ओडिशा राज्यातील कंधमाल येथे एका प्रचारसभेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी बिजू जनता दलाचे नेते व मुख्यमंत्री नवीन पटनायक हे कसे अज्ञानी आहेत हे सांगण्यासाठी भाषणात एक पंच फेकला; पण तो त्यांच्यावरच उलटला. नवीनबाबूंना ओडिशाचा साधा भूगोल देखील माहीत नाही असे सांगताना मोदी म्हणाले, ‘नवीनबाबू जे इतक्या वर्षांपासून ओडिशाचे मुख्यमंत्री आहेत, त्यांना मी आव्हान देतो की त्यांनी कोणताही कागद मदतीसाठी हातात न घेता ओडिशाच्या सर्व जिल्ह्यांची नावे तसेच त्या जिल्ह्यांच्या राजधानींची नावे सांगून दाखवावीत.’ एकतर इतके वर्षे मुख्यमंत्रीपदी असलेली व्यक्ती जिल्ह्यांची नावे नक्कीच सांगू शकते. पण जिल्ह्याची स्वतःची अशी राजधानीच नसते, तर ती नावे आणायची कोठून? पंतप्रधान भाषणाच्या ओघात काहीतरी बोलून गेले, पण सोशल मीडिया व विरोधकांना टीकेला एक विषय मिळाला. जिल्ह्याची राजधानी हा विषय चर्चेत आला. अर्थात जिल्ह्याला जशी राजधानी नसते, तशीच अधिकृतपणे ह्या देशाला ‘आर्थिक राजधानी’ देखील नसते, पण तरी देखील गेली कित्येक वर्ष भारताची आर्थिक राजधानी हे बिरुद मुंबई अभिमानाने बाळगून आहे.
मुंबई महाराष्ट्र राज्याची राजधानी आणि देशाची आर्थिक राजधानी तर आहेच, शिवाय हिंदी सिनेमाची राजधानीही आहे, टीव्ही उद्योगाचीही राजधानी आहे. मुंबईचे हे मोठेपण अनेकाना खुपते आणि त्यातील काहींना मुंबईचे महत्व कमी करायचे आहे. पण कोणाच्या कितीही मनात आले तरी देशाची आर्थिक राजधानी दुसरीकडे नेण्यात यश येणार नाही. मुंबई देशाची आर्थिक राजधानी रातोरात, आपोआप झालेली नाही किंवा कोणत्याही केंद्र सरकारची मेहेरनजर झाली म्हणून देखील झालेली नाही. हे मोठे स्थान मिळवताना मुंबई नगरीला आणि इथल्या मूळ मराठी जनतेला बरेच घाव सोसावे लागले आहेत, स्वतःत बदल घडवावे लागले आहेत. सुरुवातीपासूनच नैसर्गिक बंदराचे जे वरदान आहे ते मुंबईचे महत्व जागतिक पातळीवर नेण्यात कारणीभूत ठरले आहेच पण त्यासोबत इतर असंख्य लहानमोठ्या बाबी देखील कारणीभूत आहेत. मुंबई शहराची म्हणजेच मराठी माणसाची उदार मानसिकता देशभरातील सर्व बहुढंगी व्यक्ती व समूह यांना सामावून तर घेतेच पण त्याना इथे समान संधी देखील मिळते. स्थानिक व उपरे असा इथे अतितीव्र भेदभाव नाही (अनेक परप्रांतीय मंडळी मराठीचा एक शब्दही न शिकता मुंबईत आयुष्य काढू शकतात, असे देशातल्या नव्हे, जगातल्या कोणत्याही इतर शहरात होत नसेल). अर्थात, असे उदारमतवादी देश व शहरेच जगभरात प्रगत झाल्याचे दिसते.
मुंबई शहरात अठरापगड जाती व भाषा बोलणार्यांची लोकवस्ती एकमेकांसोबत गुण्यागोविंदाने रहात आहे. निव्वळ योग्यता, परिश्रम व जिद्दीच्या बळावर इथे कोणत्याही जाती, धर्म अथवा वर्गाच्या व्यक्तीला अद्भुत यश मिळवता येते, म्हणून ही अशक्यप्राय स्वप्नं पूर्ण करून दाखवणारी स्वप्ननगरी आहे. मुंबईचे आजचे यश अशा अनेक व्यक्तींच्या अद्भुत यशाच्या एकत्रीत बळाने मिळवलेले आहे. ते लोकसहभागातून आलेले आहे. कोणीतरी आपडो माणूस ‘७, लोककल्याण मार्ग’ येथे (पंतप्रधानांच्या विद्यमान निवासस्थानी) बसला आहे म्हणून मुंबई प्रगत झालेली नाही.
अहमदाबादला मुंबईच्या पुढे नेत आर्थिक राजधानी बनवण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे एक छुपे स्वप्न आहे आणि ते एक गुजराती व्यक्ती म्हणून अजिबात चुकीचे नाही. प्रत्येकाने आपल्या राज्याला आणि शहराला सर्वोच्च स्थानी नेण्याचे स्वप्न जरूर पाहावे. पण कोणती तरी जादूची कांडी फिरवून अशी स्वप्ने वास्तवात उतरवणे शक्य नसते. मोदी मात्र आपल्याकडे पंतप्रधानपद आले ते जणू गुजरातला देशात नंबर वन बनवण्यासाठी जादूची कांडी बनूनच आले आहे असा विचार करून अहमदाबादला आर्थिक राजधानी बनवण्यासाठी झुकते माप देऊन जमेल ते सर्व प्रयत्न करू पाहात आहेत (आणि मोदीचरणी अक्कल गहाण ठेवलेले मराठी गांडा भाई महाराष्ट्राला खच्ची करण्याच्या या प्रयत्नांवर टाळ्या पिटत आहेत, ते करणार्यांना महापुरुष, विश्वगुरू मानत आहेत). पण त्यात दहा वर्षात फारसे काही झाले नाही.
साधा विचार करा, ज्या राज्यात आणि शहरात शाकाहाराचे अवास्तव स्तोम आहे, त्यात देशातील सत्तर टक्के जनता कशी येईल? ती मांसाहारी आहे. मांसाहारी म्हणजे कोणी पापी आहेत, अशा नजरेने पाहणार्यांच्या शहरात बाकीचे पाय का ठेवतील? त्यासाठी सर्वसमावेशकता असावी लागते. आर्थिक राजधानी बनण्यासाठी आधी मागासलेली मानसिकता बदलली पाहिजे. कोणत्याही शहराला देशाच्या नकाशावर येण्यासाठी असे अनेक त्याग करावे लागतात, हृदय विशाल ठेवावे लागते. स्थानिक आणि उपरा हा दुजाभाव सोडावा लागतो. मुक्त अर्थव्यवस्थेला पोषक असे व्यक्तिस्वातंत्र्य, आहारस्वातंत्र्य द्यावे लागते. ते तुमच्या रक्तात असावे लागते. अशा शहरात देशातील सर्व राजकीय व धार्मिक विचारांना वाव असावाच लागतो. हे सर्व सतत शाकाहाराग्रही हिंदुत्वाचा गरबो रमवणार्या एकरंगी अहमदाबादमध्ये आपोआप येणे आज अशक्यप्राय आहे. आमच्याकडे भरपूर मोकळी जागा आहे आम्हाला आर्थिक राजधानी बनवा इतके सोपे झाले असते तर मग कच्छच्या वाळवंटातच विकासगंगा वाहू लागली असती की! मोकळ्या जागेची नक्कीच गरज असते पण त्या एकाच गोष्टीवर किती मजल मारता येईल? फुकट जागा व वीज देऊन, मुंबईतील मुख्यालये हलवून अहमदाबादची मुंबई होत नसते, त्यासाठी उदारमतवादी संस्कृती जोपासावी लागते.
मुंबई आज जी आहे ती जागेची कमतरता असून देखील यशस्वी आहे, कारण इथे दाटीवाटीने राहावे लागले तरी स्वातंत्र्य आणि सुरक्षितता आहे. तुम्ही काय खाता, काय पिता, कोणत्या देवाची प्रार्थना करता या व इतर खाजगी बाबींची नस्ती उठाठेव कोणी करत नाही. अडचणीत मदत करताना मागे पुढे न पहाणारी मुंबई दैनंदिन व्यवहारात जातपात देखील बघत नाही. जागेची कमतरता ही मुंबईची कमजोरी न ठरता बलस्थान ठरले आहे. कमतरता असल्यानेच इथले जागेच, फ्लॅटचे भाव कधी गडगडून खाली पडले नाहीत त्यामुळेच इथल्या प्रत्येक इंच जागेला सोन्याचा भाव असणे हे बलस्थान ठरले आहे. कवडीमोलाने अमाप जागा वाटणारे स्वतःची कमजोरी बलस्थानात बदलून दाखवण्याचे हे कसब समजू शकत नाहीत.
मुंबईत पैसा अमाप असला तरी असमानता देखील मोठी आहे. त्यामुळेच येथील सरकार व पालिकेने कायम गरीबाला केंद्रस्थानी ठेवूनच विकास केला आहे. मुंबईत आज देखील उत्तम शिक्षण फुकट देणार्या सरकारी शाळा आहेत. उत्तम उपचार देणारी सरकारी व पालिकेची रुग्णालये आहेत. मुंबईच्या सरकारी शाळेत दहावी शिकलेला देखील उत्तम इंग्लिश बोलू शकतो. ही वरवर साधी वाटणारी बाब, पण यशासाठी अशा अनेक साध्या गोष्टी गरजेच्या असतात. आम्ही फक्त आमच्याच भाषेत बोलणार हा हेकटपणा येथे नाही. समोरच्याला मराठी येत नसेल तर इथला स्थानिक त्याला सांभाळून घेतो. मुंबईकडून देशाने, खासकरून अहमदाबादने घेण्यासारखे असे अनेक गुण आहेत ते जरूर घ्यावेत; नुसती उद्योगधंदे व सरकारी कार्यालये यांची पळवापळवी करून मोठे होता येईल का?
अशी पळवापळवी करून संपवायला मुंबई ही फक्त आर्थिक राजधानी नाही तर ती स्वप्ननगरी म्हणून ओळखली जाते. पाच दहा वर्षांत कोट्याधीश व्हावे असे स्वप्न उराशी बाळगून देशातील कोणत्याही भागातून एखाद्याने खिशात एक रुपया देखील नसताना इथे यावे आणि त्याचे ते स्वप्न प्रत्यक्षात उतरावे, असे वास्तवात फक्त मुंबई शहरातच घडू शकते. एखाद्याने कोणतीच पार्श्वभूमी नसताना चित्रपट नट वा नटी व्हायचे स्वप्न बाळगून यावे आणि ते खरे व्हावे असे मुंबईतच घडू शकते. स्वप्न प्रत्यक्षात उतरतात म्हणून ही स्वप्ननगरी. सबंध देशाला रोज दोन घटका करमणुकीचा निवांतपणा व आनंद देण्याचे काम हे याच शहरातून होते.
योगी आदित्यनाथ यांना ही मायानगरी उत्तर प्रदेशला न्यायचे स्वप्न पडले होते. त्यांना कोण समजावणार की चित्रपट बनवण्यासाठी वेगळे वातावरण लागते, विविध रंग लागतात. ते एकसुरी, रटाळ आध्यात्मिक चॅनेल चालवणे नव्हे. मुंबई देशातील सर्वात मोठे समुद्र वाहतुकीचे बंदर आहेच, पण देशातील पहिली रेल्वेही मुंबई ते ठाणे धावली, देशातील पहिला विमानतळ जुहूला झाला आणि पहिले विमान देखील या नगरीतूनच उडाले. शहरी बसमधून लोकांची ये जा पहिल्यांदा मुंबईत सुरू झाली. हे पाहता मुंबईला देशातील नागरी दळणवळणाची जननी म्हणता येते.
मुंबईमधून एक दोन संस्था हलवल्याने अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेल्यांना मुंबईत काय काय आहे याची वरवर कल्पना असावी. देशाचे दोन महत्वाचे शेअर बाजार व रिझर्व्ह बँक मुख्यालय मुंबईत आहेत. अनेक बँका, वित्तीय कंपन्या, उद्योग समूह, विमा कंपन्या यांची मुख्यालये मुंबईत आहेत. भाभा अणु ऊर्जा केंद्र, ओएनजीसीचे बॉम्बे हाय, टाटा मूलभूत संशोधन संस्था, अनेक वैद्यकीय, अभियांत्रिकी तसेच इतर अभ्यासक्रम देणारी महाविद्यालये, पश्चिम व मध्य रेल्वेची मुख्यालये, देशातील सर्वात जास्त गजबजलेला आंतरराष्ट्रीय विमानतळ, परदेशी वकिलाती, मोठ मोठे कायदेतज्ञ, चित्रपटसृष्टी, मोठ मोठे बांधकाम व्यावसायिक, कृषी बाजार, हिरे व्यापार… काय नाही या मुंबईत? आपली जन्मभूमी आणि कर्मभूमी गुजरात आहे, असे सांगणारे मुकेश अंबानी देखील आपला तळ मुंबईतच ठेवून आहेत, ते काही अहमदाबादमध्ये अँटिलिया बांधत नाहीत, यावरून काय ते ओळखा.
देशातील सर्वाधीक गर्भश्रीमंत उद्योगपती जिथे राहतात त्या मुंबईची ओळख देशाची सर्वात जास्त लोकसंख्या असलेले शहर ही देखील आहे. कारण इथे सर्वांना काम मिळते. देशात पुरुषाइतकेच महिलेला देखील रोजगार या शहरातच मिळू शकतो. स्वातंत्र्यपूर्व काळात अॅलिस ट्रेडवेल या ब्रिटिश महिलेचे पती रेल्वेचे कंत्राटदार होते. अचानक झालेल्या पतीनिधनानंतर त्यानी ब्रिटनला परत न जाता या बाईंनी आपल्या नवर्याने घेतलेले मुंबई-पुणे मार्गातील बोरघाटाचे कंत्राट पूर्ण केले. अगदी तेव्हापासून मुंबई महिलांना व्यवसाय व रोजगाराची संधी देत आहे. देशात महिलांना व्यवसाय व रोजगाराच्या समान संधी उपलब्ध करून देणारे मुंबईच्या तोडीचे शहर सापडणार नाही. महिला इथे सुरक्षित आहेतच, पण शिकल्या आहेत, कमावत्या आहेत, स्वतंत्र बाण्याच्या आहेत.
नुकतेच गुजरातच्या एका ११ वर्षांच्या मुलाचे यकृत प्रत्यारोपण मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयात झाले. देशातील पहिले किडनीचे प्रत्यारोपण १९६५ साली केईएम रुग्णालयात झाले. फुफ्फुस प्रत्यारोपण जे सर्वात अवघड समजले जाते ते देखील सर्वप्रथम मुंबईच्या हिंदुजा इस्पितळात २०१२ साली झाले. देशभरातील कर्करुग्णांना जीवनदान देणार्या टाटा कर्करोग रूग्णालयासह, केईएम, जे.जे., सायन, नायर अशा रुग्णालयांत सबंध भारतातून रुग्ण आलेले दिसतात. ते पाहता देशाची वैद्यकीय राजधानी देखील मुंबई आहे असे म्हणावेच लागते.
आपल्या या लाडक्या मुंबईचे गुणगान गावे किती? पहाटे चारपासून रात्री दोनपर्यंत मुंबईच्या लोकलमधून कधीही प्रवास करा, फक्त कामसू लोक दिसतील. रामाइतकेच कामावर प्रेम करणारी इथली जनता आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी व तदनंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी ही मुंबई तळहातावरील फोडासारखी आजवर जपली आहे. संकटात हे पितापुत्र धावून गेले आहेत. मुंबईची विविधता यांनी कायम जपली आहे, तिचे सामर्थ्य यांनी कायम वाढवलेले आहे. पण आता मात्र ही मुंबई जणू काही सोन्याची खाण समजून तिची लुटालूट करणारे आयत्या बिळावरचे नागोबा बिळातून बाहेर पडले आहेत. पद्धतशीरपणे मुंबईचे प्रत्येक क्षेत्रात खच्चीकरण केले जात आहे. मुंबई या नागोबांच्या तावडीतून काढायची असेल तर आता शिवसेनेकडे फक्त मुंबईची सत्ता सोपवून पुरेसे नाही, तर दिल्लीत देखील सत्तेत सहभाग आवश्यक आहे. केंद्रात मुंबईबद्दल आकस नसणारे सरकार आज हवे आहे. मुंबईचे मतदार सुज्ञ आहेत आणि ते ही जबाबदारी ओळखून मतदान करतीलच. मुंबई कायम शिवसेना आणि ठाकरे कुटुंबीयावर विश्वास ठेवत आलेली आहे, ती तो परत एकदा दाखवेलच. मुंबई व आजूबाजूच्या ठाणे, कल्याण, पालघर परिसरात २० मे रोजी लोकसभेची निवडणूक होणार आहे. जुलमी ब्रिटिशांच्या विरोधात ‘चले जाव’चे रणशिंग जिथून फुंकले गेले, त्याच मुंबईवर आता देशातील लोकशाहीच्या दुष्मनांनाही हुसकावून लावण्याची जबाबदारी पार पाडावी लागणार आहे. इतर सर्व जबाबदार्यांप्रमाणे मुंबई ही जबाबदारीही समर्थपणे पार पाडेलच, याची खात्री आहे.