दिग्दर्शक हृषीदांचा १९५७च्या ‘मुसाफिर’पासून सुरू झालेला हा प्रवास १९९८च्या ‘झूठ बोले कव्वा काटे’पर्यंत अनेक उत्तमोत्तम चित्रपटांनी सजलेला आहे. ‘अनाडी’, ‘आनंद’, ‘अनुराधा’, ‘चुपके चुपके’, ‘अभिमान’, ‘अनुपमा’, ‘गुड्डी’, ‘बावर्ची’, ‘मिली’, ‘बेमिसाल’, ‘आलाप’, ‘जुर्माना’ आणि अनेक. हृषीदांना मध्यममार्गी दिग्दर्शक म्हटलं जातं. म्हणजे पलायनवादी मनोरंजन आणि वास्तववादी कलात्मकता याची उत्कृष्ट सांगड घालणारे. त्यांच्या सगळ्याच सिनेमातून हे प्रकर्षाने दिसून येतं. त्यातही १९६९ सालचा ‘सत्यकाम’ त्यांच्या इतर सिनेमांपेक्षा वेगळा ठरतो. कारण तो फील गुड सिनेमा नाही.
—-
‘हर एक का सपना सच होता है’ असं एक लोकप्रिय विधान आणि चित्रपटातील ओळसुद्धा आहे. ‘राशोमोन’, ‘ट्वेल्व्ह अँग्री मेन’सारख्या चित्रपटांतून सत्याच्या बदलणार्या रूपावर, मितीवर आणि न्याय संकल्पनेवर भाष्य आहे. सत्य हे दिवसाच्या बदलत्या प्रहराप्रमाणे बदलतं आहे असंही म्हणू शकतो. आणि बदल हेच अंतिम सत्य आहे असंही म्हणू शकतो. पण ह्या सगळ्या झाल्या सत्य ह्या तत्वाच्या गोष्टी. हेच सत्यतत्व, जेव्हा समाज आणि नागरी जीवन या घटकांच्या अनुषंगाने तपासायला जाऊ तेव्हा माणसांनी एक व्यवस्था म्हणून ठरवलेली नीतीमूल्यं आणि परखड वास्तव या चष्म्याच्या दोन डोळ्यातून पाहावं लागेल. आणि मग सत्य हे एखाद्या लंबकाप्रमाणे वस्तुस्थिती या हार्ड फॅक्ट्सच्या दिशेने तर कधी नैतिक, अनैतिक या व्हॅल्यूज या दिशेने दोलायमान होताना दिसतं.
दिग्दर्शक हृषीकेश मुखर्जी उर्फ हृषीदांच्या ‘सत्यकाम’मध्ये कथानायक सत्यप्रिय आचार्य हाताखालील कारकुनाला लाच घेतली म्हणून बडतर्फ करतो तेव्हा त्या कारकुनाची पत्नी सत्यप्रियला, पैशाअभावी उपचार न मिळू शकणार्या आजारी मुलाची परिस्थिती दाखवून म्हणते, ‘आम्ही या कंगाल अवस्थेत आहोत हा दोष कोणाचा? जर तो मालकाचा असेल तर त्याला तुम्ही शिक्षा देऊ शकता का? नाही ना? मग तुम्ही केवळ अधिकार आहेत म्हणून माझ्या पतीला शिक्षा देताय ते योग्य आहे का?’
अधिकार व सत्ताक्रमाने जर सत्य असत्य ठरत असेल आणि म्हणून केवळ दुबळ्या दोषी लोकांना आपण शिक्षा देऊ शकतो, वरिष्ठांना नाही हे उमजलेला सत्यप्रिय तडक अपरात्री कचेरीत जाऊन राजीनामा देतो.
वरील प्रसंग मानवी मूल्य-माणुसकीच्या दृष्टीने हृदयद्रावक असला तरी वास्तव हेच आहे की लाच घेण्याचा गुन्हा त्या माणसाकडून घडला आहे. हृषीदांचा सत्यकाम प्रेक्षकांना सत्य, नीती अनीती, जीवन मूल्य, वास्तव, धर्म, अध:पतन अशा अनेक गोष्टींवर विचार करायला लावतो.
हृषीकेश मुखर्जी. कलकत्ता सोडून मुंबईला आलेला हा पदवीधर आणि काही काळ गणिताचा शिक्षक असलेला तरूण, प्रख्यात सिनेदिग्दर्शक बिमल रॉय यांच्याकडे सहायक म्हणून काम करायला लागला. त्यांच्या ‘देवदास’ आणि ‘मधुमती’सारख्या सिनेमांचं संकलनही केलं. खरं तर संकलक म्हणूनही हृषीदांना वेगळी मागणी होती. पण दिग्दर्शक हृषीदांचा १९५७च्या ‘मुसाफिर’पासून सुरू झालेला हा प्रवास १९९८च्या ‘झूठ बोले कव्वा काटे’पर्यंत अनेक उत्तमोत्तम चित्रपटांनी सजलेला आहे. ‘अनाडी’, ‘आनंद’, ‘अनुराधा’, ‘चुपके चुपके’, ‘अभिमान’, ‘अनुपमा’, ‘गुड्डी’, ‘बावर्ची’, ‘मिली’, ‘बेमिसाल’, ‘आलाप’, ‘जुर्माना’ आणि अनेक.
हृषीदांना मध्यममार्गी दिग्दर्शक म्हटलं जातं. म्हणजे पलायनवादी मनोरंजन आणि वास्तववादी कलात्मकता याची उत्कृष्ट सांगड घालणारे. त्यांच्या सगळ्याच सिनेमातून हे प्रकर्षाने दिसून येतं. त्यातही १९६९ सालचा ‘सत्यकाम’ त्यांच्या इतर सिनेमांपेक्षा वेगळा ठरतो. कारण तो फील गुड सिनेमा नाही.
नारायण सन्याल या प्रसिद्ध बंगाली लेखकाच्या याच नावाच्या कादंबरीवर बनलेला हा चित्रपट आजही तितकाच अस्वस्थ करणारा आहे. एका प्रामाणिक माणसाची ही शोकांतिका सन्याल यांनी त्यांच्या एका मित्राच्या आयुष्यावर आधारली होती. चित्रपटात या कथानायक पात्राचं नाव आहे सत्यप्रिय आचार्य. सत्यप्रियची आई त्याला जन्म देऊन लगेच निवर्तते आणि वडील संन्यास पत्करून सत्यप्रियला आपल्या आजोबांच्या हवाल्यावर सोडून जातात. सत्यप्रियचे आजोबा सत्यशरण आचार्य हे गुरुकुल चालवतात. त्या कुलातील प्रत्येक मुलाचं नाव हे सत्य या अभिधानाने चालू होतं. सत्यप्रिय नातू असला तरी आचार्य हे संपूर्ण कुलाचे आणि एका परंपरेचे पालक आहेत. साल आहे १९४६. हिंदुस्तानची एक स्वतंत्र देश होण्याकडे जोमदार वाटचाल सुरू आहे. अभियांत्रिकीच्या शेवटच्या वर्षाला असलेला सत्यप्रिय आणि त्याचे मित्र भारताच्या स्वातंत्र्यानंतर खरे चांगले दिवस येतील या उमेदीने अनेक योजना ठरवत आहेत. निकाल लागतो आणि सत्यप्रिय दुसर्या क्रमांकाचे सुवर्णपदक मिळवतो. त्याला लागलीच एक चांगली नोकरी मिळते. भवानीगढ संस्थानाची पाहणी करण्याच्या कामामध्ये त्याच्या आयुष्यात रंजना नावाची मुलगी येते. रंजना आणि सत्यप्रियमध्ये मैत्री होते. रंजना एका वेश्येची मुलगी असल्याने तिला कोणी नवरा मुलगा मिळण्याची शक्यता कमी आहे. अशात सत्यप्रियकडूनही नकार मिळालेल्या रंजनावर, आधीपासूनच तिची अभिलाषा बाळगणारा संस्थानिक बलात्कार करतो. यानंतर मात्र सत्यप्रिय रंजनाशी विवाह करतो. तिला घेऊन तो आजोबांकडे आचार्यांकडे जातो. पण रंजनाची जात, तिची पार्श्वभूमी आणि तिचा बलात्कारातून जन्मलेला मुलगा हे सगळं तो प्रामाणिकपणाने त्यांना सांगतो. वृत्तीने कर्मठ असणारे आचार्य त्याला जायला सांगतात. त्यानंतर सुरू होतो सत्य हेच प्राणप्रिय असलेल्या सत्यप्रिय आणि त्याच्या कुटुंबाची परवड. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भ्रष्टाचार, काळा बाजार कमी होईल असं स्वप्न बघणार्या सत्यप्रियला पदोपदी खाबू लोकांशी संघर्ष करावा लागतोय. यातच त्याची उमेद संपतेय. त्याचा लाडका मित्र नरेंद्र त्याला तडजोड करण्याकरता समजावतो, पण आता सत्यप्रिय या भ्रष्ट समाजाविरुद्ध एकटाच दंड थोपटून उभा आहे एकाकी झुंज द्यायला. थकत चाललेल्या मनाने, शरीराने आणि कफल्लक संसाराने. त्याची पत्नी रंजना आणि मुलगा काबूल यांची चिंता त्याला भेडसावू लागली आहे. पण म्हणून तो या किडलेल्या व्यवस्थेला शरण जातो का? तडजोड करतो का?…
‘सत्यकाम’ हा हृषीदांचा वेगळा सिनेमा याकरता आहे की प्रामाणिक नायकावर आधारित असूनही चित्रपट कुठेच प्रेक्षकांमध्ये हिरोइजमच्या लाटा आणत नाही. उलट ‘सत्यकाम’मधल्या सत्यप्रियची त्याच्या सचोटीमुळे होणारी सोलपट जीव दडपणारी आहे. इतका प्रखर सत्यवाद नको रे बाबा असं म्हणायला लावणारी आहे. एक बेसिक प्रामाणिकपणा आपल्या सगळ्यांमध्ये असतो. सच्चाईने काम करण्याची तळमळ सर्वांमध्ये असते. पण जेव्हा त्या तत्वांना छातीशी धरून प्राणपणाने लढा देण्याची वेळ येते तेव्हा आपण बहुसंख्य तत्वांना मुरड घालतो. अंतर्मनाला समजवतो. थोपवतो. जसं चित्रपटातील सत्यप्रियचा मित्र नरेंद्र करतो. त्याला माहिती आहे भ्रष्टाचाराच्या या अजस्त्र आणि जटिल जंगलात सत्याचे नारे विरून जाणारे आहेत. त्याच वेळी मित्राची तगमग अनाठायी नाही हे ही त्याला कळतंय.
‘कॉम्प्रमाईज की बातें बुझदिल करते हैं’ या सत्यप्रियच्या बोलण्यावर त्याच्याकडे उत्तर नाहीये. आपल्यासारख्या नांग्या टाकणार्या लोकांमुळे ही व्यवस्था दिवसेंदिवस सडत चाललीय हे नरेंद्रला समजतं आहे, पण या यंत्रणेविरुद्ध लढण्याची त्याच्यामध्ये हिंमतही नाही. नरेंद्रने वास्तव स्वीकारलं आहे. त्याची सांपत्तिक स्थितीही उत्तम आहे. परंतु सत्यप्रिय हा तहाचा मार्ग स्वीकारणार नाही हे लक्षात येताच नरेंद्र एका प्रसंगी सत्यप्रियचा वरिष्ठ बनण्यापेक्षा आपली बदली करून घेण्याचा विचार करतो.
याचा अर्थ सत्यप्रिय हा एकदम तडफदार किंवा जसं हिंदी चित्रपटात नंतर प्रामाणिक नायकांना चकचकीत नी डॅशिंगली निर्भय दाखवलं गेलंय तसा नाही. आधी म्हटल्याप्रमाणे हा नायक अॅप्रिएशनल वाटावा असा अजिबात नाही. आणि त्याचबरोबर लेखक सन्याल आणि दिग्दर्शक हृषीदा यांनी त्याचे पाय मातीचे दाखवले आहेत.
नरेंद्रला बुझदिल म्हणणारा सत्यप्रिय जेव्हा त्याच्याकडे विश्वासाने, आशेने आलेल्या रंजनाला आपल्याकडे किमान मोलकरीण म्हणून ठेवण्याला, आधार देण्याला नाही म्हणतो तेव्हा तो चुकतो. तो संस्कारांमध्ये अडकतो. कुलाचाराचा आणि आजोबांचा विचार करतो. त्या एका निर्णयामुळे रंजनाला भोगावं लागणारं दुर्दैव समजताच मैं बुझदिल हूं असं तो म्हणतो. रंजना आणि तिच्या मुलाचा मनापासून स्वीकार करूनही शारीरिकदृष्ट्या सत्यप्रियला रंजनाशी एकरूप होणं कठीण जातं. एकदा रंजना उद्वेगाने म्हणते, ‘मुझे पता है बीच में कौन आ जाता है.’
सत्यप्रिय एक प्रामाणिक माणूस आहे व केवळ माणूसच आहे. त्याला उगाचच लार्जर दॅन लाइफ बनवलं गेलेलं नाही. उलट चित्रपटाच्या उत्तरार्धात त्याचा सत्याचा आग्रह हा हट्ट वाटू लागतो, त्याचा स्वभाव चिडखोर बनत चालला आहे हेही अगदी सहजरित्या हृषीदांनी दाखवलं आहे. इतक्या वर्षात पंच्याण्णव टक्के लोकांशी तात्विक भूमिकेवर भांडता भांडता माणूस चिडखोर होणारच. त्यात सत्यप्रियचा आदर्शवाद इतक्या टोकाला गेलाय की एका कंत्राटदाराने मजुरांना पैसे दिलेले नाहीत म्हणून त्याने त्या कंत्राटदाराचं बिल पास केलेलं नाही. कार्यकक्षेच्या बाहेर जाऊन तो आता सत्य आणि न्याय्य ह्या बाबींवर अडून बसू लागला आहे. मजुरांसाठी तू का भांडतोस? मालक आणि मजुरांच्या वादात मजूर कोर्टात जाऊन दाद मागतील, या नरेंद्रच्या बोलण्यावर सत्यप्रिय म्हणतो, मजुरांना कधी न्यायालय परवडेल का? न्याय हा हक्क असला तरी एकंदरीत न्यायप्रक्रियेतील निर्णय घेणार्या लोकांची साखळी आणि त्यांच्यावर प्रभाव टाकणार्या शक्ती बघितल्या तर कष्टकरी किंवा सामान्य लोकांना कोर्टात न्याय मागणं का नको असतं हे लक्षात येईल.
ओशो म्हणतात, ‘मनुष्य एक बीज आहे. जोवर मनुष्य बीजावस्थेत आहे तो वर त्याला/ तिला जीवन समजणं कठीण आहे. हे बीजावरण जेव्हा तुटेल आणि मनुष्याचा बीजातून वृक्षाकडे प्रवास होईल तेव्हाच आयुष्याचा त्याला/ तिला अनुभव येईल.’
सत्यप्रियचा हा प्रवास रंजनाला त्याने नाकारल्यावर, तिच्यावर झालेल्या अत्याचारानंतर सुरू झालाय. पण या वृक्षाला भ्रष्टाचाराच्या प्रदूषणाने कोमेजून टाकलंय. सत्यप्रिय निराश झाला आहे. भारताच्या नवनिर्माणाच्या प्रक्रियेत भ्रष्टाचाराचं पीक आलेलं आहे. सरंजामी आणि सावकारी विळख्यातून सुटून देशातील गोरगरिबांना जगण्याचे किमान हक्क तरी मिळतील, देशाला आपल्यासारखे तरूण जगात एक आदर्श उदाहरण बनवतील ही त्याची स्वप्नं जवळपास भंगल्यात जमा आहेत. पण म्हणून सिद्धांतांना डांबर फासून भ्रष्टाचाराच्या दलदलीत उडी मारण्यापेक्षा तो दुनियेला शिंगावर घेण्यासाठी तयार आहे. अगदी मंत्र्यालाही कोर्ट केस करण्याची ताकीद देण्याची धमक त्याच्यामध्ये आहे.
हृषीदा चित्रपटांत हरेक पात्रांना ठाशीवपणे उभं करतात. इथेही सत्यप्रियइतकंच दुसरं महत्त्वाचं पात्र म्हणजे त्याचा जिवलग मित्र नरेंद्र शर्मा. ह्या नरेंद्रच्या कथनातून चित्रपट उलगडत जातो आणि मुख्य म्हणजे चित्रपट आपण नरेंद्रच्या दृष्टीने बघतो. सत्यप्रिय आणि रंजनाच्या आयुष्यातील अनेक घटना- उदा. काबुलचा जन्म, सत्यप्रियच्या सुरुवातीच्या काळातील संघर्ष, त्याच्या बदलत्या नोकर्या ह्या नुसत्या निवेदनातून कळतात. त्यामुळे सत्यप्रियला प्रेक्षक एक दूरस्थ दृष्टीने बघतो. जेव्हा नरेंद्र अनेक वर्षांनी सत्यप्रियला भेटतो तेव्हा नरेंद्रसह आपणही सत्यप्रियला चहा आणि सिगरेट पिताना बघून आश्चर्यचकित होतो. हृषीदांचं दिग्दर्शक म्हणून प्रचंड कौशल्य की शेवटच्या काही प्रसंगात हे सुकाणू, ही दृष्टी ते अलगद नरेंद्रकडून सत्यप्रियकडे आणतात आणि त्या प्रसंगांमध्ये सत्यप्रियची आयुष्यभराची वेदना आपल्याला चटका लावून जाते. आजारी होऊन इस्पितळात दाखल झालेल्या सत्यप्रियला त्याची पत्नी रंजना एकदा ताण सहन न होऊन सुनावते की इतक्या प्रामाणिक वागणुकीचा तुला काय मोबदला मिळाला? तेव्हा सत्यप्रियचा असहाय्य चेहरा बघून तोपर्यंत तटस्थ असणार्या प्रेक्षकांचे डोळे नक्की पाणावतील. मात्र रंजनाची घुसमटसुद्धा तितकीच खरी आहे. तिच्याबरोबर ती दुर्दैवी घटना होण्याआधी ती सत्यप्रियच्या साईटवर येऊन त्याला जेवण बनवून वाढते, तेव्हा तिच्या आयुष्याकडून एक स्त्री म्हणून असणार्या साध्या अपेक्षा सांगते. आपल्या आईच्या भूतकाळामुळे आपल्याला त्या इच्छा पूर्ण करणंही कठीण होईल याची तिला जाणीव आहे. सत्यप्रियशी लग्न झाल्यानंतर सत्यप्रियच्या सतत होणार्या बदल्या, लोकांशी भांडणं, आर्थिक तंगी यांनी ती त्रासली आहे. मुलाच्या, काबुलच्या भवितव्याची चिंता तिला ग्रासून राहिली आहे. कथेतील अजून एक महत्त्वाचं पात्र म्हणजे आचार्य सत्यशरण उर्फ दादाजी. अत्यंत कर्मठ असणारा हा माणूस नातवाबरोबर सत्यप्रियबरोबर छान खेळीमेळीने वागतो आहे. अगदी कालिदासाच्या स्त्री-देह सौष्ठवाचं वर्णन करणार्या रसिल्या संस्कृत काव्यपंक्ती म्हणून दाखवणारा हा आचार्य, ज्याच्या सत्याच्या कल्पना ह्या वस्तुस्थितीपेक्षा नीतीमूल्यांवर, सांस्कृतिक विचारधारेवर आधारित आहेत आणि अयोग्य आहेत हे त्याला शेवटी कळतं व तो आपल्या पणतूचा- काबुलचा स्वीकार करतो. सत्यप्रियच्या आयुष्याचा आधार दादाजी आहेत खरं म्हणजे. कारण रंजना आणि लहानग्या काबुलला घेऊन विंचवाचं बिर्हाड असल्यागत ठिकठिकाणी फिरत, संघर्ष करत, लोकांचा नावडता बनत असताना चर्चा करायला, सल्ला घ्यायला त्याचा आधारस्तंभ त्याच्याबरोबर नाही.
एक अतिशय सुंदर क्षण आहे चित्रपटात. नातू अखेरच्या घटका मोजतो आहे हे कळल्यावर इस्पितळात आलेले आचार्य आधी किंचित हसतात. चकित झालेल्या नरेंद्रकडे पाहून म्हणतात, ‘मला सत्यप्रिय जेव्हा जन्मला होता ते आठवलं.’ जन्म ते मृत्यूचा प्रवास या एका वाक्यात किती सहज सामावला आहे. सत्यप्रिय आणि त्याचे आजोबा यांच्यातला शेवटचा प्रसंग अतिशय हृद्य आहे. हृषीदांनी नंतर आनंद मध्ये केलेला मृत्यू प्रसंग आता पावेतो सर्व सिनेरसिकांना माहीत आहे पण सत्यकाम मधला हा प्रसंगही तेवढ्याच ताकदीचा आहे.
राजिंदर सिंग बेदी यांनी लिहिलेले चित्रपटाचे संवाद ही सत्यकामची जमेची बाजू आहे. आचार्य सत्यशरण म्हणतात ‘सच कहने का अहंकार नहीं साहस होना चाहिए.’ किंवा जेव्हा सत्यप्रिय मंत्र्याकडे भ्रष्ट अधिकार्यांची तक्रार करायला जातो तेव्हा मंत्री महोदय म्हणतात, बताईये. डरीये नहीं, त्यावर सत्यप्रिय म्हणतो ‘आजकल सच कहने के लिये डरना पडता है.’ सत्यप्रियवर चिडलेला एक माणूस म्हणतो, ‘बडा बदमाश और पाजी है ये. बिलकुल रिश्वत नहीं लेता.’ एका प्रसंगात नरेंद्रला समजावताना सत्यप्रिय म्हणतो, ‘सच कहने से दुख सहने की तयारी चाहिए तो सच कहने से दुख देने की भी तयारी चाहिए.’ अर्थात सत्य सांगताना ते समोरच्याला दुखावेल याची मानसिक तयारी असायला हवी.
‘सत्यकाम’चं संगीत लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं असूनही चित्रपटात फार लोकप्रिय गाणं नाही याचं एक कारण म्हणजे चित्रपटाचा एकंदरीत जडगंभीर सूर हे असावं. मात्र यातलं श्रेय नामावलीवेळी येणारं पार्श्वसंगीत, जे चित्रपटातही आहे, ते विलक्षण आहे. चित्रपटाचं चित्रणही जयवंत पाठारे यांनी विषयाला साजेसं केलेलं आहे. फार फिकट आणि सौम्य रंगसंगती वापरली आहे. औदासीन्य गडद करणारी.
हो. ‘सत्यकाम’ हा अजिबात मनोरंजक किंवा टाइमपास करणारा सिनेमा नाहीये. उलट किंचित विषण्ण करणारा आहे. चित्रपटातील नायकाचं फिल्मी उदात्तीकरण नाही ना तो भ्रष्टाचाराचा नायनाट करणारा सर्वशक्तिमान आहे. गंमत म्हणजे हा नायक साकार केलाय फिल्मी दुनियेच्या ही-मॅन म्हटल्या जाणार्या धर्मेंद्र याने. आणि अप्रतिम केलेला आहे त्याने हा सत्यप्रिय आचार्य. सुरुवातीचा दिलखुलास हसणारा, जोशभरा, आनंदी, उमदा, रंजनाकडे ओढला गेलेला आणि आत्मविश्वासाने भरलेला ते नंतरचा चिडका, आक्रमक आणि आजाराने थकलेला… शेवटच्या प्रसंगात सत्यप्रिय बायको मुलासाठी नाईलाजाने एका निकृष्ट बांधकामाच्या बिलावर सही करतो पण त्याची पत्नी रंजना ते फाडून टाकते, तेव्हा बोलण्याची शक्ती गेलेला सत्यप्रिय आनंदाने हसतो. हा प्रसंग धर्मेंद्रने प्रचंड ताकदीने केलेला आहे. तितक्याच समर्थप्ाणे संजीव कुमार या नटश्रेष्ठाने त्याला साथ दिलीय. नरेन्द्रचं सत्यप्रियवर असलेलं प्रेम, काळजी अतिशय उत्तम व्यक्त केलंय संजीव कुमार यांनी. त्यांचं सत्यप्रियला सत् म्हणून हाक मारणं खूप गोड आहे. दोन मित्रांमधल्या उत्कट प्रेमाचं रसायन संजीव कुमार व धर्मेंद्र या दोघांमध्ये सुंदर जमलं आहे. शर्मिला टागोर यांची रंजना मनात घुसून रहाणारी आहे. रंजनाचं कमनशीब आणि तिची वेदना शर्मिलाच्या लांबसडक डोळ्यात तरळत राहतात. अशोक कुमार यांचा आचार्य सत्यशरण भारदस्त. आपल्या सत्याची व्याख्या एका इवल्याशा मुलाने कोती ठरवली, सत्यप्रियच्या सत्याचा वसा त्याची पत्नी रंजना आणि तिचा मुलगा काबूल यांनी पेलला आहे हे जाणून डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहत काबूलला जवळ घेणारा आचार्य डोळ्यासमोरून हलत नाही. या सर्वांवर कमाल केलीय ती डेव्हिड या जुन्या कलाकाराने. एरव्ही सकारात्मक, मवाळ भूमिका करणार्या डेव्हिड यांनी इथे रुस्तम नावाच्या बिलंदर माणसाची भूमिका केलीय. आवर्जून पहावी अशी. काबुलच्या भूमिकेत बेबी सारिका आहे.
हृषीदांच्या स्वतःच्या आवडत्या कामांमध्ये सत्यकाम फार वरच्या स्थानावर आहे. कारण भ्रष्टाचार या मानवी वृत्तीला भिडणारे आणि पराजयाच कटू सत्य मांडणारे, ‘सच एक अंगार हैं. हाथ पर ले के चलोगे तो हाथ जलेगा ही’ असं सांगणारे सिनेमे वारंवार बनत नाहीत.
हृषीदांच्या ‘आनंद’मध्ये एक अप्रतिम ओळ आहे. आनंद मरा नहीं. आनंद मरते नहीं.
‘सत्यकाम’ चित्रपटात आणि वास्तवातही सत्यप्रिय आचार्य मरून अनेक वर्ष झाली आहेत. नरेंद्र शर्मासारखे आपण मात्र टिकून आहोत. परवडेल इतका प्रामाणिकपणा पुरवून पुरवून वापरणारे.
निदा फाझली यांच्या गजलेच्या ओळीत किंचित बदल करून, दुर्दैवी सत्यप्रिय आचार्यसाठी म्हणावंसं वाटतं…
उसके दुश्मन हैं बहोत…
आदमी अच्छा सच्चा होगा.
कट इट!
– गुरुदत्त सोनसुरकर
(लेखक चित्रपट रसिक, लघुपट दिग्दर्शक आणि जाहिरात व्यावसायिक आहेत)