घरातल्या दोन मोठ्या खिडक्यांवर कधीमधी ओरडत बसलेले एक-दोन कावळे एकटक पाहात राहणे हा त्याचा आवडता छंद होता. मोरीच्या कठड्यावर बसून, त्यांच्यावर झेप घेऊन त्यांना पकडावं अशा खुन्नसने बोक्या त्यांच्याकडे पाहत राही. कधी कधी त्यांना पकडण्याचा पवित्राही घेई. पण तोपर्यंत कावळे उडून गेले की बोक्या पुन्हा मूळ स्थितीत येई. त्याला हे कळत नसे की समजा आपण त्या कावळ्यांवर झेप घेतली तर कावळा उडून जाईलच आणि आपण मात्र त्या दुसर्या मजल्यावरच्या उघड्या खिडकीतून थेट खाली इमारतीबाहेर पडून तंगडं मोडून घेऊ किंवा कपाळमोक्ष तरी करून घेऊ.
—-
चाळीत प्राणी-पक्षी पाळायला कायद्याने बंदी कधीच नव्हती. त्यामुळे कुत्रेवाली आजी, मांजरवाली काकू, पोपटवाली आई अशी टोपण नावं ती पाळणार्या घरातल्या बायांना पडलेली असत.
मांजरवाल्या काकूच्या घरातील पांढरीशुभ्र मांजर अनेक वर्ष त्या घरात मुक्काम ठोकून होती. तिच्या अनेक पिढ्या गोदावरीकाकूंनी पाहिल्या आणि जपल्या होत्या. अर्थात आता पोक्त झालेल्या त्या मांजरीचा त्रास त्या घराला कधीच जाणवला नाही. अशीच एके वर्षी गोदावरी काकूंच्या मांजरीने एकाच वेळी चार पिलांना जन्म दिला. गोदावरीकाकूंनी नेहमीप्रमाणे त्यांचे बाळंतपण केले. शेजारच्या शिर्याला म्हणाल्या, हे बहुतेक हिचे शेवटचे बाळंतपण. आता ती खूप थकलीय. किती दिवस काढेल हेही सांगता येत नाही. त्यावर शिर्या म्हणाला, काकू आपण या मांजरांचे बारसं थाटात करू या. पण त्यांची नावं कशी ठेवायची? यात नर कोण आणि मादी कोण? गोदावरीकाकू म्हणाल्या, हा गुबगुबीत करड्या रंगाचा आहे ना तो बोका आहे. बाकी या तिन्ही मांजरी आहेत. तीन मांजरींची नावं इना-मीना-डिका ठेवू आणि त्या गुबगुबीत बोक्याचं नाव बोक्याच ठेवू असं शिर्याने पक्कं केलं. बाराव्या दिवशी बारसं करायचं ठरलं. बातमी चाळीत पसरताच चाळीतली मुलं उत्साहाने कामाला लागली. दुसर्या मजल्यावर पताका लागल्या.
मांजराच्या गळ्यात रंगीत मण्यांच्या माळा घालण्यात आल्या. मांजरांसकट सर्वांना डेरीवाल्याने प्रायोजित केलेलं एकेक ग्लास मसाले दूध वाटण्यात आलं. नामकरणविधी झाला. चाळीतल्या कविराजांनी स्वत: रचलेला मांजरांचा पाळणा म्हटला. असा हा बारशाचा सोहळा धुमधडाक्यात पार पडला.
ही चारही मांजरं हळूहळू मोठी होऊ लागली. इना-मीना-डिका या तिन्ही मांजरी चाळभर भटकत असायच्या, पण हा गुबगुबीत बोक्या मात्र घरकोंबड्यासारखा गोदावरी काकूंच्या घरातच- कधी खुर्चीवर, कधी कोचावर बसलेला असायचा. बाकीच्या तिन्ही मांजरी आणि त्यांची आई घराकडे फिरकायचीही नाहीत. काकूच्या माळ्यावर दोन उंदीर खुडबूड करीत असायचे. ते कधी या बोक्यासमोर आले तर त्यांना पकडून गट्टम करायच्या ऐवजी बोक्याचीच घाबरगुंडी उडायची. त्यांना पाहिलं की हा काकूंच्या मागे मागे लपायचा. ते गेले की याचा जीव भांड्यात पडायचा.
घरातल्या दोन मोठ्या खिडक्यांवर कधीमधी ओरडत बसलेले एक-दोन कावळे एकटक पाहात राहणे हा त्याचा आवडता छंद होता. मोरीच्या कठड्यावर बसून, त्यांच्यावर झेप घेऊन त्यांना पकडावं अशा खुन्नसने बोक्या त्यांच्याकडे पाहत राही. कधी कधी त्यांना पकडण्याचा पवित्राही घेई. पण तोपर्यंत कावळे उडून गेले की बोक्या पुन्हा मूळ स्थितीत येई. त्याला हे कळत नसे की समजा आपण त्या कावळ्यांवर झेप घेतली तर कावळा उडून जाईलच आणि आपण मात्र त्या दुसर्या मजल्यावरच्या उघड्या खिडकीतून थेट खाली इमारतीबाहेर पडून तंगडं मोडून घेऊ किंवा कपाळमोक्ष तरी करून घेऊ.
एकदा मात्र बोक्याने कमाल केली. गोदावरीकाकू सकाळी अकराच्या सुमारास बाजारातून मासळी घेऊन आल्या होत्या. मोरीच्या बाजूला बसून ताटातली मांदेली साफ करीत होत्या. त्यांची नजर सगळीकडे भिरभिरत होती. कारण बोक्या घरात कुठे दिसत नव्हता. त्याचं मासळीशीही वैर होतं. तो मासळीही खात नसे. काकू म्हणायच्या की पूर्वजन्मी तो शाकाहारी असावा. दहा मिनिटे झाली असतील नसतील; बोक्या तोंडात मोठे पापलेट घेऊन खोलीत घुसला आणि ते पापलेट काकूंसमोर टाकून तिच्या तोंडाकडे पाहात बसला. काकूला समजेना की त्याने कुणाच्या घरातून चोरून आणलं ते. त्या तडक् घराबाहेर आल्या आणि आजूबाजूच्या सर्व घरांची दारं उघडून डोकावू लागल्या. शेवटी शेवटच्या खोलीतील वत्सला मामींच्या घरात मामी ताटात दोन पापलेटं घेऊन विचार करत बसलेल्या दिसल्या. काकूंना दारात पाहताच त्या म्हणाल्या, काकू मी तीन पापलेटं आणली होती शंभर रुपयाची. आल्यावर खिडकी उघडायला गेले आणि परत येऊन पाहते तर एक पापलेट गायब. काकूंच्या सगळा प्रकार लक्षात आला. त्यांनी मामींना तो सांगितला. मामी म्हणाल्या, राहूं दे मग. बघा किती काळजी आहे त्याला तुमची!
काकू तशाच घरात आल्या. कधीही तोंडातून अपशब्द न काढणार्या काकू संतापाने ओरडल्या, मेल्या, तुला त्यांच्याकडून चोरून आणायची काय गरज होती? मी आणली होती ना मांदेली… काकूने ते पापलेट धुवून वत्सलामामींना नेऊन दिलं आणि बोक्याला जवळ घेऊन म्हणाल्या, बोक्या, कशाला जीव लावतोस रे!
एकदा मात्र बोक्याने सकाळी खिडकीवर काव काव करत बसलेल्या कावळ्यावर मोरीच्या धक्क्यावरून चार-पाच मिनिटे पवित्रा घेत नेम साधून उडी मारली… कावळा उडून गेला आणि बोक्या खिडकीतून थेट खाली पडला. काकूच्या कॉलेजात जाणार्या मुलीने ती चपात्या भाजत असताना ते पाहिलं आणि ती तडक दार उघडून जिन्यातून खाली धावत सुटली. ती ओरडत होती. बोक्या पडलाय. ती चाळीच्या मागे आपल्या खोलीच्या खाली आली. तिथे सांडपाण्याचे उघडे गटार होते. बोक्या तिथे चिखलात माखलेला तिला दिसला. सगळं अंग बरबटलेलं होतं. तिने स्वत:च्या कपड्यांची पर्वा न करता तसाच त्याला छातीशी धरून वर आणला. तोपर्यंत काकूने बाहेरच्या पिंपातलं पाणी तिला बादलीत भरून दिलं. ती बादली बाजूलाच असलेल्या सार्वजनिक नळावर नेऊन ठेवली. काकूंच्या मुलीने बोक्याला त्या बादलीतल्या पाण्याने चांगला धुवून काढला. साबण लावून स्वच्छ केला. टॉवेलने पुसला. दोन बशा दूध प्यायला दिलं. कुठे लागलेय किंवा नाही ते बघितलं आणि नंतर ताबडतोब सुतार बोलावून दोन्ही खिडक्यांना ग्रिल बसवून घेतले. तेव्हापासून बोक्याचा कावळ्यांच्या काल्पनिक शिकारीचा खेळ बंद झाला.
तसा बोका मजल्यावर फिरायचा. गच्चीवर फेरफटका मारायचा. मुलांबरोबर खेळायचा. कधी कधी तळमजल्यापासून दोन्ही मजले भटकून यायचा. एक दिवस मात्र बोक्या अचानक गायब झाला. सकाळी घराबाहेर पडला तो रात्रीपर्यंत घरी आलाच नाही. काकूंना, घरातल्या माणसांना, शेजार्यातपाजार्यांना ही बातमी समजली तेव्हा सर्वांनी त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. सगळे मजले, गच्ची, टाकी, समोरच्या चाळी, आजूबाजूचा परिसर सगळीकडे त्याचा शोध सुरू होता. पण आठ दिवस झाले तरी बोक्या सापडला नाही.
शेजारचा पक्या म्हणाला, आपण पोलीस कम्प्लेंट करूया.
काकू निराश होत म्हणाल्या, पक्या, अरे प्राण्यांसाठी कुठे असतं पोलीस स्टेशन! तो कुठेही असूं दे पण सुखी असू दे.
एक दिवस पहिल्या मजल्यावरच्या सुलूताई धावत धावतच धापा टाकीत काकूंकडून आल्या आणि उसासत सांगू लागल्या, काकू तुमच्या बोक्याला मी नाक्यावरच्या हॉटेलच्या मागे असलेल्या भटारखान्यात राखेत लोळताना म्हणजे खेळताना पाहिलं. त्याच्या बरोबर तपकिरी रंगाची एक पोरसवदा मांजरही होती. दोघं आरामात खेळत होती.
काकूने म्हटलं, देव पावला. शेवटी वेडा वेडा म्हणता, वेड्याने पेढा खाल्ला. हे वयच असं असतं. माणूस काय आणि प्राणी काय! सुखी राहू दे!!
टमाट्याच्या चाळीत ही बातमी पसरताच त्या नाक्यावरच्या हॉटेलच्या भटारखान्यापाशी त्या दोघांना बघायला चाळकर्यांची ही गर्दी झाली. काकू किंवा त्यांच्या घरातील कोणीही मात्र तिथं गेलं नाही. शेजार्यांनी विचारताच काकू म्हणाल्या, त्याला असेल जाण तर येईल स्वत:हून.
खरोखरच एक दिवस बोक्या त्या तपकिरी मांजरीला घेऊन काकूंच्या घराच्या दारात उंबरठ्याबाहेर बसून राहिला. त्याच्या म्याव म्याव आवाजाने काकू लगबगीने पुढे आल्या आणि त्याला म्हणाल्या, या आता घरात. ते ऐकल्यावर हा बाजीराव आपल्या बायकोसह चक्क कोचावर जाऊन बसला. काकूंच्या मुलीने त्या दोघांच्या पुढ्यात बशी भरून दूध ठेवलं. दोघांनीही ते मिटक्या मारत चाटून पुसून खाल्लं. काकूने त्या दोघांना आरतीचं तबक घेऊन ओवाळलं. तिच्या कपाळाला हळद-कुंकू लावलं आणि आशीर्वाद देत म्हणाल्या, अष्ट मांजरं सौभाग्यवती भव!
– श्रीकांत आंब्रे
(लेखक ‘मार्मिक’चे सहसंपादक आहेत)