‘पिग्मॅलिअन’ या गाजलेल्या नाट्यकृतीवर १९६४ साली आलेली ‘माय फेअर लेडी’ म्युझिकल फिल्म ही चांगलीच गाजली होती. याच कलाकृतीने प्रेरित होऊन विश्वास जोशी यांच्या दिग्दर्शनाखाली ‘फुलराणी… अविस्मरणीय प्रेम कहाणी’ हा चित्रपट तयार करण्यात आला आहे. नटसम्राट या सुपरहिट चित्रपटाचे दिग्दर्शक विश्वास जोशी हा चित्रपट कसा घडत गेला याविषयी म्हणाले, ‘पिग्मॅलिअन’ नाटकाच्या कथेने नेहमीच आकर्षित केलं आहे. या कथेवर सिनेमा बनवायचा ठरलं तेव्हा ही फिल्म पीरियड फिल्म करावी का आजच्या काळातील करावी याबाबत द्विधा मनस्थिती होती. शेवटी मी ही गोष्ट आजच्या काळात मांडायचं ठरवलं. सौंदर्य स्पर्धा, फॅशन वर्ल्ड या पार्श्वभूमीवर एका साधारण मुलीचा कायापालट कसा होतो हे या सिनेमातून प्रेक्षकांना दिसेल.
सुबोध भावे यांना बायोपिक किंवा ऐतिहासिक व्यक्तिरेखा साकारायला आवडते का, या प्रश्नावर ते म्हणाले, मला सर्व प्रकारच्या भूमिका करायला आवडतात. निर्माते, दिग्दर्शक माझ्याकडे याच भूमिका घेऊन येतात त्याला मी काय करणार! या चित्रपटाच्या निमित्ताने मी एक वेगळी भूमिका करत आहे. वीस वर्षांपूर्वी सई ताम्हणकर माझी हिरोईन होती, ती स्टार झाली. या चित्रपटात माझ्यापेक्षा वयाने वीस वर्ष लहान आलेली प्रियदर्शिनी हिरोईन आहे, आता ती मोठी स्टार होईल. ‘फुलराणी’सारख्या गाजलेल्या नाटकाच्या गोष्टीत काळानुसार बदल करताना आम्ही शुद्ध अशुद्ध भाषेपेक्षा, अशिक्षित मुलीचा मॉडेल होण्याचा प्रवास मांडला आहे.
‘हास्य जत्रा’मधील अभिनेत्री प्रियदर्शिनी इंदलकर ‘फुलराणी’ चित्रपटात प्रमुख भूमिका करत आहे. ‘प्रियदर्शिनी’ ते ‘शेवंता’ बनण्याचा आपला प्रवास अत्यंत आश्चर्यकारकरीत्या आणि अनपेक्षितपणे पूर्ण झाल्याचं सांगत प्रियदर्शनी म्हणाली, खरं तर ‘फुलराणी’सारखा इतका मोठा सिनेमा आणि त्यात टायटल रोल साकारण्याची संधी मिळेल असं कधीच वाटलं नव्हतं. ‘फुलराणी’साठी ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या गाजलेल्या दृश्याचं ऑडिशन द्यायला मला जेव्हा सांगितलं गेलं तेव्हा माझं सिलेक्शन होईल असं वाटलंच नव्हतं. एक तर माझं पाठांतर नव्हतं आणि बर्याच अभिनेत्रींना हे तोंडपाठ आहे. त्यामुळे पाठ करून सादर करणं हा माझ्यासाठी मोठा टास्क होता. आपण काही सिलेक्ट होणार नाही, असं मानून आपल्याला जसं वाटतंय तसं करूया असा विचार केला. आश्चर्य म्हणजे दुसर्याच दिवशी कॉल आला आणि मला ऑफिसमध्ये भेटायला बोलावलं गेलं. भेटल्यावर पहिल्याच मिटिंगनंतर विश्वाससरांनी मला लॉक केलं होतं हे मला नंतर समजलं. सुबोध भावे यांना सेटवर सर्व सुबोध दादा म्हणत होते. पण जर मी सुद्धा दादा म्हणाले तर त्या व्यक्तिरेखेवर प्रेम कसं करणार. मग मी सुबोध सर म्हणू लागले. ते अभिनय करताना डोळ्यातून खूप सुंदर व्यक्त होतात. सिनियर कलाकारांच्या सोबत काम करताना अभिनयातील अशा अनेक गोष्टी मी शिकले. भाषेचा लहजा, हेलकावे, लकबी टिपत ही ‘फुलराणी’ मी साकारली आहे.
‘फिनक्राफ्ट मिडिया’, ‘अमृता फिल्म्स’ आणि ‘थर्ड एस एंटरटेन्मेंट’ने या चित्रपटाची प्रस्तुती केली असून विश्वास जोशी, अमृता राव, श्वेता बापट चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते आहेत. लेखन विश्वास जोशी व गुरु ठाकूर यांनी केले आहे. गीते बालकवी व गुरु ठाकूर, मंदार चोळकर यांची असून संगीत निलेश मोहरीर यांचे आहे. २२ मार्चला गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर प्रदर्शित होणार्या ‘फुलराणी’ चित्रपटाचे वितरण वायकॉम १८ स्टुडिओ करणार आहेत.