संतोषभाऊ, लहानपणापासून मला प्रश्न पडला आहे… वड्याचं तेल नेहमी वांग्यावरच का काढतात, भोपळ्यावर का काढत नाहीत?
– सारिका शेंडे, मूल, चंद्रपूर
बरं भोपळ्यावर काढलं, तर मग वांग्यावर काय काढायचं?
पवार, तुम्ही पण बारामतीचे आहात का?
– रामदास झाडाणे, पुणे
एकाच मतीचा आहे, पण विचार बारा येतात वो..
थंडीत ओठच का फुटतात? जीभ का फुटत नाही?
– रॉनी डिसिल्व्हा, नालासोपारा
जीभ फुटत नाही म्हणून घरी तोंडाला तोंड देऊ नका. थंडीत टाळकं गरमच असतं. उगा आक्खं तोंड फुटेल.
काडीमोड होऊ द्यायचा नसेल तर काडी किती जाड असायला हवी?
– नवनाथ कांबळे, पंढरपूर
कवेत येईल एवढी (काडीला वर गुल न लावता, वरचेवर गूळ लावत जा काडीमोड घ्यावा लागणार नाही…)
हात दाखवा, बस थांबवा ही चांगली योजना आहे. पण, त्या धर्तीवर हात दाखवा विमान थांबवा, अशी योजना का नाही सुरू करत सरकार?
– सोनाक्षी पाटील, संगमनेर
मग हवेतल्या गप्पा कशा करणार???
ईडी सरकारची घरगडी बनून, नको तिथे काडी सारत फिरते, तिची ही खोडी मोडायला काय केलं पाहिजे?
– पवन सोनाळकर, प्रभादेवी
म्हणून घरगड्यावर राग काढू नका. तुमची टीप ईडीवाल्यांना मिळेल.
मला सांगा, सुख म्हणजे नक्की काय असतं?
– पूर्णिमा सांगळे, रहिमतपूर
मेहनतीने मिळतं तेच सुख असतं.. ते घरबसल्या मिळत नाही (‘जमले’ तर ‘दामले’ना सुद्धा सांगा.)
गोगलगायीच्या डोळ्यांवर ना गॉगल, ना ती गायीसारखी दिसते, मग गोगलगाय हे नाव कसं पडलं असेल तिचं?
– वनिता शिरढोणकर, सांगली
जे दिसत नाही त्याचा विचार केला नाही की असा प्रश्न पडत नाही.
२०१४ सालापासून आपल्या क्रिकेट संघाने एकही वर्ल्डकप जिंकलेला नाही. काय बरं कारण असेल याचं?
– धनंजय बारसे, नंदूरबार
जिंकला असता तरी घरी ‘कप’ बशा धुण्यातून सुट्टी मिळाली असती का?? (अनुभवाचे बोल आहेत…)
एकाही मराठी पेपरमध्ये, चॅनेलवर ‘भारत जोडो’ यात्रेची ना ठळक बातमी दिसत, ना चांगला फोटो दिसत… नेमकी काय बरं अडचण असेल या प्रसारमाध्यमांची?
– हेमंत देशपांडे, बोरिवली
अपेक्षाच चुकीची आहे. एकदा विकलेल्या मालावर विकत घेणार्याचाच अधिकार असतो…
तुम्ही ना अगदी ‘हे’ आहात, असं माझी बायको अनेकदा लाडाने म्हणते… यातलं हे ‘हे’ काय असेल?
– पुरुषोत्तम गिरकर, रत्नागिरी
माझीही बायको असंच म्हणायची… मग मी लाडात आल्यावर टाळ्या वाजवणं बंद केलं… तिचंही ‘तसं’ बोलणं बंद झालं.
टीव्हीवर, रंगमंचावर, सिनेमात अनेक नव्या पिढीचे विनोदवीर गाजत आहेत. विनोद वीरांगनाही कमी नाहीत. यातले तुमचे खास आवडते कोण आहेत?
– अयूब शेख, सातारा
आम्ही नाही सांगणार जा…
मराठीत अचानक छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील ऐतिहासिक सिनेमांची लाट उसळली आहे, ती कशामुळे उसळली असावी?
– रमाकांत माहीमकर, दादर
महाराजांच्या इतिहासाचा अभ्यास करून सिनेमा बनवण्यापेक्षा, बर्याच लोकांचा इतिहासाचा अभ्यासच नाही, याचा अभ्यास सिनेमा बनवणार्यांनी केला असावा.