दारिद्र्याने पिचलेल्या दु:खी कष्टी लाकूडतोड्याने थरथरत्या हाती कुर्हाड घेऊन पुन्हा जंगलाची वाट धरली. एका पडक्या कोरड्या विहिरीच्या काठाशी असलेल्या वाळक्या, वठलेल्या झाडावर तो धारदार कुर्हाडीचे घाव घालू लागला. दुपारच्या रणरणत्या उन्हात तो घामाने ओलाचिंब होऊन तहानेने व्याकूळ झाला होता.
फांदीवर त्याने एक शेवटचा एक जोरदार घाव घातला आणि त्याच्या हातातून निसटून कुर्हाड विहिरीत पडली आणि तोही झाडावरून घसरून दूरवर जाऊन पडला. अंगाला खरचटले, विव्हळत कसाबसा उठून बसला. कुर्हाड खोल विहिरीत पडली होती. आता झाड कसं तोडणार आणि घरी सरपण कसं नेणार, रात्री चूल कशी पेटणार, बायको पोरं काय जेवणार या चिंतेने विचाराने तो रडू लागला.
अचानक आसमंतातून ‘नमो नमो’ असा धीरगंभीर मंत्रोच्चार ध्वनी येऊ लागला. विहिरीतून एक शुभ्र दाढीदारी तपस्वी तेज:पुंज देवदूत बाहेर आला. अत्यंत दयाळू, कनवाळू सुरात लाकूडतोड्याला विचारले, ‘मित्रों, काय परेशानी आहे तुला? असा काय रडतोय? तुला ठाऊक नाही का, असं चारचौघांत भोकाड पसरायची नौटंकी फक्त मला एकट्यालाच करायची असते. काय आहे तुझी समस्या, सांग बघू लवकर; माझ्याकडे वेळ कमी आहे, मला निवडणूक प्रचारातून जनसेवा करायला क्वचितच वेळ मिळत असतो.’
‘हे देवदूता, आज लाकडे तोडताना माझी कुर्हाड पुन्हा विहिरीत पडली आहे, सरपण घरी नेले नाही तर माझ्या घरी चूल पेटवण्याचे स्वयंपाक करण्याचे पुन्हा वांधे होणार आहेत, माझ्यावर दया करा, मला विहिरीत पडलेली माझी कुर्हाड परत काढून देता का?’ लाकूडतोड्याने हात जोडून अत्यंत अजिजीने विनंती केली.
‘अरे लाकूडतोड्या, मागच्या वेळी तुझी कुर्हाड अशीच विहिरीत पडली होती, त्यावेळी तुझ्या प्रामाणिकपणाचे बक्षीस म्हणून तुला सोन्याची, चांदीची आणि तुझी लोखंडाची कुर्हाड दिली होती. त्याचबरोबर उज्ज्वला योजनेअंतर्गत कुकिंग गॅस कनेक्शन दिले होते. आता तुला पुन्हा जंगलात येऊन लाकडे तोडून सरपण गोळा करण्याची गरज का पडतेय?’ नमो देवदूताने चौकसपणे विचारले.
‘नमोदेवा, तुम्ही उज्ज्वल गॅस कनेक्शन मोफत दिले. गॅस कनेक्शनवर सबसिडी मिळण्यासाठी मला बँकेत अकाऊंट उघडावे लागले. बँक अकाऊंट लिंक करण्यासाठी मला आधार कार्ड काढावे लागले. ते आधार कार्ड लिंक करण्यासाठी पॅन कार्ड काढावे लागले. पॅन कार्ड बँक खात्याला लिंक केले. बँक अकाऊंटचे एसएमएस ओटीपी येण्यासाठी मोबाइल खरेदी केला. गॅस सिलिंडर बुक करण्यासाठी दर महिन्याला रुपये २००-३००चा मोबाइलचा रिचार्ज पॅक मारत होतो. मात्र दरवेळी गॅस सिलिंडर रुपये १२००/- मोजून विकत घ्यावा लागतो. प्रत्येक वेळी एवढे पैसे कुठून आणावेत, मोठा प्रश्न असतो. त्याची तीन-चार रुपये सबसिडी बँकेत जमा झाल्याचा एसएमएस कधीतरी येत असतो. मात्र खात्यावर पुरेसे पैसे नाहीत, एसएमएस चार्जेस वगैरे गोष्टींच्या नावाखाली ती बँकच त्या पैशावर डल्ला मारत असते. एवढं करून प्रत्येक वेळी देशाच्या विकासासाठी गॅस सबसिडी सोडून द्या, असा संदेश गॅस कंपनी नियमित पाठवत असते. तीनेक वर्षापूर्वी लॉकडाऊन चालू असताना सक्तीने घरात डांबून राहावं लागलं होते. घरात शासनाकडून रेशनवरचे शिधा धान्य तेल मोफत मिळत होते, पण गॅस सिलिंडर मोफत नव्हता. सरते शेवटी मागच्या वेळी तुम्ही दिलेल्या सोन्या-चांदीच्या कुर्हाडी विकण्याचा प्रयत्न करून पाहिला. पण एवढ्या महागड्या मौल्यवान कुर्हाडी कुठून घेतल्या, त्यांच्या खरेदीच्या पावत्या काही दाखवता आल्या नाहीत. त्यामुळे त्या कुर्हाडी खरेदी करायला कुणी खरेदीदार मिळेना. सोने चांदीची ऐतिहासिक दुर्मिळ धारदार हत्यारे घरात चोरून विनापरवाना लपवून ठेवलीत, अशी खोटी तक्रार करून शेजार्याने माझ्याविरोधात पोलीस चौकशी सुरू करून दिली. त्यामुळे माझ्या सोन्याचांदीच्या कुर्हाडी, बँक खाते, थोडे फार पैसे वगैरे ईडी सीबीआय वगैरे विभागांनी घरदार सारे काही सीलबंद जप्त करुन ठेवले आहे. मी पुरता कंगाल झालो आहे. माझ्यामागे पोलीस चौकशीचा ससेमिरा सुरु झाल्याने मला कुणी मजुरीवर काम देत नाही. कुटुंबाचे पोट भरण्यासाठी मला पुन्हा लाकडे तोडण्याशिवाय दुसरा काही पर्यायच राहिला नाही.’
‘अरे लाकूडतोड्या, तुला गॅस सिलेंडर घ्यायला परवडत नाही ना. तर तुला मी एक युक्ती सांगतो. तुझ्या घराजवळ शौचालय असेलच. तिथल्या गटारचे चेंबर हुडकून काढ. त्या चेंबरमध्ये गॅस शेगडीची नळीचे दुसरे टोक चेंबरमध्ये टाक. चेंबरमधल्या गॅसने शेगडी पेटेल. त्यावर तुमच्या कुटुंबांचा स्वयंपाक होईल. मोबाईलला युट्युबवर ‘मन की बात’चे एपिसोड चालू करुन स्वयंपाक करत जा. त्यामुळे अन्न लवकर पकत म्हणजे शिजत जाईल. तुझी पैशाची बचत होईल, त्या पैशातून तू अदानी कंपनीचे शेअर्स खरेदी कर, त्या शेअर्सच्या खरेदी विक्रीतून तू लवकरच श्रीमंत होशील. असे लाखो लोकांचे उत्पन्न वाढून आपला देश जागतिक आर्थिक महासत्ता होईल.’ एवढे बोलत असताना नमोदेवाने आपल्या स्मार्टफोनवर लाकूडतोड्यासोबत एक सेल्फी काढला. आणि तो अंतर्धान पावला.
ही सारी अद्भुत घटना पाहून भक्त लाकूडतोड्या भलताच इंप्रेस झाला आणि तो हर्षवायू होऊन मोठमोठ्याने हसत घराकडे पळत सुटला.