इक्विटी म्युच्युअल फंड, डेट फंड, बॅलन्स्ड फंड व हायब्रीड फंड हे म्युच्युअल फंडाचे तीन प्रमुख प्रकार आहेत हे आपण बघितले. त्या प्रत्येकात अनेक उपप्रकार आहेत, याचा उल्लेख केला होता. असे सगळे मिळून म्युच्युअल फंडाचे जवळपास ४० प्रकार आहेत. इतके सगळे अर्थातच आपल्याला बघायचे नाहीत. छोटे गुंतवणूकदार सहसा इक्विटी म्युच्युअल फंडात गुंतवणूक करतात. याचे मुख्य उपप्रकार बघण्याआधी कंपनीचे मार्केट कॅपिटलायझेशन म्हणजे काय ते जाणणे आवश्यक आहे. एखाद्या कंपनीचे मार्केट कॅपिटलायझेशन म्हणजे त्या कंपनीच्या एकूण शेअरची संख्या गुणिले त्या शेअरचा मार्केटमधील भाव.
मार्केट कॅपिटलायझेशन = शेअरची संख्या X शेअरचा मार्केटमधील भाव
याआधारे इक्विटी म्युचुअल फंडाचे काही उपप्रकार होतात.
इक्विटी फंडातील पहिला उपप्रकार आहे लार्ज कॅप फंड. हा जमलेल्या निधीपैकी ८० टक्के निधी लार्ज कॅप कंपन्यांच्या स्टॉकमध्ये (म्हणजे शेअरमध्ये) गुंतवतो.
लार्ज कॅप कंपन्या म्हणजे सेबीच्या नियमाप्रमाणे शेअर मार्केटवर नोंदणी झालेल्या कंपन्यांपैकी मार्केट कॅपिटलायझेशननुसार पहिल्या १०० कंपन्या. थोडक्यात आकाराने सर्वात मोठ्या असलेल्या १ ते १०० क्रमाकांच्या कंपन्या असा अर्थ तुम्ही घेऊ शकता. रिलायन्स इंडस्ट्रीज, टीसीएस, एचयूएल, एशियन पेन्ट्स, एल अॅन्ड टी या काही लार्ज कॅप कंपन्या आहेत. सेन्सेक्स व निफ्टी ह्या इंडेक्सची-निर्देशांकाची नावे ऐकली असतील. ह्या निर्देशांकात फक्त लार्ज कॅप कंपन्यांचाच समावेश असतो. आयडीएफसी लार्ज कॅप फंड, एचएसबीसी लार्ज कॅप ही अशा काही फंडांची नावे, मात्र लार्ज कॅप म्युच्युअल फंडांच्या नावात लार्ज कॅपऐवजी बरेचवेळा ब्लू चिप फंड असा शब्द असतो. उदा: फ्रँकलिन इंडिया ब्लू चिप फंड, एसबीआय ब्लू चिप फंड किंवा आयडीबीआय इंडिया टॉप हंड्रेड फंड असेही नाव असते. त्या म्युचुअल फंडाची माहिती बघितली तर कोणत्या उपप्रकारातील फंड आहे याचा तिथे स्पष्ट उल्लेख असतो. एएमसी कंपन्यांच्या फंडांची फॅक्टशीट त्यांच्या वेबसाईटवर असते, तसेच इतरही काही साईटवर उपलब्ध असते.
फॅक्टशीटमध्येही याचा उल्लेख असतो व त्यात त्यांच्या फंडाची बरीच उपयुक्त माहितीही असते.
इक्विटी फंडातील दुसरा उपप्रकार आहे मिड कॅप फंड. हा फंड जमलेल्या निधीपैकी किमान ६५ टक्के गुंतवणूक मिड कॅप कंपन्यांच्या शेअरमध्ये करतो. सेबीच्या नियमाप्रमाणे मार्केट कॅपिटलायझेशननुसार १०१ ते २५० क्रमांकांच्या कंपन्या ह्या मिड कॅप कंपन्या आहेत. अशोक लेलँड, बाटा इंडिया, भारत फोर्ज ही काही मिड कॅप कंपन्यांची नावे. इथेही काहीवेळा फंडाच्या नावात मिड कॅप फंड स्पष्ट उल्लेख असतो. उदा. आदित्य बिर्ला सन लाइफ मिड कॅप फंड, टाटा मिड कॅप फंड इ. किंवा काहीवेळा वेगळे नाव असते. उदा. कोटक इमर्जिंग इक्विटी फंड, प्रँâकलिन इंडिया प्रायमा फंड, निप्पॉन इंडिया ग्रोथ फंड इत्यादी. त्यामुळे इथेही नावाऐवजी त्या म्युचुअल फंडाची माहिती बघावी व कोणत्या उपप्रकारातील फंड आहे ते जाणून घ्यावे.
इक्विटी फंडातील तिसरा उपप्रकार आहे स्मॉल कॅप फंड. हा फंड जमलेल्या निधीपैकी किमान ६५ टक्के गुंतवणूक स्मॉल कॅप कंपन्यांच्या शेअरमध्ये करतो. सेबीच्या नियमाप्रमाणे मार्केट कॅपिटलायझेशननुसार २५१ क्रमांकांपासून पुढील सर्व कंपन्या ह्या स्मॉल कॅप कंपन्या आहेत. सेंचुरी प्लायबोर्ड, ब्लूस्टार, बिर्लासॉफ्ट ही याची काही उदाहरणे. कोटक स्मॉल कॅप फंड, निप्पॉन इंडिया स्मॉल कॅप फंड ही अशा फंडाची दोन उदाहरणे.
या तीन उपप्रकारापैकी कोणत्या प्रकारातील फंडाची निवड करावी, लार्ज कॅप, मिड कॅप की स्मॉल कॅप? त्यासाठी काही नियम नाहीत. प्रत्येक व्यक्तीची आर्थिक क्षमता, त्याची जोखीम स्वीकारण्याची तयारी, त्याचे वय, त्याची गुंतवणूक किती काळासाठी आहे यावर ही निवड ठरते.
लार्ज कॅप कंपन्यांच्या शेअरमधील गुंतवणुकीत मिड कॅप व स्मॉल कॅप यांच्या तुलनेत जोखीम कमी असते. लाभ चांगला होतो, परंतु मिड कॅप व स्मॉल कॅप यांच्या तुलनेत तो कमी असतो. अर्थात प्रत्येक वेळी लाभ कमी असतो असे सांगता येणार नाही. काहीवेळा लार्ज कॅप कंपन्यांनीसुद्धा खूप चांगला व जास्त लाभही दिलेला आहे. मिड कॅप कंपन्यांमध्ये लार्ज कॅपपेक्षा जोखीम जास्त असते, परंतु लाभ जास्त होऊ शकतो. स्मॉल कॅप कंपन्यांमध्ये तुलनेने सर्वात जास्त जोखीम असते, पण लाभही जास्त असतो.
कोणत्या उपप्रकारातील फंडाची निवड करायची यासाठी काही सर्वसाधारण तत्वे सांगता येतील; लार्ज कॅप फंडांतून स्थिर लाभ मिळतो, शेअर मार्केटमध्ये मंदी आली तरी पुन्हा मार्केट सावरतं तेव्हा हे आधी वर येतात. गुंतवणुकीचा काही हिस्सा यात असावा. निवृत्त लोकांनी गुंतवणुकीचा जास्त हिस्सा यात गुंतवावा, आर्थिक क्षमता असेल तर काही मिडकॅप फंडामध्येही अवश्य गुंतवावा. तरुण व मध्यमवयीन लोकांनी मिडकॅप फंडामध्ये अवश्य गुंतवणूक करावी. त्यातून जास्त लाभ मिळतो. त्यांच्या गुंतवणुकीचा कालावधीसुद्धा दीर्घ असतो. गुंतवलेल्या फंडाचे मूल्य कमी झाले तरी ते दीर्घ कालावधीत भरून येऊन वर जास्त लाभ मिळू शकतो. त्यांनी आपल्या प्रवृत्तीनुसार गुंतवणुकीच्या ५० टक्केपेक्षा जास्त हिस्सासुद्धा मिडकॅप फंडामध्ये करायला हरकत नाही, फक्त गुंतवणुकीचा कालावधी दीर्घ हवा. स्मॉल कॅप फंडामधील गुंतवणूक ही आपल्या गुंतवणुकीचा मुख्य हिस्सा असू नये. एकूण गुंतवणुकीपैकी साधारण वीस ते तीस टक्के गुंतवणूक त्यात करावी. शेअर मार्केट काही कारणांनी खाली यायला सुरवात झाली, तर स्मॉल कॅप कंपन्यांच्या शेअरच्या भावात जास्त घसरण होते व ते रिकव्हर व्हायला बराच काळ लागतो. त्याचा परिणाम स्मॉल कॅप फंडांवरही तसाच होतो. त्यामुळे स्मॉल कॅप फंडात गुंतवणूक करताना तशी आर्थिक क्षमता व जोखीम घेण्याची प्रवृत्तीसुद्धा हवी.
एक महत्त्वाचा मुद्दा असा की स्मॉल कॅप फंडामधील जोखीम व किरकोळ गुंतवणूकदार स्वतःच थेट शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करताना स्मॉल कॅप कंपन्यांचे शेअर खरेदी करतो, त्यातील जोखीम यात महदंतर आहे. किरकोळ गुंतवणूकदार खूप जास्त लाभाच्या अपेक्षेने स्मॉल कॅप कंपन्यांच्या शेअरमध्ये गुंतवणूक करतो, तेव्हा त्याच्याकडे अभ्यास करण्यासाठी पुरेशी साधने नसतात. मार्केटमध्ये एखाद्या छोट्या कंपनीचे शेअर वर जायला लागले की तो त्यात गुंतवणूक करतो व बरेचदा मार खातो. या उलट स्मॉल कॅप फंड मॅनेज करणार्या फंड मॅनेजरकडे एक टीम असते, ते प्रत्येक कंपनीचा अभ्यास करतात, त्या कंपनीच्या व्यवस्थापनालाही आवश्यक असेल तर भेटतात व त्यानंतर त्यात गुंतवणूक करतात.
स्मॉल कॅप कंपन्या व पेनी स्टॉक यात खूप फरक आहे. पेनी स्टॉक म्हणजे कवडीमोल शेअर. या कंपन्यांचे फंडामेंटल म्हणजे ताळेबंदपत्रक चांगले नसते, व्यवसाय बरोबर नसतो, उत्पन्न तुटपुंजे असते व नफा नसतो. परंतु बाजारात यांच्या शेअरचा भाव वाढायला लागतो तेव्हा किरकोळ गुंतवणूकदार झटपट लाभाच्या अपेक्षेने ते विकत घेतो. नंतर त्या शेअरचा भाव तसाच झपाट्याने खाली यायला लागतो व किरकोळ गुंतवणूकदार मग त्यात अडकून पडतो. स्मॉल कॅप फंडांचे फंड मॅनेजर मात्र अशा कंपन्यांमध्ये गुंतवणूक करत नाहीत. आपण म्युच्युअल फंडाच्या एकाच योजनेत गुंतवणूक करत नाही तर चार-पाच किंवा त्याहीपेक्षा जास्त फंडांमध्ये गुंतवणूक करतो. याला आपला म्युच्युअल फंडाचा पोर्टफोलिओ म्हणतात. अशा पोर्टफोलिओत तिन्ही उपप्रकारातील फंडांचा समावेश असावा. तसेच गुंतवणुकीचा आपला उद्देश काय आहे, उदा. मुलीचे उच्चशिक्षण- तर किती वर्षांनी त्यासाठी पैसा लागेल ह्याचा विचार करावा व त्याप्रमाणे फंडाची निवड करावी. याशिवाय शेअर मार्केटची स्थिती कशी आहे याचा विचार करूनसुद्धा गुंतवणूक केली जाते. मार्केटमध्ये अनिश्चितता असेल व घाबरण्यासारखी स्थिती असेल, तर लार्ज कॅप फंडामध्ये गुंतवणूक करणे हे सुरक्षितेच्या दृष्टिकोनातून योग्य आहे.
मार्केट कॅपिटलायझेशननुसार हे तीन उपप्रकार बघितले. यांच्या संयोगातून आणखी तीन उपप्रकार होतात. त्यातील पहिला आहे लार्ज अॅन्ड मिड कॅप फंड. लार्ज कॅप कंपन्या म्हणजे मार्केट कॅपिटलायझेशननुसार पहिल्या शंभर कंपन्या व मिडकॅप कंपन्या म्हणजे १०१ ते २५० क्रमांकांच्या कंपन्या. त्यामुळे लार्ज अॅन्ड मिड कॅप फंड अशा पहिल्या एकूण २५० कंपन्यांच्या शेअरमध्ये गुंतवणूक करतो. सेबीच्या नियमाप्रमाणे किमान ३५ टक्के गुंतवणूक लार्ज कॅप कंपन्यांमध्ये केली पाहिजे व किमान ३५ टक्के मिड कॅप कंपन्यांमध्ये केली पाहिजे. राहिलेली ३० टक्के गुंतवणूक फंड मॅनेजर त्याच्या निर्णयाप्रमाणे करू शकतो. लार्ज कॅपसाठी वेगळा फंड व मिड कॅपसाठी वेगळा फंड याऐवजी हा एकच फंड दोन्हीचे काम करतो. स्मॉल कॅप कंपन्या वगळल्यामुळे ती जोखीम यात कमी होते.
फ्लेक्सी कॅप फंड हा फंड जमलेला निधी लार्ज, मिड व स्मॉल कॅप फंड या तिन्ही कंपन्यांच्या शेअरमध्ये गुंतवणूक करू शकतो. फंड मॅनेजरला ज्या प्रमाणात योग्य वाटेल त्यानुसार तो गुंतवणूक करू शकतो. किमान रक्कम कोणत्या साईजच्या कंपन्यांच्या शेअरमध्ये करायची यावर बंधन नाही. ह्या फंडांच्या मॅनेजरांचा कल सहसा जास्त गुंतवणूक लार्ज कॅपमध्ये करण्याकडे असते असे दिसून आले होते. आपण स्वत: लार्ज, मिड व स्मॉल कॅप यात किती गुंतवणूक करायची ते ठरवण्याऐवजी फंड मॅनेजर ते ठरवतो. तिन्ही प्रकारात गुंतवणूक असल्याने विविधीकरणाचा (डायव्हर्सिफिकेशन) लाभ मिळतो.
याउलट मल्टी कॅप फंड हाही तिन्ही प्रकारातील कंपन्यांच्या शेअरमध्ये गुंतवणूक करतो. मात्र सेबीच्या २०२०मध्ये आलेल्या परिपत्रकानुसार ह्या फंडाने किमान २५ टक्के गुंतवणूक प्रत्येकी लार्ज, मिड व स्मॉल कॅप कंपन्यांमध्ये केली पाहिजे व उरलेले २५ टक्के फंड मॅनेजर त्याच्या स्वेच्छेने कोणत्याही कंपन्यात करू शकतो. ह्यामुळे सुनिश्चित विविधीकरण होते व त्याचा फायदा होतो. मल्टी कॅप फंडांनी फ्लेक्सी कॅप फंडांपेक्षा तुलनेने जरा जास्त लाभ दिलेला आहे. मिड व स्मॉल कॅप कंपन्यांमध्ये प्रत्येकी २५ टक्के गुंतवणूक म्हणजे दोन्हीत मिळून ५० टक्के, त्यामुळे जोखीम जास्त होते. गुंतवणुकीचा कालावधी दीर्घ असेल हा फंड चांगला आहे.
व्हॅल्यू फंड हा एक वेगळा प्रकार आहे, ही गुंतवणुकीची एक स्टाइल आहे. ज्या कंपन्या चांगल्या आहेत व पुढे चांगली प्रगती करू शकतात, परंतु सध्या त्यांचा भाव त्यांच्या खर्या मूल्यापेक्षा कमी आहे अशा कंपन्यांमध्ये हा फंड गुंतवणूक करतो. काही निकषांच्या आधारे ही निवड केली जाते. व्हॅल्यू फंडाच्या विरुद्ध गुंतवणुकीची दुसरी स्टाईल म्हणजे ग्रोथ. ज्या कंपन्या वेगाने वाढ करतात, त्यांना ग्रोथ कंपन्या म्हणतात. त्यांच्या शेअरचे भाव वाढलेले असतात, तरीही पुढे चांगली वाढ होईल व भाव तसतसे आणखी वाढतील या अनुमानावर ही गुंतवणूक असते. व्हॅल्यू फंड सोडले तर सहसा इतर इक्विटी फंड अशा कंपन्यांची निवड करतच असतात. व्हॅल्यू फंडामुळे गुंतवणुकीच्या पद्धतीत विविधता साधली जाते. मात्र शेअर मार्केट खूप तेजीत असेल तर यांच्यापासून मिळणारा लाभ इतर फंडांच्या तुलनेत कमी असतो, कारण ग्रोथ कंपन्यांच्या शेअरचे भाव वेगाने वाढत राहतात. कॉन्ट्रा फंड म्हणजे सध्या मार्केटमध्ये ज्याचं चलन आहे, अशा सेक्टर किंवा ट्रेन्ड यांच्याविरुद्ध गुंतवणूक करणारा फंड. दुर्लक्षित सेक्टर असल्याने त्यातील कंपन्यांच्या शेअर कमी भावात मिळतात. काही कालावधीने अशा सेक्टर किंवा ट्रेन्डकडे मार्केटचे लक्ष गेले किंवा परिस्थिती त्यांच्यासाठी अनुकूल झाली तर ह्या शेअरचे भाव वाढतात व फायदा मिळतो. किरकोळ गुंतवणूकदारांनी त्यांची आर्थिक क्षमता, प्रवृत्ती व गुंतवणुकीचा कालावधी याप्रमाणे मुख्यतः लार्ज कॅप फंड, मिड कॅप फंड, स्मॉल कॅप फंड, मल्टी कॅप फंड व फ्लेक्सी कॅप फंड यात गुंतवणूक करावी. प्रत्येकात किती प्रमाणात करावी हे ठरवतानाही हेच निकष लक्षात घ्यावेत. नव्या गुंतवणूकदारांनी सुरुवातीला तरी इतर प्रकारातील फंडांचा विचार करण्याची आवश्यकता नाही.