माझा मानलेला परमप्रिय मित्र पोक्या त्या दिवशी पहाटे साडेपाच वाजता माझ्या घरी आला. मी डोळे चोळतच अंथरुणावरून उठलो आणि दार उघडलं. तो म्हणाला, टोक्या मला खरं सांग, पहाटेची स्वप्नं खरी होतात ना? मी म्हटलं, हो. चार-साडेचारच्या दरम्यान पडलेली स्वप्नं नाईन्टी नाईन परसेंट खरी होतात.
ते ऐकताक्षणीच पोक्याने उभ्या उभ्याच उंच उडी मारली आणि हसत हसत म्हणाला, दे टाळी. अरे टोक्या मिंधे सरकार गेलं बाराच्या भावात. धनुष्यबाण चिन्ह अलिबाबा आणि चाळीस चोरांकडून जाणार. शिवसेना पक्ष उद्धवसाहेबांच्या ताब्यात येणार आणि हे सगळे बंडोबा पाठीला पाय लावून जीव घेऊन पळत सुटणार.
– अरे, काय म्हणतोस काय!
– मग खोटं सांगतो की काय! अरे रात्रभर डोळ्याला डोळा नव्हता आणि पहाटे स्वप्नात सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश यांचा निकाल ऐकला आणि मी स्वप्नातच उडालो. ते म्हणाले, दोन्ही बाजूंचं म्हणणं ऐकल्यावर आम्ही या निष्कर्षाला आलो आहोत की महाराष्ट्र राज्य सरकारला एक क्षणभरही यापुढे सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही. गेले काही महिने आम्ही शिवसेनेच्या या दोन्ही बाजूंचं म्हणणं ऐकलं. महाराष्ट्राच्या समाजात या बंडखोरीविषयीच्या प्रतिक्रिया पाहिल्या आणि एक गोष्ट लक्षात आली ती म्हणजे मूळ शिवसेनेवर पक्षातील बंडखोरांनी आपला मालकी हक्क सांगण्याचा जो प्रयत्न दुसर्यांच्या सांगण्यावरून केला, तो अतिशय हीन दर्जाचा होता. त्याप्रमाणे धनुष्यबाण चिन्हासाठी त्यांनी सांगितलेला दावाही हास्यास्पद होता. मूळ शिवसेनेला उगाच पुराव्यासाठी हे सादर करा, ते सादर करा, असं सांगून निवडणूक आयोगाचा टाइमपास चालला होता. निकाल बंडखोरांच्या बाजूने द्यायचा हे आधीच ठरलं होतं. केंद्र सरकारमधील बंडखोर गटाचे धार्जिणे नेते यांनी आधीच आपली माणसं अगदी निवडणूक आयुक्तांपासून इतर अधिकार्यांपर्यंत घुसवल्यामुळे हा आयोग मूळ शिवसेनेच्या विरुद्धच निकाल देणार आणि पत्र व पक्षचिन्ह बंडखोर गटाला बहाल करणार, हे ज्योतिषांनीही सांगण्याची गरज नव्हती. इतका सरकारच्या आहारी गेलेला निवडणूक आयोग यापूर्वी कधीही नव्हता आणि आता आम्ही म्हणजे सुप्रीम कोर्टाने योग्य ठिकाणी चाप लावल्यामुळे पुढे कधीही होणार नाही. मूळ शिवसेनेचे वकील सिब्बल यांनी आपली सारी शक्ती, वकिली ज्ञान पणास लावून लोकशाही जिवंत राखण्यासाठी जी निकराची झुंज दिली ती असामान्य होती. आयोगापुढे त्यांचं काही चालण्यासारखंच नव्हतं. तो प्रयत्न दगडावर डोके आपटण्याचा होता. पण आपल्या निर्णयाने आपण कुठल्या राक्षसी शक्तीला आणि लोकशाहीचा व न्यायाचा गळा घोटणार्या बेगडी बुजगावण्यांना सहाय्य करत आहोत, याचं भान निवडणूक आयोगाला नव्हतं. या देशाच्या लोकशाहीची ही विटंबना सुप्रीम कोर्टाला पाहवत नव्हती. तरीही आयोगाच्या निर्णयात आम्ही हस्तक्षेप करू शकत नव्हतो. त्यांनी आपल्या मर्यादेची हद्द ओलांडली तरी आमचे हात कायद्याने बांधलेले होते. मात्र आता आमच्या सुप्रीम कोर्टाच्या कक्षेत मूळ शिवसेनेने रीतसर अपील केल्याने गेल्या काही महिन्यांत चाललेला महाराष्ट्रातील तमाशा पाहून या लोकशाहीच्या मारेकर्यांना वठणीवर आणण्याची हीच वेळ आहे हे लक्षात घेऊन आम्ही कपिल सिब्बल यांना त्यांची बाजू मांडण्याची पूर्ण संधी दिली. उगाच वाटेल ते पुरावे तपासत मूळ प्रश्नाला सराईतपणे बगल देण्याचा बंडखोर गटाचा प्रयत्न आम्हाला समजत होता. पण आम्हीही या देशाचे प्रामाणिक नागरिक आणि लोकशाहीचे सच्चे रक्षणकर्ते आहोत. अंतिम न्यायदानाची सुप्रीम जबाबदारी आमची आहे. ती आम्हाला टाळून चालणार नाही. लोकशाहीची विटंबना करू पाहणार्यांना आणि त्यांना साथ देणार्यांना धडा शिकवण्याची हीच वेळ आहे. त्यामुळे निकालात आम्ही आमची आणि लोकशाही रक्षणाची जबाबदारी लक्षात घेऊन असा निकाल देणार आहोत की अशा देशविघातक शक्तींनी आणि विचारांनी पुन्हा डोकं वर काढू नये. केवळ मोठमोठे नावाजलेले, कोटी कोटी फी दिवसाला घेणारे वकील बरोबर घेऊनसुद्धा खर्याचं खोटं करणं शक्य होणार नाही, हे आम्ही या निकालाने सिद्ध करणार आहोत. केवळ कागदी पुरावे नाचवून आणि तारखांच्या व काही प्रक्रियांबद्दल संशय उत्पन्न करून न्याय विकत घेता येत नाही. अशाने न्यायालयांवर, लोकप्रतिनिधींवर जनतेचा विश्वास राहणार नाही. आज महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील जनता गेले चार महिने चाललेले गैरप्रकार पाहून उद्विग्न झाली आहे. हे मोठे राज्यकर्ते सूडबुद्धी मनात बाळगून असं कसं काय वागतात, असा प्रश्न तिला पडला आहे. सत्ता येते आणि जाते, राज्यकर्ते बदलतात, पण कायदे पायदळी तुडवून मनमानी पद्धतीने चाललेला हा लोकशाहीचा खेळखंडोबा आम्ही उघड्या डोळ्यांनी पाहू शकत नाही. त्यामुळे लोकशाही जिवंत राहण्यासाठी, लोकभावनेची कदर करण्यासाठी आम्ही या निष्कर्षाला आलो आहोत की आजपासून मूळ शिवसेनेचे उद्धव ठाकरे हेच पक्षप्रमुख राहतील. त्यांच्या पिताजींनी स्थापन केलेली शिवसेना हीच खरी शिवसेना आहे. गैरमार्गाने बनवेगिरी करून राज्याच्या मंत्रीपदावर बसलेले सर्व मंत्री या क्षणी पायउतार होतील…
हे शब्द ऐकल्यावर मी झोपेतच उडी मारली आणि पलंगावरून कधी खाली पडलो ते कळलंच नाही.
हे सांगताना पोक्या आनंदाने नाचत होता… बागडत होता… म्हणत होता, पहाटेची स्वप्नं खरी होतात… हो खरी होतात.