माझा मानलेला आणि आता माजलेला परममित्र पोक्या आणि त्याची होणारी पत्नी पाकळी यांच्यातील त्या रोबोट बाईवरून झालेलं भांडण मिटल्याची खबर त्याने मला घरी आल्यावर दिली, तेव्हा माझाही जीव भांड्यात पडला. मी म्हटलं, बाकी दुनियादारी गेली खड्ड्यात, आपण दोघं तरी आपलं पूर्वीचं पैसा कमावण्याचं मिशन सुरू करू या. त्यावर पोक्या म्हणाला, मिशन नव्हे, पैसा कमावण्याचं मशीन.
– मशीन तर मशीन. गेले दोन महिने तू विवाहपूर्व पर्यटनासाठी पाकळीला घेऊन वर्ल्ड टूरला गेलास खरा, पण इथे आपल्या नेहमीच्या धंद्यात बरीच खोट झाली. मी भाजपचा सच्चा कार्यकर्ता म्हणून ईडीच्या कार्यालयात जाऊन बसायचो, पण किरीटही आपली पूर्वीसारखी सरबराई करत नव्हता. पूर्वी त्याला भेटून रिकाम्या हाताने कधी आलो नाही. आपल्याला पैशांची कमी नाही. कोट्यावधीचे धनी आहोत आपण, पण त्यांनी आपली किंमत ठेवली पाहिजे ना! अजून त्याचा माज उतरलेला दिसत नाही. प्रेस कॉन्फरन्स काय घेतो, वेड्यासारखे अचकट विचकट ओरडत तोंड किती वेडवाकडं करतो, हे पाहिलं तर डोक्यात तिडीक जाते. ते फडणवीस बेंबीच्या देठापासून ओरडतात म्हणून तुलाही त्यांच्यासारखं रेकून कुणी मुख्यमंत्री करणार आहे का? पण नाही, याचे वेडेवाकडे चाळे सुरूच असतात.
– पण टोक्या, तू त्याला भाजपची कशी तंतरली आहे सध्या, ते का नाही सांगितलंस? बाहेरच्या देशांत मोदींबद्दल किती वाईट बोललं जातंय, हे प्रत्यक्ष ऐकलंय मी. तुमचे पंतप्रधान मोदी देशातील चांगल्या संस्था एकामागून एक विकायला का काढत आहेत? लोकांना निवडणुकीला दिलेली आश्वासनं का पाळत नाहीत? ते एवढ्या थापा बिनधास्तपणे कशा काय मारू शकतात, असं विचारतात ते.
– पोक्या, तू जे सांगतोस ते इथे भारतातही आमच्या कानावर पडत असतं, पण आता निवडणुकांची चाहूल लागल्यानंतर हिंदू देवदेवतांच्या मूर्तींच्या संशोधनामागे भाजप नेते लागले आहेत. जनतेच्या पोटापाण्याच्या ज्वलंत प्रश्नावरून, महागाईवरून लोकाचं लक्ष उडवण्यासाठी ते सिद्ध झाले आहेत. मंदिर-मशीद वाद भडकवून त्यात पक्षीय पोळ्या भाजण्याचं नेहमीचं तंत्र आता जोरात सुरू झालंय. त्याचा आता इतका अतिरेक झालाय की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख आणि भाजपचे मार्गदर्शक ज्येष्ठ नेते यांना शेवटी त्यांना खडसावून दम द्यावा लागला. रोज उठसूठ मंदिर मंदिर काय लावलंय? अशा शब्दात त्यांना भाजपवाल्यांना झापलं. थोडी जरी अक्कल किंवा तारतम्य असते तर हे सगळे तोंडफाटके नेते असे वागले नसते. त्या राणा प्रकरणापासून जणू स्त्रीमुक्तीचा आंतरराष्ट्रीय पातळीवरचा एखादा लढा आपण देत आहोत, अशा थाटात त्या सोमय्यापासून दरेकरापर्यंतच्या नेत्यांचा उतावीळपणा ज्यांनी पाहिला असेल त्यांना यांच्या बुद्धीची कीव करावीशी वाटली असेल.
– पण टोक्या, हे लोक इतक्या निर्बुद्धपणे का वागतात? ते लोकांना मूर्ख समजतात काय? एक तर लोक रोज त्या चॅनेलवरच्या त्याच त्याच बातम्या आणि यांची थोबाडे पाहून कंटाळले आहेत. काय त्या राणा आणि त्या भंपक बाईची तारे तोडण्याची स्पर्धा डोक्याचा भुगा करून टाकला या बायांनी. आता लोक या बातम्यांना इतके कंटाळले आहेत की एक दिवस ते `टीव्ही फोडो’ आंदोलनही करतील. लोकांना वीट यावा या थराला हे नेते का जातात? मोठ्यामोठ्याने, तावातावाने का बोलतात? त्यामुळे लोक मतं देतील असं यांना वाटतं का? हे सोमय्या तर सोमरस पिऊन अंगात शंभर रेड्यांचं बळ संचारल्यासारखं बोलतात. यांना कोणी वेसण घालत नाही काय?
– त्यांना कुठे कुठे वेसण घालणार! मध्येच ते ईडी विसरून त्या राणाबाईच्या गोंधळात सामील झाले. यांचा काय संबंध? पण आपण विरोधी पक्षाला कसं जेरीस आणतोय हे दिल्लीतल्या नेत्यांना कळलं पाहिजे ना! म्हणून यांच्या या माकडचेष्टा चाललेल्या असतात. यांना काहीतरी करून आपणच वठणीवर आणलं पाहिजे. तू मला मदत कर. आपण याची चांगली फजिती करू या.
– ती कशी?
– मला अमित शहा आणि मोदींचा आवाज काढता येतो. मी अमित शहांचा आवाज काढून किरीटला दिल्लीवरून फोन करतो. उद्या मी आणि पाकळी दिल्लीला जाणारच आहोत भटकायला. तू उद्या दुपारी एक वाजता किरीटला ईडीच्या ऑफिसमध्ये महत्त्वाच्या कामासाठी तुला बोलावले आहे, असा फोन कर आणि मग त्याची मजा बघ. तूही त्यावेळी तिथे असला पाहिजेस.
– दुसर्या दिवशी मी बरोबर एक वाजता ईडीच्या कार्यालयात गेलो. तेवढ्यात किरीटची पण एन्ट्री झाली आणि टेबलावरचा फोनही खणखणला. मी पटकन तो घेतला आणि किरीटला बोललो, तुझा फोन आहे. अमित शहांसारखा आवाज वाटतो.
– अरे मग अमित शहांचाच असणार, माझी काळजी वाटते त्यांना. हॅलो, बोला अमितसाहेब काय सेवा करू?
– (शहांच्या आवाजात पोक्या)- आता सेवा आम्ही तुमची करायची. आज शाम को छे बजे तुम्हारा शपथ ग्रहण है। तुम्हे बिनखाते का मंत्री बनाना है। खुद मोदीजी समारोह को आनेवाले है। बाद में नाच-गाने का खाने पीने का कार्यक्रम भी बाजूवाले फाइव्ह स्टार हॉटेल में होनेवाला है। आप अपने फॅमिली के साथ आना. मित्र परिवार को भी लाना, आपके जीवन पर आधारित एक फिल्म भी पार्टीने बनायी है। तुम्हारे बचपन से तुम्हारी लीलावती में नवनीत के साथ हुई भेट; सबका दर्शन इस फिल्म में होगा। कितना महान, कार्य है आपका. मोदी बोले, कितना लॉयल आदमी है। इसके कार्य का चीज होना चाहिए। अढाई बरस तो मिलेंगे, उसको दिल्ली में धूम मचा देंगे वो। ऐसा मोदी बोले. तो तुम टाइम पर आना। प्लेन जल्दी पकडना। बाकी किसी को भी मत बताना. अभिनंदन और बधाई. फोन रखता हूँ।…
त्यानंतर माझ्याशी न बोलता ते ईडीच्या कार्यालयातून अंगात वारं आल्यासारखे बाहेर पडले. मी त्यांच्या मागोमाग चालत होतो. ते मोबाईलवरुन बहुतेक घरी फोन करत असावेत. तिथे ते दिल्लीत पोचल्यावर त्यांची काय मजा होते हे मला नंतर कळव रे पोक्या! धमाल येणार एवढं नक्की!