आपण मरणांतानि वैरानि अशी संस्कृती पाळणारे लोक आहोत. शत्रूचे निधन झाले तरी आनंद व्यक्त करू नये, मृत्यूबरोबर वैर संपवावे, अशी ही उदार परंपरा. पण, गौरी लंकेशच्या हत्येनंतर फटाके वाजवणार्या आणि समाजमाध्यमांवर जल्लोष करणार्या हिडीस मोदीभक्तांनी ती कधीच लयाला घालवली आहे. दर वर्षी महात्मा गांधी आणि पंडित नेहरू यांच्या जयंती-पुण्यतिथीला या हिंस्त्र टोळ्या असाच धुडगूस घालत असतात. मात्र हे अपवाद. आपली संस्कृती मृत्यूच नव्हे, तर कोणत्याही निरोपाच्या टप्प्याला वैर संपवून अलविदा करण्याचीच आहे. मात्र, याला राज्यपाल पदावरून पायउतार झालेले भगतसिंग कोश्यारी अपवाद ठरतील. राज्यपाल हे काही लोकनेते नसतात, लोकप्रिय नसतात, त्यामुळे राज्यपालाच्या पायउतार होण्याने कुणाला दु:ख होण्याची शक्यता नसते… त्याचा रबरस्टँपसारखा वापर करून आपले राक्षसी मनसुबे तडीस नेलेले त्याचे दिल्लीतले मालक सोडून. मात्र, एक राज्यपाल पायउतार झाल्यावर अख्ख्या राज्याने सुटका झाली, अशी भावना व्यक्त करावी, इतकी नफरत कमावण्याचा विक्रम कोश्यारी यांच्या नावावर जमा झाला आहे.
प. बंगालमध्ये धनखड असोत, पाँडिचेरीत किरण बेदी असोत किंवा केरळ, तामीळनाडूतले राज्यपाल असोत- जिथे जिथे भारतीय जनता पक्षाची सत्ता नाही, तिथे तिथे राज्यपालांनी तिथल्या राज्यकर्त्यांची आणि जनतेची अशीच दूषणे कमावली आहेत, पण, त्यातही दूषणसम्राट ठरण्याचा मान कोश्यारींकडेच जाईल हे निश्चित. कारण, या राज्यांमध्ये राज्यपालांनी सतत भारतीय जनता पक्षाचे एजंट म्हणून सतत राजकीय काड्या करण्याचे उद्योग चालवले आहेत, तेच कोश्यारी यांनीही केलेच; पण, तामीळनाडूचे राज्यपाल रवी यांचा एका घटनेपुरता अपवाद वगळता राज्याच्या अस्मितेवर आघात करण्याची हिंमत एकाही राज्यपालाने केली नाही. बंगाल, केरळ, तामीळनाडूत असे काही केले तर सगळा प्रोटोकॉल बाजूला ठेवून जनता धिंड काढेल, याची धास्ती तिथल्या राज्यपालांना होती.
दुर्दैवाने, छत्रपती शिवरायांचा, मोगलांच्या छातीत धडकी भरवणारा महाराष्ट्र असा दरारा, असा वचक निर्माण करू शकला नाही, ही आपल्याला आवडणारी गोष्ट नसली, तरी वस्तुस्थिती आहे. कारण, महाराष्ट्र चिरफाळलेला आहे. भाजपने देशभर ‘फोडा आणि राज्य करा’ ही कार्यपद्धती अवलंबलेली आहे. तिच्यातून समाज किती चिरफाळतो, याचे दर्शन आज महाराष्ट्रात घडते आहे. कोश्यारी यांनी छत्रपती शिवरायांपासून महात्मा फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्यापर्यंत महाराष्ट्राच्या मानबिंदूंवर गरळ ओकले, तेव्हा ते निमूटपणे ऐकणारे आणि फुले दाम्पत्याच्या खासगी आयुष्यावरच्या गलिच्छ ‘नॉनव्हेज ज्योक’वर दात विचकणारे कोण होते? मराठीजनच होते ना? मुंबई आणि ठाण्यातून राजस्थानी आणि गुजराती वजा केले तर मुंबईत पैसा राहील काय, या संतापजनक विधानावर टाळ्या वाजवणारे हात अन्यप्रांतीयांचे होते का? हे पार्सल ज्या उत्तराखंडातून आले तिथेही यांची जीभ श्री शिवरायांच्या बाबतीत जरी अशी घसरली असती, तर तिथल्या जवान मर्दांनी त्यांना हटकले असते आणि अनाप शनाप भकू नका, अशी तंबी दिली असती. महाराष्ट्रातले कोश्यारींचे श्रोते गप्प कसे बसले? इथे कोणाहीबद्दल काहीही बोला, कोणालाही काही फरक पडत नाही, असे वाटून कोश्यारींची भीड चेपली याला त्यांना घोड्यावर बसवणारे भाजपेयी जेवढे जबाबदार आहेत, त्याहून अधिक महाराष्ट्रातले नेभळट मराठीजन जबाबदार आहेत, हे खेदाने नमूद करायला लागते.
आताही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले, त्याप्रमाणे पार्सल परत पाठवले गेले, त्याला जनतेची नाराजी, महाविकास आघाडीचा प्रखर विरोध आणि त्यातही शिवसेनेचा ऊग्र संताप जबाबदार असला तरी हा संपूर्ण विजय आहे का? नाही. आपण वेळोवेळी काहीही बरळून महाराष्ट्राचा अवमान केला, याबद्दल मावळत्या ‘भाज्यपालां’नी माफी मागितलेली नाही. त्यांना या पदावर नेमणार्यांनीही आमचे चुकले, असे म्हटलेले नाही. पहाटेच्या शपथविधीच्या वेळी जे साध्य करता आले नाही, ते सगळ्या प्रकारचे सामदामदंडभेद वापरून आणि राज्यपालांच्या अधिकारांचा गैरअर्थ लावून, त्यांचा गैरवापर करून मिंध्यांमार्फत साध्य केल्यानंतर यांना परतीचे तिकीट देण्यात आले आहे… ही हकालपट्टी नाही, तर शिस्तशीर राजीनामा देऊन तो मंजूर करण्यात आलेला आहे, ही सन्मानपूर्वक गच्छंति झालेली आहे. यातून पुणे आणि कोल्हापुरात फटाके फोडून आनंद व्यक्त करण्याइतके मराठीजनांना काय मिळाले? कमळाचे डेख?
एक पार्सल जात असताना त्या जागी रमेश बैस यांच्या रूपाने दुसरे पार्सल आले आहे, हे मूळ मध्य प्रदेशातील पार्सल झारखंडमार्गे आले आहे. त्यांचे नाव घोषित होताच, बैस या शब्दाच्या मराठी अर्थाच्या अनुषंगाने समाजमाध्यमांवर काही विनोद तयार झाले, काही कविता तयार झाल्या. बैस यांची कारकीर्द मोदीकाळात बहुतेक सर्व प्रकारच्या पदांवर नेमणुका झालेल्या करिश्माहीन, व्यक्तिमत्त्वहीन, निस्तेज, अनोळखी होयबांच्या कारकीर्दीपेक्षा वेगळी नाही. तेही मोदींनी ऊठ म्हटले की उठणार आणि बैस म्हटले की बसणार. मोदी ज्यांच्यावर धावून जायला सांगतील, त्यांच्यावर धावून जाणार. त्यांनी झारखंडात यापेक्षा वेगळे काही केलेले नाही. इथेही त्यांना वेगळे काही करण्याची संधी असेल, असे वाटत नाही.
पण, एखाद्या इतक्या मोठ्या पदावर कोणाची नेमणूक होते, तेव्हा त्यांचे स्वागत करण्याचीही आपली संस्कृती आहे. तिला अनुसरून आपण रमेश बैस यांचे मोकळ्या मनाने स्वागत केले पाहिजे. राजकीय पातळीवर त्यांच्याकडून शून्य अपेक्षा आहेत. मिंधे आणि महाशक्तीचे बेकायदा सरकार कोश्यारींनी प्रयत्नांची शिकस्त करून सत्तेत आणले आहे, आता मुंबई बळकावण्यासाठी सर्व प्रकारची सज्जता होईपर्यंत, हे कचकड्याचे बाहुले खेळवले जाणार आहे. त्या खेळात बैस यांचा हात असेलच. त्यांच्याकडून न्यायबुद्धी, समतोल निर्णयक्षमता आणि संपूर्ण राज्य आपले आहे, अशी उदार भावना यांची अपेक्षा नाही. त्यांच्या पक्षाची तशी परंपरा नाही. आम्हाला मते न देणार्यांचा आम्ही विकास करणार नाही, हे त्यांच्या विचारधारेचे लोकशाहीचे आकलन आहे. ते बैस यांच्या बाबतीत वेगळे असेल, ही अपेक्षाच नाही.
मात्र, निदान या पदावरून समारंभांमध्ये बोलताना त्यांनी पदाचे, जबाबदारीचे भान ठेवावे, महाराष्ट्रात राहून, इथले खाऊन महाराष्ट्राचा अवमान करू नये; या राज्याचे प्रेम कमावले नाही, तरी चालेल, पण, कोश्यारी यांच्याप्रमाणे तिरस्काराचे धनी होऊ नये, त्यांचा विक्रम अबाधित ठेवावा, इतकीच माफक अपेक्षा त्यांना कारकीर्दीसाठी शुभेच्छा देताना व्यक्त करायला हरकत नाही.