विधिमंडळाचं कामकाज पाहिलं, दिल्ली पालिकेतली मारामारी पाहिली आणि रोज सगळ्या पक्षाच्या नेत्यांनी केलेले आरोप प्रत्यारोप पाहिले की धुळवड हा आपला राष्ट्रीय सण म्हणून जाहीर करायला हवा, असं वाटतं… कधी बदलणार हे भयंकर चित्र?
– रामकृष्ण शेवडे, चिंचोली
तुम्हाला याची सवय झाली की चित्र बदलेल… सवय नसल्याने भयंकर वाटतंय… निराश हाऊ नका… विश्वास ठेवा… एक दिवस चित्र बदलेल तेव्हा तुम्ही आम्ही पण नेत्यांच्याच भाषेत बोलायला लागलेले असू!
गौतमी पाटीलच्या लावणीमध्ये काही लोक शास्त्रीय नृत्य कशाला शोधायला जातात? लावणी आहे ती, रांगडी गंमत असणारच ना!
– सारिका माने, पिंपळगाव
म्हणजे घरी सांगायला मोकळे… काल रात्री शास्त्रीय नृत्य बघायला गेलो होतो म्हणून!
लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये एखाददुसरा खून झाला तर त्या नात्यालाच बदनाम करायला निघालेले लोक जेव्हा एखादा नवरा बायकोला कैचीने भोसकून मारतो, डोक्यात शिलाई मशीन टाकतो, तेव्हा पारंपरिक विवाहसंस्थेला दोष का देत नाहीत?
– प्रांजली मोरे, माणगाव
त्यांच्या लग्नाच्या वेळी कोणी विवाहसंस्थेला दोष दिला नाही, त्याचा बदला घेत असतील ते.
माझ्या मित्राला कोंबडीपालनाचा उद्योग करायचा आहे. त्याला काय सल्ला द्याल?
– राजा लिमये, रत्नागिरी
कोंबडे पण पाळ म्हणावं.. एकटा काय काय करणार तो… तुम्हीही मदत करा त्याला… कोंबडीपालनात…
जगात सगळ्यात कडक नशा कशाची?
– हिरामण बोडके, पाचलगाव
आधी हलकी फुलकी नशा करून बघा… झेपली तर मग कडक नशा शोधा.
तुमची बायको तुमचा फोन चेक करते का हो?
– रवींद्र सोनवणे, सांताक्रूझ
हे काय विचारणं झालं का? ज्या बायकोला नवर्याच्या पुरुषत्वावर विश्वास असतो, तीच बायको नवर्याचा फोन चेक करते (असा पॉजिटिव्ह अप्रोच ठेवा… मग असे आडून आडून प्रश्न विचारायची गरज पडत नाही).
यंदाचं महाराष्ट्र सरकारचं बजेट हे पंचामृत बजेट होतं, असं अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. ही परंपरा चालू ठेवून पुढच्या बजेटसाठी तुम्ही काही नावं सुचवा.
– राजेश खरात, पळसपे
तुळशी पत्र बजेट…. विषय क्लोज.
कांद्याची भानगड काही समजत नाही हो आपल्याला. भाव कधी इतके जास्त होतात की ग्राहकाला रडवतो. कधी इतके पडतात की शेतकरी आत्महत्या करायला मजबूर होतो… हे रहस्य काय आहे?
– जीवन कापसे, भोकरदन
तरीही शेतकरी त्याच त्याच लोकांना निवडून द्यायला का मजबूर होतो? या रहस्याचा शोध लागला की सांगतो उत्तर.
सामान्य माणसांच्या घरातही चार-पाच कोटी रुपये सहज सापडू शकतात, असं कर्नाटकात ज्यांच्या घरी सहा कोटी रुपये रोख रकमेच्या स्वरूपात सापडले, त्या भारतीय जनता पक्षाच्या आमदाराने म्हटलं आहे. तुमच्या घरी किती पडली आहे कॅश?
– कुंदन बच्छाव, इस्लामपूर
माझ्या घरी एटीएम कार्ड्स आहेत (बिन कामाची)… पंतप्रधानांचं त्यांची माणसं ऐकत नसली तरी मी ऐकलं आणि घराबरोबर बँक खातं पण क्याश लेस केलंय. (खरं म्हणजे ते झालंय.)
मी योग्य व्यवसाय सुरू केला, तर २०२४ सालात माझी फार भरभराट होईल, असं एका ज्योतिष्याने सांगितलं आहे. मी कोणत्या व्यवसायाचा विचार करावा, काही सुचवाल का?
– प्रकाश मुकादम, काळाचौकी
काय घाई आहे… २०२४ला वेळ आहे अजून… तरीही घाई करायची असेल तर मेहनत सोडा आणि मुकादमगिरी सुरु करा.
महिलांना एसटीचा प्रवास अर्ध्या तिकिटात करता येणार आहे यापुढे. हा महिलांची हाडे खिळखिळी करण्याचा कटच नाही का? त्यापेक्षा पूर्ण तिकीटाचे पैसे देणार्यांचा प्रवास सुखाचा का करत नाही हे सरकार?
– मालती भिवरकर, गोंदिया
पूर्ण तिकिटाचे पैसे देणारे सहनशील असतात. अर्ध्या तिकिटचे पैसे देणारे बजेट मांडनार्यांच्या आई-बहिणीची सारखी आठवण काढतात. म्हणून अर्ध्या तिकिटवाल्यांना सवलती मिळतात.