रंगभूमीवर काम करताना अंगात रंगदेवता संचारते का?
सुहासिनी बेणारे, खुलताबाद
– रंगदेवतेचं माहित नाही पण भूमिकांचं सांगता येईल मला नक्की.
तुम्ही मुख्यमंत्री झालात तर रंगभूमीसाठी काय विशेष कराल?
नंदन बंतापल्लीवार, चंद्रपूर
– आधी ती सुरु करीन. आणि मराठी रंगभूमीचा १७५ वर्षांचा इतिहास काय आहे आणि तो का आहे; याचा जगालाच नाही तर, कठीण असलं तरीही मराठी लोकांनाही त्याचा विचार करायला भाग पाडीन.
ग्रामीण भागात एक शिक्षणाधिकारी महिला आठ लाख रुपयांची लाच घेताना पकडली गेली. यावर तुमची प्रतिक्रिया काय?
परशुराम परब, ठाणे
– हे तर काहीच नाही! शिक्षक बनण्याच्या परीक्षेलाही कॉपी करून पास झालेल्या काही शिक्षकांची मला माहिती आहे. त्यातून ते सहीसलामत सुटून पुढे कालौघात आदर्श शिक्षक पुरस्कारापर्यंत कसे पोहचले याचाही मी साक्षीदारही आहे. अधिकार्यांनी लाच घेणं यात काय नावीन्य राहिलंय आज मला सांगा!
कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे?… तुम्हाला काही कल्पना आहे का?
प्रथमेश पाटील, सावरगाव
– पोहचवायला जाताना, खांदा देणार्या माणसाची गेलेल्या माणसाशी ओळख आहे की नाही; याचं गेलेल्या माणसालाच काही देणं घेणं नसल्याने, उगाच आपण मधे जाऊन ओझं वाहणार्याची भोचकपणे चौकशी करायला आणि ते तपासायला मी कधीही गेलो नाही आजवर.
रस्तोरस्ती उसळलेली गर्दी पाहिल्यावर पटतं की कोरोनाला भारतातली माणसं घाबरत नाही; कोरोनाच आपल्याला घाबरायला लागला असेल का?
अक्रम खान, सोलापूर
– तो कशाला घाबरतोय? त्याच्याशी काही जणांची उत्तम मैत्री देखील झाली आहे आपल्याकडे.
कोरोनाकाळ सर्वार्थाने संपल्यानंतर नाटक-सिनेमांचे खेळ आणि प्रयोग पुन्हा सुरू झाले तरी कोरोनापूर्व काळाइतका प्रतिसाद लाभेल लोकांचा?
सुवर्णा यंदे, बेलापूर
– निर्विवाद! नाटक सुरु झाल्यावर, नाटकाचा रेग्युलर प्रेक्षक असाल तर, तुम्हाला बघायला आवडणार आहे का? यावर तुमच्या प्रश्नाचं उत्तर अवलंबून आहे.
अतिशय देखण्या, व्यायामाने कसदार बनवलेल्या देहयष्टीच्या अतिशय यशस्वी कलावंताचं नुकतंच निधन झालं. आरोग्याबद्दल इतक्या जागरूक असलेल्या कलावंतांचं असं आकस्मिक निधन होणं धक्कादायक नाही का? कशाने जडत असतील हृद्रोग?
सूर्यकांत टिळक, बेळगाव
– वरवर दिसणार्या नुसत्या पिळदार शरीराचा हृदयरोगाशी तसा काहीही संबंध नसतो. प्रत्येक रोग हा ‘शरीर- मानस सौख्या’च्या संयोगाचा विषय आहे. असं एखादं निश्चित कारण असतं त्याचं, तर प्रत्येकाला सुटलं नसतं ते कोडं?
महाराष्ट्राच्या वतीने गणरायाला साकडं घालण्याची जबाबदारी तुमच्यावर दिली, तर काय साकडं घालाल?
श्रद्धा सुरवसे, पुणे
– बुद्धीचा दाता आहेस म्हणून सगळी बुद्धी स्वतःकडेच ठेवू नकोस. त्याच्या वाटपाची गरज आहे अरे आज इकडे. वाटल्यास उधारीवर दे. तुझं येणं आणि असणं हे आम्हाला मंगलमय वाटण्याची जबाबदारीही तुझ्यावरच आलीये त्याबद्दल क्षमा कर! आणि ती जबाबदारीही आता तूच घे बाबा शेवटी!
परदेशात फिरताना तिथलं काय आपल्या देशात असायला हवं, असं तुम्हाला वाटतं; आपल्याकडचं काय तिथे असायला हवं?
यशवंत प्रभुदेसाई, नाना चौक
– परदेशी लोकांचं त्यांच्या देशावरचं प्रेम, सामाजिक शिस्त, नियम आणि स्वच्छतेच्या गप्पा न मारता प्रत्यक्ष त्यांच्या कृतीमधून दिसून येतं. आपल्याकडे ती जबाबदारी आपण स्वतः सोडून बाकी इतरांवर आपण सोपवलेली असते. आपलं प्रेम फक्त मनात आहे ते प्रत्यक्ष कृतीत दिसायला हवं. आणि आपल्यासारखी खाद्य पदार्थांची विविधता आणि चवींची चैन परदेशात कुठेही उपलब्ध नाही.
गणेशोत्सवाशी सगळ्यांच्या काही ना काही आठवणी जोडलेल्या असतात. तुमची अशी खास आठवण काय?
रवींद्र सोनार, पाथरी
– सातवीत असताना मी कोल्हापूरच्या आमच्या गणेश मंडळात वामनावताराच्या जिवंत देखाव्यात बटूची भूमिका केली होती. दहा दिवसात १०-१२ मिनिटाच्या त्या नाटिकेचे अंदाजे १५० प्रयोग झाले असावेत.