मुंबईत चालण्यापेक्षा पळण्याक आणि घड्याळापेक्षा तेच्या काट्यांवर धावणार्या लोकलीक जास्त महत्व हा. जसा सांताक्रुज, विरार वैगेरे लोकल्स फलाटावर इल्यो की प्रत्येक मुंबईकराची आणि त्या लोकलची राम-भरत मिलापासारखी भेट थयसर होत आसता. दररोज सकाळी नव्या जोमात आणि उत्साहात ती भेट होत आसता. त्याचप्रमाणे ‘एव्हरीडे विथ कृष्णा नाईक’चो संपादक कृष्णा नाईक तेचो चेलो कमलाकर जवळकरबरोबर अतिवृष्टीमुळे आंबेरीसोबत केळुरीच्या बाजूचा धरणाचा तोंड सोडलेला हा, ह्या सांगत इलो तेव्हा आमचे सगळे केळुरी ग्रामस्थ वेळ न दवडता आपापल्या घरांबरोबर भरतमिलापाची भेट करूक वाट काढत सैरावैरा पळुक लागले. पूर्ण केळुरी ग्रामस्थांचोहो आपापल्या घरांबरोबरचो पहिलोच भरत मिलाप आसूक व्हयो असा म्हाका दिसता. कारण आपापल्या घरांप्रती एवढे करूण, सजग आणि सतर्क असलेले केळु्री ग्रामस्थ म्या तरी कधी पाहिल्यानी नाय.
घरां आसंत ती म्हणजे जेवूसाठी, झोपूसाठी किंवा मग नाटकाच्यो तालमी, मैफिली वैगेरे जमवूसाठी. बाकी सगळो कारभार हो अगदी खुलोच होतो. ‘घर असावे घरासारखे, नकोत नुसत्या भिंती’ वगैरे ह्यो गजाली कधी आमच्या केळुरी ग्रामस्थांच्या पचनी पडल्योच नाय. कारण आमचे सगळे केळुरी ग्रामस्थ भिंतींच्या घरांपेक्षा सुद्धा मोकळ्या आकाशाखाली असलेल्या गावरूपी एकत्रित कुटुंबातंच जास्त रमत होते. पुरूषमंडळींची बसण्याची ठीकाणां ही ठरलेली असायची. एकतर गावच्या कट्ट्यावर किंवा जिलग्याच्या भुसारीच्या दुकानावर किंवा ‘ऑल इज रेडी’ या रमेश भालवडकराच्या हाटेलावर. बायलो संध्याकाळी पाच ते सात-साडेसात वाजेपर्यंत श्री केळुरेश्वराच्या प्रांगणात जमायच्यो आणि थयसर तेंचा वीस मिनिटाच्या पहिल्या सत्रात किमान चाळीस बुलेटीन्साचा लाईव्ह प्रसारण होत होता आणि उरलेल्या सत्रांमधे मगे नामांकीत न्यूज चॅनल आणि तेंच्या अँकरांका लाजवतील एवढ्या विविध गोष्टींवर सखोल आणि प्रौढ चर्चासत्रा होत होती. पोरां ही अर्धा दिवस शाळेत, आणि मगे मैदानात. हा, पण तरूण मुली तेवढ्यो घरात असायच्यो. त्योसुध्दा असून नसल्यासारख्यो. कारण तेंचा सगळा लक्ष ह्या वॉटसॅपावर असायचा.
पण कृष्णाच्या तोंडून ह्या कायतरी अघटीत ऐकल्यानंतर आमचे सगळे केळुरी ग्रामस्थ घाबरान गेले. कारण आजपर्यंत आमचे केळुरी ग्रामस्थ कधीच खयच्याच प्रसंगाक घाबरलेले नव्हते. उलट आलेले प्रसंगंच आमच्या केळुरी ग्रामस्थांका घाबरान धूम ठोकीत होते. पण ही नैसर्गिक आपत्ती होती. हेच्यापुढे कुणाचा काय्यक चालणार नव्हता. ह्या सगळ्यांका म्हायत होता. सगळेजण सरपंचांच्या घराकडसून सापडेल त्या वाटेन आपापला घर गाठूकसाठी पळू लागले. आमच्या केळुरीतलो कोमल मनाचो कवी दाजी काका फडणीस मागचो पुढचो कसलोच विचार न करता मुंबई-पुणे एक्सप्रेस ट्रेनसारखो केळुरीकर मास्तराच्या फलाटावर येऊन धडकलो. आण मोठ्या आकांतान तेच्या घराभायर बेल वाजवूक लागलो. ‘कोण मेलो रे थंयसर?’ कोकीळेक सुद्धा लाज दिसात अशा मृदु आवाजात केळुरीकर मास्तराची भक्कम पत्नी आतून ओरडली. दाजीकाका आधीच विचित्र पद्धतीन थरथरत होतो, त्यात ह्यो केळुकरणीचा आवाज ऐकल्यानंतर दाजीकाका साडे तीन ताड उडालो. एवढ्यात केळुरीकर मास्तराची कोकीळकंठी अप्सरा हातात उलथना घेऊन ‘कोण रे तो?’ असा म्हणत भायर इली. दाजीकाकाक भायर बघून ती म्हणे, ‘अरे बापरे दाजीकाका तुम्ही? म्हाका वाटला ही गावातली उंडार पोरा हंत. हेंच्याकडे काम होता काय? पण हे तर मुंबईक गेले हंत. कसलोसो पेटी वाजवायचो प्रोग्राम हा खंय. तुमका म्हायत नाय?’ दाजीकाका म्हणजे काही बोलतंच नव्हतो. शब्दंच सुटत नव्हतो तोंडातून तेच्या. तेच्या त्या विचित्र अंगविक्षेप करून थरथरण्याचो केळुरीकरणीने काहीतरी वेगळोच अर्थ काढला. ती लगेच, ‘दाजीकाका अहो मुतूक होता हा काय? तर मागच्या मोरीत चला.’ तेवढ्यात मोठ्या गलेलठ्ठ तूथपेस्टच्या ट्यूबमधून जशी कधी-कधी बरोच प्रयत्न केल्यानंतर पेस्ट भायर येता, तशेच दाजीकाकाचे शब्द आत्ता एवढ्या वेळानंतर हळू हळू बाहेर पडूक लागले. ‘अहो वहिनी ता सगळा सोडा, म्हाका आधी माझो काव्यसंग्रह द्या. मास्तरांच्या वादनाच्या खोलीत पांढर्या रंगाची वही असा काय बघा, ती द्या. तुमका सगळं सांगतो.’ केळुरीकरीण लगेच आत जाऊन केळुरीकर मास्तराच्या पेटीवर असलेलो दाजीकाकाचो काव्यसंग्रह घेऊन इली.
वास्तविक दाजी काकान आपला ‘टिंब टिंब आणि बरेच काही’ नावाचो काव्यसंग्रह केळुरीकर मास्तराका तेतूतल्या काय कवितांका चाल लावूसाठी दिलो होतो आणि ज्या कवितांका चाल लावता लावता केळुरीकर मास्तर स्वत: शिकलेले काही रागच विसरून गेलो होतो. तो आत्ता पुरात बुडू नये म्हणान तो काव्यसंग्रह नेऊक आलो होतो. ‘अहो आता तरी सांगा दाजी काका काय झाला काय?’ केळुरीकरीण दाजीकाकाका टिंब टिंब आणि बरेच काही देत म्हणजे तो काव्यसंग्रह देत तेका इचारूक लागली. अगदी त्याही परिस्थितीत आमच्या दाजी काकान केळुरीकरणीच्या प्रश्नाचा काव्यरूपी उत्तर दिल्यान.
केळुरीच्या शेजारी गाव आसंय आंबेरी
पूर इलो थंयसर उडाली सगळ्यांची भंबेरी
सरपंचांच्या घरा होतो सर्व धावत इलो कृष्णा
पुराची खय आजून सर्वोपरी भागली नाय तृष्णा
केळुरीच्या बाजूक असलेला धरणाचा तोंड
आता उघडलेला हा
धावत पळत गच्चीवर चढत आपलो
जीव वाचवायचो हा.
‘देवा केळुरेश्वरा, माझ्या काव्यसंग्रहाचा आणि आम्हा केळुरी ग्रामस्थांचा रक्षण कर रे.’ असा म्हणत दाजीकाका टिंब टिंब आणि बरेच काही पोटाशी धरून पळूक लागलो. केळुरीकरणीनं उलथनं अंगणात टाकल्यान आणि गच्चीवर जाऊन बसली.
तेवढ्यात थयसून कृष्णा नाईक दवंडी पिटत येऊक लागलो. ‘सगळ्यांनी घरावर, गच्चीवर नायतर कौलांवर चडान रवा. केळुरीच्या बाजूक असलेला धरणाचा तोंड उघडलेला हा. पाणी येता हा. सांभाळून रवा.’ कृष्णा नाईक ह्या सगळा बोलत होतो आणि कमल्या जवळकर अगदी दुरून काय गच्चीवरती किंवा कौलांवरती चढलेल्या लोकांचे फोटो टिपत होतो आणि ‘पूराक तोंड दिवूक केळुरी सज्ज’ वगैरे अशो हेडलाईन्स आपल्या फेसबुक पेजीवर मिनटा-मिनटाक टाकत होतो. तेवढ्यात श्यामराव वेर्णेकराच्या आवशीन ही दवंडी ऐकली. पंढरी कामताच्या मते ‘कल जाएगी की आज… आज जाएगी की अब’ अशा परिस्थितीत आसलेली ती श्यामराव वेर्णेकराची ऐंशी वर्षांची म्हातारी झोपली होती. तिका आमच्या केळुरीत श्यामची आई म्हणत होते. ती गादीसकट उठली आणि तडक माजघरात जाऊन दोन दिवसांपूर्वीच घातलेल्या आंबयाच्या लोणच्याची बरणी घेतली आणि सरळ गच्चीवरती गेली.
थयसून जनू नाडकर्णी, पंढरी कामत, सदा गावडे आणि संस्कृतीरक्षक निरंजनपंत वालावलकर धावत पळत आपापल्या घराच्या दिशेन पळत होते. जनू नाडकर्ण्याची ब्राँझ युगातली ती छत्री काय केल्या बंदंच होत नव्हती. हा आता ता तेच्या छत्रीचा वैशिष्ठ्यच होता म्हणा. पण त्या छत्रीनं पळूक लागल्यापासून पंढरी कामताची पाठ धरल्यान होती. जनू नाडकर्णी असो काय पळत होतो, की तेच्या त्या छत्रीच्यो तारो पंढरी कामताच्या कंबरेक लागून तेका गुदगुल्यो होत होत्यो. तेना दोन-तीन वेळेक आपली बाजू बदलून पळण्याचो निष्फळ प्रयत्न केलो. पण जनू नाडकर्णी कबड्डीच्या ग्राऊंडवर असल्यासारखो असो काय बेभान पळत सुटलो होतो, की काय विचारूकंच नको. ‘आता काय पूर येता हा तेच्याबरोबर कबड्डी खेळतंस काय रे जन्या? अरे शिंच्यो एका बाजूक धाव मरे! वशाड मेलो.’ जनू नाडकर्ण्यावर तेचो काय्यक परिणाम झालो नाय. तो त्याही अवस्थेत निरंजनपंतांका अगदी आगाऊपणे प्रश्न विचारूक लागलो, ‘काय हो वालावलकर तुमचा गोमुत्र शिंपडून हेचो काय उपाय होऊ शकत नाय काय?’ निरंजनपंत धावता धावता अचानक थांबलेच आणि थयसरंच तेना जनू नाडकर्ण्याका शब्दांच्या माऱ्यांनी धू धू धुतलो. ‘अरे मस्करी करतंत तुम्ही नाडकर्णी? अहो शोभता काय हो तुमका? अहो गोमुत्राबद्दल बोलतंत तुम्ही. अहो तुमका काय म्हायत? गोमुत्राचा सामर्थ्य महान आसा. गोमुत्र ह्या सर्वश्रेष्ठ आसा. जसा दधिचींच्या अस्तींची शस्त्रा झाली तसाच म्या गोमुत्राची शस्त्रां करीन.’ परिस्थिती काय आणि वालावलकर केळुरीच्या नाक्यावर उभे रवून थयसर आपल्या वक्तृत्वाचा प्रदर्शन करूक लागले. आणि तेंच्या पुढचो हो आमचो महाभाग जनू नाडकर्णी, तो म्हणजे तेच्यावर तेंका प्रश्न विचारायचो. ‘काय तरी काय हो वालावलकर? आं? अहो गोमुत्राची कशी काय जातंली शस्त्रां?’ तेवढ्यात पंढरी कामत थयसर माघारी पळत इलो. ‘अरे मेल्या मुतूक जागो मिळूचो नाय तुका! अरे मेल्यांनो पाण्यान भरतोलो गाव थोड्या वेळात आणि तुम्ही दोघे कसल्यो रे चर्चो करतंत? चला लवकर.’ ह्या सगळ्या संभाषणाचो कमलाकर जवळकरान फोटो टिपून ठेवलो. तो फोटो बघितलो असतो तर तेच्यात अशो एक सो एक जनू नाडकर्ण्याच्यो, पंढरी कामताच्यो आणि निंजनपंतांच्यो तसाच सदाच्यो ज्यो काय पोझेस होत्यो, त्यो पोझेस पाहिल्यानंतर ‘गावागावात जाऊन डाको घालणार्या चार मित्रांची टोळी’ या हेडलाईनखाली हो फोटो सहज खपलो असतो. कमल्या जवळकर त्या टोळीचो अजून एक वरचया अँगलानं फोटो घेण्याचो प्रयत्न करुक लागलो. इतक्यात सळ सळ सळ सळ सळ सळ असो आवाज दुरून पण वेगान येऊक लागलो. सगळे मागे वळान बघतंतता काय? धरणाच्या सोडलेल्या पाण्याचे लोट केळुरीचो उंबरो ओलांडून आत येत होते.
– शिवप्रणव आळवणी
(लेखक प्रशिक्षित अभिनेते आहेत)