इस्लामचे प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल अवमानकारक टिप्पणी केल्यानंतर नूपुर शर्मा या भाजपच्या प्रवक्तीवर पक्षाने निव्वळ निलंबनाची कारवाई केली… तीही काही दिवसांनी, अरब राष्ट्रांचा आणि आखाती देशांचा दबाव आल्यानंतर. ही कारवाई झाल्यावर राज्याचे माजी मुख्यमंत्री, विद्यमान विरोधी पक्षनेते आणि भाजपचे चाणक्य क्र. २ देवेंद्र फडणवीस यांनी या नूपुरबाईंना फोन करून ‘बेटी, चिंता मत करो’ असा धीर दिला म्हणे! भाजपेयींच्या नेहमीच्या पद्धतीनुसार आपण असे काही केले नाही, असे म्हणून फडणवीस हात झटकू शकतील; पण मुळात त्यांनी नूपुरबाईंना दिलासा देण्याचे कारणच नाही. कारण, बुडत्या भाजपसाठी जी कामगिरी या बाईंनी बजावली आहे ती पाहता, त्यांना लवकरच उच्चपदाची बक्षिसी मिळू शकते, खासदारकीची लॉटरी लागू शकते, मंत्रिपदही लाभू शकते- तेही केंद्रात. काही दिवसांनी ‘चिंता मत कीजिए देवेंद्रजी’ असा दिलासा या बाईच फडणवीसांना देताना दिसल्या, तर आश्चर्य वाटायला नको.
या बाईंनी पैगंबरांविषयी आक्षेपार्ह उद्गार काढले, त्यावेळची पार्श्वभूमी लक्षात घ्या. नुकताच पर्यावरण संतुलन साधून विकास करण्याच्या संदर्भातील जागतिक निर्देशांक जाहीर झालेला आहे. त्यात १८० देशांच्या यादीत भारताचा क्रमांक तळातून पहिला म्हणजे १८०वा आहे. देशात महागाईने उच्चांक गाठला आहे. तिला आळा घालण्यासाठी रिझर्व्ह बँकेने व्याजदरात वाढ केलेली आहे. कर्जे महाग झाली आहेत. रुपया सार्वकालिक नीचांकाला पोहोचला आहे. अर्थव्यवस्थेचे बारा वाजलेले आहेत. सटोडियांचा लाडका सेन्सेक्सही घसरतो आहे. परदेशी गुंतवणूकदारांनी गुंतवणूक कमी करायला सुरुवात केली आहे. कोणत्याही अर्थसाक्षर देशात या सगळ्याने लोक अस्वस्थ झाले असते आणि त्यांनी रस्त्यावर येऊन आंदोलने केली असती. शेवटी भिकेला तेच लागणार आहेत. आपल्याकडे असे काही होण्याची शक्यता नाही. कारण ती शक्यता निर्माण होताच भाजप परिवार हिंदू-मुस्लिम दुहीचा पत्ता टाकतो आणि दोन्हीकडील कट्टरांना उकसवतो. त्यातून निदर्शने, आंदोलने होणे, त्यांना हिंसक वळण लागणे आणि दंगलींचे प्रकार घडतात. मग ‘त्यां’च्यावर जरब ठेवण्यासाठी मोदी आणि योगींसारखे कट्टर हिंदुत्ववादीच सत्तेत हवे आहेत (भले मोदींनी आपल्या कमरेची उरली सुरली लंगोटीही काढून घेतली तरी हरकत नाही) अशी अनेकांची मनोधारणा तयार होते. गोदी मीडिया या नावाने कुख्यात प्रसारमाध्यमे हे भ्रमित करणारे उद्योग भडक पद्धतीने २४ तास दाखवत राहतात आणि देशात फक्त हेच सुरू आहे, असे वातावरण निर्माण करतात.
आपल्याकडे रस्त्यात कुठेही जेसीबी मशीन काही खोदकाम करत असले की रिकामटेकड्यांची फौज दिवसभर ती माती उकरण्याचे निरर्थक कार्य संमोहित झाल्यासारखी पाहात असते. मोदी सरकारने सगळ्या देशाचे रूपांतर अशा रिकामटेकड्यांमध्ये करून टाकले आहे. रोजगार नाहीत, नोकर्या नाहीत, व्हॉट्सअॅपवर फॉरवर्डच्या स्वरूपात येणार्या आयटी सेलच्या प्रचारातील खरेखोटे समजण्याची बौद्धिक कुवत नाही, फक्त हातात मोबाइल आहे आणि त्यावर स्वस्तात डेटा मिळतो आहे, अशा बेरोजगारांच्या फौजा दिवसभर, तहानभूक हरपून ही असली खोदकामे आणि पाडकामे पाहात बसतात. हा मजकूर लिहिला जात असताना उत्तर प्रदेशात ‘दंगेखोरां’वर पुन्हा बुलडोझर चालू लागल्याच्या बातम्या येत आहेतच.
नूपुर शर्मा बाईंच्या बेताल बडबडीने भाजपचे काम सोपे केले आहे. अरब जगताने आणि आखाती देशांनी कान उपटल्यामुळे मोदींच्या सरकारला कशी कारवाई करावी लागली, असे चित्र वरकरणी तयार झाले. पण, जिच्या चुकीमुळे संपूर्ण देशावर हात जोडून माफी मागण्याची वेळ आली तिच्यावर केंद्र सरकारने कोणतीही कारवाई केलेली नाही, तिला साधी अटकही झालेली नाही, हे लक्षात घेतले पाहिजे. देशातील मुस्लिमांच्या ‘श्रद्धा’ देशाबाहेर कुठेतरी असतात, हे भाजपचे एक लोकप्रिय नॅरेटिव्ह आहे (अमेरिकेचे नागरिकत्व स्वीकारलेले यांच्या पक्षाचे समर्थक तिकडचे खाऊन इकडच्या लष्कराच्या भाकर्या भाजत असतात, ते अलाहिदा). आखाती आणि अरब देशांच्या रोषामुळे सर्वसामान्य हिंदूंच्या मनात तेच प्रबळ होणार आहे. शिवाय, या अरब देशांना, आखाती देशांना जगातल्या कोणत्याही मुस्लिमधर्मीय माणसांशी काही देणेघेणे नाही, सर्वधर्मीय ईशनिंदेशीही काही देणेघेणे नाही- फक्त इस्लामची आणि प्रेषितांची निंदा झाली की ती आम्ही खपवून घेणार नाही, बाकी तुम्ही तुमच्या देशातल्या मुस्लिमांवर थेट बुलडोझर घातले तरी हरकत नाही, असा यांचा इस्लाम आहे. भारतीय मुस्लिमांनी त्यांच्या कच्छपि लागण्यात अर्थ नाही.
अरब देशांमध्ये ईशनिंदेचा सोयीस्कर कायदा आहे. आपल्या देशात तो नाही. असताही कामा नये. नाहीतर जेवढी होते तेवढी धर्मचिकित्साही बंद होईल आणि धर्मांधांचे फावेल. त्यामुळे, आमच्या धर्माबद्दल, प्रेषितांबद्दल चकार शब्द काढाल, तर सर कलम करू, वगैरे धमक्या देण्यानेही भारतीय मुस्लिमांचे नुकसानच होणार आहे. त्यांची एकारलेली प्रतिमा बळकट करण्यासाठीच भाजप याचा दुरुपयोग करणार, यात काहीच शंका नाही. मोदींच्या सरकारचे राज्य कारभाराच्या सर्व पातळ्यांवरचे अपयश झाकण्यासाठी आता त्यांच्याकडे दोनच आधार आहेत… अयोध्येतील राम मंदिराचे लोकार्पण आणि हिंदू-मुस्लिम दंगलींना चिथावणी. यातले दुसरे काम नूपुर शर्मा यांच्या उद्गारांनी सोपे केले आहे… त्यांना कोणीच ‘बेटी, चिंता करू नकोस,’ म्हणून दिलासा देण्याची गरज नाही… त्या आता कायमच्या चिंतामुक्त झाल्या आहेत… आपल्याला मात्र हा देश टिकवण्यासाठी चिंताही केली पाहिजे आणि योग्य वेळी योग्य कृतीही केली पाहिजे.