बाळासाहेबांच्या व्यंगचित्रांची कल्पना, त्यांचे काँपोझिशन, रंगसंगती, व्यक्तिचित्रण आणि त्या सगळ्यातून निर्माण केलेले जिवंत नाट्य याचा अभ्यास आजच्या पिढीचे व्यंगचत्रिकारही करतात आणि त्यातून काही ना काही शिकतात. असंच शिक्षण देणारं हे एक व्यंगचित्र. इथे ग्रहणाच्या काळोखाने चित्राचा वरचा एक तृतियांश भाग व्यापला आहे, त्याखाली करडे ढग आहेत आणि खाली स्वच्छ पांढरी पार्श्वभूमी… पण त्यावर चितारलेल्या सामान्यजनांची चित्रे वरचा काळोखच खाली आलेला आहे, याची भीषण जाणीव करून देतात. भारतीय जनतेने लढा देऊन मिळवलेल्या स्वराज्याला कसे भ्रष्टाचार, महागाई आणि अन्नधान्याच्या टंचाईचे ग्रहण लागले आहे, हे बाळासाहेबांनी मोजक्या फटकार्यांमधून जिवंत केलं आहे… सर्वसामान्य जनतेला भिकारी बनून दे दान, सुटे गिराण, दे अन्नदान, दे वस्त्रदान, अशी भीक मागावी लागत आहे, असं जळजळीत चित्रण त्यांनी केलं आहे… आज आपल्या आठ वर्षांच्या राजवटीत लाजिरवाणे काही घडलेच नाही, असा दावा करणार्या पंतप्रधानांच्या काळात देशाची सर्व निर्देशांकांवर पिछेहाट झाली आहे, महागाई गगनाला भिडत चालली आहे… पण, युक्रेनमध्ये युद्ध झालं म्हणून आपल्या देशात महागाई वाढली, असं व्हॉट्सअॅपज्ञान पाजळणार्या सर्वसामान्यांच्या बुद्धीवर पडदा पडला आहे, हे ग्रहण अधिक घातक आहे.