नाटककार गंगाराम गवाणकर लिखित ‘वस्रहरण’ नाटकाला व्यावसायिक रंगभूमीवर प्रगटून ४४ वर्षे उलटली. रत्नाकर मतकरींच्या ‘अलबत्या-गलबत्या’ या बालनाट्याला ४९ वर्षे झाली. केदार शिंदे याच्या ‘सही रे सही’ला २३ वर्षे पार झाली. प्रशांत दळवी याच्या ‘चारचौघी’ला ३३ वर्षे पूर्ण झाली आणि देवेंद्र पेम याच्या ‘ऑल द बेस्ट’लाही ३१ वर्षे झालीत. ही पाचही नाटके एक काळ उलटला, तरीही रंगभूमीवर ‘हाऊसफुल्ल’ गर्दी खेचत आहेत. या नाटकांचे निर्माते, तंत्रज्ञ, कलाकार बदलले तरी ही नाटके कालबाह्य झालेली नाहीत. नव्या दमात सुरूच आहेत. ही नाटके म्हणजे मराठी रंगभूमीवरले पन्नास वर्षाचे दीपस्तंभ म्हणून सार्यांना खुणावतात, ज्यांच्याकडे महाविक्रमी किताब चालून आलाय.
नव्या विक्रमांवर विक्रम प्रस्थापित करण्यासाठी २०२४ या नव्या वर्षात पुन्हा एकदा ‘ऑल द बेस्ट’ रसिकांपुढे आलंय. ३१ डिसेंबर १९९३पासूनचा या नाटकाचा रंगप्रवास म्हणजे एखाद्या महाकादंबरीचा विषय ठरेल. स्पर्धेत उमेदवारी करणार्या कलाकारांना या नाटकाने ‘सुपरस्टार’ बनविले. रंगमंचावरून चित्रपटापर्यंत पोहचविले. भरत जाधव, अंकुश चौधरी, संजय नार्वेकर आणि संपदा जोगळेकर ही मूळची टीम. भरत यात मुक्याची तर संजय बहिर्याची आणि अंकुश आंधळ्याची भूमिका करायचे. पुढे दीपा परब हिनेही यात भूमिका केली. दीपा आणि अंकुश हे एकाच कॉलेजचे. महर्षी दयानंद कॉलेजपासून त्यांची मैत्री पुढे नाटकातही एकत्र आली आणि ‘ऑल द बेस्ट’ करीत दोघांचे लग्नही झाले! या नाटकाने एक प्रेमविवाह जमण्यास मदतच केलीय. यातले तिघेही कलाकार ‘फिल्मस्टार’ बनले. आजही ‘ऑल द बेस्ट’ म्हटलं की त्यांना भरून येतं. कारण त्यांच्यातील कलाकाराचे तेच कूळ आणि मूळ आहे. कलाकारांच्या आयुष्याला ‘ऑल द बेस्ट’ करणारे हे नाटक सिद्ध झालं. हौशी स्पर्धेची रंगभूमी ते व्यावसायिक नाटके, चित्रपट इथपर्यंतचा हा प्रवास या नाटकाने घडवून आणला.
मूळची ही एकांकिका असल्याने कथानकाचा जीवही एकांकिकेप्रमाणेच आहे. तिघे जिवलग दोस्त. पण तिघांमध्ये शारीरिक व्यंगं आहेत. विजय हा आंधळा, दिलीप मुका आणि चंदू हा बहिरा. जगापुढे वावरताना तिघेही आपली व्यंगं लपविण्याचा प्रयत्न करतात. तिघांचा दोस्ताना पक्का. एकमेकांना सांभाळून घेण्याची त्यांची प्रवृत्ती. एक सुंदरी मोहिनी एके दिवशी यांच्याकडे येते आणि तिघेही या मोहिनीच्या प्रेमातच पडतात. तिघेही तिला पटविण्याचा प्रयत्न करतात. विजय अंध असूनही डोळस असल्याचे भासवितो. मुका असलेला दिलीप हा प्रेम प्रगट करण्याची धडपड करतो आणि बहिरा असलेला चंद्रकांत (चँग) हा सारं काही ऐकू येतंय, असा अभिनय करतो. मोहिनी त्यांची स्वप्नसुंदरी बनते, ती देखील त्यांच्याशी संवाद साधते. खरं तर या तिघांची व्यंगे तिला पुरेपूर ठावूक असतात, पण ती दुखावत नाही. अखेरीस प्रकरण लग्नापर्यंत पोहोचते. पुढे काय होतं हे मराठी नाट्यरसिकांच्या दोन पिढ्यांना माहिती आहे, पुढच्या पिढीने तो अनुभव रंगमंचावरूनच थेट घ्यावा. अपंगत्वापेक्षा कर्तृत्व लाखमोलाचे, आत्मविश्वास महत्वाचा, हा एक मेसेज देण्याचा प्रयत्न या नाटकात आहे.
हे कथानक रसिकांना पुरेपूर ठाऊक असूनही रसिक आज ३१ वर्षानंतरही हाऊसफुल्ल गर्दी करतात. याचं कारण संहितेत असणार्या गाळलेल्या जागांचे सादरीकरण! मुका, आंधळा आणि बहिरा यांचे इम्प्रोव्हायझेशन अवघडच. पण त्यातला गोंधळ, गडबड, समज-गैरसमज, साद-पडसाद ज्या प्रकारे पुढे येतो, त्यातून हसून हसून पुरेवाट होते. दिग्दर्शक देवेंद्र पेम यांची मूळ कल्पनाच भन्नाट आहे, जी त्यांनी सफाईदारपणे मांडली आहे. नाट्याचा वेग हा ‘एक्स्प्रेस’ गाडीला मागे टाकणारा आहे. नाट्य कुठेही क्षणभरही संथ होत नाही. हशा-टाळ्या यांची एकही जागा हुकत नाही. लेखक-दिग्दर्शकाला सलाम! या नव्या प्रयोगाची तालीम भरपूर झाल्याचेही दिसते. बर्याच तालमी झाल्याशिवाय कलाकारांमध्ये इतका परफेक्टनेस येत नाही. प्रयोग वेगवान आणि बंदिस्त झालाय. नाटकातलं नाटक हा ‘अॅक्शन ड्रामा’ असल्याने तालीम ही जणू संहिता ठरते. पेपरवर्क किंवा संहितेपेक्षा सादरीकरण हे महत्वाचे बनते.
चौघा कलाकारांचे ‘टीमवर्क’ मस्त जमलंय. अभिनयातली सहजता नजरेत भरते. भूमिकांची निवड योग्य आहे. मयुरेश पेम याने दिलीपची, मुक्याची भूमिका केलीय. मुका असूनही प्रेम व्यक्त करण्याची धडपड नजरेत भरते. रंगभूमीवरला वावर लक्षवेधी. मनमीत पेम याचा बहिरा ही त्याची लपवाछपवी मस्त करतो. नव्या पिढीचा विनोदवीर म्हणून सिद्ध होतो. देहबोली चांगली.
विकास पाटील याचा विजय अंध असूनही रुबाबदार आहे. अंधत्वावर मात करण्याचा त्याचा प्रयत्न हशे वसूल करतो. वस्तूंच्या जागांचा घोळात घोळ आणि त्यातून निर्माण झालेला पेचप्रसंग उत्तम. मोहिनीच्या भूमिकेत रिचा अग्निहोत्री शोभून दिसते. या तिघांपुढे ती ठामपणे उभी राहते. प्रेम व्यक्त करतानाची उडालेली फट्फजिती चांगलीच रंगली आहे. टीमवर्क चोख आहे.
पडद्यामागेही सारी जुळवाजुळव नाटकाच्या आविष्काराला साथ देणारी. प्रदीप पाटील यांनी नेपथ्य रचना करतांना टेबल, खुर्च्या, पायर्या, दरवाजे याची चांगली उभारणी केलीय. ती कुठेही खटकत नाही. शीतल तळपदे याची प्रकाशयोजना आणि वेदांत जोग यांचे संगीत तसेच उल्लेश खंदारे (रंगभूषा), चैताली डोंगरे (वेशभूषा) यांचीही ‘हजेरी’ आहे. तांत्रिक बाजू नाट्याला पूरक आहेत. त्यात ‘अतिरेकी’पणा नाही. भडकता नाही.
चंद्रलेखाचे कल्पक निर्माते, मोहन वाघ यांच्या निधनानंतर ‘ऑल द बेस्ट’ थांबलं नाही. देवेंद्र प्रेम याने त्याच्या ‘अनामय’ संस्थेतर्फे सुरूच राहिले. ‘ऑल द बेस्ट पार्ट २’ या नावाने नाटक व्यावसायिक रंगभूमीवर आले होते. मूळ कथानकात भर टाकून पूर्णपणे नवा प्रयोग सादर झाला. एखाद्या वर्कशॉपसारख्या त्याच्या दोन महिने तालमी झाल्या आणि ‘भाग टू’ वाजतगाजत आलं. त्यात इंप्रोव्हायझेशनवर भर होता. पण प्रयोग बंदिस्त होता ‘नाटकातलं नाटक’ त्यात गच्च भरलेलं. मयुरेश पेम (बहिरा), अभिजीत पवार (मुका), सनीभूषण मुणगेकर (अंध) आणि खूशबू तावडे यांची त्यात भूमिका होती. पुन्हा मूळ ‘ऑल द बेस्ट’ची रसिकांची मागणी कायम होती आणि आहे. या नाटकाने अंकुश, भरत, संजय यांच्याप्रमाणे दीपा परब, संपदा जोगळेकर, श्रेयस तळपदे, सतीश राजवाडे, आनंद इंगळे, जितेंद्र जोशी, सुहास परांजपे, राजेश देशपांडे, संतोष मयेकर यांना चमकविले. कमाल म्हणजे हिंदुस्थानातील बहुतेक सर्वच भाषांत याचे प्रयोग झालेत. बारा भाषांत किमान १० हजारावर प्रयोगांची आजवर नोंद झालीय. हे भाग्य महाविक्रमालाही लाजविणारे आहे. याचा हिंदीत प्रयोग बघण्याचा योग काही वर्षापूर्वी आला होता. जो एका नाट्य कार्यशाळेच्या विद्यार्थ्यांनी केलेला. ही संहिता, त्यातील विषय दमदारपणे पेश करणारे देवेंद्र पेम ग्रेटच! या ग्लॅमरस दुनियेत देवेंद्रसह अनेकांना नाव, प्रतिष्ठा, पैसा सर्वकाही या नाटकामुळे मिळावे. हे विसरता येणार नाही.
गेल्या काही वर्षभरातील विनोदी नाटकांच्या महापुरात विविध ‘प्रयोग’ हे आकारला आलेत. बरेचदा कथानक गायब आणि विनोदासाठी विनोदनिर्मिती असेही दिसले. पण शंभर नंबरी सोनं असणारी नाटके जरी जुनी असली तरी ती रसिकांनी मान्य केली. त्यावर प्रेमही केले. त्याच वाटेवरून हे नाटक नव्या टीमसह, नव्या तंत्रमंत्रासह प्रगटत आहे. दुरावलेला तरुण प्रेक्षक पुन्हा एकदा या निमित्ताने नाट्यगृहाकडे ओढला जाईल, अशी आशा करायला हरकत नाही.
ज्यांनी मूळ कलाकारांच्या संचातले नाटक बघितले असेल त्यांना या प्रयोगाशी तुलना करण्याचा मोह जरूर होईल. त्यावेळचे तरुण रसिक आज आजोबांच्या भूमिकेत शिरलेही असतील. ही अशी तुलना करण्याचा प्रयत्न टाळणे उत्तम. दुसरं म्हणजे शारीरिक अपंगत्व, व्यंग हा अपराध नाही. त्यांना समाजाने सांभाळून आणि समजून घेण्याची खरी गरज आहे. नाटकाच्या विनोदनिर्मितीसाठी कथानक गुंफले असले तरी त्याला असलेली दु:खाची, वेदनेचे किनार विसरता येत नाही. एका महाविक्रमी आणि निवृत्त न होणार्या शंभर नंबरी ‘बेस्ट’ प्रयोगाचा आस्वाद तरुणाईने आवर्जून घ्यावा.
ऑल द बेस्ट
लेखन / दिग्दर्शन : देवेंद्र पेम
नेपथ्य : प्रदीप पाटील
प्रकाश : शीतल तळपदे
संगीत : वेदांत जोग
रंगभूषा : उल्लेश खंदारे
वेशभूषा : चैताली डोंगरे
व्यवस्थापक : नितीन नाईक
निर्माता : देवेंद्र पेम
निर्मिती : अनामय प्रॉडक्शन