अखेर गणराज विराजमान झालेत… बाजारपेठा सजल्या… हायवेवर वाहनांची वर्दळ वाढली… बहुतांश चाकरमानी गणपतीसाठी गावाला गेले आहेत. निसर्गही साज-श्रृंगार लेऊन नटलाय… ‘ऑल इज सेट फॉर वेलकम टू बाप्पा’, असं म्हणत तरुण पिढीने विघ्नहर्ता गणरायाचे स्वागत मोठ्या उत्साहात केले आहे. या वातावरणात गणपतीच्या गाण्यांनी मोठी भर घातली आहे. कोरोनाचे संकट अजूनही पूर्णपणे दूर झालेले नसतानाही संगीत क्षेत्राने गणपतीच्या गाण्यांत जोरदार मुसंडी मारली आहे. त्यातल्याच काही गाण्यांचा हा गोषवारा…
—-
‘कोकणचा गणपती’
नानाविध प्रकारे बाप्पाची पूजा केली जाते. कोकणातील लोकांसाठी हा गणपतीचा सण अगदी जिव्हाळ्याचा, आपुलकीचा आणि अभिमानाचा विषय असतो आणि म्हणूनच मुंबईतले चाकरमानी गणपतीसाठी अगदी जय्यत तयारी करून कोकणची वाट धरतात. म्हणूनच या वर्षी सागरिका म्युझिक कानरसिकांसाठी ‘कोकणचा गणपती’ हे गाणे ऑडिओ आणि व्हिडीओ रूपात घेऊन आले आहेत. चिंतामणी सोहोनी यांनी या गाण्याचे संगीत दिग्दर्शन केलेले असून त्यांनीच ते गायलेही आहे. त्यांच्यासोबत या गाण्याला वैशाली सामंत, स्वप्नील बांदोडकर आणि अवधूत गुप्ते यांनीही स्वरसाज दिला आहे. रघुनाथ मतकरी यांनी या गाण्याचे शब्द लिहिले आहेत. सागरिका दास यांनी दिग्दर्शन केलेल्या या गाण्याचा व्हिडिओसुद्धा कोकणातल्या गणपती उत्सवाची आठवण करून देतो. या गाण्याचा ऑडिओ ६ सप्टेंबरपासून सर्वच ओटीटी प्लॅटफॉर्म्सवर ऐकायला मिळतोय, तर चिंतामणी सोहोनी, वैशाली सामंत, स्वप्नील बांदोडकर आणि अवधूत गुप्ते यांच्यावर चित्रित केलेला व्हिडिओ ७ सप्टेंबरला सागरिका म्युझिकच्या मराठी यूट्युब चॅनलवर आला आहे.
‘गणपती अंगणात नाचतो…’
पिकल म्युझिकने भाद्रपद प्रतिपदेचा मुहूर्त साधत ‘गणपती अंगणात नाचतो…’ हे नवे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आणले आहे. समीर दीक्षित आणि ह्रषिकेश भिरंगी यांच्या पिकल म्युझिकची प्रस्तुती असलेल्या या गाण्याची निर्मिती निर्मात्या राखी सुरेश गावडा यांच्या एस. आर. एन्टरटेन्मेंटच्या बॅनरखाली करण्यात आली आहे. या गाण्याच्या व्हिडिओमध्ये गणरायाची भव्य मूर्ती पहायला मिळते. संचित चौधरी आणि शीतल अहिरराव या नव्या जोडीवर हे गाणे चित्रीत करण्यात आलेय. गोरक्षनाथ वाघमारे यांनी हे गाणे लिहिले असून, व्हिडीओचे दिग्दर्शन राज सहाणे यांनी केले आहे. संगीतकार पी. शंकरम यांनी राधा खुडेसोबत हे गीत गायले आहे. अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये झळकलेली शीतल अहिरराव या गाण्याच्या निमित्ताने एका वेगळ्याच रूपात दिसतेय. तिच्या जोडीला संचित चौधरीही लक्ष वेधून घेणार आहे.
‘गजर तुझा मोरया’
नादखुळा म्युझिकने ‘आपली यारी’ या गाण्याच्या यशानंतर आता गणेशभक्तांसाठी एक ‘गजर तुझा मोरया’ हे सुमधूर गाणे आणले आहे. निखील नमीत आणि प्रशांत नाकती ह्यांची निर्मिती असलेले सचिन कांबळे दिग्दर्शित हे गाणे नुकतेच लाँच करण्यात आलेय. हे गीत कुणाल-करण यांनी लिहिले असून त्याचे संगीतही त्यांनीच दिले आहे. रोहित राऊतने हे गाणे गायले आहे. या गाण्याबाबत बोलताना निर्माते प्रशांत नाकती म्हणतात, ‘संगीतकार कुणाल-करण जोडीसोबत गायक रोहित राऊतची भट्टी खूप चांगली जमते. या गाण्यातही याचीच अनुभूती येईल. यंदा महाराष्ट्राने कोरोनासह महापुराच्याही नैसर्गिक संकटाला तोंड दिले आहे. सर्व संकटातून वाट काढताना विघ्नहर्त्याचा धावा करणा-या प्रत्येक भक्ताची भावना ह्या गाण्यातून प्रतीत होत आहे.’ दिग्दर्शक सचिन कांबळे म्हणतात, ‘महापुरातल्या अनेक कुटूंबांची प्रातिनिधिक कथा या गाण्यातून मांडण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे. यंदाच्या गणेशोत्सवात हे गाणे घराघरात ऐकलं जाईल अशी आशा आहे.’
‘हे गणराया’
एक वेगळ्या धाटणीचे ‘हे गणराया’ हे गाणे निर्माते अँजेला आणि तेजस भालेराव घेऊन आले आहेत. पीबीए म्युझिक अंर्तगत या गाण्याचा टिझर नुकताच सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पीबीए म्युझिकची ‘विठ्ठला विठ्ठला’, ‘नखरा’ ही गाणी या आधीही प्रेक्षकांना आवडली होती. हे गाणे गायक आदर्श शिंदे आणि गायिका श्रावणी महाजन यांनी गायले आहे, तर या गाण्याचे बोल संग्राम पाटील आणि मयुरेश शिंदे यांनी लिहिले आहेत. संगीत व दिग्दर्शन मयुरेश शिंदे याने केले आहे. आरजे सुमित, अभि रोकडे, अनिकेत शिंदे, विवेक तलवार, निखिल वाघ, हर्षदा वाघ, विवेक केसरकर, दुर्वा साळोखे, श्वेता भारगुडे या सर्वांच्या नृत्याने या गाण्याची रंगत वाढली आहे.
‘बाप्पा मोरया’
समीर दीक्षित आणि ऋषिकेश भिरंगी यांच्या पिकल म्युझिकनं ‘बाप्पा मोरया’ हे गणेशोत्सवाचा आनंद द्विगुणित करणारं गाणं सादर केले आहे. ‘झाले गेले विसरून जावे पुढे पुढे चालावे…’ या शब्दरचनांप्रमाणे मागील गणेशोत्सवाचे दिवस विसरून यंदाचा सोहळा आनंदात साजरा करण्याच्या उद्देशानं अतिशय सुंदर शब्दरचना असलेलं व तितक्याच सुरेल चालीत बांधलेलं गाणं निर्माते दत्ता मदन यांनी तयार केले आहे. समृद्धी पांडे यांच्या लेखणीतून अवतरलेले हे गीत मयुरेश माडगांवकर यांनी संगीतबद्ध केलं आहे. दत्ता मदन यांनी हे गाणे गायले असून संगीत संयोजनही त्यांचेच आहे. या गाण्यासाठी सनईवर ओमकार धुमाळ यांनी, तर तालवाद्यांवर चेतन परब यांनी साथ केली आहे. प्रोग्रामिंग प्रसाद परसनाईक यांनी केलं आहे.
‘बाप्पाची आरास करूया’
ए. के. प्रोडक्शनच्या माध्यमातून प्रत्येक वर्षी गणपतीच्या गाण्याची निर्मिती गणेशोत्सवादरम्यान केली जाते. यावर्षीही अरुण काशीद यांनी बाप्पाची आरास करूया… हे गणपती बाप्पाचे व्हिडिओ गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आणले आहे. या गाण्याचे चित्रीकरण काहीच दिवसांपूर्वी इचलकरंजी येथील गोविंदराव हायस्कूलमध्ये पार पडले आहे. या गाण्याची निर्मिती, दिग्दर्शन आणि गीत लेखन अरुण काशीद यांनी केले असून त्याला अभिमन्यू कार्लेकर यांनी संगीत दिले आहे. निखिल मधाळे यांनी याचे गायन केले. याचे फोटोग्राफीचा व्यवसाय सांभाळत नेहमी कॅमेर्याच्या मागे राहणारे विक्रम खांडेकर यांना या गाण्यात कॅमेर्यासमोर येऊन काम करण्याची संधी मिळाली आहे. स्थानिक नवोदित आणि जुन्या कलाकारांनीही यात काम केले आहे. ध्वनिमुद्रण, संकलन, नृत्यदिग्दर्शन, मांडणी, सजावट, नृत्य आणि चित्रीकरण यामुळे हे गाणे नक्कीच प्रेक्षकांना आवडेल हे नक्की.
‘गणपती बाप्पा मोरया रे’
गणेशोत्सव आला की बाप्पाची महती सांगणारी, त्याचे वर्णन करणारी अनेक गाणी प्रकाशित होतात. या सगळ्या गाण्यांत आपले वेगळेपण सिद्ध करणारे ‘बाप्पा मोरया रे’ हे खरेखुरे धमाल गाणे गीतकार सुबोध पवार यांनी आणले आहे. काहीच दिवसांपूर्वी म्हणजे १६ ऑगस्टला पारशी नववर्षाचा मुहूर्त साधत हे गाणे जल्लोषात ध्वनिमुद्रित करण्यात आल्याचं गीतकार सुबोध पवार यांनी सांगितले. स्वराज क्रिएशन प्रस्तुत या गाण्याचे संयोजन नितीन मोरजकर यांनी केलेलं असून या ध्वनिमुद्रण प्रसंगी गायक, संगीतकार, अभिनेता आणि निर्माता महेंद्र अंधारे हेही उपस्थित होते. सुबोध पवार यांनी लिहिलेल्या या गाण्याचे संकलन राज जाधव यांनी केले आहे.
‘तू गणराया’
गणेशोत्सवाच्या काळात नुकत्याच आलेल्या ‘तू गणराया’ या गाण्यानेही प्रेक्षकांच्या हृदयाचा ठोका चुकविला आहे. ‘स्वप्न स्वरूप प्रॉडक्शन’ निर्मित आणि सचिन आंबात दिग्दर्शित या गाण्यामधे एका नवविवाहित जोडप्याने गणरायाच्या आगमनाची तयारी कशी केली, शिवाय अतूट नातं जपत, बायकोला प्रोत्साहन देत, आणि स्वतः पुढाकार घेऊन एका नवीन परंपरेचा श्री गणेशा या गाण्यातून सादर केला आहे. अभिनेता सिद्धार्थ खिरिद आणि अभिनेत्री पायल कबरे यांनी या गाण्यात नृत्य केले आहे, तर दिग्दर्शक सचिन आंबात यांनीच या गाण्याचे बोल लिहिले आहेत. गायिका स्नेहा महाडिक आणि गायक रोहित ननवरे यांनी ते गायले असून रोहित ननवरे यांनी या गाण्याला संगीत दिले आहे. ‘स्वप्न स्वरूप’ युट्युब चॅनेलवर याचा प्रेक्षक मनमुराद आनंद घेत असून तब्बल १ लाखाहून अधिक व्यूजचा टप्पा पार झाला आहे.