‘खाजगी’ आडनावाचे मूळचे व्यापारी; पण, नंतर उद्योगात शिरलेले एक कुटुंब होते! ‘राजकीय अर्थव्यवस्था’ नावाचे एक मैदान होते; त्यात ‘क्रोनी’ नावाचा खेळ खेळला जायचा… म्हणजे, कोणालाही प्रवेश नसायचा तो खेळ खेळायला; त्यासाठी, पण खूप पैसे अपफ्रंट भरायला लागायचे. ‘खाजगी’ नावाच्या कुटुंबाच्या पुढच्या पिढ्यांनी बर्याच हिकमती करत, त्या क्रोनी खेळात प्रवेश तर घेतलाच आणि प्रावीण्यदेखील मिळवले. खूप पैसे मिळाल्यावर बंगल्याचे आवार मोठे झाले; कुटुंबकबिला वाढला, बर्याच गाड्या आल्या; पण, एक मोठा प्रॉब्लेम होता! त्या बंगल्याकडे जाणारा जो रस्ता होता, त्या रस्त्याच्या मध्ये, काही शेकडो वर्षे जुना ‘सार्वजनिक’ नावाचा वटवृक्ष होता… प्रचंड मोठा, त्यामुळे, गाड्या त्या वृक्षाच्या अलीकडेच पार्क कराव्या लागत. त्या वटवृक्षाबद्दल गावकर्यांच्या मनात आत्मीयता तर होतीच; ‘महागाई’ नावाचे काहिली करणारे ऊन पडायचे; माणसे उष्माघात होऊन मारायची; पण, ‘सार्वजनिक’ वटवृक्षाच्या सावलीचा आश्रय घेतलेली लोक जिवंत राहत. गावाच्या पंचायतीत अनेक वर्षांपूर्वी एक ठराव झाला होता की, त्या वटवृक्षाला कापणे तर दूरच, कोणीही हात देखील लावायचा नाही! आता ‘खाजगी’ कुटुंबाकडे रग्गड पैसे होते, गाड्या होत्या. पण, बंगल्याकडे जायचा रस्ता अडचणीचा होता… त्यांनी ‘नवउदारमतवादी’ नावाच्या अमेरिकन कन्स्लटन्टना नेमले. त्यानंतर, सारा नूरच पालटू लागला… गावात अशी वदंता पसरली की, तो वृक्ष नैसर्गिक ‘साधनसामुग्री’ असलेले ‘जमिनीखालचे पाणी’ फस्त करत आहे… इतके की, गाववाल्यांना नजिकच्या भविष्यात प्यायला पाणीच मिळणार नाही; त्यासंदर्भात, शास्त्रीय अभ्यास प्रसिद्ध होऊ लागले! त्या वटवृक्षाला, ‘भ्रष्टाचार’ नावाची भयंकर कीड लागलेली आहे; ज्यामुळे त्याच्या फांद्या तुटून गाववाल्यांच्याच अंगावर पडण्याची दाट शक्यता आहे… काही फांद्या तर, ‘पडल्या की पाडल्या’ देखील गेल्या! त्याशिवाय, कन्सल्टन्सीवाले, ‘जनमानस करा कलुषित’ नावाचे एक जालीम रसायन, त्या झाडाच्या बुंध्यात, मुळात इतरांना समजणार नाही… अशा पद्धतीने घालू लागले! त्या रसायनामुळे तो वटवृक्ष सुकत चालला, त्याच्या फांद्यावरील अन्न बनवणारी पाने पिवळी पडली, दिसेनाशी झाली, नवीन पालवी फुटलीच नाही. अपप्रचाराला बळी पडलेले गावकरी, वटवृक्षाच्या फांद्या आपल्या अंगावर पडून आपण जखमी होऊ, या भीतीने स्वतःच्या हाताने, स्वतःच्या कुर्हाडीने वृक्षाच्या फांद्या छाटू लागले! पंचायतीत खूप पूर्वी संमत झालेला, वटवृक्ष न कापण्याचा, ठराव पंचांनी स्वतःहून ‘खारीज’ केला. …आणि एक दिवस शेकडो वर्षे मायबापाची सावली देणारा ‘सार्वजनिक’ नावाचा तो वटवृक्ष स्वत:च उन्मळून पडला! खाजगी कुटुंबाने देखील नक्राश्रू ढाळत जाहीरपणे हळहळ व्यक्त केली… तुमची सावली गेली असेल; तर, आमच्या ‘कॉर्पोरेट सोशल-रिस्पॉन्सिबिलिटी फंडा’तून बाजूला एक शेड बांधून देतो सांगितले. आता, खाजगी कुटुंबाने बंटेलिया नावाचा खूप मोठा राजवाडा बांधायला घेतलाय, आणि त्यांच्या, व्हीआयपी पाव्हण्यांच्या शेकडो गाड्या डायरेक्ट पोर्चपर्यंत आत जात आहेत!