तुम्हाला कोणी निवडणुकीचे तिकीट दिले तर काय कराल?
– दयानंद लोणारे, अमळनेर
दुसर्याला विकून टाकेन ताबडतोब.
काश्मीरमध्ये जागा विकत घेऊन रिसॉर्ट बांधण्याची माझी फार तीव्र इच्छा आहे… तुम्ही या उद्योगात माझे भागीदार बनाल का?
– अमर डोईफोडे, मिरज
मुंबईत बरं चाललंय माझं!
वेधशाळेचा पावसाचा अंदाज हमखास चुकणार, हा आपला अंदाज नेहमी कसा बरोबर येतो?
– वैदेही गाडगीळ, सातारा
दुसर्याची सातत्याने चूक होतेय, त्यात तुमचा अंदाजाचा प्रश्न कुठे आला?
मला कधीच न तोट्यात जाणारा, सतत वाढता नफा देणारा, रोज गोण्या भरून पैसे देणारा व्यवसाय करायचा आहे. मी कोणता व्यवसाय करावा, काही सजेशन?
– बशीर मुनव्वर, कोल्हापूर
बँकांमध्ये चोरी करा किंवा दरोडे घाला.
निवडणुका आल्या की राजकारणात घोडेबाजार होतो, असं म्हणतात; घोड्यांच्या भावना दुखावणार नाहीत का हो असं बोलल्याने? त्यांनी काय करावं?
– रामदास मोरे, रविवार पेठ, पुणे
नाही दुखावणार.
आंब्याचा भाव २०० रुपये डझन असेल आणि एक भिंत रंगवायला पाव किलो डिस्टेंपर लागत असेल, तर हिटलरच्या मिशीत केस किती?
– यामिनी कोल्हे, शिक्रापूर
सात.
कै. पु. ल. देशपांडे यांची दाद अनेक कलावंतांना उभारी देऊन जायची. तुम्हाला कधी त्यांच्यासमोर कला सादर करण्याची, त्यांना भेटण्याची संधी मिळाली का? त्यांची दाद मिळाली का?
– वसंत वर्तक, आचोळे
नाही मिळाली ती संधी.
पुलंच्या कोणत्या नाटकातली कोणती व्यक्तिरेखा सादर करण्याची तुमची फार मनापासूनची इच्छा आहे?
– मैथिली साने, नागपूर
चितळे मास्तर
अशोक सराफ यांची नुकतीच पंचाहत्तरी झाली. त्यांनी साकारलेली कोणती व्यक्तिरेखा तुम्हाला सगळ्यात जास्त आवडते?
– सुशांत गायकवाड, आंबोली
धुमधडाकामधली.
तुम्ही नटसम्राट साकारलात तर तुमच्या सरकार कोण असतील?
– दिलीप कांबळे, बेलापूर
वीणा जामकर
अतिशय आनंदाच्या क्षणी आणि अतिशय दु:खाच्या क्षणी आपल्या मनात एखादं गाणं रुंजी घालू लागतं… अशी तुमच्या मनात रुंजी घालणारी गाणी कोणती?
– जया महामिने, अमरावती
खूप आहेत… लताबाईंची.
स्त्रीचं सौंदर्य जन्मजात असेल तर त्यात तिचं कर्तृत्त्व काय, असं म्हणतात… पण कलाकारांचे कलागुणही जन्मजातच असतात की… त्यांना श्रेष्ठत्व का द्यायचं?
– रोनिटा गोन्साल्विस, वांद्रे
गुण जन्मजात असला तरी त्याला संधी मिळणं आणि खुद्द कलावंताने त्यावर काम करणं हेही तितकेच महत्त्वाचे आहे.
रेल्वे स्टेशनांवर ‘यह स्टेशन आपकी संपत्ती है’ असं सांगून ‘इसे साफसुथरा रखने में अपना सहयोग दे’, अशी उद्घोषणा करतात. मग लोक सगळीकडे कचरा फेकतात, थुंकतात… ही घोषणा बदलायला नको? काय बदल सुचवाल तुम्ही?
– रेवणनाथ साळुंके, जेजुरी
खरं तर ये रेल्वे स्टेशन आपका घर है, यहां थुकना, कचरा फेंकना आपका अधिकार है. इसे गंदा करने में हमारा सहयोग दें, अशी घोषणा असायला हवी रेल्वेची.