□ कंगना, राणांना सुरक्षा; मग काश्मिरी पंडितांना का नाही? -डॉ. नीलम गोर्हे
■ ते सुरक्षित झाले तर उर्वरित देशातल्या हिंदूंच्या भावनांना हात घालून मतांचं हुकमी पीक कसं काढता येणार?
□ २००६मध्ये कराची कसोटीत आपण सचिनचे चेंडूने डोके फोडण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करीत होतो, अशी कबुली पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने दिली आहे.
■ त्याच्या अभेद्य बॅटिंगवर आपटून आपटून भल्या भल्या गोलंदाजांची डोकी फुटली, तू कोण होतास रे झिपर्या!
□ भाजप काश्मीर प्रश्न हाताळू शकत नाही – केजरीवाल यांचा दावा
■ तुम्ही सध्या पंजाब नीट सांभाळा, तेवढंच बास!
□ हिंदी ही शूद्रांची भाषा : डीएमके खासदाराचे माथेफिरू विधान
■ लोकांना हिंदी शूद्रांची भाषा ठरवल्याचा राग येतो, पण एक माणूस दुसर्या माणसाला शूद्र ठरवू शकतो, याचं कुणालाच काही वाटत नाही, हे भयंकर आहे.
□ कुवेतमध्ये हिंदुस्थानी उत्पादनांवर बंदी; पैगंबराच्या अवमानाचे जगभरात पडसाद.
■ भारताने काय घोडं मारलंय? एका पक्षाच्या बेताल वाचाळ प्रवक्तीच्या चुकीची शिक्षा सगळ्या देशाला कशी देता येईल?
□ नोटांवर गांधीजी कायम राहणार : आरबीआयचा खुलासा
■ रिझर्व्ह बँकेकडे अशी निर्णय घेण्याची ताकद आहे? एखाद्या रात्री आठ वाजता काय होईल पाहा…
□ गुजरातमध्ये पुन्हा ड्रग्ज तस्करी; २५० कोटींचे हेरॉईन जप्त
■ जोवर विवेक अग्निहोत्री गुजरात फाइल्स (याचे बरेच भाग काढावे लागतील खरेतर) किंवा उडता गुजरात नावाचा सिनेमा काढत नाही, तोवर कोणाला या प्रश्नाचं गांभीर्य समजणं कठीण.
□ हिंदुत्व टोपीत नसतं, डोक्यात असतं : मुख्यमंत्री
■ डोकं असलं पाहिजे ना पण त्यासाठी टोपीखाली.
□ पंतप्रधान मोदी यांनी सर्वसामान्य नागरिकांचे सशक्तीकरण करून त्यांना आत्मसन्मानाने जगता यावे यासाठी १० महत्त्वपूर्ण योजना राबवल्या. यामुळे जगात देशाची प्रतिष्ठा व सन्मान वाढला आहे – प्रकाश जावडेकर
■ टीचभर आकाराच्या देशांनी आपल्या देशाची किती लाज काढली, त्यातून प्रतिष्ठा आणि सन्मान यांच्यात किती वाढ झाली आहे ते कळलंच… बाकीच्या थापा उघड्या पाडायला यांच्याच सरकारने जारी केलेली आकडेवारी पुरेशी आहे… रेटून बोलणं काही सुटत नाही पण.
□ चीनमधील अत्याचारांवर मुस्लीम देश शांत का? अभ्यासकांनी उपस्थित केले प्रश्न
■ जगाचं राजकारण आदर्शवादाच्या चौकटीत चालत नाही… आपण तरी युक्रेनवर हल्ला करणार्या रशियाची ‘कडी निंदा’ केली का? चीन आपल्यापेक्षा प्रबळ आहे, आर्थिकदृष्ट्या सशक्त आहे, हे मान्य केलेले बरे.
□ मास्कची सक्ती नाही; पण वापरा.
■ आपले लोक सक्ती केली तरी वापरत नाहीत. असं सांगून कसे वापरू लागणार?
□ ‘काश्मीर फाइल्स’ या चित्रपटात खोटी परिस्थिती होती. आताही त्यांचेच सरकार असून तेथील पंडितांना संरक्षण देण्यात अपयश आले आहे- शरद पवार
■ हे सत्तेत आले की काश्मिरी पंडित अस्थिर होतात, हेच खरे.
□ एसी लोकलमध्ये पाच महिन्यांत अकरा हजार सातशे अकरा फुकटे. ३१ लाखांचा दंड वसूल.
■ उन्हाच्या तडाख्यात समोर एसी लोकलचा गार झोत आला की पाय आपसूक ओढून नेत असणार आत.
□ लोन अॅपवरून हजारो रुपयांना गंडा आणि बदनामी करण्याच्या प्रकारांत वाढ.
■ फोनवर, इंटरनेटवर कोणतीही लिंक क्लिक करण्याआधी हजार वेळा विचार केलाच पाहिजे.
□ कोल्हापूर चित्रनगरीला हिंदीसह दाक्षिणात्य वाहिन्यांची पसंती.
■ ‘कलापूर’ला पुन्हा जुनी प्रतिष्ठा प्राप्त झाली तर सगळ्या महाराष्ट्राला किती अभिमान वाटेल.
□ गुजरातच्या बडोदा शहरातील २४ वर्षीय क्षमा बिंदू या युवतीच्या स्वत:शीच लग्न करण्याच्या निर्णयाला आता सर्व थरांतून विरोध.
■ आपल्याकडे दुसर्याच्या भानगडीत नाक खुपसण्याची खोड मोठीच आहे एरवीही.
□ चिमुकल्याने मोबाइलवर व्हिडिओ पाहून बाहुलीला दिली फाशी, स्वत:ही घेतला गळफास.
■ ज्या वयात हातात पुस्तकं द्यायची त्या वयात मोबाइल द्याल तर वेगळं काय होईल?
□ १७७ काश्मिरी पंडित शिक्षकांची बदली. ‘टार्गेट किलिंग’मुळे केंद्राचा मोठा निर्णय.
■ त्यांना द्या की वाय/झेड सुरक्षा!
□ खोटी आश्वासने देत भाजपने केंद्राची सत्ता बळकावली – बाळासाहेब थोरात
■ खोटारडेपणा उघडा पाडण्यात विरोधी पक्षही कमी पडलेच की बाळासाहेब!