हा प्रसंग २०१७मधला.
मिताली राजने आपल्या ट्वीटरवर एक फोटो शेअर केला. त्या फोटोत मितालीसह वेदा कृष्णमूर्ती, नुशीन अल खादीर आणि ममता मबेन या क्रिकेटपटूही होत्या. कमाल मैत्रिणींच्या सहवासात भन्नाट असा दिवस असं मितालीने लिहिलं. फोटोत मितालीचा ड्रेस काखेजवळ घामाने ओला झाल्याचं दिसत होतं. आपल्या देशात रिकामपेंडी जनता मोप. त्यांना हे दिसलं आणि त्यांनी मितालीला ट्रोल करायला सुरुवात केली. घाम येण्यावरून, घाम आलेला असताना फोटो टाकण्यावरून, दिसण्यावरून, ड्रेसवरून असं बरंच काही. थोड्या वेळानंतर हा प्रकार मितालीच्या लक्षात आला. या रिकामटेकड्या जनतेला मितालीने खणखणीत स्ट्रेट ड्राईव्ह मारावा असा रिप्लाय दिला. मितालीने लिहिलं, मी मैदानात वर्षानुवर्ष घाम गाळला आहे म्हणूनच आज या स्थानी पोहोचली आहे. घाम येण्याची मला शरम वाटत नाही.
भारतासारख्या उष्ण कटिबंधातल्या देशात घाम येणं अगदीच नैसर्गिक. पण आपल्या देशात सौंदर्याच्या ठोकळेबाज कल्पना आहेत. सेलिब्रेटींनी कायम परीटघडीचं असावं असंही वाटतं लोकांना. शरीराला त्रास होईल इतके मेकअपची पुटं चढवलेल्या व्यक्तीचं कौतुक होऊ शकतं. पण घाम आलेल्या सेलिब्रेटीला ट्रोल करायला मंडळी पुढे असतात. मितालीने शाब्दिक चोप देऊन हा विषय संपवला.
प्रसंग दुसरा
२०१७मध्येच हा प्रसंगही घडलाय.
वर्ल्डकपमध्ये भारतीय महिलांची इंग्लंडविरुद्ध लढत होती. सलामीची जोडी मैदानात उतरल्यानंतर तिसर्या आणि चौथ्या क्रमांकाचे बॅट्समन तय्यार होऊन बसलेले असतात, तसा तणावाचाच काळ असतो. केव्हा विकेट पडेल आणि पटकन निघावं लागेल सांगता येत नाही. या मॅचदरम्यान अशीच तय्यार स्थितीत असताना मिताली पुस्तक वाचत असल्याचं कॅमेर्याने टिपलं. पायाला पॅड बांधलेले, आर्मगार्ड वगैरेही. हेल्मेट-बॅट ही आयुधं बाजूला, असं सगळं सेट होतं आणि मिताली शांतपणे पुस्तक वाचत होती. मुख्य म्हणजे हल्ली करतात तसं मॅनिप्युलेटिव्ह कँडिड नव्हतं. तिचं लक्ष वाचनात होतं, जेव्हा कॅमेर्यात ही फ्रेम टिपली गेली, तेव्हा ती कॅमेर्याकडे बघत नव्हती.
मॅच संपल्यानंतर तिला याबद्दल विचारण्यात आलं. मितालीचं उत्तर लक्षात ठेवण्यासारखं. ती म्हणाली, मला वाचायला आवडतं. नियमांमुळे मला सामन्यादरम्यान किंडल वगैरे गॅझेट बरोबर बाळगता येत नाही. तेराव्या शतकातल्या पर्शियन कवीचं हे पुस्तक आहे. बॅटिंगला जाण्याचा काळ किचिंत दडपणाचा असतो. पुस्तक वाचून शांत वाटतं.
याच स्पर्धेतला आणखी एक प्रसंग.
मॅचआधी प्रेस कॉन्फरन्स होते. त्यात मितालीला तुमचा आवडता पुरुष क्रिकेटपटू कोण? असं विचारण्यात आलं. या प्रश्नाने मिताली चिडली नाही पण तिने जे उत्तर दिलं ती सणसणीत चपराक होती. ती म्हणाली, तुम्ही हाच प्रश्न पुरुष क्रिकेटपटूला विचारता का? तुमची आवडती महिला क्रिकेटपटू कोण असं विचारता का?
२३ वर्षांची खंडप्राय कारकीर्द नावावर असणार्या मिताली राजने गेल्या आठवड्यात क्रिकेट खेळणं थांबवण्याचा निर्णय घेतला. पण खेळणं थांबवत असले तरी कोणत्या ना कोणत्या प्रकारे खेळाशी जोडलेली असेन असंही मितालीने स्पष्ट केलंय. मितालीच्या योगदानाची, कारकीर्दीची, विक्रमांची चर्चा होईलच. पण सामाजिक दृष्टिकोनातून तिचं खेळणं किती महत्त्वाचं आहे याचा विचार करायला हवा.
मितालीने निवृत्तीचा निर्णय जाहीर केला त्याच दिवशी मिंट वृत्तपत्राने लाँग रीड या त्यांच्या रिपोर्ताज स्टाईल दोन पानी लेखात महिलांचं नोकरीतलं प्रमाण कसं कमी होतंय, त्यांच्या आरोग्याची कशी हेळसांड होतेय, स्त्रियांचा बहुतांश वेळ घर सांभाळण्यातच कसा जातोय, असा एक रिपोर्ताज अलीकडे प्रसिद्ध झालेल्या राष्ट्रीय कौटुंबिक सर्वेक्षणाच्या निमित्ताने केला.आपल्याकडे साधारण मुलगी दहावी झाली की तिच्या लग्नाचं सुरू होतं. काही गावांमध्ये तर मुलीची शाळा संपता संपताच तिला बोहल्यावर उभं केलं जातं. तुम्ही सहज आठवून पाहा, पोरं दररोज सोसायटीतल्या जागेत, जवळच्या मैदानात, दूर गावात जाऊन कुठेतरी खेळतात. सुट्टीच्या दिवशी क्रिकेटचा डाव हमखास रंगतो. शिक्षण संपून नोकरीला लागलेली पोरंही क्रिकेट खेळतात. मुली अशा जमून क्रिकेट खेळत असल्याचं तुम्हाला आठवतंय का? शाळेत-कॉलेजात पोरांची क्रिकेट टीम बनते. मुलींची टीम आहे आणि मैदानात सराव सुरू आहे असं चित्र किती नियमितपणे दिसतं? आजही हे चित्र दुर्मीळ आहे. पोरीने शिक्षण पूर्ण करावं, लग्न करावं, संसार थाटावा, मुलांचं संगोपन करावं असं प्रोफॉर्मा आपण अलिखितपणे सेट केलाय.
दमदार काम करणार्या वर्किंग विमेनची संख्या वाढते आहे, ही सकारात्मक गोष्ट आहे; पण आजही मोठ्या प्रमाणावर महिलांना रांधा-वाढा-उष्टी काढा यामध्येच अडकतात. स्वत:च्या कुटुंबाला प्रेमाने जेवू खावू घालण्याच वावगं काहीच नाही; पण संधी मिळाली तर ही मुलगी नोकरीत-व्यवसायात भरारी घेऊ शकते हा विचार सहजतेने होताना दिसत नाही. मुलीला क्रिकेट खेळावं वाटलं तर त्यांना स्वतंत्र जागा मिळू शकेल का, मुलीला मुलांबरोबरीने खेळावं लागेल का, मुलीला खेळताना सुरक्षित वाटेल का, खेळणं हाच करिअरचा पर्याय असेल तर त्यासाठी कोच-अकादमी जवळच्या परिसरात उपलब्ध होईल का, असे सगळे प्रश्न फेर धरून उभे राहतात. क्रिकेट खेळायचं मग शिक्षणाचं काय, लग्न कसं होईल, लग्नानंतर काय ही प्रश्नांची पुढची मालिकाही सज्ज असते.
मितालीने खेळायला सुरुवात केली तेव्हा हे सगळे प्रश्न आ वासून उभे होते. तिने आणि तिच्या घरच्यांनी प्रश्नांचा सामना केला, मुलीला क्रिकेट खेळताना पाहून चक्रावणार्या नजरांचाही मितालीने सामना केला. क्रिकेट खेळणं आवडतंय हे समजल्यावर मितालीने तो ध्यास आयुष्यभर जपला. सामाजिक, आर्थिक अडथळे येत राहिले पण तिने माघार घेतली नाही.
भारतीय महिला क्रिकेटचा विचार दोन टप्प्यांत करावा लागतो. बीसीसीआयने महिला क्रिकेटला छत्रछायेखाली घेतलं तो एक काळ आणि त्यापूर्वीचा काळ. महिला क्रिकेटची स्वतंत्र संघटना आणि कारभार होता. संसाधनं मर्यादित होती. महिला क्रिकेटपटू ट्रेनने प्रवास करायच्या. मानधन जेमतेमच असायचं. सरावासाठी मैदान उपलब्ध होतानाही अडचणी यायच्या. स्टेडियममध्ये आजही स्वच्छ टॉयलेट नसतात. त्या काळात तर ही सुविधा शक्यच नव्हती. स्पर्धेसाठी जायचं झालं की साध्या हॉटेलमध्ये मुक्काम असायचा. करारबद्ध नसल्याने आर्थिक स्थैर्य नव्हतं. महिला क्रिकेटचे सामने टीव्हीवर अभावानेच दिसायचे. या सगळ्यामुळे महिला क्रिकेटच्या सामन्यांचं वृत्तांकनही नगण्य स्वरुपाचं होतं. प्रचंड घुसळणीनंतर २००६मध्ये बीसीसीआयने महिला क्रिकेटला आपल्या ताफ्यात समाविष्ट केलं. चांगल्या हॉटेलात वास्तव्य, सरावासाठी उत्तम सुविधा, दुखापतींच्या व्यवस्थापनासाठी एनसीए असं सगळं मिळू लागलं. विमानाने प्रवास होऊ लागला. विदेश दौर्यांची संख्या वाढली. खेळाडूंना करारबद्ध करण्यात आलं. देशांतर्गत महिलांच्या वयोगट स्पर्धा वाढल्या. मुलींना कोचिंग देणार्या प्रशिक्षकांची संख्या वाढली. मिताली राज-झूलन गोस्वामी यासारख्या खेळाडूंच्या कामगिरीमुळे मुली क्रिकेट खेळायचा विचार करू लागल्या.
असं म्हणतात की एक पिढी खस्ता खाते. त्यांना हरघडी ठोकर बसते. संघर्ष करायचाही कंटाळा येईल अशी परिस्थिती असते. मिताली त्या पिढीची आहे. पण या सगळ्या अनुभवांनी ती कटू झाली नाही. देशासाठी सर्वोत्तम कामगिरी करण्याची मशाल तिने नव्या पिढीला दिली. आपला अनुभव युवा खेळाडूंमध्ये वाटला. नव्या क्रिकेटपटू मितालीचा उल्लेख मितूदीदी असा करतात. मॅडम वगैरे करत नाहीत.
वय वाढत असलं तरी कामगिरीत सातत्यामुळे युवा खेळाडूंसमोर तिने आदर्श ठेवला. टेस्ट, वनडे आणि ट्वेन्टी२० तिन्ही प्रकारात मितालीची बॅट तळपत राहिली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दोन दशकं खेळायचं तर खेळ आणि फिटनेस दोन्हीमध्ये कमालीचं सातत्य हवं. मितालीने दोन्ही आघाड्या समर्थपणे सांभाळल्या. वीसहून अधिक वर्षांची कारकीर्द असलेल्या खेळाडूंच्या मांदियाळीत सचिन तेंडुलकर, जावेद मियांदाद, सनथ जयसूर्या यांच्या बरोबरीने मिताली राजचं नाव आहे. मिताली भारतासाठी २२ वर्ष आणि २७४ दिवस खेळली आहे.
वनडेत मितालीचं ५०.६ हे अॅव्हरेज धोनीच्या आकडेवारीशी साधर्म्य राखणारं आहे. वनडेत सर्वाधिक रन्स तिच्याच नावावर आहेत. तब्बल १५५ सामन्यांत मितालीने भारताचं नेतृत्व केलं आहे. यापैकी जवळपास ६० टक्के सामन्यांत भारताने विजय मिळवला आहे. धोनी, गांगुली, अझरुद्दीन या भारताच्या यशस्वी कर्णधारांच्या यादीत मितालीचं नाव आहे. टेस्ट क्रिकेटमध्ये भारतासाठी द्विशतक झळकावणारी ती एकमेव महिला क्रिकेटपटू आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक कॅच तिच्या नावावर आहेत. सहा वर्ल्डकप स्पर्धांमध्ये मितालीने भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे. विक्रमांची ही यादी न संपणारी आहे. माणसाचं काम बोलायला हवं, मितालीची आकडेवारी पुरेशी बोलकी आहे.
मिताली भरतनाट्यम शिकली आहे. मितालीच्या तामीळ कुटुंबात कोणी खेळणारं नव्हतं. तिच्या आईवडिलांचा भक्कम पाठिंबा मोलाचा आहे. ब्रेकफास्ट विथ चॅम्पियन्स या कार्यक्रमात मितालाची मुलाखत झाली होती. माणसं मोठी झाली की अशी औपचारिक होतात किंवा व्हावं लागतं. या कार्यक्रमात मिताली खळखळून हसताना दिसते. ही मुलाखत अगदी अलीकडची आहे. कारकीर्दीत सगळं कमावून झाल्यानंतरची आहे. वेळ झाल्यास युट्यूबवर ही मुलाखत नक्की पाहा.
पुढच्या वर्षी महिलांचं आयपीएल होऊ शकतं. महिला क्रिकेटसाठी हा एक मोठा टप्पा असेल. महिला क्रिकेटला इथवर आणणारे जे अव्वल शिलेदार आहेत त्यापैकी मिताली एक आहे. महिला आयपीएलच्या निमित्ताने मिताली आपल्याला कॉमेंटेटर, कोच किंवा अन्य कुठल्याही जबाबदारीत दिसू शकते. मिताली शब्दाचा अर्थ होतो मैत्र. क्रिकेटशी असलेल्या घट्ट मैत्राचा यापेक्षा चपखल उदाहरण नाही.