचे गाणे होणार होते. तिकिटापुरते पैसे नसायचे. छुपा मार्ग शोधून आम्ही आत घुसायचो. अंधारात उभे राहायचो. नाटक वा गाणे सुरू झाले की पुढच्या रांगेत प्रथम जमिनीवर बसायचो. कुणी हुसकील ही भीती कायम मनात असायची. मध्यंतरानंतर अलगद गादीवर टेकायचो. भीमसेनजी गात होते, ताना घेत होते, नाना मुळे तबल्यावर होते. भीमसेनजी वरची तान घेऊन सोडून देत पुन्हा समेवर येण्याच्या मधल्या क्षणकालात शेजारी बसलेल्या वादकाशी हितगुज करीत. त्या दिवशी रंगात आलेले नाना मुळे तबल्याचा ठेका दणक्यात ठोकत होते. भीमसेनजींच्या लक्षात आले, गडी वारूवर बसल्यागत पळतोय… गाता गाता त्यांनी पालथ्या हातानेच ‘हळू रे बाबा’ सुचविले. नाना चाळीसच्या स्पीडने तबला हाकू लागले. जरा वेळाने भीमसेनजी ‘इंद्रायणीकाठी लागली समाधी ज्ञानेशाची’ गात होते, त्यांच्या समोरच्या गादीवरचे कुटुंब पेंगत होते. भीमसेनजींनी ‘उजेड राहीले उजेड होऊन, निवृत्ती सोपान मुक्ताबाई’ म्हणताना हात त्यांच्या दिशेने केले. पहिल्या लायनीतले श्रोते जोरात हसू लागले.
एकदा बेबंदशाहीच्या प्रयोग होता. सूर्यकांत संभाजी होते. त्यांच्या तोंडी अनेक आवेशपूर्ण संवाद होते. पण त्या दिवशी तो जोश येईना. स्टेजवर दुसरा प्रसंग सुरू झाला. मी व माझा भाऊ दशरथ विंगेत गेलो. सूर्यकांत अस्वस्थसे खुर्चीवर बसले होते. भावाने तंबाखूची पुडी व चुना त्यांच्यापुढे धरला. सूर्यकांतांनी चमकून भावाकडे पाहिले व न बोलता तंबाखू मळू लागले. थोरला बार तोंडात भरला भावाच्या पाठीवर थोपटत हसत म्हणाले, पोरा मनचं जाणलंस रे! त्यांचा पुढचा प्रवेश गगनभेदी संवादांनी टाळ्या घेणारा ठरला.
असाच एक प्रसंग सांगण्यासारखा आहे. प्रसिध्द नाटककार, लोकसत्ताचे माजी संपादक विद्याधर गोखले एका कार्यक्रमानिमित्त नाशिकला आले होते. त्यांच्यासह गप्पाटप्पांची एक मैफिल आयोजित करण्यात आली होती. सिलेक्टेड पन्नासेक प्रतिष्ठित मंडळी आलेली होती. गोखले अतिशय गप्पिष्ट. काव्यशास्त्रविनोदातला बापमाणूस. जय जय गौरीशंकर, संगीत सुवर्णतुला, पंडितराज जगन्नाथ, मदनाची मंजिरी, अशी एकाहून एक सरस नाटके त्यांनी लिहिली. मात्र, सतत तोंडात पानाचा तोबरा, तेसुद्धा तंबाखूचे पान. परिणामी त्यांच्या गप्पा इतक्या रंगत की समोरची मंडळीही ‘रंगून’ जात. त्यांचे रंगलेले शर्ट हे त्याचे प्रमाण असे. एका श्रीमंत मारवाड्याच्या वाढदिवसानिमित्त त्यांचे भाषण ठेवले होते. माणूस अबोल आणि बापुडवाणा, गरीब स्वभावाचा होता. मुख्य भाषणाआधी कार्यक्रमाचं यजमान म्हणून त्यांच्याविषयी दोन शब्द बोला, असं संयोजकांनी सांगितल्यावर विद्याधरजी उभे राहिले. त्याच्याकडे एकदा डोळे भरून पाहून घेत बोलू लागले आणि त्यांच्या भरजरी भाषेत त्यांनी त्याचे इतके कौतुक केले, उदार कर्ण, हृदयतेचा सागर, राजा हरिश्चंद्र अशा असंख्य उपमा-अलंकारांनी त्या गरिबाला त्यांनी चिंब भिजवून टाकले. उत्तरादाखल तो बोलायला उभा राहिला, तेव्हा सारखा रडू रडू करत होता. तो इतका उदार, दानशूर, गरिबांचा कैवारी, विशालहृदयी होता, हे त्यालाही ठाऊक नव्हते. मनोमन त्याला वाटले असावे आपण किती उधळे फुकट पैसा वाया घालवला आहे.
असाच एकदा सुलोचनाबाई चव्हाण यांचा लावणीचा कार्यक्रम होता. त्या व त्यांचे साजिंदे स्टेजवर. समोर पटांगणावर लोक दाटीवाटीने बसले होते. आदबशीरपणे पदर ओढून बसलेल्या बाईंचा गहिरा आवाज, गिर्रेबाज लावण्या ऐकूण कडाडून टाळ्या पडत होत्या. बरेचसे रसिक तरूण, म्हातारेही आवर्जून हजर होते. स्टेजवर इतरांबरोबर बाईंचे पती श्री. चव्हाण ढोलकीवर नेहमीच असायचे. एका रंगेल म्हातारबुवांनी चिठ्ठी लिहिली आणि शेजारच्या पोराला म्हटले, ‘ही चिठ्ठी बाईंना नेऊन दे!’ पोरगा अधिकच बेरड। तो म्हणाला, ‘अहो आजोबा, चिठ्ठ्या चपाट्या द्यायचं हे काय तुमचं वय आहे का? बाई विवाहित आहेत आणि तो शेजारी बसलेला ढोलकीवाला दांडगा माणूस पाहिलात का? तो त्यांचा नवरा आहे. अस्सल कोल्हापुरी.’ आजूबाजूला एकच हशा पिकला. खरे तर ती चिठ्ठी फर्माईशीची होती. अर्थाचा अनर्थ म्हणतात तो हाच.
पं. राम मराठे, भालचंद्र पेंढारकर, बाळ कोल्हटकर, सतीश दुभाषी, आशा काळे, पु. ल. देशपांडे, व. पु. काळे, गो. नी. दांडेकर, जितेंद्र अभिषेकी यांचा बाज वेगळाच… कितीक रंगकर्मी… कितीक नाटकं.. समृद्ध बालपण ते हेच. गावकरीचे रसरंग त्या काळी सिनेमाक्षेत्रात प्रतिष्ठेचे समजले जाई. एका भव्य पुरस्कार सोहळ्याला झाडून सगळी मोठमोठी मंडळी नाशिककरांनी पाहिली. गदिमा, जयश्री गडकर, सुलोचनाताई, लतादिदी, दादा कोंडके, आशा भोसले, हृदयनाथ मंगेशकर आदी बरेच दिग्गज आले होते.
आता नाशिक मेट्रोसिटी होणार आहे म्हणे. गगनचुंबी इमारती, ताजसारखी तारांकित हॉटेलं, पंचगल्ली बोळात मोठमोठे मॉल्स, प्रशस्त महामार्ग, फ्लायओव्हर्स, इंटरनॅशनल स्कूल्स, इलेक्ट्रॉनिक मीडियाचे नेटवर्क लेवून नाशिक भरजरी होत आहे.
कॉलेज कट्ट्यावर बसून, लाजून गुंजन करणारे तरूण-तरुणी नव्या कोर्या लांबलचक चारचाक्यात बसून हवं तेथे हवं त्यावेळी बिनधास्त बिअर, सिगार्स वडीलधार्यांना न जुमानता भकाभक ओढत आहेत. पूर्वी गरिबीमुळे कपडे फाटके असत. आता तसेच पण महागडे कपडे तरुणाईला भावताहेत. आई-वहिनीने घरी केलेले जेवण त्यांना नकोय. मॅकडोनाल्डची बर्गर-पिझ्झाची पार्सल्स त्यांना हवी असतात. कित्येक घरातील तरूणतरुणी शिकून परदेशस्थ झालेत. मुले हाताशी येतील म्हणून आई-बाप म्हातारपणाची गंगाजळी शिक्षणाला लावतात. पाण्यात गळ टाकून बसतात. कधी तरी पोरगं गळाला लागेल… पण विशाल झगमगाटी विदेशी समुद्राने त्याला कधीच गिळलेले असते.
या नाशकातही अशी शेकडो घरे आहेत, बंगले आहेत- तिथे ही पोरकी म्हातारी मंडळी राहतात. मोबाईल्सचे पीक उदंड झाले. देवापुढे न झुकणार्या माना मोबाइलपुढे रात्रंदिवस नतमस्तक झाल्यात. ‘चला गिळून घ्या गरम पोळ्या करते आहे,’ अशी उचकून बोलावणारी बायको आता मोबाईलमध्ये पहात नवर्याला, ‘टेबलावर जेवण ठेवलंय!’ असं सांगते. ‘पोळ्या कुठेत,’ तोही मोबाईलमध्ये पाहतच विचारतो. घरातल्या घरात आई-बाप-भाऊ-बायको हरवली आहे. फोन बूथवर नाणं टाकूनही फोन न करता येणारी माणसं आज मोबाइलच्या तलावात सराईतपणे पोहत आहेत. रामायणकाळी मोबाइल असते तर सीतेचे सुवर्णमृगाकडे लक्षच गेले नसते आणि नाशिकच्या दंडकारण्याचा घोर अपमान झाला नसता. सिंहस्थात लाखो लोक छोट्याशा रामकुंडात डुबक्या मारण्यासाठी आटापिटा करतात, त्यात मोठ्या संख्येने नाशिककरही असतात. पण घरच्या नळाला स्वच्छ पाणी गोदेचेच आहे हे विसरतात.
‘लास्ट एंपरर’ नावाच्या सिनेमाचा शेवट आठवतो. चीनचा एक राजकुमार सोन्याच्या राजवाड्यात ऐश्वर्यात वाढत असतो. भरजरी पोशाख, उंची अन्न, दासदासी… पण कम्युनिस्ट राजवट येते. दहा बारा वर्षांचा असतानाच त्याला जीव वाचविण्यासाठी परागंदा व्हावे लागते. कुठेतरी जाऊन मोलमजुरी करून तो तरूण होतो. तेव्हा त्याला त्याचा राजवाडा पाहायची इच्छा होते. तो त्या शहरी जातो. तेथे कोणत्याही जुन्या खुणा शिल्लक नसतात. तो राजवाड्याकडे जातो. तो पाहण्यासाठी तिकीट असते. याच्याकडे पैसे नसतात. हा द्वारपालाला विनवून सांगतो, ‘बाबा रे, हा राजवाडा माझाच आहे. मला डोळे भरून एकदा पाहू दे!’ द्वारपाल त्याला वेडा समजून त्याची खिल्ली उडवून हुसकून देतो.
आपल्याच नाशकात वावरताना सरकारी कार्यालये, हॉस्पिटल्स, पोलीस चौक्या, शिक्षण संस्था हाच अनुभव देतात. पैसे नसतील तर अक्षरश हुसकून देतात. असो. कालाय तस्मै नमः