रखरखीत हा शब्द देखील थिटा पडावा असे वातावरण तापले होते. गावातल्या लोकांना तसे सगळे ऋतू सारखेच. उन्हाळा आला आणि गेला, फार तर यावेळी जरा जास्ती तापलंय एवढाच काय तो शब्दातील फरक. पण शरद कुंभारचे तसे नव्हते. आयुष्य शहरात गेलेला माणूस तो. नाही म्हणायला कधी कधी मित्रांच्या गावाकडे लग्नाच्या निमित्ताने किंवा जत्रेच्या निमित्ताने त्याचे जाणे झालेले होते. पण ते फार फार तर एखादी रात्र किंवा दोन दिवस यापलीकडे नाही. त्यामुळे पाच दिवसांसाठी ढोलेवाडीला आलेला शरद अवघ्या दोन दिवसात तिथल्या वातावरणाला कंटाळला होता. अगदी जीव त्रासला होता त्याचा.
दिवसभर कूलर आणि एसीची सवय असलेला शरद, एका चांगल्या चार्टर्ड अकाऊंटंटच्या हाताखाली काम करत होता. पुण्यासारख्या शहरात मध्यवर्ती ऑफिस होते. सगळ्या सुखसोयी हजर होत्या. लाइट नाहीत किंवा पाणी नाही, पंखा बंद पडलाय हे इतक्या वर्षात कधी अनुभवले देखील नव्हते. मात्र त्याच्या साहेबाला कुठून अवदसा आठवली आणि त्याने नरहरी नेवासकर सहकारी बँकेच्या ऑडिटचे काम स्वीकारले त्याला माहिती. पण त्याचा परिणाम म्हणून शरदला बँकेच्या ढोलेवाडी शाखेच्या ऑडिटची जबाबदारी देण्यात आली.
बरोबर आलेले सहकारी दोन दिवसात परत गेले आणि शरद खर्या अर्थाने कंटाळला. मुख्य कार्यभाग उरकला होता. आता राहिलेली किरकोळ कामे संपवायची तरी तीन दिवस लागणार होते. त्यात ढोलेवाडीला लोडशेडिंगचा शाप मिळालेला. बाहेर ऊन नाही तर सूर्य आग ओकतो आहे असे शरदला जाणवत असायचे आणि अचानक फिरतोय म्हणून पंखा म्हणायचा अशा अवस्थेतले ते यंत्र गपकन मान टाकायचे. अक्षरश: घामाच्या धारांमध्ये भिजत शरदला काम करायला लागायचे. त्यात लाइट नाही म्हणजे संगणकावरील काम देखील बंद करावे लागायचे. या सगळ्या अडचणीत तीन दिवसांचे सहा दिवस होऊ नयेत एवढी प्रार्थना सतत करणे हेच काय ते शरदच्या हातात होते.
शरदची सोय गावातच राहत असलेल्या बँक मॅनेजरच्या घरी करण्यात आली होती. त्याने घराबाहेर बांधलेल्या दोन छोट्या खोल्या रिकाम्या होत्या. त्यात शरद आणि मंडळींची सोय केली होती. संध्याकाळी बँकेचे काम उरकले की मॅनेजरच्या गाडीवर बसून घरी. बँकेच्या जुन्या इमारतीची एक बाजू ढासळल्याने, गेल्या पंधरा-वीस दिवसांपासून बँक बाजार समितीच्या बिल्डिंगमध्ये तात्पुरती हलवली होती. त्यामुळे ती काहीशी गावातल्या मूळ वस्तीपासून लांब आली होती. बँक आणि गाव यांच्यामध्ये प्रचंड सुनसान रस्ता. त्याच्या दोन्ही बाजूला पडीक जमीन. त्या रखरखत्या उन्हात तर ती जमीन अजून भकास वाटायची.
आज बँक मॅनेजर गावात कोणी नातेवाईक आजारी पडल्याने लवकर गुल झाला होता. त्यामुळे शरदने एकट्यानेच घराकडे जायचे ठरवले. शरद रमतगमत घराकडे निघाला होता. एरवी नजरसुद्धा टाकू नये असे वाटणारा तो उदास जमिनीचा लांबलचक पसरलेला सापाच्या वेटोळ्यासारखा पट्टा संध्याकाळच्या वातावरणात जरा बरा वाटत होता. दोन्ही बाजूला मोकळे असल्याने थोडा फार गारवासुद्धा जाणवत होता. ‘वेतोबाचा पार’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या त्या छोट्याशा वळणाला वळसा घालून शरद पुढे आला आणि त्याचे पाय जमिनीला खिळले. डाव्या हाताला एक सुंदर देखणी बंगली उभी होती. बंगलीवरचे `स्वागत’ हे नाव लांबून देखील सहज वाचता येत होते.
शरद थिजल्यासारखा त्या टुमदार बंगलीकडे पाहत होता. गेल्या चार दिवसात आपण आठ वेळा या रस्त्याने येणे जाणे केले पण ही बंगली आपल्या नजरेत कशी भरली नाही याचे त्याला आश्चर्य वाटत होते. बरं इतकी सुंदर बंगली आपल्याला दिसली आणि आपण विसरलो असे देखील घडणे शक्य नाही. आता त्याचे मन द्विधा व्हायला सुरुवात झाली होती. गेल्या चार दिवसात ही बंगली आपल्याला कधीच कशी दिसली नाही असे एक मन त्याला ठामपणे सांगत होते. दिसली असती तर ताबडतोब आपण मॅनेजरकडे नक्की चौकशी केली असती. तर दुसरे मन त्याला हसत होते. बँकेतून बाहेर पडलो की कधी एकदा घरी जातो अन दोन पेग मारतो या नादात असलेला तू, असा किती आजूबाजूला लक्ष देत होतास?
मनात वेगवेगळे विचार उसळत असताना त्याचे लक्ष मात्र बंगलीवर खिळलेले होते. छोटीशी पण आकर्षक अशी वास्तू होती. उगाच भव्यतेचा नाद न करता, खालती दुमजली घर आणि वरती छानशी गच्ची बांधलेली होती. गच्चीतले गुलाब लांबून देखील मन प्रसन्न करत होते. बंगलीबाहेर चारी बाजूला छानसे कुंपण आणि आतमध्ये छोटीशी पण छान बहरलेली बाग होती. आणि आतमध्ये चक्क एसी दिसत होता. त्या रखरखाटात एका क्षणात मन प्रसन्न करण्याची जादू त्या दृश्यात होती. क्षणभर खिडकीचा पडदा हलला आणि एक सुंदर चेहरा क्षणभरासाठी डोकावला आणि नाहीसा झाला. त्या एका क्षणात देखील त्या चेहर्याचे सौंदर्य शरदने टिपले.
बंगलीच्या दर्शनाने भारावलेला शरद आता त्या आकर्षक चेहर्याच्या जादूत गुंतला होता. काय करावे? वाजवावा का दरवाजा? शेवटी मनाचा हिय्या करून त्याने कुंपणाच्या दरवाजाकडे पाऊल टाकले. कुंडी अगदी आवाज न करता निघाली. बंगलीतली माणसे वक्तशीरपणे सगळ्याची काळजी घेत असणार हे नक्की. आतमध्ये शिरताच बाहेरून लहानशी वाटणारी ती बंगली जरा मोठी वाटायला लागली होती. आवारातून तिला बघताना ते साहजिकही होते म्हणा. त्या सुंदर चेहर्याचे दर्शन झाले तर ठीकच, नाहीतर निदान दोन घटका एसीचा वारा तरी मिळेल असा विचार करत शरदने दाराबाहेरची बेल वाजवली. आत कुठेतरी एक सुंदर किणकिणाट झाला आणि दरवाजा उघडला गेला. आतमधून एक साठ पासष्ट वर्षांचा रुबाबदार चेहर्याचा म्हातारा डोकावला.
`नमस्कार… मी शरद कुंभार…’
`आम्ही दारावर काही विकत घेत नाही…’ तुसड्या स्वरात म्हातारा खेकसला आणि शरद गडबडला.
`तुमचा काहीतरी गैरसमज होतो आहे साहेब. मी इथे बँकेत कामासाठी आलो आहे आणि..’
`बँक त्या दिशेला आहे आणि आता ती बंद होऊनही अर्धा तास उलटला असेल.’ म्हातारा एकही शब्द सरळ बोलण्याच्या मूडमध्ये नसावा.
`अहो, कोण आलंय?’ आतून एका स्त्रीचा प्रश्न आला आणि मागोमाग एक पन्नास पंचावन्न वर्षाची घरंदाज स्त्री डोकावली. तिचा तो करारी चेहरा, उभा राहण्यातला रुबाब पाहून तिचा घरातला अधिकार शरदच्या लगेच लक्षात आला आणि त्याने म्हातारीकडे मोर्चा वळवला.
`नमस्कार मॅडम. मी शरद कुंभार. तुमच्या गावात बँकेच्या ऑडिटसाठी पुण्याहून आलोय.’
`अरे वा. हो का? मग इकडे कोणीकडे?’
`गावात परत निघालो होतो आणि अचानक तुमचे हे सुंदर घर दिसले आणि राहवले नाही. पुण्यामुंबईच्या लोकांना हे असे सुंदर घर, परिसर बघायला मिळणे मुश्कील आहे आजकाल,’ शरद एका दमात बोलून गेला.
म्हातारीच्या चेहर्यावर काहीसा अभिमान झळकला, पण मग त्याचे प्रसन्न हास्यात रुपांतर करीत ती म्हणाली, `हो कोणालाही भुरळ घालेल असे घर आहे हे.’
`मी आत येऊ का?’ किंचित अवघडलेल्या स्वरात शरदने विचारले.
`आत येताय? या की…’ म्हातारी प्रसन्न वदनाने म्हणाली.
`तुम्हाला काय कोणी आमंत्रित केलेले नाही. तुम्ही स्वत:हून आत येत आहात!’ म्हातारा पुन्हा गरजला.
`अहो, वाटते शहरातल्या माणसाला अप्रूप. काय कोणी चोरून नेणार आहे का बंगली? तुम्ही या हो आतमध्ये.’ म्हातारीने म्हातार्याला दटावले.
शरद आतमध्ये शिरला आणि हॉलची सजावट पाहून थक्क झाला. बघताक्षणी मौल्यवान जाणवावीत अशी पेंटिंग्ज, पायाखाली वीतभर जाड गालिचा, भिंतीवर एक वाघाचे कातडे टांगलेले, हस्तिदंती घोड्याची जोडी…’ तो मंत्रमुग्ध होऊन सर्व पाहत राहिला.
`तुम्ही उभे का? बसा ना. आमच्या यांच्या बोलण्याचा राग मानू नका हां. काय आहे ना, आमच्या कुमुदला बघायला, छेडायला गावातली काही टवाळ मुले कायम इकडे घिरट्या घालत असतात. त्यामुळे मग..’
‘अच्छा खिडकीतून डोकावलेल्या त्या सुंदर चेहर्याचे नाव कुमुद आहे तर…’ मनातल्या मनात शरदने उगाचच दोन वेळा त्या नावाचा उच्चार केला.
`कुमुद बेटा पाणी आण गं…’ म्हातारीने आवाज दिला आणि शरद उगाचच सावरून वगैरे बसला. पुन्हा एकदा काही सेकंदासाठी पाणी देण्यापुरते त्या सौंदर्याचे दर्शन झाले आणि ते पुन्हा आतमध्ये गायब झाले. म्हातारीला बोलायला जाम आवडत असावे. तिने शरदचे पूर्ण नाव काय, शिक्षण काय, आईवडील काय करतात याची अगदी इत्थंभूत चौकशी केली. वर स्वत:च्या कुटुंबाचीही सगळी माहिती पुरवली. म्हातारा म्हातारी आणि कुमुद असाच काय तो छोटा परिवार होता. हे कुटुंब मूळचे जबलपूरचे. म्हातारा मिल्ट्रीमध्ये होता. कर्नल दौलतराव राठोड असे त्याचे नाव आणि बायकोचे सुलभा. सोलापुरात सैनिक म्हणून कार्यरत असताना कोणा दुसर्या कर्नलच्या नादी लागून त्याने ही जमीन विकत घेतली. ही जमीन घेतली आणि दौलतरावांची भरभराट सुरू झाली. कुमुदचादेखील जन्म झाला, बढती मिळत गेली इत्यादी इत्यादी. रिटायर व्हायच्या एक वर्ष आधी कर्नलने ही बंगली बांधायला घेतली होती आणि आता हा सणकी कर्नल सहकुटुंब इकडे स्थायिक झाला होता.
`इतक्या चौकशा कशाला हव्यात गं तुला? त्याला काय जावई करून घेणार आहेस का?’ दौलतराव पुन्हा एकदा तिरसटले.
`हो! काय हरकत आहे? मला तरी पसंत आहे, भेटून बघू यांच्या आईवडिलांना एकदा,’ म्हातारी ठणकावून म्हणाली आणि शरदच्या मनावर जणू मोरपीस फिरले. त्याचवेळी प्रचंड असा विजांचा कडकडाट झाला आणि शरद एकदम दचकला.
`अवकाळी पाऊस… इथले वैशिष्ट्य आहे…’ एक नाजूक आवाज आला. निसर्गाचे बदलते रुप बघण्यासाठी कुमुद हॉलच्या खिडकीपाशी आली होती. अवघ्या दहा मिनिटात प्रचंड अंधारून आले होते.
`गच्चीवर घेऊन जा त्यांना. अनुभव घ्या म्हणावं आमच्या बंगलीवरच्या पावसाचा..’ कौतुकाने सुलभाबाई म्हणाल्या.
सुलभाच्या मागोमाग गच्चीकडे निघताना शरदला उगाच आतून असे रुबाबदार फिलिंग जाणवत होते. ते गच्चीच्या जिन्याजवळ पोहोचले आणि कुमुदने पटकन त्याचा हात धरून त्याला शेजारच्या छोट्या बोळकांडात ओढले.
`का आला आहात तुम्ही इथे? निघून जा.. शक्य तेवढ्या वेगाने पळून जा. क्षणभर देखील थांबू नका इथे,’ तिच्या हाताला आलेला घाम शरदला जाणवत होता. भयाने, काळजीने तिचा चेहरा आकसला होता. नजरेत प्रचंड भीती होती.
`कुमुद..’ आतून सुलभाताईंची कठोर हाक आली आणि कुमुद हॉलकडे पळाली. क्षणभरापूर्वी घडले ते नक्की काय होते? भास होता का सत्य? कुमुद खरंच इतकी घाबरली होती का? कसला धोका आहे आपल्याला इथे? आता गच्चीवर कुमुदला एकांतातच काय ते विचारू. घडल्या प्रसंगाने शरदचे डोके सुन्न झाले होते. कुमुदला इथे काही धोका तर नसेल ना? तिला या लोकांनी पळवून आणून कैद तर केले नसेल ना? अवघ्या काही काळाचा सहवास पण त्याला कुमुदची जणू ओढ लागली होती. त्याच अवस्थेत तो गच्चीच्या पायर्या चढत गच्चीत पोहोचला आणि सभोवतालचे दृश्य बघून त्याच्या पायातले बळच सरले. बंगल्याच्या भोवती काळाकुट्ट अंधार साठलेला होता आणि फक्त बंगल्याच्या परिसरावर प्रचंड वेगाने पाऊस कोसळत होता. बंगल्या समोरील रस्ता त्याला अगदी स्पष्ट दिसत होता. रस्त्यावरून बँकेचा मॅनेजर आणि चार पाच गावकरी त्याच्या नावाचा पुकारा करत त्याला इकडे तिकडे शोधत पुढे निघाले होते…
शुद्ध आली तेव्हा शरदला आधी आपण कुठे आहोत तेच आठवेना. हळूहळू त्याच्या जाणिवा परत आल्या आणि त्याचे मन शहारून उठले. दिवसाचा नक्की कोणता वेळ आहे तेच उमगत नव्हते. आणि आता तर सर्वत्र अंधार दाटलेला होता. अंदाजाने गच्चीच्या जिन्याचा अंदाज घेत शरद हाताने चाचपडत पुढे झाला आणि खालच्या अस्पष्ट उजेडात त्याला जिन्याचा आकार दिसला. कसातरी धडकत, ठेचकाळत तो खाली उतरला आणि दुर्गंधाचा एक भपकारा त्याच्या नाकात बोचायला लागला. मिणमिणत्या उजेडाच्या दिशेने तो पुढे सरकला आणि धाडकन पाय अडकून कोसळला. त्याने हाताने चाचपडून पाहिले तर एका जाड वेलीत त्याला पाय गुंतला होता. इतक्या देखण्या, स्वच्छ बंगल्यात ही वेल आली कुठून? कर्नलऽऽ.. सुलभामावशी.. कुमुदऽऽ.. एकेकाला साद घालत तो अडखळत पुढे सरकत होता. अखेर तो त्या मिणमिणत्या उजेडात पोहोचला.
मगाशी मौल्यवान वस्तूंनी सजलेला तो हॉल आता एखाद्या जर्जर इमारतीच्या पडक्या भागासारखा दिसत होता. कोसळलेल्या विटा, कोळ्याची जाळी आणि एका कोपर्यात बसलेले लाल डोळ्यांचे कर्नल आणि सुलभा राठोड. ते त्यांचे अमानवी रूप पाहून शरद जोरात किंचाळला आणि दाराकडे धावला. क्षणात त्याने दरवाजा उघडला. समोर आणखी एक दरवाजा होता. तो घाईने लोटून शरद बाहेर पडला; मात्र तो पुन्हा एकदा हॉलच्याच दारातून आत शिरला होता. राठोड कुटुंब खुदूखुदू हसत त्याची मजा घेत होते आणि त्यांच्या मागे अंधारात उभी असलेली कुमुद अश्रू ढाळत होती.
`तुम्हाला काय कोणी आमंत्रित केलेले नाही. तुम्ही स्वत:हून आत आलात!’ कर्नलचा आवाज गरजला आणि पुन्हा एकदा शरदची शुद्ध हरपली.