काही नाटके इतिहास ठरतात. गोविंद बल्लाळ देवल यांनी १८९३च्या सुमारास इंग्रजी नाटककार गानारेल यांच्या ‘ऑल इन दी राँग’ या नाटकाचे अस्सल मराठमोळे रूपांतर ‘संगीत संशयकल्लोळ’च्या रूपाने केले आणि ते मराठी रंगभूमीचा वाटचालीत एक तुफान गाजलेले नाटक ठरले. वाड्:मय, काव्य आणि आविष्कार म्हणूनही सर्व पातळ्यांवर नंबर वन सिद्ध झाले. त्यातील ‘तसबिरीचा घोटाळा’ पिढ्यान्पिढ्यांनी अनुभवला. आज १३० वर्षानंतरही त्याची जादू कायम आहे. याच संशयकल्लोळाच्या वाटेवरून ज्येष्ठ रंगकर्मी प्रदीप कबरे यांनी ‘नवरा-बायको’ यांच्यातील नव्याच संशयावर आधारित ‘दिल धक् धक् करे’ हे विनोदी नाट्य रंगभूमीवर आणले असून प्रसन्न, खेळकर. गुंतवून ठेवणारे नाट्य म्हणून ते नॉनस्टॉप हसविते!
लग्न म्हणजे जोडीदाराशी जुळवून घेणं, सुसंवाद साधणं, परस्परांचे स्वभाव सांभाळणं, संशय, गैरसमज टाळून प्रसंगी तडजोडही करणं. मात्र तरीही परिस्थिती हाताबाहेर गेल्यास आणि सुवर्णमध्य वेळीच न काढल्यास शेवटी घटस्फोट अटळच. अशावेळी आनंदी घर तुटण्यास क्षणाचाही विलंब लागत नाही. ‘दोन ओंडक्यांची होते सागरात भेट, एक लाट तोडी दोघां, पुन्हा नाही भेट, हेच खरे! या नाटकातील कथानक अशाच एका सुखी संसारातील दे धम्माल घटनांचा आलेखच आहे. ज्यात फॅन्टसी कॉमेडीचा परिपाक आहे.
कथा एका टिपिकल मध्यमवर्गीय कुटुंबातली. घरात दोघेजण. अमर आणि अंजली. हसतं-खेळतं तसं सुखी दांपत्य. ‘नवरोजी’ अमर याला सकाळी नाश्ता घेताना ‘काहीतरी होतेय’, असा संशय येतो. तब्येत बिघडलीय. काही खरं नाही, असं त्यांचं मन सांगतंय. त्यानंतर रोजच वर्तमानपत्र वाचताना ‘मरणनिदान’ याने तर अधिकच घबराट उडतेय. कारण अगदी चाळिशी-पन्नाशीतले हृदयविकाराच्या झटक्याने गेल्याचे तो वाचतो आणि त्याला कापरं भरतं. आपलं मरणही आता अटळ आहे, या संशयाने त्याला दिवस-रात्र हादरून सोडलेलं.
यांचे फॅमिली डॉक्टर घोरपडे प्रगटतात. ते तपासणी करतात. निव्वळ पोटदुखी असल्याचे निदान करतात, पण फोनवर बोलतांना एका दुसर्या पेशंटचे ‘शेवटचे काही दिवस उरलेत’ असं सांगतात आणि नवा संशय हा अमरच्या डोक्यात शिरतो. ‘शेवटचे दिवस’ हे आपलेच उरले आहेत, आता आपल्या मृत्यूनंतर पत्नी अंजली काय करणार? तिचं कसं काय होणार? पुढलं उभं आयुष्य ती कोणासोबत घालविणार? असे एक ना दोन, अनेक प्रश्न अमरच्या डोक्यात पिंगा घालू लागतात.
भरीस भर म्हणून अमरचा शाळकरी दोस्त बाबी सरमळकर याचे आगमन होते. तो व्यवसायाने वकील असला तरी कायम दारुच्या नशेतच वावरतो. प्रत्येक वेळी दारूच्या नशेत भन्नाट सल्ले देऊन नवरा-बायकोमध्ये गोंधळाचे वातावरण उभे करतो. ‘आपल्या नवर्याचे बाहेर कुठेतरी ‘लफडे’ आहे. तो प्रेमात गुंतलाय!’ – असा अंजलीचा पक्का समज होतो, तो वाढतच जातो.
या घरात आणखीन एक ‘हिरो’ प्रगटतो. जो अंजलीचा कॉलेजचा मित्र आहे. मोहन त्याचं नाव. दोघांमध्ये कॉलेजच्या गप्पा रंगतात. अजूनही मोहन अविवाहित. घरातल्या गेस्ट रूममध्ये तो ‘घरोंदा’ करतो. अंजली आणि मोहन बाहेर एकत्र शॉपिंग करतात. आपल्या मृत्यूनंतर बायकोचा एक चांगला पर्यायी नवरा म्हणून अमर मोहनकडे बघू लागतो. आणखीन एका महाभागाची या घरात एन्ट्री होते. मारोतीराव गवंडे त्याचं नाव. त्याचा अजब धंदा म्हणजे जिवंतपणीच मृत्यूनंतरच्या समाधी उभारण्याचे कंत्राट घेणे! तो अमरकडून त्यापोटी लाखो रुपये उकळतो आणि जिवंतपणे मृत्यूनंतरच्या ‘शांतता समाधी’ची व्यवस्थाही करतो. अमर आणि अंजली यांच्यातले संशयाचे भूत पराकोटीला पोहोचते. याचे विचित्र परिणाम दोघांना भोगावे लागतात.
मालतीसोबतचा अमरचा प्रेमसंवाद आणि डॉक्टरमधला यम आणि अमर यांची गळाभेट अशा मनातील प्रसंगाची ‘फॅन्टसी’ या कथानकात सुरेख पेरली आहे. यातून नाट्य एकेक वळण घेत धडधडणार्या ‘दिला’भोवती फेर्या मारून हसवणुकीचा खेळ रंगतदार करते. प्रत्येक प्रसंगात मजेदार घोटाळ्याचे चित्रण करून नाटककार प्रदीप कबरे यांनी रसिकांना गुंतवून ठेवले आहे. दिग्दर्शक आकाश आनंद यांनीही खटकेबाज संवाद आणि त्यामागलं ‘कृतीनाट्य’ मजबुतीने उभं केलंय. प्रयोग वेगवान करण्यामागे संहिता आणि दिग्दर्शनाची कल्पकता नजरेत भरते.
प्रदीर्घ काळ रंगभूमीवर वावर असणारे ज्येष्ठ रंगकर्मी प्रदीप कबरे यांनी अमरच्या भूमिकेत शिरून टायमिंगचे अचूक गणित मांडले आहे. त्यांची देहबोली लवचिक असून विनोदाचे नेमके क्षण हशा-टाळ्यांसह वसूल केलेत. विनोदाचे बादशाह अशोक सराफ यांनी गाजविलेल्या ‘सारखं छातीत दुखतंय’ या नाटकाची आठवणही येत राहते. पत्नी अंजलीच्या भूमिकेत वरदा साळुंखे हिने चांगली साथसोबत केलीय. भूमिकेतली सहजताही नजरेत भरते. दोस्त बाबीच्या रूपात सुदेश म्हशीलकर यांचा ‘दारूडा दोस्त’ लक्षवेधी ठरतो. फॅमिली डॉक्टर घोरपडे बनलेले संदीपराज यांनीही कहर केलाय. बबन प्रभू, आत्माराम भेंडे यांच्या नाटकातील ‘डॉक्टर’ असल्याचा भास होतो. विनोदाची समज उत्तम आहे. संजीव चव्हाण (मारोतीराव गवंडे), निलेश देशपांडे (मोहन), कोमल मासवकर (मालती) यांच्याही भूमिका नाट्य फुलविण्यास सहाय्य करतात. विनोदी नाटकाची भट्टी बिघडणार नाही, याची दक्षता सारेजण घेतात.
नवरा-बायको आणि प्रेयसी या नाजूक नात्यातील गैरसमज, वादविवाद यावर मराठी रंगभूमीवर अनेक शैलीत विविध विषयांची नाटके आजवर आलीत. त्याचप्रकारे यातही तिघांची पात्ररचना जरूर आहे, पण दोघेजण संशयकल्लोळाने ग्रासलेले. शेवटच्या क्षणी धक्कातंत्र आहेच! संगीतकार अशोक पत्की आणि नृत्यदिग्दर्शिका दीपाली विचारे या पडद्यामागल्या मोठ्या कलावंतांचा सहभाग नाटकात आहे, पण त्यांना विशेष काही करण्याची संधी मिळालेली नाही. तरीही नृत्य-संगीतासाठी ज्या जागा उपलब्ध आहेत त्यांत चमक दिसून येते. भव्य दिवाणखान्याचे नेपथ्य सुरेश सावंत यांनी आणि स्वप्न आभासी दृश्यातील प्रकाश योजना आनंद केळकर यांनी चांगली सजविली आहे. तांत्रिक अंगे नाट्याला अनुरूप आहेत.
वैवाहिक नातीगोती ही परस्परांच्या प्रेमापेक्षा विश्वासावर अवलंबून असतात, ती सांभाळणं ही लग्नाच्या बंधनातली पहिली पायरीच. या विश्वासाची जागा संशयाने घेतली तर दुरावा अटळच. त्याचे परिणाम दोघांसह कुटुंबाला, मित्र-मैत्रिणींना भोगावे लागतात. बदलत्या काळात ‘विश्वासपूर्ण सहजीवना’च्या अभावी तुटलेले संसार बरेच दिसतात. अर्थात हा विषय दुसर्या बाजूने विचार केल्यास अत्यंत गंभीर आणि शोकात्मिकेचा असला तरी नाटककार प्रदीप कबरे यांनी त्याला हळुवारपणे हास्याची फोडणी दिलीय. संसारात शरण जायचे असते, तडजोड करायची असते, हाच मेसेज यात आहे. रोगप्रतिकारशक्ती ही फक्त शाररिक असावी असे नव्हे तर मानसिकही असावी, शरीर आणि मन गुण्यागोविंदाने नांदले पाहिजे, हे नाटककाराला यातून मांडायचे आहे. प्रेमाच्या नाटकाला, जीवनाच्या तसेच संसाराच्या नाटकालाही जगाच्या प्रारंभापासूनच सुरुवात झालीय. जोपर्यंत स्त्री-पुरुष जगाच्या पाठीवर आहेत तोपर्यंत अशा नाटकांचे नवनवीन अविष्कार हे रंगतच जाणार. पिढ्यान्पिढ्या हा अंक साकार होणार आणि ‘दिल’ धक् धक् करणारच.
दिल धक् धक् करे…
लेखन – प्रदीप कबरे
दिग्दर्शन – आकाश आनंद
संगीत – अशोक पत्की
नेपथ्य – सुरेश सावंत
प्रकाश – आनंद केळकर
नृत्यदिग्दर्शन – दीपाली विचारे
सूत्रधार – आरती कबरे
निर्मिती – गुरु प्रॉडक्शन