□ पंडित नेहरूंच्या वारसांना त्यांचे नाव लावण्याची भीती का वाटते? – पंतप्रधान मोदी.
■ इंदिरा गांधी यांना वडिलांचे नाव वापरण्याची संधी होती, ती त्यांनी नाकारली. कारण भारतीय समाजात तशी पद्धत आहे. तुम्हीही मातोश्री हीराबेन यांच्या घराण्याचे आडनाव लावलेले नाही ना? नेहरू आडनाव न लावताही तुमचा पक्ष घराणेशाही घराणेशाही म्हणून कोकलत असतो, ते लावले असते, तर तुम्ही केवढा थयथयाट केला असता?
□ खुर्च्या येतात, जातात… मला लोकांच्या हृदयात स्थान हवंय – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे.
■ एक सुसंस्कृत राजकारणी आणि राज्यातील जनतेची काळजी वाहणारा कुटुंबप्रमुख मुख्यमंत्री म्हणून तुम्ही ते कधीच कमावलेलं आहे, उद्धवजी. ते सत्तेतले चिरकुट हिरावून घेऊ शकत नाहीत.
□ ‘वंदे भारत’मध्ये प्रवाशांना येणार विमानप्रवासाचा फील.
■ इथे कुणी फुकटची दारू पिऊन सहप्रवाशांच्या अंगावर मूत्रविसर्जन करून तो फील देणार नाही ना?
□ गेल्या १२ वर्षांत १६ लाख लोकांनी भारत सोडला…
■ ज्याच्याकडे पैसा आणि पर्याय असेल, तो इथे राहायला, मुलांना इथे वाढवायला वेडा आहे की काय?
□ गद्दार गँगमुळेच राज्यावर अवकळा – आदित्य ठाकरे.
■ एक पनवती गेली, आता हीसुद्धा जाईल लवकरच. आपण आशावादी राहिलं पाहिजे.
□ मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचा मार्ग मोकळा.
■ २०२२मध्ये धावली ना ती? मोदींनी हिरवा झेंडा दाखवला ना तिला? अजून मार्ग मोकळाच होतोय…
□ अदानींची संपत्ती वाढवण्यासाठी ईडी आणि सीबीआयचा वापर – राहुल गांधी.
■ जीव्हीकेच्या हातातून विमानतळ कसे हिसकावले गेले, ते सगळ्या देशाने निमूटपणे पाहून टाळ्या वाजवल्या आहेत राहुलजी! मोदीजी ने किया तो कुछ सोच के किया होगा, असं वाटत होतं त्यांना. ते ‘कुछ’ काय होतं ते आता कळायला लागलंय…
□ जातीवाचक शिवीगाळ करणे हा अँट्रॉसिटीचा गुन्हा नाही – कर्नाटक उच्च न्यायालय.
■ मुळात पंडितांनी जाती निर्माण केलेल्या असल्यामुळे त्यांची उतरंड असणं, अस्पृश्यता असणं, या सगळ्यातच काही गैर नाही, असं एकदाच जाहीर करून टाका, न रहेगी अॅट्रॉसिटी, न रहेगा गुन्हा!
□ आणखी एक प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेला, मिंधे सरकार ढिम्म.
■ मोदीजी नवा लॉलीपॉप आणून देतील हो! उगाच कशाला झोपमोड करताय स्वाभिमान विकलेल्यांची.
□ ‘ईडी’मुळेच विरोधकांची एकजूट – पंतप्रधान मोदी.
■ मोदीजी, ईडीमुळेच तुमच्या पक्षात ठिकठिकाणचे भयभीत जीव गोळा झालेले आहेत… तुमच्या पक्षाचा मूळ जीव किती छोटुकला आहे, याची तुम्हाला कल्पना असेलच की!
□ सोमय्यांची पीएचडी बोगस.
■ माणूसच बोगस तिथे डिग्री कुठून खरी असेल?
□ अदानीत गुंतवणूक नको, एलआयसीने हात झटकले.
■ बैल (चारा खाऊन) गेला (तेव्हा झोपा काढल्या) आणि झोपा केला…
□ शाहरूख खानच्या पठाणची ९०० कोटींची कमाई.
■ त्यातले नऊ दहा लाख तरी बहिष्कारी कावळ्यांमध्ये वाट, शाहरूख. त्यांनी आदळआपट केली नसती, तर त्यांची कावकाव बंद करण्यासाठी लोकांनी इतक्या हिरीरीने हा सिनेमा बघितला नसता.
□ पत्रकार वारिशे यांच्या हत्येची एसआयटी चौकशी होणार : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.
■ ती कराल हो, त्यातून जे सूत्रधार समोर येतील, त्यांना जेरबंद करायची हिंमत आहे का?
□ कसब्यात भाजपचे टेन्शन वाढले, आम्ही ‘नोटा’च्या पर्यायाचा वापर करू, ब्राह्मण समाजाची फलकबाजी.
■ सगळीकडे जातधर्माचे खड्डे खणून ठेवले की त्यात कधी ना कधी स्वत:ही पडण्याची वेळ येतेच.
□ मोदी मुंबईत येतील तेव्हा जनतेने स्वागत करावे. ते येतात तेव्हा काहीतरी देऊन जातात : देवेंद्र फडणवीस.
■ काहीतरी देऊन जातात? कुठून? स्वत:च्या खिशातून, पगारातून की बिगरसरकारी, बेहिशोबी पीएम केअर्स फंडातून? आमच्याच करांतून कामं करताय ना? सेवक आहेत ना ते जनतेचे? मग त्याची ही कौतुकं कशाला? शिवाय, मुंबईकडून कररूपाने नेता किती आणि देता किती?