गणपती हा गणनायक. गणांचा म्हणजे सामान्यजनांचा प्रतिनिधी. बाळासाहेबांनी श्री गणेशाचं व्यंगचित्रात्मक दर्शन घडवताना तो कायमच सर्वसामान्य जनतेचा प्रतिनिधी म्हणून रेखाटला. सर्वसामान्य माणसांना जी दु:खं भोगावी लागत होती, जे अन्याय सहन करावे लागत होते, ते साक्षात गणरायालाही भोगायला लावले- भक्तांच्या सुखदु:खाशी जो एकरूप होतो तोच खरा देव ना! एकेकाळी देशात अन्नधान्याचा तुटवडा होता आणि नरेंद्र मोदी किंवा त्यांचा पक्ष सत्तेत येण्याच्या कितीतरी आधी देशात हरितक्रांती आणि दूधक्रांती घडून अन्नधान्याची सुबत्ता आली (हल्ली हे सांगावे लागते, देशाला स्वातंत्र्यच २०१४ साली मिळाले, असा एकंदर आविर्भाव असतो). तुटवड्याच्या काळात रेशनिंगवर धान्य, साखर, तेल, रॉकेल घ्यायला लागायचे. सणासुदीला साठेबाज व्यापारी कृत्रिम टंचाई निर्माण करून गोरगरिबांना नाडायचे. त्यांची मुजोरी किती होती, ते दाखवणारं हे जळजळीत व्यंगचित्र आहे… आज सणासुदीला जनतेला नाडण्यासाठी साठेबाजांची गरज नाही, सगळ्या वस्तू खुल्या बाजारात उपलब्ध असल्या तरी महागाईच आकाशाला भिडली आहे सगळ्याच पदार्थांची.